डॉ. जयंत नारळीकर यांना अखेरचा सलाम!

राजीव देशपांडे -

विश्वाच्या उत्पतीसारख्या विषयात संशोधन करणारे जागतिक किर्तीचे खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन जनसामान्यापर्यंत पोहोचविणारे कार्यकर्ते, विज्ञानविषयक साहित्याची आवड मराठी वाचकाला लावत विज्ञान साहित्याला मराठीत प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे साहित्यिक, संशोधन क्षेत्रात देशाची मान उंचवणार्‍या आयुका सारख्या संस्थेची उभारणी करणारे प्रशासक डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी, २० मे २०२५ रोजी पुण्यात झाले.

अनेक भारतीय शास्त्रज्ञ अंधश्रद्धाविरोधी ठाम भूमिका घेण्यास कचरतात. पण डॉ. जयंत नारळीकरांनी वास्तुशास्त्र, फलज्योतिष आणि फसव्या विज्ञानाविरोधात ठाम भूमिका घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सक्रीयपणे साथ दिलेली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांबरोबर त्यांनी घेतलेली फलज्योतिषाचा फोलपणा उघड करणारी चाचणी आजही फलज्योतिषाविरोधातील संघर्षात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला खूपच बळ देणारी ठरत आहे. विद्यापीठात फलज्योतिष शिकविण्याच्या विरोधातील मोहिमेतही त्यांनी सक्रियपणे भाग घेतला होता. आजकाल आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानातील शोध आमच्या पूर्वजांनी कसे हजारो वर्षे पूर्वीच लावलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही कसे प्राचीन काळात प्रगत वगैरे होतो याचे पौराणिक दाखले देत बढाया मारल्या जात आहेत. यात अगदी देशातील अत्युच्च पदांवरील व्यक्तींसह वैज्ञानिक जगतातील मान्यवरही सामील होत असल्याचे आपण पाहात आहोत. पण डॉ. जयंत नारळीकरांनी निर्भयपणे पण अतिशय संयतपणे आपला विवेकी बाणा न सोडता वैज्ञानिक युक्तिवादाने हे सारे दावे खोडून काढले आहेत.

विज्ञान केवळ प्रयोगशाळेत बंदिस्त असता कामा नये तर अगदी तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यातील ज्ञान, त्याचे फायदे यावर कोणाचीही मक्तेदारी असता कामा नये, विज्ञानाचे बाजारीकरण होता कामा नये, असा आयुष्यभर त्यांनी ध्यास घेतला. त्यासाठी विज्ञान कथा, कादंबर्‍या, खगोलीय विज्ञानाबद्दल माहितीग्रंथ, खगोलीय घडामोडीबद्दल वैज्ञानिक माहिती देणारे विविध वर्तमानपत्रे, मासिके यातून लिखाण, ठिकठिकाणी व्याख्याने देत वैज्ञानिक सिद्धांताबद्दलचे सर्वसामान्यांचे कुतूहल जागृत करत विज्ञानाचा प्रचार, प्रसार केला. या साठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मराठी विज्ञान परिषद यांच्या कामात सक्रियपणे सहभाग घेतला.

१९८८ साली विद्यापीठ अनुदान मंडळाने डॉ. नारळीकरांना पुण्यात आयुकाच्या (आंतर विद्यापिठीय खगोल आणि खगोल भौतिकी केंद्र) उभारणीसाठी आमंत्रित केले. मग त्यासाठी त्यांनी आपली प्रज्ञा, प्रतिभा आणि सर्जनशीलता पणाला लावली. तेथील विद्यार्थी आणि संशोधकांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य लोकांसाठीही त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या व्याख्यानांचे कार्यक्रम आयुकात उपलब्ध करून दिले, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांचा विज्ञानाशी प्रत्यक्ष संबंध यावा. डॉ. नारळीकरांच्या नेतृत्वाखाली पुण्यात उभारली गेलेली ‘आयुका’ ही भारताच्या विज्ञान क्षेत्रासाठी मानबिंदू ठरलेली आहे. डॉ. नारळीकरांनी अशा भक्कम पायावर उभारलेल्या या संस्थेचा खगोलविज्ञानातील शिक्षण आणि संशोधनातील आपला जागतिक लौकिक डॉ. नारळीकरांच्या निवृत्तीनंतर आजही तेथील विद्यार्थी आणि संशोधकानी अबाधित ठेवलेला आहे.

डॉ. जयंत नारळीकर नेहमीच प्रवाहाविरोधात उभे राहिलेले आहेत. मग तो फलज्योतिष, वास्तुशास्त्र विरोध असो, फसवे विज्ञान, अंधश्रद्धा विरोधातील संघर्ष असो ते ठामपणे धाडसाने उभे राहिले. तसेच केंब्रिजमध्ये असताना फ्रेड हॉएल यांच्यासह त्यांनी अवकाश आणि काळाच्या अनुषंगाने विश्व सर्व बाजूंनी समान दिसते आणि त्याला आरंभ नाही आणि अंतही नाही असे प्रतिपादन करणारा विश्वरचनाशास्त्राचा स्थिर स्थिती (स्टेडी स्टेट) सिद्धांत मांडला. पण विज्ञान जगताने खगोलशास्त्रीय निरीक्षणांनी सिद्ध केलेला विश्वरचनाशास्त्राचा महास्फोट (बिग बँग) सिद्धांताला मान्यता दिली. पण डॉ. जयंत नारळीकर अखेरपर्यंत आपल्या सिध्दांताशी ठाम राहात त्या अनुषंगाने संशोधन करत राहिले.

अंधश्रद्धा आणि असहिष्णुततेच्या विषातून पसरवल्या जात असलेला तथाकथित वैज्ञानिक परंपरा, विवेकवाद्यांवर आणि इतरांवर होत असलेले हल्ले, या घटना भारताला २१ व्या शतकाच्या प्रारंभीसुद्धा वैज्ञानिक विचारसरणीच्या प्रचार, प्रसार करणार्‍या प्रखर मोहिमेची किती आवश्यकता आहे याची जाणीव आपल्याला आज करून देत आहेत. हे डॉ. जयंत नारळीकरांनी १० वर्षांपूर्वी ‘रिपब्लिक ऑफ रिझन’ या पुस्तकाला लिहिलेल्या छोट्याश्या प्रस्तावनेत लिहिले होते. त्यात ते पुढे म्हणतात, आज आपल्या देशाला भेडसावत असणार्‍या खर्‍या प्रश्नांची सोडवणूक विवेकी वैज्ञानिक दृष्टिकोनातून कशी करायची हे फार मोठे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. अशी ही आव्हानात्मक परिस्थिती आजही थोडीशीसुद्धा कमी झालेली नसून नाही उलट जास्तच गंभीर झालेली आहे. अवैज्ञानिक धर्मांध दावे, फसवे विज्ञान, बलात्कारी बुवा-बाबा यांना राजमान्यता मिळत असलेल्या काळात डॉ. जयंत नारळीकरांसारखे मार्गदर्शक, पाठीराखा, विवेकवादी शास्त्रज्ञ २० मे रोजी आपल्यातून निघून जाणे अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीसाठीच नव्हे तर एकूणच डाव्या, पुरोगामी आणि विवेकवादी चळवळींसाठी खूपच दु:खदायक आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मंडळ आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे पाठीराखे, हितचिंतक असलेल्या डॉ. जयंत नारळीकरांना भावपूर्ण आदरांजली वाहात अखेरचा सलाम करीत आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ]