राजीव देशपांडे -
कोरोना महामारीच्या सावटाखाली प्रकाशित होत असलेला हा दुसरा वार्षिक अंक. कोरोनाच्या दुसर्या लाटेने चांगलाच तडाखा दिला. चळवळीतील अनेक सहकारी कार्यकर्ते, नातेवाईक, मित्र हिरावले गेले. त्या धक्क्यातून सावरत परिस्थिती आता कुठे सुरळीत होण्याच्या मार्गावर येऊ लागली आहे, बाजार फुलू लागले आहेत, सण-समारंभ, उत्सव, देवभक्ती, पर्यटन या सगळ्यांनाच उधाण आलेले आहे. लसीकरणाच्या ‘विक्रमी’ आकड्यांची जोरदार जाहिरातबाजी चालू असली तरी हा केवळ एक टप्पा आहे, याचे भान राखले पाहिजे. गाफील राहून चालणारे नाही, या आरोग्यतज्ज्ञांच्या इशार्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
त्याचबरोबर या वर्षात हवामान बदलाच्या परिणामांचे चटकेही भारतासकट सार्या जगाने चांगलेच अनुभवले. वादळे, अतिवृष्टी; त्यामुळे येणारे प्रचंड पूर, जंगलांना लागलेले वणवे यांसारख्या नैसर्गिक संकटांनी जगातील एकाही देशाला सोडले नाही. त्यात विकसित-अविकसित असा भेदभाव अजिबात नव्हता. त्यामुळे जीवितहानीबरोबरच साधन संपत्तीची हानीही बरीच झाली. पर्यावरण वाचवण्यासाठी झालेल्या चळवळींनी, पर्यावरणतज्ज्ञांनी या संदर्भातील पर्यावरण र्हासाच्या धोक्यांची जाणीव सातत्याने करून देऊनही भांडवलकेंद्री विकासाच्या प्रारुपाने पछाडलेल्यांनी त्याकडे पार दुर्लक्ष केले. त्याचेच घातक परिणाम आज सार्या जीवसृष्टीलाच भोगावे लागत आहेत.
अशा सगळ्या अवघड परिस्थितीत गेल्या वर्षभरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय आहे. कार्यकर्त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या खटल्यात विशेष सीबीआय न्यायालयात पाच संशयित आरोपींवर सप्टेंबरमध्ये आरोपनिश्चिती करण्यात आली. या वर्षात जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा प्रभावी वापर करत कार्यकर्त्यांनी अनेक बुवांना तुरुंगाचा रस्ता दाखवला; तसेच जातपंचायतीच्या मनमानीला लगाम घातला. अनेक महिलांचे चिकाटीने प्रबोधन करत, त्यांची भीती घालवत, त्यांच्या जटा कापून अघोरी प्रथेतून मुक्तता केली. कोरोना काळात वाढलेले ताणतणाव लक्षात घेत ‘अंनिस’च्या ‘मानसमित्र-मैत्रिणीं’नी अनेकांना भावनिक प्रथमोपचार देत आधार दिला. कोरोना काळात सोशल मीडियावरून पसरलेल्या व पसरवल्या गेलेल्या अनेक अंधश्रद्धा, गैरसमजुतीचा भांडाफोड, प्रतिवाद कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे केला. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस व नंतरही ‘अंनिस’च्या शाखांनी पूरग्रस्त संकलन केंद्रे स्थापन करून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. पर्यावरणपूरक गणेश विसर्जन, होळी लहान-पोळी दान, दिवाळीतील फटाकेविरोधी अभियन यांसारखे उपक्रम राबवत पर्यावरणविषयक जाणिवा वाढविण्याचे काम केले.
या सगळ्या आव्हानात्मक पार्श्वभूमीवर आम्ही या वर्षीचा वार्षिक अंक प्रकाशित करत आहोत. आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या नुकत्याच घडलेल्या आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध पत्रकार आणि ‘असेटिक गेम्स : साधूज्, आखाराज् अँड द मेकिंग ऑफ द हिंदू व्होट’ या पुस्तकाचे लेखक धीरेंद्र झा यांची मुलाखत या अंकात आम्ही देत आहोत. या मुलाखतीतून साधुविश्वातील एकूण व्यवहारांबद्दलचे अनेक तपशील वाचकांच्या माहितीत भर घालतील. तसेच ‘दलित पंथर’ या संघटनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने तिचे सहसंस्थापक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक ज. वि. पवार यांचीही सविस्तर मुलाखत देत आहोत. त्यामुळे सत्तरच्या दशकातील सामाजिक, राजकीय घडामोडींची; तसेच त्या घडामोडीत महत्त्वाची भूमिका पार पाडणार्या संघटनेची माहिती वाचकांना नक्कीच होईल; तसेच ‘वैज्ञानिक प्रगतीचे मूळ कशात आहे; मानवी गरजेत की मानवी कुतुहलात?’.. याचा ऊहापोह करणारा प्रा. प. रा. आर्डे यांचा प्रदीर्घ लेख वाचकांच्या माहितीत नक्कीच भर टाकेल. तसेच चक्रधर स्वामींच्या अंधश्रद्धा निर्मूलनाबाबतच्या विचारांबाबतचा लेखही वाचकांना नक्कीच भावेल. धार्मिक ग्रंथांची चिकित्सा; तसेच ‘अंनिस’च्या ज्येष्ठ कार्यकर्त्याची मुलाखत ही वार्षिक अंकाची नेहमीची सदरे आहेतच.
बाल विभागातील प्रसिद्ध कवी विरा राठोड यांच्या 12 बालकविता या अंकाचे एक वैशिष्ट्यच आहे. यावेळेच्या वार्षिक अंकातील प्रसिद्ध साहित्यिक सदानंद देशमुख, बालाजी मदन इंगळे आणि अरुणा सबाणे यांच्या कथा थोड्या वेगळ्या आहेत. सध्याच्या बदलत्या ग्रामीण परिस्थितीशी संबंधित त्या कथा आहेत. थेट अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय जरी या कथांचा नसला तरी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, दैववाद यांना पोषक परिस्थिती कशी निर्माण होत आहे, याची जाणीव देणार्या या कथा आहेत.
या वार्षिक अंकासाठी आम्हाला मुलाखत देणारे मान्यवर, अंकात लिखाण करणारे लेखक, साहित्यिक, कवी या सर्वांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत.
वार्षिक अंकाला नेहमीप्रमाणे भरघोस मदत करणारे जाहिरातदार, देणगीदार यांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो.
दरवर्षीप्रमाणे अथक प्रयत्न करत वार्तापत्राला जाहिराती, देणग्या मिळवून देणार्या व अंकाच्या निर्मितीत सहभागी असणार्या सर्व कार्यकर्त्यांना सलाम!
आमचे वाचक या अंकाचे मन:पूर्वक स्वागत करतील, अशी खात्री आम्हाला वाटते.