-

धर्मग्रंथ म्हणजे आपल्या मेंदूला लागलेल्या वाळव्या
मी युवकांना आवाहन करतो की, जे अवास्तव आणि खोटे महत्त्व या धर्मग्रंथास प्राप्त झालेले आहे, ते नष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसू नका. सदर धर्मग्रंथ म्हणजे आपल्या मेंदूला लागलेल्या वाळव्या आहेत. धर्मग्रंथ हे आपल्या हिताविरुद्ध आहेत, नव्हे तर ते विष पेरणारे ही आहेत. ही पुस्तके आपणास गुलाम असल्याची जाणीव करून देतात.
मी जे सांगितले ते अंधपणाने स्वीकारा, अशी कोणावरही सक्ती करणार नाही
तुम्ही मात्र मी जे काही सांगतो आहे ते योग्य की अयोग्य आहे, यावर विचार करा. मी जे सांगतो त्यावर अंधपणे विश्वास ठेवू नका. मी माझ्या विचारांना कुठल्याही धर्मशास्त्राचा अथवा वेदाचा आधार देत नाही. माझ्या बुद्धीला पटेल तेच मी बोलतो. तुम्हीसुद्धा सदसद्विवेकबुद्धीनेच विचार करा आणि मी जे काही सांगितले त्यात काही सत्य आढळून आले तेच स्वीकारा अन्यथा ते सोडून द्या. जे सांगितले ते अंधपणाने स्वीकारा, अशी कोणावरही सक्ती करणार नाही. ज्यांना माझे विचार पटणार नाहीत त्यांना मी ते स्वीकारण्यास मुळीच भाग पाडणार नाही. कोणाला फसविण्याचाही माझा हेतू नाही. मी फक्त आपणास आठवण करून देऊ इच्छितो की, तुमच्याकडेही युक्तिवाद करण्याची पात्रता आहे. तुमच्याकडे विषयाचे योग्य विश्लेषण करण्याची शक्ती तर आहेच; परंतु ते योग्य की अयोग्य ठरवण्याची बुद्धीही आहे.
आपलेच लोक माझ्याविरोधात न्यायालयात गेले
माझ्याविरोधात न्यायालयात चालू असलेल्या खटल्यासंदर्भात मला काहीही सांगावयाचे नाही. जेव्हा मी सेलममध्ये देवांच्या प्रतिमेस जोड्याने मारले तेव्हा एकही ब्राह्मण माझ्याविरोधात न्यायालयात गेला नाही. उलट आपलेच लोक माझ्याविरोधात न्यायालयात गेले. त्यांच्या भावना दुखावल्या, अशी त्यांनी तक्रार केली आणि मला न्यायालयाकडून हुकूम आला. तुम्ही त्याबद्दल वर्तमानपत्रांतून वाचले असेलच.
जोपर्यंत आपण देव धर्मास प्राणघातक व्याधी समजून त्याची शस्त्रक्रिया करत नाही, तोपर्यंत आपण समस्यांवर कुठलाही तोडगा काढू शकणार नाही. देव धर्म ही व्याधी अत्यंत जुनाट झालेली आहे. त्यामुळे मी त्या समोरच्या मुळापर्यंत जात आहे. केवळ वरवरची चर्चा करून काही प्रश्न सुटणार नाही, म्हणून आम्ही क्रांतीकारी विचारांच्या प्रचारासाठी ही रॅशनलिस्ट असोसिएशन (बुद्धिप्रामाण्यवादी संघटना) सुरू केलेली आहे. जर आम्ही स्वतःला खालच्या दर्जाचे समजत असू आणि जर आम्ही हिंदू ही संकल्पना मान्य करत असू तर आपणास आपण शूद्र आहोत, हेही मान्य करावे लागेल. एवढेच नव्हे तर आम्हाला शास्त्र, धार्मिकविधी, देव आणि सनातन मतवादी नियमही मान्य करून त्याप्रमाणे वागावे लागेल. आम्हाला शूद्र, वेश्येचे मूल कोण म्हणाले आहे ते आम्ही विचारू नये का?
आमच्या द्रविड कळघम संघटनेचे सभासद व्हायचे असेल तर…
शंकराचार्यही आज मान्य करीत आहेत की, या पुराणातील कथा शिकलेल्या लोकांसाठी नाहीत. त्या केवळ अशिक्षित लोकांसाठीच आहेत. या लोकांनी देवावर विश्वास ठेवावा म्हणूनच त्या लिहिल्या आहेत. आपण शांत राहून सर्वकाही अंधपणे मान्य केले तर आपण काहीही प्रगती करू शकणार नाही. ब्राह्मण पिकाचा सर्व हंगाम कापून नेतील. म्हणून आपण स्वाभिमान प्रचाराच्या माध्यमातून लोकांना शिक्षित केले पाहिजे. आपण लोकांना अंधविश्वास सोडून देण्याचे आवाहन केले पाहिजे. जर तुम्हाला वाटले की, मी जे काही सांगितले आहे ते योग्य आहे तर ते स्वीकारा आणि आयुष्याचे एक नवे पान उद्यापासूनच उघडा. जर तुम्हाला असे वाटले की, आमच्या द्रविड कळघम संघटनेचे सभासद व्हायचे असेल तर तुम्ही मंदिरात जाऊ नका, जातीय संकेताचे कोणतेही चिन्ह शरीरावर ठेवू नका, ब्राह्मणांना एका पैशाचीही दक्षिणा देऊ नका. त्यांची मक्तेदारी आणि शोषण संपुष्टात आणा.
पेरियार यांच्या स्मृतीस्थळावरील विचार

मी या कर्तव्याचे पालन करण्यासाठी स्वतःला योग्य बनवले आहे. कारण माझ्या जीवनात इतर कोणत्याही चिंता नाहीत, मी स्वतःला पूर्णपणे विवेकवादी विचारांना समर्पित केले आहे, त्यासाठी विवेकवादी तत्त्वे आणि कार्यक्रम आखले आहेत.
मंदिरे देवांसाठी बांधली जात नाहीत. ती ब्राह्मणांच्या उपजीविकेसाठी आणि सामान्य लोकांना अपमानित आणि शोषण करण्यासाठी बांधली जातात.
पापाच्या भीतीमुळे पतीशी निष्ठा राखणारी स्त्री, अनैतिकता उघड होण्याच्या भीतीने ‘पवित्र’ राहणारी स्त्री, प्रतिशोधाच्या भीतीने पतीशी निष्ठावान राहणारी स्त्री, या सर्व एकाच श्रेणीत येतात.
देव नाही, देव अजिबात नाही. ज्याने देवाचा शोध लावला तो मूर्ख आहे. जो देवाचा प्रचार करतो, तो बदमाश आहे. जो देवाची पूजा करतो तो रानटी आहे.
‘पुरुषत्व’ हा शब्द म्हणजे स्त्रियांना हीन लेखणे आहे. पुरुषत्वाची ही संकल्पना नष्ट केल्याशिवाय स्त्रियांना स्वातंत्र्य मिळणार नाही.
तुमच्या सर्व दोषांचे मूळ कारण म्हणजे उराशी बाळगलेली व ‘शूद्र’ या संकल्पनेला तुम्ही दिलेली मूक संमती. तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे. शूद्र म्हणून अपमानित जीवन जगण्यापेक्षा त्याविरोधात संघर्ष करून मरणे चांगले.
ज्याने आत्मा, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म आणि पूर्वजन्म या संकल्पनाचा प्रचार केला तो दुष्ट आहे. जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो तो मूर्ख आहे. जो या सर्व असत्यांचा उपभोग घेतो तो सर्वात वाईट गुन्हेगार आहे.
स्त्रियांवर अस्पृश्यांपेक्षा वाईट प्रकारे अत्याचार केला गेला आहे. त्यांना वाघाची शिकार होणार्या सहनशील/नम्र बकरीसारखे, मांजराची शिकार होणार्या उंदरासारखे वागवले जाते. जणू देवाने स्त्रीला पुरुषाची गुलाम म्हणून निर्माण केले आहे. जर देवाने अशी व्यवस्था तयार केली असेल तर अशा देवाचा नाश करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. आपण अशा वाईट गोष्टींसाठी देवाला दोष द्यावा का? अशा गोष्टी सहन करणार्या देवाची काय गरज आहे? त्याचा नाश करणे चांगले नाही का?
मानवतेच्या दुःखाचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्यात असलेली विषमता आहे. मानवतेची सेवा करण्याचा प्रयत्न करणार्यांचे कर्तव्य म्हणजे प्रथम ही असमानता, विषमता दूर करणे आणि समानता आणणे.
या रिपोर्ताजसाठी द्रविड कळघमचे अनेक कार्यकर्ते, द्रविड कळघमची वेबसाईट, मराठी विश्वकोष आणि पेरियार यांच्यावरील भीमराव सरवदे यांच्या पुस्तकांची मदत झाली आहे. त्या सर्वांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत.
– रुपाली आर्डे–कौरवार (७६६६७ ४५४४६)
राहुल थोरात (९४२२४ ११८६२)
प्रा. डॉ. अशोक कदम (९८५०० १२५३०)