राजीव देशपांडे -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मार्गदर्शक, हितचिंतक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’ च्या वार्षिक अंकात १९९६ साली प्रसिद्ध झालेली मुलाखत पुर्नप्रकाशित करीत आहोत…
विज्ञाननिष्ठेची व्याख्या आपण कशी कराल?
विज्ञान हा विषय अस्तित्वात आला, तो मानवी जिज्ञासेतून. सृष्टीत माणसाला ‘चमत्कार’ दिसले. चमत्कार म्हणजे जी ‘घटना’ माणसाला अनपेक्षित, गूढ वाटली ती. या अनपेक्षित आणि गूढ घटनांचे निरीक्षण करीत, काय? कसे? आणि का? हे प्रश्न माणसाने विचारले. त्या प्रश्नांच्या उत्तरातूनच त्याला सृष्टीव्यापाराबद्दल वेगवेगळी माहिती मिळाली. त्या माहितीचा छडा लावताना काही ‘मूलभूत नियम’ त्याला कळाले आणि त्याची खात्री झाली. या सृष्टीतील प्रत्येक चमत्कारांमागे हे ‘मूलभूत नियम’ कार्यरत आहेत. त्या नियमाप्रमाणेच हा ‘सृष्टीव्यापार’ चालतो, यावर त्याची ‘निष्ठा’ बसली. हीच त्याची ‘विज्ञाननिष्ठा’ ही अभ्यासातून निर्माण झाली होती. या निष्ठेपायीच वैज्ञानिकांनी संशोधन केले, शोध लावले. त्यातूनच विज्ञानाची प्रगती साधली गेली.
या विज्ञाननिष्ठेचे अंतिम टोक नास्तिकतेपर्यंत जाते, असे आपणास वाटते काय? नास्तिकता या अर्थाने या विश्वाचा कोणी निर्मिक किंवा निर्माता नाही म्हणजे देव नाही, या अर्थाने.
विज्ञानाचे अंतिम टोक नक्की कुठे आहे, त्याच्याबद्दल आताच सांगता येणं शक्य नाही. उदाहरण घ्यायचे झाले, तर एखादा उंच जिना चढताना चार-पाच पायर्या चढून गेल्यावर त्याच्या पुढच्या आणखी पायर्या दिसतात. आणखी चार-पाच चढल्यावर त्याच्या पुढच्याही दिसतात, तेव्हा आपण काही अटकळी बांधतो की, हा जिना शेवटी कुठंपर्यंत पोचणार. तसे काही अंदाज, अटकळी बांधता येतील; पण विज्ञानाचे अंतिम टोक नक्की काय आहे, हे विज्ञानाच्या आताच्या टप्प्यावर सांगता येणार नाही.
पण ते नास्तिकताच असायला पाहिजे असे काही…
असं काही नाही; परंतु जितके-जितके तुम्ही विज्ञानाच्या क्षेत्रात शिरता, त्यावेळी विज्ञानाचे असे नियमच का आहेत, हा प्रश्न जाणवतो. पण याचे उत्तर विज्ञानात आपल्याला सापडणार नाही. अधिक तपशिलात गेल्यावर हेच नियम का? दुसरे का नाहीत? असेही प्रश्न पडायला लागतात. पण हे प्रश्न काही मूलभूत प्रश्न नाहीत. खरा मूलभूत प्रश्न आहे, असे नियम का आहेत? त्यावरून काही लोक म्हणतात, हे नियम आहेत, म्हणजे हे नियम करणारा नक्कीच कोणीतरी आहे. त्यातूनच देवाची भावना त्या लोकांत निर्माण होते. काही लोक याचा उलटा अर्थ घेतात. हे नियम आहेत, त्यांची अंमलबजावणी होतीय, त्यात कोणीही ढवळाढवळ करीत नाही. त्यामुळे देव ही गोष्ट असणार नाही, हे नास्तिकतेचे टोक झाले. या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी ‘अंतिम सत्य’ असावे, असे वाटते; पण ते काय आहे, हे मला सांगता येणार नाही. मला एवढेच आता गूढ अन् चमत्कारिक वाटते की, विज्ञानाचे हे नियमच का आहेत? नियम आहेत, दिसतात, त्याप्रमाणे व्यापार चालतात. आणखी खोलात जाऊन ते नियम स्पष्ट करता येतात. हे मी मान्य करतो, हे सर्व विज्ञानाच्या चौकटीत बसते.
मग हेच नियम विश्वाचे ‘वास्तव भान’ आहे काय… की नियम आहेत, त्याप्रमाणे सर्व चालते…
हो, इथपर्यंत आपण विधान करू शकतो. यापुढे जाऊन, हे नियम बनविणारा कोणी आहे म्हणजे कोणती तरी ‘सुपर पॉवर’ वगैरे आहे, असे मानणे किंवा या नियमाप्रमाणेच सगळं चालले आहे, ते नियम चालविण्यासाठी कोणाचीच आवश्यकता नाही, असे मानणे, ही दोन्ही टोके आहेत, ती दोन्ही टोके आतातरी मला मान्य नाहीत.
यालाच मग ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ आपण म्हणू शकू का?
वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे माझ्या मते असा की, असे विज्ञानाचे नियम आहेत अन् त्याप्रमाणे सृष्टीचे व्यापार चालतात, यावर माझी निष्ठा आहे अन् मला कोणीतरी एखादा चमत्कार करून दाखवला, ज्यांचा सकृतदर्शनी अर्थ मला कळत नाही. त्यावेळेस अभ्यास करून त्यामागचे उत्तर आज, नाही तर उद्या शोधून काढेन.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून ‘धर्मा’कडे पाहता येणे शक्य आहे, असे आपल्याला वाटते काय?
विज्ञानाचा आवाका मर्यादित आहे, तो वाढतोय. आपल्या मनात येणारे विचार, विकार, राग, लोभ वगैरे भावना कशामुळे येतात, याची कारणमीमांसा, संशोधन अजून विज्ञानात आलेले नाही. हा भाग पूर्वीपासून विज्ञानबाह्य राहिला आहे. या ठिकाणी धर्माने कारणमीमांसा केलेली आपल्याला आढळते. मनुष्य हा अनेक विकारांनी भारलेला आहे अन् तो समाजात समूहात राहत असल्याने त्याच्या वर्तणुकीवर निर्बंध घालणे भाग आहे, असे निर्बंध घालणारे धार्मिक विचार असणे आवश्यक आहे. ‘धारयती इति धर्म:’ या उक्तीप्रमाणे समाजधारणेसाठी मानवी वर्तणुकीवर काही निर्बंध घालणे किंवा सर्व सुरळीत चालावे यासाठी आचारसंहिता ठरवणे, हे मी धर्माचे काम समजतो; पण पुढे-पुढे याचे रूपांतर अमूक एका व्यक्तीने सांगितलेलाच धर्म योग्य; दुसर्याचा धर्म अयोग्य, असे सांगून संघर्ष सुरू करणे, हे मला पटत नाही. या ठिकाणी धर्म या कल्पनेचा दुरुपयोग केला जातो, असे वाटते.
वैज्ञानिक दृष्टिकोन अन् समाजजीवनाच्या आचारांचा नियमन करणारा धर्म, यामध्ये काही विसंगती असे आपल्याला वाटत नाही?
मूळ कल्पनेत विसंगती नाही. रॅशनॅलिझम किंवा ह्यूमॅनिझमच्या दृष्टिकोनातून धर्माकडे पाहिले, तर माणसाने माणसाशी करायचा व्यवहार म्हणजे धर्म. हा व्यवहार कसा करावा, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून ठरवावे…
कसा व्यवहार करावा, हे धर्म अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकेल?
धर्म सांगू शकेल; पण त्यामागचे जे निकष आहेत, ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून ठरवले गेले पाहिजेत.
एखादं उदाहरण…
सत्य बोलावे, असे धर्मात सांगितले आहे. ते वैज्ञानिक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. केलेल्या निरीक्षणाची जशीच्या तशी नोंद वैज्ञानिक करीत असतो. खरेपणाने जर नोंद केली नाही, तर येणारे निष्कर्षच चुकीचे येऊन संशोधनात अर्थच राहणार नाही. म्हणजे सत्य बोलणे, हा वैज्ञानिक दृष्टिकोनच आहे. असे प्रत्येक बाबतीत म्हणता येईल. धर्माप्रमाणे वर्तन कर, याचा अर्थ केवळ देवळात जाऊन पूजा करणे असा नाही, तर समाजात वावरताना एक जबाबदार व्यक्ती म्हणून वर्तन करणे.
आपण अंधश्रद्धांची व्याख्या कशी कराल?
अंधश्रद्धेची व्याख्या मी अशी करेन की, समजा तुम्ही एखाद्या घटनेवर विश्वास ठेवला की, ही घटना अमूक-अमूक कारणांमुळे घडलेली आहे; पण तुम्हाला प्रत्यक्ष प्रयोगाने कारणमीमांसा देऊन, जर असे दाखविले की, ती विशिष्ट घटना तुम्ही समजता त्यामुळे घडत नाही, तर त्या घटनांमागे दुसरीच कारणे आहेत. तरीही अट्टाहासाने, जाणून-बुजून त्याकडे दुर्लक्ष केले व मी म्हणतो, तेच बरोबर आहे व तुम्ही जे प्रयोग करून सिद्ध करता आहात, तेच चुकीचे आहे. अशा प्रकारच्या भावनेला ‘अंधश्रद्धा’ म्हणता येईल.
ही मानसिकता जी पुराव्याच्या वस्तुनिष्ठतेपेक्षा आपण म्हणता, त्याप्रमाणे काही प्रमाणात स्वत:च्या हेकेखोरेपणावर किंवा वास्तवाचा आधार नसलेल्या ठामपणावर आधारित आहे. ही मानसिकता आपल्या समाजात इतक्या मोठ्या प्रमाणावर का असावी की, जगभरच सर्वत्र ती तशी आहे?
हो, तशी ती जगभरच आहे. म्हणजे अमेरिकेसारख्या ठिकाणी, जिथे तंत्रज्ञानाची एवढी प्रगती झाली आहे, तिथेही ही ‘अंधश्रद्धाळू’ मानसिकता दिसून येते; परंतु आपल्या देशात ही मानसिकता मोठ्या प्रमाणावर दिसते. कारण ‘व्यक्तिनिष्ठा’ फार आहे. तथाकथित व्यक्तींचा, महात्म्यांचा प्रभाव इथल्या सामान्य माणसांवर खूप आहे. फोटोतून विभूती निघते, असे एखाद्या मोठ्या व्यक्तीने सांगितले की, लोक त्यामागची कारणे न शोधता विश्वास ठेवतात. एकेकट्या व्यक्तीच्या मानसिकतेतून अंधश्रद्धेची भावना काढणे सोपे गेले असते; पण त्या व्यक्तीची सूत्रे वरून दुसरा एखादा ‘महात्मा’ वगैरे यांच्याशी जोडलेली असतात व ती सूत्रे कापणे अवघड जाते.
पारलौकिकतेच्या आधाराची…
पारलौकिकता म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीने, महात्म्याने आपल्याकडे काहीतरी शक्ती आहे, असे दाखविण्यासाठी केलेला एखादा चमत्कार यामुळे लोकांचा त्या व्यक्तीवर मोठा विश्वास बसतो. ती व्यक्ती लोकांचा आपल्यावर विश्वास बसावा म्हणून चमत्कार करून दाखविते; तर ती व्यक्ती चमत्कार करते म्हणून लोकांचा ‘चमत्कारा’वर विश्वास बसतो. असा हा गुंता आहे व तो सोडविणे अवघड आहे. आता बघा, वेद हे अपौरुषेय मानले जातात. गुरूने सांगितले शिष्याने मुखोद्गत केले, असेच पिढ्यान्पिढ्या ते मुखोद्गत होत गेले; पण वेदात नक्की काय सांगितले गेले आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न कोणी केला नाही अन् फक्त पाठांतर केले गेले. गुरूने सांगायचे, शिष्याने मान्य करायचे. ही परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. आपण त्याचा खूप उदो-उदो करतो. कारण त्यात एक शिस्त आहे, श्रद्धा आहे. ठीक आहे, मान्यही आहे; पण त्याचा एक विपरीत परिणाम झाला. चौकस बुद्धीची परंपरा निर्माण होऊ शकली नाही. गुरूला कोणी वेदाचे अर्थ विचारलेत अन् गुरूने त्याचा कुठे खुलासा केलाय, असे कुठे दिसत नाही.
विविध स्वरुपाच्या अंधश्रद्धांबाबत बोलताना नेहमी कर्मकांडाच्या विरोधी बोलावेच लागते. या कर्मकांडांच्याकडे कसे बघावे, असे आपणास वाटते?
कर्मकांडे पूर्वी ज्या कारणांनी अस्तित्वात आली, त्या कारणांच्या खोलात गेले, तर कळते की, त्या कर्मकांडांना काही ना काही आधार त्या-त्या काळात होता; परंतु आताच्या काळाला तो आधार संयुक्तिक राहिला आहे की नाही, हे पाहणे जरुरीचे आहे. पूर्वीच्या काळात यज्ञ करीत असायचे, त्याचे काय कारण होते? यज्ञामुळे वातावरणात काही फरक पडायचा काय? पाऊस पडू शकायचा काय? त्याच्यामागे काही विज्ञान होते काय, हे जाणण्याचा प्रयत्न न करता केवळ तूप टाकून आग तयार करायची अन् पाऊस पडेल, अशी अपेक्षा करायची, ही ‘अंधश्रद्धा’च मानायला पाहिजे.
अंधश्रद्धेशी संबंधित कर्मकांडे व मानवी व्यवहाराशी संबंधित कर्मकांडे असा भेद करता येणे शक्य आहे का अन् तो करावा काय?
काही कर्मकांडांना प्रतीकात्मक महत्त्व असते, म्हणजे दुसर्याला पाय लागल्यावर नमस्कार करणे किंवा फोटोला हार घालणे या सर्व आदर व्यक्त करण्याच्या प्रतीकात्मक पद्धती आहेत. त्यामुळे तुमच्या विज्ञाननिष्ठेला काही बाधा पोचते, असे काही मला वाटत नाही; परंतु हा एक भाग झाला. माझा स्वत:चा अनुभव सांगतो. एखाद्या मोठ्या कॅथेड्रेलमध्ये; विशेषत: परदेशात चर्चमध्ये आत खूप शांत असते. अशा ठिकाणी जाऊन मला स्वत:शी संवाद साधायला खूप आवडते; मग त्यात माझे वैज्ञानिक विचार असतात, एखादी वैज्ञानिक कथा-कल्पना असते. त्याला ते शांत वातावरण पोषक ठरते. पण समजा, एखाद्या मंदिरात गेलो, तेथे खूप गर्दी आहे, घंटानाद होतोय, अशा ठिकाणी शांतपणे स्वत:शी संवाद साधणे अवघड बनते. त्यामुळे अशा देवळात मी केवळ देऊळ, त्याची वास्तुरचना पाहायला जातो.
वारंवार सांगितले जाते की, आज काही आधुनिक म्हणून सांगितले जाते, ते आमच्याकडे फार पूर्वीच सांगून ठेवलेले आहे. आमच्याकडे फार पूर्वीपासून एक प्रगत, वैज्ञानिक जीवनपद्धती होती आणि ती फक्त शोधून काढणे, एवढेच आता काम राहिलेले आहे. तर या बाबतीत आपल्याला काय वाटते?
मी ‘पुराणातील वांगी’ नावाच्या लेखात याबाबतीत सविस्तर लिहिलेले आहेच. पूर्वी काय होते याबाबतीत मीच कसा एकदा फसलो गेलो, ते तुम्हाला सांगतो. ‘शुक्रनीती’ म्हणून एक ग्रंथ आहे. त्यामध्ये आज जसे ‘प्रॉव्हिडंड फंड’ किंवा ‘वेलफेअर’ वगैरे जे असते किंवा मालकाने आपल्या नोकरांसाठी कोणत्या तरतुदी कराव्यात वगैरे नियम त्यात दिलेले आहेत. या सर्व गोष्टी त्यात संस्कृतमध्ये लिहून ठेवण्यात आल्या आहेत. मला सांगण्यात आले की, गुप्त साम्राज्याच्या वेळचा तो ग्रंथ आहे. मी फारच प्रभावित झालो. त्याचा मी एका लेखात उल्लेखही केला की, आपले पूर्वजही असे गुणात्मक लिहू शकत, सांगू शकत, तेव्हा आपण आपल्या पूर्वजांच्या अशा गुणात्मक बाजूंवर भर द्यावा; पण नंतर बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्कॉलर्सनी मला कळविले की, तुम्ही जो ‘उतारा’ दिलेला आहे, तो ‘प्रक्षिप्त’ आहे. ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतात आली, तेव्हा तिचे नियम पाहून केरळातील कुणीतरी ते संस्कृतात रचून ‘शुक्रनीती’त घुसडले. त्यामुळे अशा प्रकारचा प्रक्षिप्त भाग या जुन्या ग्रंथात खूप असतो. तसेच या ग्रंथातून ‘टेक्निकल इन्फॉर्मेशन’ जिला म्हणतात, ती कुठेच सापडत नाही. हल्ली ज्याचा खूप उदो-उदो केला जातो, त्या वैदिक गणिताचे उदाहरण घेऊ इथे. माझ्याकडे ते शंकराचार्यांचे वैदिक गणितासंबंधीचे पुस्तक आहे. बनारसमध्ये ते प्रसिद्ध आहे. ते मी पूर्ण वाचले तेव्हा मला त्यात ज्याला ‘मॉडर्न मॅथेमॅटिक्स’ किंवा ‘हायर मॅथेमॅटिक्स’ म्हणतात, असं काही आढळलं नाही. केवळ गुणाकार, भागाकार, वजाबाकी करायला सोपे नियम सांगितले आहेत, ते सुद्धा काही विशिष्ट परिस्थितीतच लागू पडणारे आहेत. तेव्हा याला गणित म्हणायचे की, निव्वळ आकडेमोड? जसं शकुंतलादेवींना ‘मॅथेमेटिशियन’ म्हटलं जातं; पण त्यांच्याकडे आकडेमोड करण्याच्या चांगल्या पद्धती होत्या, त्यापलिकडे आपण काही म्हणून शकत नाही. वैदिक गणित म्हणून जे म्हटले जाते, ते खुद्द वेदामध्येच नाही. ते नंतर घुसडण्यात आले, असे मानणारेही अनेक स्कॉलर्स आहेत. तरीही आपण असे म्हणू शकतो की, वैदिक गणितावर आणखी संशोधन करून त्याचे योग्य/ वास्तविक मूल्यमापन करायला पाहिजे.
हल्ली वास्तुशास्त्राचे जे ‘फॅड’ बोकाळले आहे, त्याच्या संदर्भात जे विज्ञान म्हणून सांगितले जाते, त्यात कितपत तथ्य आहे? उदाहरणार्थ, पूर्वेकडे स्वयंपाकघर असावे, असे सांगताना असे सांगितले जाते की, ही ‘अॅस्ट्रोबॉयलॉजी’ आहे. पूर्वेकडून सकाळच्या वेळी येणार्या किरणांत व्हिटॅमीन ‘डी’ आणि इतर शरीरोपयोगी गोष्टी असतात अगर पृथ्वीच्या दिशेने जमिनीतून पूर्वेच्या दिशेने व ईशान्येच्या दिशेने ऊर्जाप्रवाह वाहतो, त्यामुळे ईश्वराची दिशा ईशान्य वगैरे वगैरे.
या ‘तथ्य’ तर काहीच नाही, यात ‘विज्ञान’ काहीच नाही. हे निव्वळ ‘आभासी विज्ञान’ आहे. वर जी तुम्ही उदाहरणे दिलेली आहेत, त्यात वैज्ञानिक काहीही नाही. जसे- ग्रहणाच्या वेळी सांगितले जाते सूर्याकडे बघू नये आणि त्यासाठी जी कारणे दिली जातात, त्यातही तथ्य नसतं.
“अवकाश ही समग्र व्यवस्था कधी तरंग, तर कधी अणुस्वरुपात आहे. म्हणजे कधी साकार, तर कधी निराकार आहे, असे म्हणून अध्यात्मवादी म्हणतात की, हेच उपनिषदातले ‘ब्रह्मा’ होय, जे पूर्वीच सांगितले आहे. हे खरे आहे काय?
हे एक वरवरचे ‘शाब्दिक साम्य’ आहे. अधिक खोलात शिरून पाहिले तर असं साम्य अजिबात दिसत नाही.
मंगळावरच्या जीवसृष्टीबद्दल आपल्याला काय वाटते?
याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मी अन्य लेखातून हे प्रश्न मांडलेही आहेत. मुळात हा सर्व पुरावा प्राथमिक स्वरुपाचा आहे. तो दगड मुळात मंगळावरचा आहे काय, इथंपासून सुरुवात करायला पाहिजे. दुसरे म्हणजे तो मंगळावरून इथं कसा आला? तिसरे म्हणजे त्या दगडाच्या आत जे सापडलंय, ते मुळात खरोखर ‘बॉयलॉजिकल फॉसिल’ आहे काय? चौथा मुद्दा म्हणजे पृथ्वीवर हा दगड तेरा-चौदा हजार वर्षे राहिला आहे, त्यामुळे त्याच्यावर काय परिणाम झाले आहेत? उदाहरणार्थ त्यातील फॉसिल पृथ्वीवरचेच नसेल का? असे अनेक प्रश्न अजून सुटलेले नाहीत; पण मुळात जी कल्पना आहे की, जीवसृष्टी पृथ्वीशिवाय इतर ठिकाणीही असावी, ती कल्पना मात्र मला मान्य आहे.
विज्ञानाचे आज जे व्यापारीकरण चालू आहे त्याबद्दल आपले काय मत आहे?
विज्ञानाचे आज ज्या पद्धतीने व्यापारीकरण होत आहे, ते मला मान्य नाही. विज्ञानाची परंपरा अशी असते किंवा अशी असावी की, हे मुक्त आहे. इथे कोणीही यावे, त्यातील ज्ञान उचलावे व जावे आणि अशा वेळेस एखाद्या शोधावर जेव्हा निर्बंध घातले जातात, एखाद्याच कंपनीला त्या शोधाचा फायदा घेऊ दिला जातो, तेव्हा ते मूळ संकल्पनेशी विसंगत आहे. एखाद्याने शोध लावला, तर त्याची ‘रॉयल्टी’ त्याला जरूर मिळावी; पण याचा अर्थ असा नाही की, ठराविक कंपन्यांकडे ज्ञानाचा मक्ता असावा. आता आण्विक शास्त्रज्ञांचे उदाहरण घ्या, विज्ञानाचा गैरफायदा घेऊन बनविलेले अणुबॉम्ब नष्ट करण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत; पण नष्ट करतानाही काही सत्तांच्या हातात मात्र ते राहावेत, असेही प्रयत्न चालू आहेत. यातील जो ‘डिस्क्रिमिनेशन’चा भाग आहे, तो विज्ञानाशी मुळीच सुसंगत नाही. म्हणून सी.टी.बी.टी.बाबत भारताची जी भूमिका आहे, प्रथम ज्या पाच-सहा सत्तांकडे हे बॉम्ब बनविण्याचे ज्ञान आहे, ते त्यांनी नष्ट करावे, ती मला पटते.
आपल्या लिखाणामागच्या प्रेरणा कोणत्या?
विज्ञान अन् तंत्रज्ञान समाजात खूप पसरले आहे, तेव्हा या विज्ञान-तंत्रज्ञानाचे समाजावर काय परिणाम होतील, याचा फायदा काय? त्याचा तोटा काय? पुढे त्याचे काय होणार? अंधश्रद्धा अन् वैज्ञानिक दृष्टिकोन यातील संघर्षाचे स्वरूप लोकांसमोर मांडावे, या सामान्यत: माझ्या लिखाणामागच्या प्रेरणा आहेत.
आपल्यासारखा शास्त्रज्ञ फलज्योतिषावर सतत बोलतो, तेव्हा आपणाशी संपर्क साधून, या विषयावर संशोधन करण्यासाठी एखादा ज्योतिषी पुढे आला आहे काय किंवा एखाद्या ज्योतिष मंडळाने वगैरे तशा प्रकारची तयारी दाखविली आहे काय?
नाही. माझ्याशी तरी कोणत्याही ज्योतिषाने असा संपर्क साधलेला नाही.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीबद्दल आपले काय मत आहे?
अशा चळवळी समाजात आवश्यकच आहेत. पण माझे असे मत आहे की, या चळवळी फार आक्रमक स्वरुपाच्या असू नयेत. जास्त समजावून सांगितले, तर सामान्य माणूस अंधश्रद्धा टाकून देईल; पण ज्या गोष्टींवर तो परंपरेने विश्वास ठेवत आला आहे, त्या गोष्टींबाबत त्याचा एक ‘इगो’ तयार झालेला आहे. त्यामुळे जर त्यावर एकदम आक्रमकपणे हल्ला झाला, तर तो बचावात्मक होईल व त्या गोष्टींना जास्तच कवटाळून बसेल. एक पंचतंत्रातील गोष्ट आहे- एका व्यक्तीच्या अंगावरचा सदरा काढायचा होता. वारा म्हणाला, ‘मी काढून दाखवतो.’ जोरात वारा सुटला, तसे त्या व्यक्तीने तो सदरा घट्ट धरून ठेवला. मग सूर्य म्हणाला, ‘मी काढून दाखवतो.’ अन् तो तळपू लागला. खूप उकडू लागल्यावर त्या व्यक्तीने तो सदरा काढून टाकला, म्हणजे थोडे ‘टॅक्टफुली’ समजावून सांगितले, तर लोक ऐकतात, विचार करतात, अंधश्रद्धा टाकायला राजी होतात.
आपण स्वत:ला विवेकवादी समजता काय किंवा स्वत:चे वर्णन आपण कसे कराल?
मी स्वत:चा उल्लेख ‘मानवतावादी वैज्ञानिक’ असाच करेन.
संवादक : राजीव देशपांडे
(ता.क. : सदर मुलाखत डॉ. नारळीकर हे आयुकाचे संचालक असताना घेतली गेली, मुलाखतीवेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर, टी. बी. खिलारे, प्रभाकर नानावटी उपस्थित होते.) (प्रसिद्धी : अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, वार्षिक अंक १९९६)