एकवेळ प्रश्न विचारू नका, पण किमान तर्कबुद्धी तर वापरा!

कुलगुरु डॉ. सोनीझरीया मिंझ -

डॉ. सोनीझरीया मिंझ या झारखंड मधील सिदोकान्हू मूर्मू विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत. आदिवासी मुलगी ते जे एन यु सारख्या सुप्रतिष्ठीत विद्यापीठातील संगणक विज्ञानाच्या प्राध्यापक ते कुलगुरू या त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांनी आलोक देशपांडे व मुक्ता दाभोलकर यांच्याशी मनमोकळा संवाद साधला आहे. स्थानिक ज्ञान निर्मितीची प्रक्रिया गतिमान करण्याची गरज,अस्मितेचे राजकारण ते वंचित वर्गातून येणार्‍या मुलींसमोर रोल मॉडेल्स असण्याची आवश्यकता अशा अनेक विषयांबद्दलची त्यांची मते जाणून घेऊया!

जयभीम मॅम! आपली कुलगुरुपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने आपले अभिनंदन! एक आदिवासी मुलगी ते ‘जेएनयू’ सारख्या सुप्रतिष्ठित विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्समधील पीएच. डी. केलेली विद्यार्थिनी…..सामान्यपणे कॉम्प्युटर सायन्स हा विषय देखील उच्चवर्गीय, उच्चजातीय पुरुषांचे वर्चस्व असलेला प्रांत आहे. त्यानंतर ‘जेएनयू’मध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या प्राध्यापक आणि आता एका विद्यापीठाच्या कुलगुरू असा आपला प्रवास राहिला आहे, तर आम्हाला या प्रवासाविषयी सांगा.

धन्यवाद मुक्ता! आपल्या वार्तापत्रासाठी मुलाखत देणं, ही माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. माझा जन्म झारखंडमध्ये झाला. मी रांचीमध्ये लहानाची मोठी झाले. आता ती झारखंडची राजधानी बनली आहे; परंतु 1960 च्या दशकात ते एक छोटं शहर होतंं. इतकं छोटं शहर की तिथं वीजही पुरेशी नव्हती. आम्हाला अभ्यासासाठी कंदील वापरावा लागत असे. माझे शालेय शिक्षण रांचीमध्ये झाले. जून 1980 ला अकरावी झाल्यानंतर मी झारखंड सोडले आणि बरोबर चाळीस वर्षांनंतर जून 2020 मध्ये मी पुन्हा झारखंडला आले. तर, चाळीस वर्षेमाझा प्रवास झारखंडच्या बाहेर झाला. माझ्या वडिलांचं गाव झारखंड आणि छत्तीसगडच्या सीमेवर आहे. वडील शिष्यवृत्ती अंतर्गत शिकागो विद्यापीठात पीएच. डी. करत होते, तेव्हा मी देखील आईसोबत तेथे गेले होते. त्यावेळी मला इंग्लिश येत होतं. आई-वडिलांची इच्छा होती की, मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावे पण काही कारणांमुळे तिथे प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे हिंदी माध्यमाच्या शाळेत जावे लागले. हिंदी भाषेतला पहिलीचा वर्ग माझ्यासाठी कठीण होता. आज मी एक कुलगुरू आहे. माझ्या विद्यापीठात बी. एड.चा अभ्यासक्रम आहे. बर्‍याच वर्षांपासून चर्चा होते आहे की, मातृभाषेत शिक्षण झाले पाहिजे. कारण मुले ज्या भाषेत घरी बोलतात, विचार करतात, त्या भाषेतून शिक्षण झाले तर ते त्यांच्यासाठी सोप्पे असते. मला पहिल्या वर्गात हिंदी अजिबात समजत नव्हतं. जी मुलं आपल्या मातृभाषेच्या ऐवजी दुसर्‍या भाषेत शालेय शिक्षण घेतात, त्यांची अडचण मी समजू शकते. तसं बघितलं तर पहिलीनंतरचे माझे शालेय शिक्षण सुखद झाले; परंतु एक-दोन घटना आठवणीत राहतील अशा घडल्या. माझे संस्कृतचे शिक्षक मला एकदा म्हणाले की, संस्कृत आर्यांची भाषा आहे, तर तू संस्कृतमध्ये चांगले मार्क्स कसे मिळवतेस? त्यांचा रोख मी आर्य नसून आदिवासी असण्याकडे होता. विज्ञानाचे शिक्षक म्हणाले, ‘कॉलेजमध्ये तू जीवशास्त्र घे, तुला गणित जमणार नाही.’ मला तेव्हा खूप राग आला होता. मी दुसरीपासून ते अकरावीपर्यंत वर्गात पहिली येत होते. दोन-तीन वेळा मी गणितात शंभरपैकी शंभर गुण मिळवले होते. व्यक्तीला प्रोत्साहन देण्याऐवजी ‘तू हे शिकू शकणार नाहीस,’ हे सांगणं संतापजनक आहे. मी त्या शिक्षकांवर खूप रागावले होते. तेव्हा मी मनाशी ठरवलं की, त्यांना गणितच शिकून दाखवणार. माझे आई-वडील त्यांच्या काळातील पुरोगामी विचारांचे होते, मी पाच वर्षांची असताना वडिलांनी सांगितले होते, ‘ईश्वराने सर्वांना समान बुद्धी दिली आहे, तिचा उपयोग केला पाहिजे.’ पाच वर्षांच्या मुलीला तेव्हा त्यांचं हे सांगणं समजलं नव्हतं; पण ते माझ्या लक्षात राहिलं होतं. त्यामुळे संस्कृत आणि गणिताच्या शिक्षकांच्या बोलण्यानंतर माझ्या मनात आलं की, हे कोण आहेत मला रोखणारे? तर मला वाटतं, हे दोन गतिरोधक माझ्या आयुष्यात आले. त्यामुळे मी प्रगती केली. मी गणितामध्ये बी. एस्सी., एम. एस्सी. केलं. त्यानंतर वाटलं की, आपण संगणक विज्ञान करावे. कारण की त्यावेळी आपल्या देशात नव्यानेच हा अभ्यासक्रम सुरू झाला होता. आयआयटी, पुणे विद्यापीठ आणि ‘जेएनयू’मध्ये हा अभ्यासक्रम होता. प्रवेश परीक्षेतून माझी ‘जेएनयू’त एम. फिल. पीएच. डी.साठी निवड झाली. त्यानंतर मदुराई येथील कामराज विद्यापीठात आणि भोपाळ येथील बर्कतुल्लाह विद्यापीठात संगणक विज्ञानाची सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 1992 मध्ये मी त सहाय्यक प्राध्यापक म्हणून दाखल झाले. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. पुढे ‘जेएनयू’च्या ‘स्कूल ऑफ कॉम्प्युटर अँड सिस्टिम्स सायन्सेस’मध्ये सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक झाले. कुलगुरू बनणे हे माझे स्वप्न नव्हते.

परंतु मी टाळेबंदीच्या दरम्यान कुलगुरुपदासाठीची जाहिरात बघितली, त्यावेळेस मी झारखंडमध्ये होते. तर, ठरवले अर्ज करूया. कारण की, आजपर्यंत शिक्षण क्षेत्रात आपण खूप अनुभव घेतला आहे. त्याचा उपयोग आपल्या भागातील संस्थात केला तर कदाचित चित्रात थोडा बदल होऊ शकतो. या उद्देशाने मी कुलगुरुपदासाठी अर्ज केला आणि माझी निवड झाली. त्यानंतर जराही विलंब न करता मी रुजू झाले. गेल्या पाच महिन्यांपासून मी ‘सिदो-कान्हू मुर्मू’ विद्यापीठाची कुलगुरू आहे.

तुमचा प्रवास रोचक आहे. आपण तो आमच्यासमोर मांडलात, त्याबद्दल धन्यवाद! मी तुम्हाला सांगू इच्छिते की, तुमची मुलाखत घेणार्‍या आम्हा दोघांचेही म्हणजे आलोकचे (देशपांडे) आणि माझे शालेय शिक्षण आमच्या मातृभाषेत मराठीत झाले आहे. मातृभाषेत शिक्षण घेणं गरजेचं आहे, असं आमच्या आईवडिलांचं मत होतं; परंतु प्रत्येक राज्यात असे अनेक समूह असतात की, त्यांची मातृभाषा ही राज्याच्या अधिकृत भाषेपेक्षा वेगळी असते. आपण म्हणालात की, जितकी तुमच्यासाठी इंग्रजी वेगळी होती, तितकीच हिंदीही वेगळी होती. मातृभाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे; पण मातृभाषेतून शिक्षण देण्याचे वचन सरकार पूर्ण करू शकत नाही, तेव्हा राज्य भाषा असलेल्या हिंदी, मराठीसारख्या भाषेतून शिक्षण घेणं सोपं आहे की ते इंग्रजीतून? तुम्हाला काय वाटतं?

मी ‘जेएनयू’त दाखल झाले, तेव्हा ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना भेटण्याची मला जास्त संधी मिळाली. आपण जर पाहिलं तर नागांमध्ये जवळजवळ तीनशे भाषा आहेत. त्या भाषा बोलणार्‍यांना ‘मायनर ट्राईब’ असे म्हणतात. मायनर ट्राईबमधील मुले त्यांची भाषा बोलत मोठी होतात आणि नकळतपणे मेजर ट्राईब भाषाही शिकतात. नंतर त्यांच्यातील बरेचजण शिक्षणासाठी बंगालला येतात. तिथे ते बंगाली शिकतात. हिंदी (मराठी) सारखीच बंगाली मुख्य भाषा आहे. इथे ते तिसरी भाषा शिकतात; पर्यायाने ईशान्य भारतातील जवळजवळ सर्वजणांना थोडीफार बंगाली येत असते. उच्चशिक्षणासाठी इंग्रजी गरजेची आहे, त्यामुळे ते इंग्रजी शिकतात. शिक्षण घेताना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर चार भाषांमध्ये वावरण्याची अडचण मी समजू शकते. ज्याची हिंदी आणि इंग्रजी मातृभाषा नाही आहे, त्यांना त्या दोन्ही भाषांत शिकणे सारखेच कठीण आहे. माझ्या घरात माझी शिक्षण घेणारी दुसरी पिढी आहे; पण शिक्षण घेणार्‍या पहिल्या पिढीचे खूपच कठीण असते. कारण की घरात पालकांना ते शब्दांचे अर्थही विचारू शकत नाहीत. त्यामुळे शाळा ही कुतूहल जागृत करणारी आनंददायी जागा न राहता भीतीचे ठिकाण बनते. आजही संथालमध्ये ज्यांची मातृभाषा संथाली आहे, त्यांना मातृभाषेत शिक्षण मिळत नाही. ते म्हणतात ‘हम बिकू भाषा में नहीं पढेंगे।’ बिकू भाषा म्हणजे परकी भाषा.(ऐतिहासिकदृष्ट्या). बाहेरचे माझ्याकडे तुच्छ नजरेनं पाहतात, तर मी त्यांच्याकडून शिक्षण कसे घेऊ? ज्याच्यासमोर माझी ओळख न्यून आहे, त्याच्याकडून शिक्षण घेताना न्यूनगंड तयार होतो. माझे भाग्य हे की, माझ्या शाळेत आदिवासी शिक्षक होते. असमान वागणूक हे अनेक तर्‍हेच्या नागवणुकीचे मूळ कारण आहे. आमच्या वाट्याला जातिव्यवस्थेतील असमानता येत नाही; पण आदिवासी आणि बिगरआदिवासी ही असमानतेची एक रेषा असते. याचा अनुभव शिक्षण क्षेत्रातही येतो. कॉम्प्युटर सायन्समध्ये पण एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला कमी लेखते. स्वतःला उच्चभ्रू (elite) समजण्यासाठी आमचा इतिहास, भाषा यांना तुच्छ लेखलं जातं.

आपले विचार आणि काम यावर आईवडिलांचा प्रभाव निश्चितपणे पडला असेल! आपले वडील त्यांच्या कुटुंबातील पहिले शिक्षित होते, तर आई त्यांच्या कुटुंबातील शिक्षण घेणारी दुसरी पिढी होती. वडिलांनी परदेशात जाऊनही शिक्षण घेतले, एक महाविद्यालय सुरू केले. आम्हाला तुमच्या आईवडिलांच्या पार्श्वभूमीविषयी कुतूहल आहे. तुम्ही त्याविषयी सांगा.

सामान्यपणे वडिलांच्या उच्चशिक्षणामुळे त्यांच्याकडे आधी लक्ष आकर्षित होते; पण मी आईपासून सुरुवात करते. रांची शहरात माझ्या आईने खूपच नवीन गोष्टी केल्या होत्या. आज बालवाडी ही संकल्पना प्रचलित आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’मध्ये पूर्वप्राथमिक शिक्षणाचा समावेश केलेला आहे. माझ्या आईने 1971 च्या आसपास रांचीमध्ये बालवाडी चालू केली होती. मुस्लिम आणि आदिवासी वस्तीत जाऊन बालवाडीची माहिती दिली होती. छोटा शिशुगट आणि मोठा शिशुगट या वर्गांत मुलांना हिंदी व इंग्रजीचे ज्ञान दिले, तर मुलांना पहिल्या इयत्तेपासून शिक्षण घेणे सोपे जाईल, हा विचार आईच्या बालवाडीमागे होता. तिच्या बालवाडीतील मुलांना चांगल्या ठिकाणी प्रवेशही मिळाला. माझी आई ही रांची शहरात बालवाडीची संकल्पना राबविणारी पहिली व्यक्ती होती. जेव्हा तिने बघितले की, बर्‍याच विवाहित महिलांना विवाहामुळे आणि बाळामुळे कामावरून रजा घ्यावी लागते किंवा काम सोडावे लागते, तेव्हा तिने 1980 च्या पूर्वी पाळणाघर चालू केले. त्यात ती दोन महिन्यांच्या बाळांनाही ठेवून घेत असे. बालवाडी व पाळणाघर या दोन गोष्टी तिने रांची शहाराला दिल्या. कालांतराने बर्‍याच जणांनी बालवाडी किंवा पाळणाघरे सुरू केली.

1967 साली माझे वडील पीएच. डी. पूर्ण करून शिकागोहून परतले. जेव्हा त्यांनी रांचीतल्या उच्चशिक्षणाची परिस्थिती बघितली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, महाविद्यालयांमध्ये मर्यादित जागा आहेत आणि तेथे निवड प्रक्रिया आहे. द्वितीय किंवा तृतीय श्रेणीतील विद्यार्थ्यांना तेथे जागा नाहीये. मध्यम ते सामान्य श्रेणीतील विद्यार्थी शाळेत योग्य संधी न मिळाल्याने चमकू शकत नाहीत. यातील बर्‍याच मुलांना शालेय शिक्षण घेताना शेतात काम करावे लागते आणि गावातल्या शाळांच्या शिक्षणाचा दर्जाही चांगला नसतो, पायाभूत सुविधांचा अभाव असतो. त्यांनी ठरवले, अशा मुलांना दुसरी संधी दिली पाहिजे. वडिलांच्या महाविद्यालयात चाळीस टक्क्यांहून अधिक गुण मिळवणार्‍याला प्रवेश मिळत असे. तृतीय श्रेणी हा येथील प्रवेशाचा निकष असे. त्यांच्या अनुभवामुळे आणि प्रयोगशीलतेमुळे अजून एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की, आदिवासी मुलांकडे खेळांच्या स्पर्धेसाठी चांगली क्षमता आहे. त्यांनी मुलांच्या या क्षमतेला वाव दिला. प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एका तरी खेळत भाग घेण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. ज्यात प्रगती करता येते, अशा क्षेत्रातील सहभागामुळे आदिवासी मुलांना आत्मसन्मान आणि आत्मविश्वास मिळाला. जी मुले द्वितीय आणि तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाली होती, ती विद्यापीठाची परीक्षा प्रथम आणि द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाली.

मुलगी असल्यामुळे आपल्याला शिक्षण आणि करिअरमध्ये भेदभावाचा सामना करावा लागला आहे का ?

मी ज्या आदिवासी समाजातून येते, त्या समाजात मुलगा-मुलगी असा भेदभाव कमी आहे; नाही आहे, असे म्हणणे योग्य नाही. कारण सरतेशेवटी तो एक पितृसत्ताक समाज आहे. माझ्या वडिलांच्या बहिणीही शाळेत जात होत्या. मला चार बहिणी आहेत आणि एकही भाऊ नाही. वडील कौटुंबिक चर्चेत आईला व आम्हाला सर्वांना समानसंधी देत. त्यांनी कौटुंबिक निर्णय कधी एकट्याने घेतले नाहीत. वरिष्ठ आणि कनिष्ठ असा फरक घरात नव्हता. त्यामुळे मला वाटते की, मी एक चांगले कौटुंबिक वातावरण असलेल्या घरात वाढले.

आपण संगणक विज्ञानासारख्या प्रतिष्ठित विषयात पीएच. डी. केलीत. सामान्यपणे असे होते की, जे असे करिअर बनवतात, ते त्यामध्येच पुढे जाण्याचा विचार करतात. सामाजिक न्यायासाठीच्या कामात सहभागी व्हायचे तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो, असा वेळ देण्याची निवड ते करत नाहीत; तुम्ही मात्र वेगळा निर्णय घेतला. तुम्ही ‘जेएनयू टीचर्स असोसिएशन’च्या प्रमुख होता. तुम्ही अनेक आंदोलनांत सामील होऊन आपले मतही व्यक्त करता. तर, एकीकडे करिअर आणि दुसरीकडे, सामाजिक न्यायासाठीच्या आंदोलनांतील सहभाग, यातील समतोल आपण कसा साधला आणि या भूमिकेमागची प्रेरणा काय होती?

याला जोडून आणखी एक प्रश्न मी विचारतो, झारखंडहून तुम्ही जेव्हा दिल्लीला ‘जेएनयू’त आलात, तेव्हा ‘जेएनयू’चे एक पोलिटिकल अ‍ॅक्टिव्हिझमचे वातावरण आहे. त्याचा तुमच्यावर कसा प्रभाव पडला?

मी वडिलांबद्दल सांगताना एक मुद्दा सांगायचा राहून गेला. वडिलांनी तृतीय श्रेणीत पास होणार्‍या मुलांसाठी महाविद्यालय चालू केले. आदिवासींची परिस्थितीच अशी होती की, तृतीय श्रेणी मिळालेले बहुतेक विद्यार्थी आदिवासी असत; परंतु त्यांनी फक्त आदिवासींसाठी महाविद्यालय काढले नाही, तर तृतीय श्रेणी मिळालेल्या प्रत्येकासाठी ते महाविद्यालय होते. कोणत्याही समस्येकडे ते वस्तुनिष्ठपणे बघत. त्यामुळे त्यांनी हा उपाय शोधला. त्यांचे घरातील संभाषण आम्ही टीपकागदासारखे टिपत होतो. अशा वातावरणात मी आणि माझ्या बहिणी मोठ्या झालो. समस्येकडे बघणे आणि त्यातून मार्ग काढणे, हा आमच्या जडणघडणीचा भाग होता. मी अभ्यास करताना ठरवले होते की, मला गणित शिकायचं आहे. माझ्या शिक्षकांना त्यातील सगळ्यात मोठी पदवी मिळवून दाखवायची आहे. ‘जेएनयू’त शिकताना मी विद्यार्थी आंदोलनांत खूप सक्रिय नव्हते. मोर्चा किंवा जेवणानंतरच्या रात्रीच्या बैठकांना मी उपस्थिती लावत असे. परंतु आदर्शवाद आणि वास्तव याच्यामधली दरी मला दिसत असल्याने मी संशयवादी (स्केप्टिकल) होते. ‘जेएनयू’त प्राध्यापक म्हणून आले, त्यावेळी मी दोन निर्णय घेतले. मी जीवतोड मेहनत करून शिक्षण घेतले होते; परंतु तोपर्यंत माझ्या लक्षात आले, होते की, मी कितीही जीव तोडून मेहनत केली तरी मला नोबेल किंवा संगणक विज्ञानातील सर्वोच्च परितोषिक ‘ट्यूरिंग अवॉर्ड’ मिळणार नाहीये. मी तितकी प्रतिभाशाली नाहीये. परंतु आई-वडिलांनी आम्हाला शिकवले होते की, तुम्ही समाजाशी जोडलेले असले पाहिजे. कुठेही असा, काहीही करा; पण तुमच्यामुळे समाजाचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. मी तुम्हाला आधीच सांगितले की शिकत असताना मी ‘जेएनयू’तील आंदोलनांकडे चिकित्सक नजरेने पाहत होते. वास्तव आणि आदर्शवाद यांच्यातील दरी मला दिसत होती. येथे नोकरी करताना मी असे ठरवले की, आपल्या देशातील प्रश्न इतके वेगवेगळे आहेत की, त्यातील काही प्रश्नांवर तरी मी काम करेन. मी ‘जेएनयू’मध्ये असल्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल असे काही करेन. जी धोरणे न्याय्य नाहीत, असे मला वाटत होते. त्यांच्याशी संबंधित प्रश्न हाताळायला मी हळूहळू सुरुवात केली. जसे की ‘जेएनयू’मधील प्रवेशाचे धोरण, त्यात आम्ही काही बदल आणण्याचा प्रयत्न केला. जसे की, उत्तीर्ण होण्यासाठीचे गुण, त्यात काही सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला, आरक्षणाची अंमलबजावणी होईल, आरक्षित जागा भरल्या जातील, यासाठी काम सुरू केले. हळूहळू ‘जेएनयू’मधील सर्व विभागांनी ही सुरुवात केली. इथे लोक आदर्शवाद आणि वास्तव यातील दरी समजू शकत असत. परंतु त्यांच्या विभागामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची वेळ येत असे, तेव्हा ते गुणवत्तेबद्दल बोलू लागत. या कमतरता मला सहन होत नव्हत्या आणि मी त्या दूर करण्याच्या दिशेने काम सुरू केले. अर्थात ‘जेएनयू’मधील वातावरण, विचार मांडण्याचे, चर्चेचे, वादविवादाचे स्वातंत्र्य यामुळे माझ्यासारख्या लोकांना बोलण्याची व कृती करण्याची संधी मिळाली.

आपण पाच महिन्यांपासून कुलगुरू आहात, या पाच महिन्यांचा अनुभव कसा होता? आणि उर्वरित कार्यकाळासाठीचे आपले नियोजन कसे आहे? तुम्हाला कुठे जायचे आहे?

‘जेएनयू टीचर्स असोसिएशन’च्या कार्यकालात आमचे एक बोधवाक्य होते – ‘सामाजिक न्याय (Social Justice), लिंगभावविषयक न्याय (Gender Justice), नैसर्गिक न्याय (Natural Justice)’. न्यायाचे हे तीन आयाम घेऊन मी सिदो-कान्हू मुर्मू विद्यापीठात पाऊल ठेवलं आहे. इथे येण्यापूर्वी मला सांगितले गेले आहे की, विद्यार्थिनींच्या प्रवेशाचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि विद्यापीठाशी निगडित सर्व महाविद्यालयांमध्ये मुलींना अधिकाधिक सुरक्षित वाटेल, असे वातावरण निर्माण करणे, त्यांची संख्या वाढवणे, ही माझी मनोमन इच्छा आहे. त्याकरिता मुलगे आणि मुली अशा दोघांच्यासोबत काम करावे लागेल; तसेच प्रशासनासोबत देखील काम करावे लागेल. माझ्या पाच महिन्यांच्या अनुभवातून असे लक्षात आले आहे की, झारखंडमधल्या दुसर्‍या विद्यापीठांतदेखील जवळपास अशीच स्थिती आहे. मंजूर पदांची संख्या मर्यादित आहे. विद्यार्थी-शिक्षक दर इतका कमी आहे की, मला NAC साठी अर्ज देखील करता येणार नाही. भौतिक सुविधांसाठी म्हणजे ‘हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चर’साठी सरकार मदत करत आहे; पण ‘सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर’चे काय?.. मी ‘सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर’ हा शब्द वापरायला सुरुवात केली आहे. म्हणजे शिक्षक व इतर कर्मचार्‍यांची संख्या अत्यंत अपुरी आहे. जोपर्यंत हे विद्यार्थी- शिक्षक प्रमाण योग्य होत नाही, तोपर्यंत मी हार मानणार नाही. आरक्षणानुसार जागा भरल्या जाव्यात, यासाठी ‘पोस्ट बेस्ड रोस्टर’ची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे माझे मत आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, जे पारंपरिक विषय आहेत ते तर आहेतच; पण या परिसरातील ज्ञान शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे. जसे की, आम्ही ज्या संथाल परगण्यात आहोत, तेथे 20 जूनला आम्ही ‘हूल’ साजरे करतो. सिदो व कान्हू या दोन भावांनी 1855 मध्ये सुरू केलेली क्रांती साजरी करण्यासाठी आम्ही ‘हूल’ साजरी करतो. आमच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास इथून सुरू व्हायला हवा. मला इतर ठिकाणच्या इतिहासकारांना दोष द्यायचा नाही; पण आमच्या येथील इतिहासकारांनी आपले काम केलेले नाही. त्यामुळे आमच्या विद्यापीठाने स्थानिक ज्ञान, इतिहास यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले नाही, तर ते दुसरे कोण करणार? मला हे काम करण्याची इच्छा आहे. मी प्राध्यापकांना प्रेरित करायला सुरुवात केली आहे; पण प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असताना आमचे प्राध्यापक संशोधनासाठी वेळ कुठून काढणार? मी ही व्यवस्था अधिकाधिक चैतन्यशील, सृजनशील, नवनिर्मितीक्षम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. येथे ‘डिझाईन अँड ट्रायबल आर्ट’सारखे विभाग निघावेत, असे मला वाटते. जगभरातून मानववंशशास्त्रज्ञ इथे येतात आणि माहिती घेऊन जातात. आम्ही त्यांच्या अभ्यासाचे विषय बनून राहतो; पण आम्ही आपला स्वतःचा अभ्यास केलेला नाही. इथे मानववंशशास्त्र विभाग नाही. शिक्षणशास्त्राचा विभाग नाही. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’त मातृभाषेतून शिक्षणाबद्दल बोलले जाते. आदिवासी संस्कृतीतून आम्हाला काही वैशिष्ट्यपूर्ण अध्यापन पद्धती मिळू शकतात. त्यासाठी आमच्या शिक्षकांचे प्रशिक्षण करणारा, अभ्यासक्रम, अध्यापनपद्धती याविषयी संशोधन करणारा शिक्षण विभाग आम्हाला तयार केला पाहिजे. ही माझी स्वप्ने आहेत. विद्यार्थी प्रवेशाच्या वेळी आरक्षणाच्या तरतुदी पाळल्या जातात; परंतु मला त्या व्यवस्थेमध्येही बारकाईने लक्ष घालायचे आहे.

मॅम आजचा कालखंड हा आयडेंटिटी पॉलिटिक्स किंवा अस्मितेचे राजकारण करण्याचा आहे. अस्मितेच्या भावनेचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्याचे वातावरण आहे. उच्चजातीय मानसिकता आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करू पाहत आहे. या काळात आपण आदिवासी अस्मिता किंवा तथाकथित कनिष्ठ जातींची अस्मिता सिद्ध करण्याच्या संघर्षाकडे कसे बघता?

संवैधानिक अधिकार मिळविण्यासाठी जर अस्मितेचे राजकारण केले जात असेल तर त्यात गैर काय? परंतु इतर कोणत्या तरी हेतूने लॉबी तयार करण्यासाठी अस्मितेचे राजकारण वापरले जात असेल तर ते योग्य नाही, असे मला वाटते. दुसरे म्हणजे आदिवासी अस्मिता सबल्टन (subaltern) या शब्दाने दर्शविली जाते. हा शब्द मला योग्य वाटत नाही. या शब्दातच ‘सब’ म्हणजे ‘उप’ असा शब्द आहे. ‘ईक्वलटन’ असा काही शब्द असू शकेल का? मी भाषावैज्ञानिक किंवा समाजशास्त्रज्ञ नाही. गणित आणि संगणक विज्ञान जाणणार्‍याच्या भूमिकेतून मी हे बोलते. आदिवासी, दलित किंवा बहुजन अस्मितांनी हे ध्यानात घ्यावे की, इतर अस्मितांनी शिक्षणावर वर्चस्व प्रस्थापित करूनच स्वतःचे स्थान पक्के केले आहे. या व्यवस्थेसाठी आपण ‘ब्राह्मण्यवादी’ असा शब्द वापरतो. शिक्षणातून निर्माण झालेल्या एकाधिकारावर उतारा शोधताना आपण फक्त शैक्षणिक नव्हे, तर विद्याशाखीय अभ्यासाच्या जागा वापरल्या पाहिजेत. जसे मी ‘हूल’संदर्भात संगितले. ‘हूल’चा अभ्यास केला पाहिजे. ‘हूल’ 30 जून 1855 ला घडले. त्याच्या आधी काय काय घडले, याचा अभ्यास करून ते पुढे आणले पाहिजे. त्याचा पाठठ्यपुस्तकात समावेश होईल का नाही, हा पुढचा मुद्दा; पण त्याबद्दल किमान सखोल चर्चा तर होऊ दे. कितीतरी औषधी वनस्पती आहेत. ते सगळे आयुर्वेदाखाली संबोधित केले जाते; परंतु वनस्पतिशास्त्रज्ञ, औषधनिर्माणशास्त्रज्ञ यांनी त्यात सहभागी झाले पाहिजे. जोपर्यंत आपण या सर्व गोष्टी अभ्यासाच्या विचारपीठावर आणत नाही, तोपर्यंत मी (जे आहे त्याबद्दल) तक्रार करू शकत नाही. विद्यापीठे आणि अध्ययनविषयक विचारपीठे या ठिकाणी या विषयांकडे दुर्लक्ष झालेले आहे. जसं मी मानववंशशास्त्राबद्दल बोलले. जगभर बिगरआदिवासींनी आदिवासींचा अभ्यास केलाय. त्यातून असे जाणवते की, त्यांना काही सांस्कृतिक संदर्भ योग्य शब्दात मांडता आलेले नाहीत. इंग्रजीत त्या सांस्कृतिक संदर्भांसाठी योग्य शब्द नसतील. हे दुरुस्त करण्यासाठी त्या-त्या भागातील व त्या-त्या समाजातील लोकांनी अभ्यास करून मांडणी केली पाहिजे, हा फक्त अस्मितेच्या राजकारणाचा मुद्दा न बनता त्याच्याकडे अभ्यासाच्या भूमिकेतून बघितले पाहिजे. कोणत्या मुद्द्याचा आग्रह धरायचा व कोणता मुद्दा सोडून द्यायचा, हे अभ्यासाच्या आधारे ठरले पाहिजे. आजपर्यंत ज्याच्याकडे दुर्लक्ष झाले, तो मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी किंवा प्रस्थापित करण्यासाठी विद्याशाखीय विचारपीठे वापरली गेली तर मला आनंद वाटेल.

आज तुम्ही एक रोल मॉडेल बनला आहात. तुमचे रोल मॉडेल कोण होते?

मला आजही आठवते, मी दुसरीत होते, तेव्हा माझ्या पालकांनी मला रोल मॉडेलविषयी सांगितले. आमचे एक आदिवासी नेते होते. सी. कार्तिक राव. ते वास्तुरचनाकार होते. जगातल्या सर्वोत्तम 10 वास्तुरचनाकारांमध्ये त्यांचे नाव आले होते. आई-वडिलांनी कायम आम्हाला आमच्या आजूबाजूच्या मोठ्या लोकांविषयी सांगितले. ज्यांना मान्यता मिळाली आहे; पण जे भारताला कमी परिचित आहेत, असे अनेक जण त्यात होते. शाळेत देखील महापुरुष किंवा महान काम केलेल्या महिलांविषयी चर्चा होत असे. मला वाटते, रोल मॉडेल्स असणे खूप महत्त्वाचे आहे. मी शाळेत असताना इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. जेव्हा ‘पहिल्या महिला पंतप्रधान’ असा त्यांचा उल्लेख केला जात असे, तेव्हा माझ्या अंगात ऊर्जा संचारत असे. त्या रांचीला भेट देत असत. त्या येत-जात असताना आम्ही त्यांना बघण्यासाठी जात असू. आजूबाजूला रोल मॉडेल असणे खूप गरजेचे आहे. काही यशस्वी लोक असेही असतात की, जे आपल्यासारख्याच पार्श्वभूमीतून येतात. त्यांना बघून वाटते की, यांची वाटचाल देखील आपल्याइतकीच अवघड होती. खरंतर माझा प्रवास हा माझ्या समजतील इतर अनेकांच्यापेक्षा सुलभ होता आणि कदाचित म्हणूनच मी तो अशाप्रकारे पार पाडू शकले असेन. पहिली ते दहावी माझ्याबरोबर असलेल्या अनेक वर्गमैत्रिणींचा प्रवास अजून कठीण असेल. त्यामुळेच त्या अर्ध्या वाटेवर थांबल्या असतील. समान पार्श्वभूमीतून येणार्‍या प्रेरणादायी लोकांची उदाहरणे खूप महत्त्वाची आहेत. त्यातून पुढे जायला थोडी अजून ताकद मिळते. परंतु त्याचबरोबर आपल्याला एकदम आदर्शवादी मॉडेलची देखील आवश्यकता असते. त्यातून आपली उद्दिष्टे उंच होतात. त्यामुळे आपल्याला आपल्या सांस्कृतिक वातावरणात प्रेरणेचे स्रोत मिळू शकतात किंवा दुसर्‍या वातावरणातदेखील ते मिळू शकतात. परंतु जीवनाच्या लांबीचा आणि खोलीचा अदमास येण्यासाठी प्रेरणा खूप आवश्यक आहे. आयुष्यात असे अनेक टप्पे येतात की, जेथून पुढे जाण्यासाठी काहीवेळा साहस, तर काहीवेळा निश्चयाची आवश्यकता असते. आत्मसन्मान, आत्मविश्वास यांची गरज असते. मला वाटतं, हे सर्व आपल्या प्रेरणास्रोताकडून मिळते. मी सांगू इच्छिते की, माझ्या वर्गातील इतर वर्गमित्रांचा प्रवास माझ्यापेक्षा खडतर झाला असेल. ते ‘अनसंग हिरो’ आहेत. आपल्या प्रदेशातील ‘अनसंग हिरो’ शोधले पाहिजेत. त्यामुळे प्रेरणेचे आणखी स्रोत मिळतील. लोकांना त्या-त्या भागातील हिरोज पण मिळाले पाहिजेत. मुक्ता, तुम्हीही एक आदर्श आहात!

आमच्या संघटनेचे नाव अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे. विवेकशील समाजाची निर्मिती हे आमचे उद्दिष्ट आहे. अंधश्रद्धा निर्मूलन आणि विवेकाची जोपासना या संदर्भातील आपले मत जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.

जिथे मी मोठी झाले, तिथे आजूबाजूला शिक्षणाचा अभाव होता. जिथे शिक्षणाचा अभाव असतो, तिथे अंधश्रद्धा प्रबळ असतात, याबाबतीत माझे दुमत नाही. शिक्षण असेल तर तर्क करण्याची, प्रश्न विचारण्याची क्षमता येते. शिक्षण नसेल तर तर्क करण्याची क्षमता कमी असते. मुलांच्या जिज्ञासेला शिक्षण वाव देते. मी एका धर्माचे पालन करते. त्यातही मी तर्काला जागा ठेवते. अंधश्रद्धांमध्ये तर्काला जागा नाही. अंधश्रद्धेच्या विरोधात पुरावा दिल्यानंतरही तुम्ही बदलत नसाल तर तुम्ही अंधश्रद्धांचे भक्त आहात. आपल्या देशात शिक्षण इतके व्यापक झाले आहे की, अंधश्रद्धेला अजिबात जागा असता कामा नये. कारण शिक्षणातूनच तार्किक क्षमतांचा विकास होतो. प्रश्न नाही विचारले तरी आपण किमान तर्क तर करू शकतो? तर्क करण्याच्या क्षमतेचा वापर करून आपण अंधश्रद्धा कमी करून शेवटी त्या संपवू शकतो. अंधश्रद्धेत तर्क व प्रश्न विचारण्याला जागा नाही आणि शिक्षण तर्क व प्रश्न विचारण्याला चालना देते. ज्यामध्ये तर्क करणे आणि प्रश्न विचारण्याला जागा नाही, ते शिक्षण नाही. संथाल परगण्यात जर मला अशी काही शक्यता दिसली की, तुमच्या संस्थेबरोबर एकत्र येऊन काही कार्यक्रम करता येतील, जर अंधश्रद्धेचे प्रकोप माझ्या नजरेस आले आणि तुमच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि तुमच्याबरोबर मिळून काही करता आले तर माझ्यासाठी ती अभिमानाची बाब असेल.

तुमच्यासोबत बोलून खूप आनंद वाटला!

जर कोरोना नसता तर झारखंडला येऊन प्रत्यक्ष मुलाखत घ्यायला आवडले असते.

समारोप करताना मी फुले दाम्पत्याला अभिवादन करते. जर ते नसते आपण कदाचित बोलू शकलो नसतो. त्यांच्या प्रबळ निश्चयाला मी खूप महत्त्व देते. माझ्या झारखंड भागात ख्रिश्चन मिशनर्‍यांनी शिक्षणाचे कार्य केले. त्यांनीच चालू केलेल्या एक शाळेत माझे शिक्षण झालेय. त्याबद्दल त्यांच्याविषयी माझ्या मनात आदराची भावना आहे. आजच्या काळात देखील ज्यांचा प्रवास कठीण आहे. त्यांचा प्रवास माझ्या प्रयत्नांनी थोडा तरी सुलभा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. मी त्यांचा प्रवास सोपा बनवू इच्छिते, विशेषतः संथाल परगाण्यातील मुली आणि महिला!


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]