छ.संभाजी महाराज धर्मरक्षक नव्हे, स्वराज्यरक्षक!

अनिल चव्हाण -

१४ मे : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विशेष लेख

छावा चित्रपट रिलीज झाला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राबद्दल समाजात उलटसुलट चर्चा सुरू झाली. संभाजीराजेंना पकडून कुणी दिले, यावरून वाद सुरू झाला. हा संशोधनाचा विषय आहे. कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी छावा चित्रपटानंतर काही कॉमेंट्स केल्या.

ते म्हणतात, “संभाजीराजांनी अण्णाजी दत्तोला हत्तीच्या पायी दिले. त्याच्या कुलकर्णी वतनात संगमेश्वर गाव आहे. तिथे अण्णाजी दत्तोचा कंपू असावा. याच काळात त्या परगण्याचे देश कुलकर्णी पद अण्णाजीकडेच होते. सरकारकून प्रल्हाद निराजीला या काळात कैदेत ठेवले होते. म्हणजे या काळात मोठा कट झाला होता. त्याचवेळी पन्हाळा जिंकण्यासाठी शेख निजाम उर्फ मुकर्रबखान-हैदराबादी या सरदाराला औरंगजेबाने पन्हाळा परिसरात पाठवले होते. त्याला संभाजी महाराज संगमेश्वरी असल्याची खबर फितूरांनी दिली. याबाबतीत दोन-तीन लोकांकडे संशयाची सुई जाते. एक म्हणजे रामदासांचे शिष्य रंगनाथ स्वामी! त्या वेळी दिवाकर गोसावी आणि उद्धव गोसावी यांचे भांडण सुरू होते. संभाजीराजेंनी दिवाकर गोसावीच्या बाजूने न्याय दिला! आणि रंगनाथ स्वामी उद्धव गोसावींच्या बाजूचे होते. पाँडिचेरीच्या फ्रेंच कंपनीचा प्रमुख मार्टिन याचे अनेक सरदारांशी कम्युनिकेशन होते. त्याने नोंद करून ठेवली आहे की ,”संभाजीराजाला त्यांच्या ब्राम्हण सरकारकूनांनी पकडून दिले.”

अभ्यासू लेखक विश्वास पाटील म्हणतात,” संभाजी महाराजांना पकडण्यापूर्वी दोन महिने आधी संभाजी महाराज आणि कवी कलश यांनी शिर्यावर चढाई केली होती. त्यांनी शिर्केला पळवून लावले होते.

इंद्रजीत सावंत यांनी मार्टिनचा हवाला देऊन फितुरीचे कारस्थान ब्राह्मण सरकारकुनांनी केल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या एका व्यक्तीने त्यांना धमकी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास

यापूर्वी शिवाजी महाराजांबद्दलही अशा चर्चा झालेल्या आहेत, किंबहुना अजूनही सुरू आहेत.

आमच्या लहानपणी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांच्या दोन गुरूंची माहिती आम्हाला शिकायला मिळाली. पण आता इतिहास संशोधकांनी पुरावे देऊन जाहीर केले की, शिवाजी महाराजांना असे कोणी गुरू नव्हते, त्यांच्या मातोश्री या त्यांच्या गुरु होत. या बाबीवर कोर्टाने सुद्धा शिकामोर्तब केले. बरे, हे आज शोधून काढले, असे नाही. महात्मा ज्योतिबा फुले शिवरायांच्या गुरूबद्दल म्हणतात, “पाण्यात मासा खेळे, गुरु कोण असे त्याचा?” राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केळुसकर गुरुजींकडून शिवरायांचे चरित्र लिहून घेतले. १९०६ साली ते प्रसिद्ध झाले. पुढची ३०-४० वर्षे शिवरायांच्या गुरुवरून आंदोलने मोर्चे झाले. पुढे शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू मा. आप्पासाहेब पवार यांनी शिवरायांवर ग्रंथ लिहिला.

प्राध्यापक तज्ज्ञ ही अज्ञ?

पण प्राध्यापक मंडळींनी वरील पुस्तके वाचलीच नाही. महाराष्ट्रातल्या प्राध्यापकांना ती उपलब्ध झाली नसतील, पण शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेमध्ये असलेल्या कॉलेजमधील इतिहासाच्या प्राध्यापकांनी तरी ही पुस्तके वाचावीत की नाही?

बरे हे प्राध्यापक ब्राह्मण असते, तर ब्राह्मणांच्या डोक्यावर आपल्याला खापर फोडणे सोपे होते. पण शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेमधील ही मंडळी बहुजन समाजातील होती.

संशोधित ग्रंथ

संभाजी महाराजांची माहिती मिळावी म्हणून कोल्हापुरात प्रसिद्ध झालेला आणि इतिहास तज्ज्ञांनी संपादित केलेला ग्रंथ वाचण्यासाठी घेतला. ही या ग्रंथाची दुसरी आवृत्ती आहे.

‘पहिल्या आवृत्तीचे संपादकाचे निवेदन’ यामध्ये संपादक म्हणतात,”मराठ्यांचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची फाल्गुन वैद्य तीस शके सोळाशे दहा (म्हणजे ११ मार्च १६८९) रोजी पुण्याजवळच्या वढू-तुळापूरच्या परिसरात मोगली छावणीत औरंगजेब बादशहाने हाल हाल करून हत्या केली. मराठ्यांच्या राज्याच्या शत्रूशी लढत असता या मराठा राजाने हौतात्म्य पत्करले.”

‘स्मारक ग्रंथाविषयी संपादकाचे निवेदन’ यामध्ये संपादक म्हणतात, “मराठ्यांचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा फाल्गुन वैद्य तीस शके सोळाशे दहा (म्हणजे ११ मार्च १६८९) रोजी पुण्याजवळच्या वढू-तुळापूरच्या परिसरात मोगली छावणीत औरंगजेब बादशहाने हाल हाल करून वध केला. मराठ्यांच्या राज्याच्या शत्रूशी लढत असता या मराठा राजाने हौतात्म्य पत्करले.”

हत्या की वध?

संपादकांना हत्या म्हणायचे आहे की वध? खरं म्हणजे, हे दोन्ही शब्द चूक आहेत. एकाने दुसर्‍याला मारण्याची क्रिया घडली असेल, तरी त्या मागील हेतूवरून मरणारा आणि मारणारा यांच्या चरित्रावरून वध, हत्या किंवा खून असा शब्द वापरला जातो.

‘रामाने रावणाचा वध केला.’ इथे, राम सज्जन, रावण दुर्जन आहे. रावणाला मारणे हे चांगले काम आहे. वध हा शब्द वापरतात, तेव्हा मारणारा सज्जन, थोर आणि मरणारा दुर्जन, वाईट, दुष्ट असतो.

‘मांजराची हत्या घडली तर काशीला जावे.’ हत्या ही चुकून घडते. मारण्याचा हेतू नसतो. मरणारा हा क्षुल्लक असतो.

‘खून करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी पकडले!’ अशी बातमी आपण वाचतो. खून करणारा खुनी असतो म्हणजे वाईट असतो. ज्याचा खून झाला तो चांगला किंवा वाईट कसाही असू शकतो.

खून करणार्‍याला न्यायालयातून शिक्षा होते. वध किंवा हत्या करणार्‍याला शिक्षा झाल्याचे उदाहरण नाही. शब्दाचे हे अर्थ सुद्धा माहिती नसतील, असे संपादक इतिहास तज्ज्ञ बनतात. त्यांचा इतिहास वाचून सामान्य मंडळी एकमेकांच्या छाताडावर बसतात.

पुरंदरे यांचा इतिहास

महाराष्ट्रात हिंदू-मुस्लीम द्वेष वाढवून दंगली घडवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वापर करण्यात आला. असा इतिहास लिहिणार्‍यात सर्वांत पुढे नाव आहे बाबासाहेब पुरंदरे यांचे! पण त्यांनी स्वतःला कधीच इतिहासकार म्हणवून घेतले नाही; इतरांनीही म्हटले नाही. ते स्वतःला शिवशाहीर म्हणवून घेत. पण गंमत म्हणजे त्यांनी शाहिरी केलेली नाही. पण त्यांच्या या द्वेष पसरवण्याच्या कार्यासाठी, सर्वांचा विरोध असताना सुद्धा, पोलीस पहार्‍यात त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला.

२५ वर्षांपूर्वी जेम्स लेन यांनी पुस्तक प्रसिद्ध केले. त्यामध्ये शिवरायांची आणि मा जिजाऊ यांची अत्यंत खालच्या पातळीवरून बदनामी केली आहे. त्या विरोधात महाराष्ट्रात मोठे काहूर उठले. पुन्हा पुन्हा इतिहासाची पाने चाळण्यात आली. अस्सल पुरावे, भकम पुरावे, दुय्यम पुरावे, इत्यादी प्रकारानुसार अभ्यास करण्यात आला. आणि शिवरायांना त्यांच्या आई याच गुरु होत्या. त्यांची बदनामी ब्राह्मण्यवादी इतिहासकारांनी आणि लेखकांनी जाणून-बुजून केली आहे; अशी टीका होऊ लागली.

या टीकेचा परिणाम प्राध्यापकांवर काय झाला असेल?

प्राध्यापकांच्या नोट्स

शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. भाग एकच्या परीक्षेस इतिहास विषयाचा पेपर आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खास नोट्स पुरवण्यात आल्या आहेत. त्या वाचूनच विद्यार्थ्यांचा अभ्यास होतो. त्याच्या सत्र एकच्या अभ्यासक्रमामध्ये घटक एक-ऐतिहासिक पर्यटन आणि घटक एक-स्वराज्याची पार्श्वभूमी यामध्ये दिलेली माहिती पुढीलप्रमाणे.

“६) मुस्लीम धार्मिक अत्याचाराविरुद्ध मराठ्यांची प्रतिक्रिया!

बहामनी सुलतानापासून ते औरंगजेबापर्यंत काही अपवाद वगळता सर्व मुस्लीम राज्यकर्त्यांनी दक्षिणेतील हिंदू प्रजेवर अत्याचार व जुलूम केले होते. त्याच्याविरुद्ध मराठ्यांनी उठाव केले, म्हणजे ती एक धार्मिक प्रतिक्रिया होती.”

) सामाजिक परिस्थिती!

“मुस्लीम सत्तेचे प्राबल्य असल्यामुळे हिंदूंवर अनेक अन्याय अत्याचार होत होते; मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती.”

मुस्लिमांनी केलेले अन्याय-अत्याचार आणि उद्ध्वस्त केलेली मंदिरे, याचे काही पुरावे या लेखक, प्राध्यापक महोदयांनी शोधले आहेत काय? शृंगेरीचा मठ पेशव्यांनी लुटला आणि टिपू सुलतानाने परत बांधून दिला; हे उदाहरण मुस्लीम अत्याचाराचे आहे काय? त्या काळच्या लढाया हिंदू विरुद्ध मुस्लीम नव्हत्या; त्याला ब्रिटिशांनी हा रंग दिला आणि ब्राह्मणवाद्यांनी त्याचा वापर केला.

पण मुस्लिमांबद्दल द्वेषपूर्ण सवंग विधाने करण्याची सवय राजकारण्यांप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आहे.

फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे साक्षर बनलेल्या आणि प्राध्यापक बनलेल्या बहुजनांची ही परिस्थिती आहे. याच नोट्समध्ये वर्ण व्यवस्थेबद्दल काय म्हटले आहे पहा.

“४) सामाजिक परिस्थिती

मराठा सत्तेच्या उदयापूर्वी महाराष्ट्रामध्ये समाजात धर्मशास्त्राचा प्रचंड प्रभाव होता. समाजव्यवस्था चातूरवर्णीय व्यवस्थेत अडकली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे प्रमुख चार वर्ण होते. विशिष्ट वर्गालाच शिक्षणाचा अधिकार होता. इतर वर्णांना शिक्षणाचा अधिकार नव्हता.”

विशिष्ट वर्ण

विशिष्ट म्हणजे कोणता वर्ण? त्या वर्णाचे नाव का घेतले जात नाही? हे ब्राह्मणी दहशतीचे उदाहरण आहे.

पुरावा नसताना मुस्लीम द्वेष सहज पसरवायचे आणि पुरावा असताना सुद्धा ब्राह्मण्यवादाविरोधात काही लिहायचे नाही. या मानसिकतेतून इतिहासाचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधन होते. ऐतिहासिक दृष्टिकोन निर्माण करणे, हे शिक्षणाचे ध्येय आहे; पण असा काही दृष्टिकोन असतो; हे प्राध्यापकांच्या गावी सुद्धा नाही.

धर्मरक्षक नव्हे, स्वराज्यरक्षक

संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले? की स्वराज्याचे रक्षण केले? या प्रश्नांचे उत्तर त्यांनी केलेल्या कायद्यामध्ये आणि त्यांच्या वर्तनामध्ये मिळते.

त्यांनी स्वतःला कधीही धर्मरक्षक म्हणून घेतलेले नाही. सर्व धर्मांच्या प्रजेला त्यांनी समान वागणूक दिली. धर्माच्या बाबतीत त्यांनी शिवरायांचा आदर्श घेतला होता याची अनेक उदाहरणे मिळतात.

छत्रपती संभाजी महाराजांच्या लढाया, पोर्तुगीज, इंग्रज, जंजिरेकर सिद्धी आणि मोगल यांच्या विरोधात झाल्या आहेत. या लढाईमध्ये दोन्ही बाजूला हिंदू आणि मुस्लिम सैनिक आणि सरदारही होते. या लढाया धर्मावर आधारित नव्हत्या.

धर्म हा शब्द सुद्धा सापेक्ष आहे. प्रत्येकाची धर्माची व्याख्या वेगळी आहे. महिलांना जिवंत जाळून त्याला ‘सती’ म्हटले जाते. या विरोधात राजा राम मोहन रॉय यांनी ब्रिटिशाकडे अर्ज केला आणि सती प्रथा बंद करण्याची मागणी केली. तेव्हा चिडलेल्या सनातनी ब्राह्मणांनी पत्रक प्रसिद्ध केले आणि ब्रिटिशांना सांगितले की,”हा आमच्या धर्मातला तुमचा हस्तक्षेप आहे. बायकांना जिवंत जाळणे हा आमचा सनातन धर्म आहे. ही आमची धर्मश्रद्धा आहे; त्यात लक्ष घालू नका.”

दलितांना मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव होता, आहे. ही सुद्धा धर्मश्रद्धाच होती. दलित आणि स्त्रियांशी असमानतेचा अन्यायी व्यवहार करणे, हा धर्म आहे का? की सर्वांशी समतेने वागणे, शत्रूच्या स्त्रीला सुद्धा सन्मानाने वागवणे, हा धर्म आहे ?

आजही वैदिक कोणत्या धर्माप्रमाणे वागतात?

शिवराय आणि शंभुराजे यांचा धर्म माणुसकीचा धर्म होता. वैदिकांचा विषमतेवर आधारित आणि दलित आणि स्त्रियांना छळणारा धर्म शिवरायांचा किंवा शंभूराजांचा धर्म नव्हता. म्हणून संभाजीराजे स्वराज्यरक्षक होते असे म्हणावे लागते.

मराठी साहित्य

नामवंत इतिहासकारांनी संभाजी महाराजांची विकृत प्रतिमा साहित्यिकांसमोर ठेवली. बखरींमधून बदनामीकारक आणि खोटा मजकूर लिहिला गेला. तो वाचून मराठी साहित्यिकांनी संभाजी महाराजांची प्रतिमा विकृत चितारली.

नाटक आणि चित्रपटांमधून संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली. आताच्या सखोल संशोधनानुसार लक्षात येते की, त्यांच्या नावावर खपवलेल्या तरुणी प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हत्या. रायगडावरील ज्या ठिकाणांची अतिरंजित वर्णने केली आहेत, त्या ठिकाणी संभाजी महाराज त्या काळात दीड दोन वर्षे नव्हते.

संभाजी महाराजांचा संघर्ष

संभाजी महाराजांना ब्राह्मण सरकारकूनांनी पकडून दिले की शिर्केंनी पकडून दिले यासंबंधी वाद असला, तरी शिर्के आणि सरकारकून यांच्याशी त्यांचे मतभेद होते, हे सर्व जण मान्य करतात. शिर्केंचे कारण होते, त्यांना वतन हवे होते.

सरकारकूनांना सत्ता हवी होती. संभाजी महाराज राज्यकारभारात भाग घेऊ लागले, तेव्हापासून संभाजीराजे व प्रधान यामधील वितुष्टास सुरुवात झाली असावी. या वितुष्टामध्ये वैदिक पंथीय व शाक्तपंथीय असा काही संघर्ष होता का?

शृंगारपूर-संगमेश्वर भागात शाक्तपंथीयांची वस्ती आणि प्रभाव होता. शाक्तपंथीयांचा मुख्य गुरु शिवयोगी याची मठी शृंगारपुरीस होती. कवी कलश याच काळात शृंगार पुरी होता असे दिसते. शाक्तपंथीय कवी कलशाला मुख्य सल्लागार म्हणून संभाजीराजांच्या अंतर्गत वर्तुळात स्थान मिळाले. त्यांनी पुढे पुढाकार घेऊन युवराज यांचा कलशाभिषेक घडवून आणलेला आहे.

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी रायगडावर वैदिक पंथीय व शाक्त पंथीय यांचा संघर्ष झालेला दिसतो. हा संघर्ष विकोपात जाऊ नये म्हणून महाराजांनी शाक्तपंथीय निश्चलपुरी गोसावीकडून आपला दुसरा तांत्रिक राज्याभिषेक करून घेतल्याचेही प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांचे सर्व प्रधान वैदिक धर्माभिमानी असल्याने त्यांनी वैदिक पंडितांची बाजू घेतली.

वैदिक आणि शाक्तपंथीयांच्या धार्मिक बाबींचा विचार केला जातो; पण सामाजिक बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

वैदिकांना चार वर्णांमध्ये विभागलेला समाज पाहिजे आहे; तर शाक्तपंथीयांना समतेवर आधारित समाज हवा आहे. त्यांना बदनाम करण्यासाठी वैदिकांनी, लैंगिक बाबींचा बाऊ केला. जाती, वर्ण आणि स्त्री-पुरुष समतेचा विचार दाबून टाकला.

समतेसाठी संघर्ष

समतेच्या संघर्षाला खूप मोठा इतिहास आहे. चार्वाक, गौतम बुद्ध, भगवान महावीर, संत बसवेश्वर, चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रविदास, कबीर हे महान संत, समतावादी होते. यांच्याबरोबरच त्या वेळचे लिंगायत, दत्तपंथीय, नाथपंथीय, भागवत धर्मीय, वारकरी, असे सुप्रसिद्ध मोठे पंथ किंवा दशनाम गोसाव्यासारखे मठ उभा करून काम करणारे छोटे पंथ, हे सर्व वर्णव्यवस्थेच्या विरोधात होते. या सर्वांचा संघर्ष वैदिकांशी झाला आहे; आणि आजही सुरू आहे.

शिवराय आणि संभाजी महाराजांचे नाते या समतावाद्यांशी होते. तर त्यांच्याबरोबर काम करणारे वैदिक प्रधान विषमतावादी, ब्राह्मण्यवादी होते.

संभाजी महाराजांना पकडून कोणी दिले हा मुद्दा बाजूला ठेवला, तरी त्यांचा छळ केला तो कोणत्या कायद्यानुसार याचा शोध घेतला पाहिजे.

शूद्राने संस्कृत वाचले, संस्कृत उच्चार केला, ब्राह्मणांवर हात उगारला,ब्राह्मणाला मारले, तर अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी ज्या शिक्षा वैदिक ग्रंथांमध्ये दिलेल्या आहेत, त्या सर्व शिक्षा संभाजी महाराजांच्या छळाशी बरोबर जुळतात. हा योगायोग आहे का?

राजा मुस्लीम असला, तरी हिंदूंसाठी न्यायदानाचे काम ब्राह्मण करत असत. त्यासाठी मनुस्मृतीचा कायदा वापरला जाई! याचे ठळक उदाहरण म्हणजे त्याच शतकातील संत तुकारामांचा केलेला छळ. संत तुकारामांवर खटला करण्यात आला. शूद्र असून सुद्धा ज्ञान सांगतो. ब्राह्मणांचा गुरु होतो. ब्राह्मणाकडून पाया पडून घेतो, हे त्यांच्यावर आरोप होते. ब्राह्मण न्यायाधीशांनी मनुस्मृतीप्रमाणे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची आणि त्यांचे अभंग पाण्यात बुडवण्याची शिक्षा दिली आणि सनातनी ब्राह्मणांनी ती अमलात आणली. सत्तेवर आदिलशहा असताना घडलेली घटना आहे. संभाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा असेच घडलेले आहे. पुढे संभाजी महाराजांचा खरा इतिहास झाकून ठेवणे, आणि पुन्हा पुन्हा त्यांची बदनामी करणे, यामागील कारणांचाही शोध घेता येतो. हे सर्व करणारी मंडळी नेमकी वैदिक आहेत.

शहीद कॉ. गोविंद पानसरे यांनी ’शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहिले. त्याच्या लाखो प्रती महाराष्ट्रात पसरल्या. आणि शिवराय सर्व जाती-धर्माचे भोक्ते होते, रयतेचे राजे होते. त्यांनी स्त्रिया आणि शेतकर्‍यांच्या बाजूने कायदे केले. हे सत्य लोकांच्या पुढे आले. हिंदू-मुस्लीम दंगे बंद झाले.

आता संभाजी महाराजांच्या नावाने द्वेष पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ पदवी दिली आहे.

द्वेष पसरवायला आळा घालायचा असेल तर संभाजी महाराजांचा सत्य इतिहास समोर आला पाहिजे. ते काम आज कॉम्रेड शहीद गोविंद पानसरे यांच्या विचारांचे मावळे करत आहेत.

अनिल चव्हाण, कोल्हापूर

संपर्क : ९७६४१ ४७४८३


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]