सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन फाऊंडेशनचा संघर्ष

शुभदा निखार्गे -

मुंबईतील भायखळ्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी गेली १६४ वर्षे राणीचा बाग या लोकप्रिय नावाने एक शांत आणि सुंदर उद्यान व प्राणी संग्रहालय उभे आहे. आज हे उद्यान व्ही.जे.बी. वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणून ओळखले जाते. मुंबई शहर आणि राणीच्या बागेतील नैसर्गिक आणि मानवनिर्मित वारसा यांचे एक अतूट नाते आहे. वारसा दर्जा लाभलेले हे उद्यान मुंबईचे हरित फुप्फुसच आहे. या बागेला बृहन्मुंबई वारसा अधिनियमावली १९९५ अंतर्गत २ ब दर्जाचे वारसा मानांकन मिळाले आहे. अशा मुंबईच्या या हरित वारशाच्या  स्वरूपात मोठा बदल करण्याचे व त्याला तथाकथित आधुनिक रूप देण्याची योजना मुंबई महानगरपालिकेने राणीच्या बागेच्या १५० व्या वर्षानिमित्त आखली. या योजनेचा फोलपणा लक्षात आल्यावर त्याविरोधात सामाजिक व पर्यावरणीय जाणीव जागृत असणार्‍या स्त्रियांच्या एका छोट्या गटाने ‘सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन अ‍ॅक्शन कमिटी’ स्थापन केली. या कमिटीने महानगरपालिकेच्या या योजने विरोधात यशस्वी लढा दिला. पर्यावरण दिनानिमित्त त्या लढ्याची  कहाणी आम्ही अनिवाच्या वाचकांसाठी देत आहोत.

ही कमिटी स्थापन करून या योजने विरोधात संघर्ष करण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुंबईतील गोरेगाव शाखेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या शुभदा निखार्गे या अग्रस्थानी होत्या. त्यांच्याच शब्दात या लढ्याचा वृत्तांत आम्ही देत आहोत.

राणी बागेला १५० वर्षे झाली म्हणून २०१२ मध्ये ‘राणीबाग १५० वर्षे’ एक इंग्रजी कॉफी टेबल बुक प्रकारचे इंग्रजी पुस्तक शुभदा निखार्गे व हुतोक्षी रुस्तमफार्म यांच्या संपादकत्वाखाली काढण्यात आले. यात अनेक मान्यवरांचे राणीच्या बागेबद्दलचे लेख आहेत. तसेच इतर अनेक मान्यवर लेखकांसह एका ‘लोकोद्यानाचा चिरंतन वारसा : राणीचा बाग तेव्हा आणि आता’ व ‘मुंबईचे वारसा स्थान असलेल्या वनस्पती उद्यानाचे रक्षण : सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन कमिटीचा संघर्ष’ हे दोन अतिशय महत्त्वाचे लेख शुभदा निखार्गे यांनी हुतोक्षी रुस्तुमफ्राम यांच्याबरोबर लिहिले आहेत. त्यात शुभदा निखार्गे यांनी जिजामाता उद्यानातील शिल्पे व वृक्षांची अत्यंत सुरेख छायाचित्रे काढलेली आहेत. मूळ इंग्रजीत असलेले हे पुस्तक मराठीतही उपलब्ध आहे.

राणी बागेवर आमूलाग्र आणि अनिष्ट फेरबदलांचे काळे ढग दाटले – अन् ‘सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन कमिटी’ने जन्म घेतला.

२००७ मधील फेबु्रवारी महिना. मुंबईतील १३८ वयोमान असलेल्या ‘व्हिक्टोरिया गार्डन्स’ ऊर्फ ‘राणी बाग’ या वनस्पती उद्यानावर एक तीव्र आघात झाला. मुंबई महापालिकेने वनस्पती उद्यानाचे रूपांतर ‘आंतरराष्ट्रीय’ दर्जाच्या प्राणिसंग्रहालयात करण्याचे जाहीर केले. त्यासाठीचा खर्च होता ४३३ कोटी रुपये. हा खर्च महाराष्ट्रातील छोट्या महापालिकांच्या वार्षिक अंदाजपत्रकापेक्षाही जास्त होता. जास्त खर्च म्हणजे जास्त बांधकाम हे समीकरण ध्यानात घेता येथे प्रचंड बांधकाम होणार आणि तेथील हजारो वृक्षांचा, पर्यायाने वनस्पती उद्यानाचा व पर्यावरणाचा र्‍हास होणार या भीतीने आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने आम्ही काही निसर्गप्रेमी मैत्रिणींनी ‘सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन अ‍ॅक्शन कमिटी’ या नावाने एक अनौपचारिक गट स्थापन केला. त्याला २०१२ मध्ये ‘सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन फाऊंडेशन’ या नावाने एक नोंदणीकृत धर्मादाय न्यास असे औपचारिक स्वरूप देण्यात आले, ज्याचे हुतोक्षी रुस्तमफ्राम, शुभदा निखार्गे, शील तन्ना, हुतोक्षी अरेथ्ना, के. टी. बागली हे विश्वस्त होते.

पार्श्वभूमी :

१८६१ मध्ये अ‍ॅग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटीने स्थापन केलेल्या वनस्पती उद्यानाची रचना पुनरुज्जीवन (Renaissance) शैलीतील अक्षीय मांडणीच्या (Axial Planning) धाटणीची असून त्यात अनेक अंतर्गत उद्याने, उभ्या-आडव्या मार्गांचा समावेश होता आणि अप्रतिम स्मारकांनी उद्यानाची शोभा वृद्धिंगत झाली होती. १८९० मध्ये या ३३ एकर एवढ्या विस्तीर्ण उद्यानात १५ एकरांची भर घालण्यात येऊन एका लहान प्राणिसंग्रहालयाची स्थापना करण्यात आली. याच काळात जगभरातील आर्थिक मंदीमुळे अ‍ॅग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटीचे दिवाळे निघाले आणि व्हिक्टोरिया गार्डन्सचा ताबा मुंबई नगरपालिकेने घेतला. तेव्हापासून मोठे वनस्पती उद्यान आणि छोटं प्राणिसंग्रहालय ४८ एकरांच्या भूखंडावर एकत्र सुखेनैव नांदत आहेत. या दोन सुविधांमध्ये भौगोलिक सीमा नाहीत त्यामुळे प्राणिसंग्रहालय वनस्पती उद्यानापासून वेगळे काढता येत नाही. १९९० नंतर आजूबाजूचे तीन भूखंड संपादित केले गेले आणि उद्यानाचे एकूण क्षेत्र ६० हजार एकर झाले.

राणी बाग या लोकप्रिय नावाने ओळखल्या जाणार्‍या या उद्यानाचे अधिकृत नाव आहे ‘वीरमाता जिजाबाई भोसले बोटॅनिकल उद्यान आणि प्राणीसंग्रहालय’. हे दक्षिण मुंबईतील सर्वांत मोठे, सार्वजनिक तसेच मुंबईतील एकमेव २-ब वारसा दर्जा प्राप्त वनस्पती उद्यान आहे. या घडीला उद्यानात २५६ प्रजातींचे ४,२१३ वृक्ष आणि त्यावर उपजीविका करणारी छोटे सस्तन प्राणी, पक्षी, फुलपाखरे आणि किटकांची वैविध्यपूर्ण जैवविविधता आहे. अनेक वारसा दर्जाची वास्तुशिल्पे आणि पुतळे यांनी शोभिवंत झालेले हे उद्यान म्हणजे मुंबईतील नैसर्गिक वारसा आणि मानवनिर्मित वारसा यांचा अपूर्व संगमच जणू. साहजिकच मुंबईचे जणू फुप्फुस असलेले हे उद्यान शहरातील सर्वाधिक वर्दळीची जागा आहे. दररोज ८ हजार तर सुट्टीच्या दिवशी तब्बल ४० हजार पर्यटक या बागेला भेट देतात. गेली १६४ वर्षे मुंबईच्या सेवेत असलेल्या अशा या अनमोल उद्यानाच्या रक्षणासाठी ‘सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन फाऊंडेशन’ गेल्या १९ वर्षांमध्ये राणीच्या बागेतील वनस्पती उद्यानाचे संरक्षण, जतन आणि संवर्धन करण्यासाठी केलेल्या संघर्षाचा संक्षिप्त अहवाल पुढे दिलेला आहे.

एक बहुआयामी संघर्ष

राणी बागेच्या विकासाचा कोणताही प्रकल्प असला, तरी त्यासाठी दोन वैधानिक संस्थांची मान्यता असणे अनिवार्य आहे. १) दिल्ली येथील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (यानंतर उल्लेख केंद्रीय प्राधिकरण), जे भारतातील सर्व प्राणिसंग्रहालयांवर देखरेख ठेवते आणि २) मुंबई वारसा जतन समिती – (यानंतर उल्लेख ‘वारसा समिती), कारण राणी बागेला २-ब हा दर्जा मिळालेला आहे. आम्ही आमचा संघर्ष सुरू केला तोपर्यंत महापालिकेने केंद्रीय प्राधिकरण व वारसा समिती यांच्याकडून मान्यता मिळवलेली नव्हती.

१) आम्ही सर्वप्रथम माहिती अधिकार कायद्याचे प्रभावी आयुध वापरून महापालिका, केंद्रीय प्राधिकरण आणि वारसा समिती यांच्याकडून पत्रव्यवहार, आराखडे, सभांची इतिवृत्ते वगैरे माहिती संकलित केली. आमच्या अंदाजानुसार प्रस्तावित नूतनीकरणाच्या आराखड्यातील वैशिष्ट्यांची यादी छाती दडपून टाकणारी होती – ऑस्ट्रेलियन, आफ्रिकन, आग्नेय आशियाई आणि भारतीय वन्य प्राण्यांचे चार मोठे विभाग, मत्स्यालय, नाईट सफारी, उपाहारगृह आणि एक कृत्रिम हिंदी महासागर सुद्धा! हे सारं काही ४८ एकर संकुलात जिथे वनस्पती उद्यानाचे क्षेत्र ६३ टके व प्राणिसंग्रहालयाचे क्षेत्र फक्त १८ टके आहे; फेरबदलांच्या आराखड्यांवरून हे दिसून आले की जुने मार्ग व प्राण्यांचे पिंजरे पाडून टाकले जाणार असून नवीन बांधकाम करण्यात येणार आहे; परंतु नवीन खंदक, पाण्याचे/सांडपाण्याचे नळ, तसेच विद्युतीकरणासाठी नवीन खोदकाम यामुळे पुरातन वृक्षांची मुळे सरसकट कापली गेली असती व यांचा नकीच वृक्षांना धोका पोचला असता. शिवाय अशी पैशांची उधळपट्टी केल्यावर प्रवेश शुल्क वाढविले जाईल आणि सर्वसामान्यांसाठी असलेली ही बाग फक्त उच्चभ्रूंसाठी राहील अशी भीतीसुद्धा आम्हाला वाटली.

२) लवकरच आम्ही एक www.saveranibagh.com हे संकेतस्थळ सुरू केले आणि प्रस्तावित नूतनीकरणाला विरोध करणारी एक याचिका ऑनलाईन प्रदर्शित केली आणि नागरिक, पर्यावरणीय संस्था तसेच माध्यमांचा पाठिंबा मिळवला.

३) आम्ही सर्व अधिकृत व्यासपीठांवरून आमच्या मुख्य मागण्या लावून धरल्या –

वनस्पती उद्यानाने ६३ टके क्षेत्र, तेथील वृक्ष व त्यांची मुळे, अंतर्गत उद्याने, चहूबाजूला फुटणार्‍या पायवाटांचे दाट जाळे यापैकी कशालाही धका लागता कामा नये. प्राण्यांचे पिंजरे आणि त्यांचे निवारे यांचे नूतनीकरण त्यांच्या सध्याच्या जागीच करावे व वनस्पती उद्यानाने व्यापलेल्या ६३ टके क्षेत्रावर संचभर देखील अतिक्रमण होता कामा नये.

४) यासाठी आम्ही पत्रकार परिषदा घेतल्या. महापालिका, केंद्रीय प्राधिकरण (दिल्ली), वारसा समिती, मुख्यमंत्री, दिल्लीत असलेले पर्यावरण आणि वन मंत्रालय या सर्वांकडे आम्ही प्रत्यक्ष भेटून निवेदने सादर केली. त्यांच्या अधिकृत सुनावण्या आणि भेटींसाठी आम्ही उपस्थित राहिलो आणि तसेच मुंबई उच्च न्यायालयाकडेही दाद मागितली. आम्ही वरील वेगवेगळ्या संस्थांकडून माहिती अधिकारांतर्गत गोळा केलेल्या प्रचंड माहितीचा ताळमेळ घालून त्यांचा प्रस्तावित आराखडा, त्यांचे इरादे, त्यांच्या विविध कागदपत्रांतील नोंदी यामधील विसंगती उघड करून दाखविल्या. सातत्याने केलेला पाठपुरावा, कपाट भरभरून मिळालेल्या कागदपत्रांची काळजीपूर्वक छाननी आणि तपशीलवार सादरीकरणे ही आमची बलस्थाने ठरली. उघडच आहे की, यासाठी आम्हाला अहोरात्र काम करावं लागलं.

५) आम्ही यासाठी लागणारा निधी कुणाकडे न मागण्याचा निर्धात केला आणि राजकारणी लोकांपासून व सत्तेच्या दलालांपासून लांब राहण्याचे ठरविले. फत अधिकृत शासकीय संस्था आणि नोकरशहा यांच्याकडे दाद मागण्याचे ठरवले.

६) आमचे हितचिंतक, वनस्पतिशास्त्रज्ञ, वास्तुविशारद, अभियंते, वारसातज्ज्ञ आणि वकील – यांच्याकडून फेरबदलाच्या आराखड्यांचे विश्लेषण करण्यासाठी आणि महापालिकेच्या विरोधात कोर्टात दावा कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन घेतले.

७) त्यामुळे महापालिकेने वरवर बदल केलेले सुधारित आराखडे सादर केले. पण महापालिकेने वारसा समितीकडे नवीनच मुद्दा मांडला की, राणी बाग हे वनस्पती उद्यान नसून ‘फक्त’ एक उद्यान आहे. त्यानंतर आम्ही राणी बागेच्या वनस्पती उद्यानाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ढीगभर राजपत्रे चाळून, मुंबईच्या इतिहासातील पुरावे शोधून, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संकेतस्थळे धुंडाळून आणि महापालिकेच्याच अभिलेखांमधून पुरावे गोळा करून सादर केले.

८) अखेरीस वारसा समितीने या प्रश्नावर मत देण्यासाठी डॉ. असद रहमानी आणि डॉ. मार्सेलिन आल्मेडा या दोन स्वतंत्र तज्ज्ञांची नेमणूक केली. दोघांनीही प्रस्तावित नूतनीकरणामुळे वनस्पती उद्यान नष्ट होईल, असे नि:संदिग्ध मत व्यक्त करून प्रस्तावित नूतनीकरणाला नकार दिला.

९) भूतपूर्व महापालिका आयुक्त श्री. द. म. सुकथनकर आणि श्री. शरद काळे यांच्या भरभकम पाठिंब्यामुळे आमचे हात अजूनच बळकट झाले. त्यांनीदेखील हे वनस्पती उद्यान टिकवून ठेवले पाहिजे याचा पुनरुच्चार केला.

१०) २००७ पासून सुरू झालेल्या संघर्षाच्या प्रवासात मुंबईतील पर्यावरणप्रेमी संस्था-संघटनांनी (उदा. BNHS, WWF INDIA, Sanctury Asia, FoT, NAGAR, Awaaz Foundation, UDRI, Oval Trust Deeefce Indian Heritage Society)) तसेच लंडन येथील Royal Botanic Gardens, Kew (UK) ने देखील आम्हाला पाठिंबा दिला.

११) अनेक अपरिचितांनीसुद्धा या संघर्षाच्या वाटेवर चालताना उपयुक्त सूचना केल्या आणि अनेक संदर्भ दिले.

१२) इतकं होऊनही २०१५ मध्ये पालिकेच्या प्रस्तावाला सशर्त मान्यता मिळाली. या अनाकलनीय अपयशाने आमचा अंत पाहिला आणि आम्ही न्यायालयात जाण्याचे ठरविले आणि त्यासाठी आमची सज्जता सुरू केली, हे आवर्जून नमूद करायला हवं की, यासाठी नामवंत वकिलांनी आमची बाजू कोर्टात मांडण्यासाठी पैसे आकारले नाहीत!

१३) एक शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही मार्च २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त श्री. अजय मेहता यांची भेट घेतली आणि न्यायालयात जाण्याचा आमचा इरादा त्यांच्या कानावर घेतला. अनपेक्षितपणे त्यांनी आमच्यासोबत आराखड्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी महापालिका उपायुक्त श्री. नाईक यांची नेमणूक केली.

१४) अखेरीस महापालिका आमच्यासोबत चर्चेसाठी बसून आमच्या हरकतींची दखल घेण्यास तयार झाली होती. मार्च २०१६ ते २०२० या कालावधीत आम्ही महापालिका उपायुक्त व राणी बागेचे संचालक यांच्यासमवेत राणी बागेला साप्ताहिक भेटी दिल्या आणि सतत बैठकांसाठी हजर राहिलो.

१५) अखेरीस आमच्या बहुतेकच सूचना स्वीकारण्यात आल्या आणि आराखड्यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या.

१६) आमच्या अथक प्रयत्नांनातर राणीच्या बागेतील वृक्ष संपदेचे जरी रक्षण झाले, तरी तिच्या नशिबाचे भोग संपले नव्हते. जून २०१४ मध्ये मुंबईचा प्रस्तावित विकास  आराखडा (DP २०१४-३४) सादर झाला. यात राणी बागेचे वर्गीकरण जे इतकी वर्षे ‘उद्यान’ होते ते बदलून ‘प्राणिसंग्रहालय’ असे करण्यात येऊन एफएसआय ५ देखील देण्यात आला. परंतु एकदा बैठकी, निवेदने, सादरीकरण यांचं दळण दळून झाल्यावर २०१६ मध्ये एकदाचा राणी बागेला मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात वनस्पती उद्यानाचा दर्जा मिळाला.

१७) पण इतकं पुरेसं नव्हतं. राणी बागेला मिळालेला हा दर्जा तिच्या नावात प्रतिबिंबित होणं आवश्यक होतं. राणी बागेचे ‘व्ही.जे.बी. उद्यान व प्राणिसंग्रहालय’ हे नाव बदलून ‘व्ही.जे.बी. वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय’ असे व्हावे यासाठी आम्ही परत एक मोहीम सुरू केली. हा प्रश्न श्री. द. म. सुकथनकर, मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि आम्ही मे २०२२ मध्ये तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्यासमोर उपस्थित केला. त्यांनी आमच्या प्रस्तावाला लगोलग मान्यता दिली आणि आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पण तरीही राणी बागेच्या प्रवेशद्वारावरचा नामफलक बदलायला दोन वर्षे लागली, तीसुद्धा महापालिकेत खेटे घालून सातत्याने तगादा लावल्यावरच असोसिएशनचा संघर्ष संपला, राणीबागेला न्याय मिळाला.

संघर्षाकडून संवर्धनाकडे

१) २०१२ मध्ये राणीच्या बागेला १५० वर्षे पूर्ण झाली. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही बीएनएचएस व एफओटी यांनी संयुक्तपणे ‘Rani Bagh – 150 years’ या नावाने इंग्रजीमध्ये एक कॉफी टेबल बुक प्रकाशित केले. २०१३ मध्ये आम्ही ‘राणीबाग १५० वर्षे’ या नावाने मराठी भाषांतरही प्रसिद्ध केले. अर्थात, राणी बाग हे वनस्पती उद्यान आहे, याचा कायमस्वरूपी दस्तावेज राहावा व भविष्यात राणीबागेला परत परत अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागू नये हा सुप्त हेतूही त्यात होता.

२) अखेरीस महापालिकेने आमच्या मदतीने ४० वृक्षमाहिती फलक, तसेच बागेची सर्वांगीण माहिती देणारे सहा मोठे फलक राणी बागेत लावले आहेत.

३) आम्ही राणीबागेत नियमितपणे वृक्ष आणि वारसा विषयक पदभ्रमणांचे आयोजन करतो.

४) आम्ही राणी बागेत दुर्मीळ वृक्षांची लागवड करतो.

५) आम्ही राणी बागेत एक छोटेसे फुलपाखरू उद्यान व वनौषधी उद्यान विकसित केले आहे.

६) इंग्रजी आणि मराठीतून राणी बागेची तोंडओळख करून देणार्‍या दोन लघुपटांचीही निर्मिती आम्ही केलेली आहे. V. J. B. Botanical Udyan Zoo Mumbai`s Only Heritage Botanical Garden असे त्याचे नाव असून यू ट्यूबवर ते प्रदर्शित करण्यात आले आहेत.

७) वनस्पती उद्यानाबाबत असलेली प्रामाणिक कळकळ पाहून आम्हाला आता महापालिका अधिकार्‍यांकडून हळूहळू सहकार्य मिळत आहे. आम्ही हल्लीच NAAGAR आणि महापालिका यांच्या मदतीने राणी बागेतील पदभ्रमण सुखकर व्हावे म्हणून ‘Mumbai Botanical Garden & Zoo’ हे दिशादर्शक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप तुम्हाला कुणाच्याही मदतीशिवाय तुमच्या आवडीचे वृक्ष, वारसा शिल्पे, प्राण्यांचे पिंजरे तसेच प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, उपाहारगृह इत्यादी सुविधांपर्यंत विनासायास जाण्याचा मार्ग दाखवेल.

समारोप

१९ वर्षांपूर्वी २००७ मध्ये आमच्या संघर्षाची सुरुवात झाली तेव्हा आम्ही समाजातील मातब्बर व्यक्तींना फारसं ओळखत नव्हतो किंवा आमच्याकडे पैशाचे पाठबळही नव्हते. मुंबईचे एकमेव वारसा दर्जा प्राप्त वनस्पती उद्यान वाचविण्यासाठी केलेल्या संघर्षाचा प्रवास कधी  आनंदाच्या तर कधी वैफल्याच्या हिंदोळ्यांवर झुलत होता. आज मागे वळून पाहताना असंख्य व्यक्तींनी आणि संस्थांनी आम्हाला पाठबळ देण्यासाठी जो पुढाकार घेतला त्याचा विस्मय वाटतो. येथे नमूद केलेल्या आणि करू न शकलेल्या सर्वांच्या मदतीबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.

सामाजिक उत्तरदायित्वाची तीव्र इच्छा असल्यामुळे २००७ ते २०२६ या संघर्षाच्या कालखंडात राणी बागेचे नूतनीकरण होत असताना वनस्पती उद्यानाला किंचितही हानी पोचणार नाही याची काळजी घेत ऊन, पाऊस, चिखल यांची पर्वा न करता आम्ही देखरेख करीत राहिलो. ४८ एकर एवढ्या सदाहरित भूखंडावर बहरलेलं वनस्पती उद्यान आणि त्यातील आकाशाला गवसणी घालू पाहणारे उंच पुरातन वृक्ष, हेच आमच्या गेल्या १९ वर्षांच्या सातत्याने केलेल्या संघर्षमय यशोगाधेचे मूक सोबती आहेत आणि आमचे प्रेरणादायी स्त्रोतसुद्धा.

– शुभदा निखार्गे, हुतोक्षी रुस्तमफ्राम
(विश्वस्त, सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन फाऊंडेशन)
साभार : उत्तरदायित्व


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]