श्रीपाल ललवाणी -
मला अजूनही ते १९८२-८३ सालचे दिवस आठवतात. त्या वेळी मी अगदी तरुण होतो आणि बुद्धिप्रामाण्यवादी मंचाचे काम करत होतो. डॉ. बाबा आढाव हे अधूनमधून मंचाच्या कार्यक्रमाला येत. त्यातून त्यांचा परिचय झाला, त्यांच्या कार्याची माहिती मिळाली. त्या वेळी महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या साप्ताहिक बैठकीत मी नियमित जाऊ लागलो. येथेच माझा डॉ. अनिल अवचट, ताहेरभाई पुनावाला, अन्वर राजन, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी परिचय झाला. त्यांचे विचार मला समजून घेता आले. यातूनच माझी विचारांची बैठक पकी झाली.
डॉ. बाबा आढावांचे कार्य पाहून मात्र थक व्हायला होत असे. शालेय वयातच त्यांनी १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत भाग घेतला. पुढे ते राष्ट्रसेवा दलात सामील झाले. आयुर्वेदातील वैद्यकशास्त्रातील पदवी संपादन करुन ते नाना पेठेत वैद्यकीय व्यवसाय करू लागले. त्यांच्या दवाखान्याच्या आजूबाजूला हमालांचा मोठा भरणा होता. त्यांचे कष्ट, त्यांना मिळणार्या असुविधा हे पाहून बाबांनी ‘हमाल पंचायत’ या नावाने त्यांची संघटना उभारली. रेल्वे स्टेशनवरील हमालांनाही त्यात सामील करून घेतले. त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात म्हणून अविरत संघर्ष केला, प्रसंगी तुरुंगवासही भोगला. हमाल पंचायतीची स्थापना ही बाबांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना ठरली.
डॉ. बाबा आढाव हे काही काळ राजकारणातही होते. त्यांनी निवडणुकाही लढवल्या. पुणे महानगरपालिकेचे ते नगरसेवकही होते. पण ते राजकारणात रमले नाहीत. विधायक कामाचेच त्यांना आकर्षण होते. असंघटित कष्टकर्यांसाठी कार्य करण्यात त्यांनी आपली हयात घालवली. महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषद, घरगुती मोलकरीण संघटना, रिक्षा पंचायत, टेम्पो पंचायत, कागद काच कचरा वेचक संघटना, पथारी धारकांची संघटना अशा अनेक संघटना त्यांनी केवळ उभारल्याच नाहीत तर ते त्या संघटनांचे आधारवड राहिले. त्यांनी त्यांना त्यांच्या न्याय्य मागण्या मिळवून दिल्या. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला, अनेकवेळा तुरुंगवासही भोगला.
बाबांवर महात्मा फुले यांच्या विचारांचा पगडा होता. यातूनच त्यांनी १९७१ साली महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना केली. समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय या आधुनिक मूल्यांवर त्यांची निष्ठा होती. संयुत महाराष्ट्र चळवळ, आणिबाणी विरोधातील आंदोलन, राष्ट्रीय एकात्मता समितीची स्थापना, सामाजिक कृतज्ञता निधी, एक गाव एक पाणवठा अशा विविध आंदोलने त्यांनी उभारली आणि यशस्वीपणे राबवली. महात्मा फुले यांनी सुरू केलेली मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी नव्वदीनंतरही बाबा आंदोलन करत होते.
बुद्धिप्रामाण्यवादी बाबा
डॉ. बाबा आढाव हे बुद्धिप्रामाण्यवादी व विज्ञाननिष्ठ होते. अवैज्ञानिक गोष्टींना त्यांचा विरोध होता. ‘मी नास्तिक का आहे’ या विषयावर त्यांनी एकदा व्याख्यान दिले होते. त्यांच्या सुधारक दृष्टिकोनामुळेच त्यांनी ‘देवदासी प्रथा’ निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला त्यांचा मनापासून पाठिंबा होता. जोवर पोलीस ठाणे आणि सरकारी कार्यालयात देवपूजा केली जाते आणि सरकारी अधिकारी, नेते होतात, गंडेदोरे घालतात तोवर त्यांच्याकडून घटनेच्या तत्त्वांचे पालन होणार नाही असे प्रतिपादन ते करत.
सामजिक कृतज्ञता निधी
अनेक कार्यकर्ते आपल्या घरादाराची पर्वा न करता सामाजिक कार्य करत असतात. त्यांना थोडी फार आर्थिक मदत मिळावी यासाठी बाबांनी सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्याचे ठरविले. ‘एक गाव एक पाणवठा’ या आंदोलनापासून बाबांच्या कार्याशी जोडले गेलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा सा. कृ. निधी उभारण्यात अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. सा. कृ. निधी उभारण्यासाठी राज्यभर आचार्य अत्रे लिखित ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे प्रयोग करण्याचे ठरले. यासाठी डॉ. श्रीराम लागू, रिमा लागू, निळू फुले, भारती आचरेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी काहीही मानधन न घेता नाटकात काम करण्याचे मान्य केले. राज्यभर दौर्याच्या आखणीचे काम डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केले. त्यांच्या कुशल संघटन कौशल्यामुळे दौरा अतिशय यशस्वी ठरला.
‘एक गाव – एक पाणवठा’ चळवळ
१९७० च्या दशकात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. या काळात ग्रामीण भागात दलितांना सार्वजनिक विहिरींवरून पाणी भरू दिले जात नसे. त्यांना पाण्यासाठी तासन् तास वाट पाहावी लागे किंवा मैलोन् मैल पायपीट करावी लागे. ही अमानवीय प्रथा पाहून बाबा आढाव यांनी ७ ऑगस्ट १९७२ रोजी पुण्यातून ‘एक गाव एक पाणवठा’ या चळवळीची घोषणा केली.
गावातील सार्वजनिक विहिरी आणि पाणवठे सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी खुले करणे. ‘माणूस’ म्हणून सर्वांना पाण्याचा समान अधिकार मिळावा.गावातील उच्चवर्णीय आणि दलित यांच्यातील भिंती पाडणे हे मुख्य उद्दिष्ट होते.
बाबा आढाव यांनी केवळ भाषणे न देता प्रत्यक्ष कृतीवर भर दिला. त्यांनी कार्यकर्त्यांसह खेडोपाड्यात भेटी देऊन दलितांना सार्वजनिक विहिरींवर पाणी भरण्यास प्रवृत्त केले. या चळवळीमुळे दलित समाजात आपल्या हक्कांप्रती जाणीव निर्माण झाली.घटनेने अस्पृश्यता पाळणे गुन्हा ठरवले असले तरी, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी या चळवळीमुळे अधिक प्रभावीपणे होऊ लागली.अनेक तरुण कार्यकर्ते या चळवळीशी जोडले गेले, त्यामुळे नरेंद्र दाभोलकर हे ही होते. ज्यामुळे महाराष्ट्रात समतेच्या विचारांचे वारे वाहू लागले.
बाबांना शेवटच्या दुखण्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या काही दिवस आधी त्यांनी मला भेटायला बोलावले. त्याप्रमाणे मी त्यांना म. फुले समता प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये भेटलो. “बाबा, आम्ही तुमच्याकडे प्रेरणास्थान म्हणून पाहतो”, असे मी म्हणालो. बाबा नेहमीसारखे दिलखुलास हसले. बाबांची व माझी ही शेवटची भेट ठरली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण आदरांजली.
-श्रीपाल ललवाणी
मो. ९८२३९७७४७२
