घरावर दगडांचा मारा… आणि नंतर घरातील वस्तू पेटवणारी भानामती

मधुकर अनाप - 9850144709

पंधरा दिवसांपासून त्यांच्या घरावर दगड येत होते. म्हणून त्यांनी घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. कॅमेरा बसवताच दगड येण्याचे थांबले आणि अचानक घरातील कपडे व प्लास्टिकच्या वस्तू आपोआप पेटू लागल्या. कुणालाही अचंबित आणि भय निर्माण करणारा हा प्रकार घडला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्दमधील पुजारी यांच्या घरात.

मला अंनिस कार्यकर्ता म्हणून ओळखत असलेले अ‍ॅड. गणेश पुजारी यांचा २८ मार्च २०२५ रोजी बेलापूर खुर्द येथील सकाळीच फोन आला. काल सायंकाळपासून रात्रभर आणि आत्ता सकाळीही आपोआप कपडे आणि इतर वस्तू पेटण्याचा भानामतीचा प्रकार सुरू आहे सर्व कुटुंबीय भयभीत झाले आहे आपण लवकर यावे अशी विनंती केली.

मी क्षणाचाही विलंब न लावता तयारी केली आणि घटनास्थळी जाण्यासाठी निघालो असता श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचाही फोन आला की, मी घटनास्थळी येत आहे, आपणही या. श्रीरामपूर पोलीस स्टेशनला आपल्या विनंतीपत्रानुसार अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन झालेला असल्यामुळे त्यांनी आपल्याला लगेच संपर्क केला. साधारणतः तासाभरात मी घटनास्थळी पोहोचलो.

ज्यांच्या घरात हा प्रकार घडला ते पुजारी कुटुंबीय व ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले होते. गावातच घर असल्यामुळे सुमारे चारशे ते पाचशे लोक हा प्रकार कुतूहल, भीती आणि चमत्कार म्हणून बघण्यासाठी उपस्थित होते.

परिस्थितीची पाहणी करून पुजारी कुटुंबीयांना अगोदर धीर दिला. घाबरण्याचे काही कारण नाही, सर्व प्रकार थांबेल असे सांगून त्यांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी घडलेल्या घटनेविषयी केलेल्या चर्चेनुसार मिळालेली माहिती अशी…

मोहन केशव पुजारी हे बेलापूर खुर्दमध्ये पत्नी व दोन मुलांसह राहतात. १५ दिवसांपासून रात्री त्यांच्या घरावर अचानक दगड यायला लागले, त्यामुळे पुजारी कुटुंबीय भयभीत झाले होते. हा प्रकार थांबत नसल्याने पुजारी यांनी घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. कॅमेरा बसवताच घरावर येणारे दगड बंद झाले; परंतु गुरुवार, २७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता चमत्कार वाटावा अशी घटना घडली. पुजारी यांच्या पत्नी दळण करत असताना घरातील गादीने अचानक पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच घरातील सदस्यांनी गादीची आग विझवली. त्यानंतर थोड्याच वेळात किचनमधील प्लास्टिकच्या सामानानेदेखील पेट घेतला. सुरुवातीला चुकून आग लागली असेल, म्हणून कुटुंबीयांनी आगीच्या घटनेला गांभीर्याने घेतले नव्हते; परंतु किचनमधील सामान पेटल्यावर मात्र पुजारी कुटुंबीय भयभीत झाले. आग पुन्हा लागते की काय, यामुळे या कुटुंबाने गुरुवारची संपूर्ण रात्र दहशतीखाली काढली. शुक्रवार, २८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता पुजारी यांच्या पत्नी आंघोळीला बाथरूममध्ये गेल्या असता बाथरूममध्ये त्यांच्या कपड्याने पेट घेतला. त्यामुळे पुजारी कुटुंबीय प्रचंड भयभीत झाले. त्यांनी घरातील कपडे व प्लास्टिकचे सामान शेजारच्या दोन तीन घरात हलवले. हे सामान दुसर्‍या घरात ठेवताच पुन्हा ठेवलेले कपडे आणि प्लास्टिकने पेट घेतला, तोपर्यंत ही वार्ता बेलापूर खुर्द गावात पसरली. त्यामुळे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दुसर्‍या घरात पेटलेले सामान एका ग्रामस्थाने विझवण्याचा प्रयत्न केला असता त्याचा हात भाजला. भानामती किंवा जादूटोण्यातून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा ग्रामस्थ करू लागले.

दोन पोलीस कॉन्स्टेबल तेथे उपस्थित होते जमावाला शांत करत होते. मी पोचल्यानंतर पाच मिनिटात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत झालेल्या प्रकाराची कुटुंबीयांसह पाहणी केली. जळालेल्या वस्तूंचे पोलीस विभागाने काही नमुने सोबत नेले आणि जबाब देण्यासाठी सर्व कुटुंबीयांना पोलीस स्टेशनमध्ये येण्याचे सांगितले.

तुम्ही तुमचे काम चालू करा असे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी मला सांगितले. झालेल्या सर्व प्रकारची मी माहिती घेतली.

घरात व बाहेर ग्रामस्थांची प्रचंड गर्दी होती. घरातील सर्वांना बाहेर जाण्याची विनंती केली. कुटुंबीयांना एका खोलीत एकत्रित घेऊन त्यांना विश्वासात घेतले आणि झाल्या प्रकाराबद्दल प्रत्येकाला अगोदर एकत्रित आणि नंतर स्वतंत्र घेऊन माहिती विचारली.

या मुलाखतींमधून घडलेला प्रकार लक्षात आला. एखाद्याचा संशय किंवा खात्री झालेली असेल तरी पुढील वाद-विवाद टाळण्यासाठी अंनिसकडून ही माहिती गुप्त ठेवली जाते. झालेला प्रकार थांबवणे हा मुख्य हेतू असतो. हे थांबवायचं असेल तर तुमचं सहकार्य अपेक्षित असल्याचे पुजारी कुटुंबीयांना सांगितले.

काहीजण तंत्र मंत्राचा प्रकार असल्याची सांगत होते, तर काही सूज्ञ मंडळी हा रासायनिक पदार्थांच्या साह्याने केलेला प्रकार असावा असा अंदाज व्यक्त करत होते. पुजारी कुटुंबीयांसह बाहेर येऊन सर्वांच्या समोर हा प्रकार जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा असून पुजारी कुटुंबीयांना घाबरवण्याचा प्रकार आहे. त्यामुळे आपण कोणीही घाबरून जाऊ नये. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आतापर्यंत असे अनेक प्रकार थांबविले आहेत हा प्रकार सुद्धा आजपासून बंद होईल असे त्यांना आश्वासित केले. पेटलेल्या वस्तूंचे काही नमुने एका प्लास्टिकच्या पिशवीत जमा केले.

कुटुंब प्रमुख श्री. व सौ. पुजारी यांना काही सूचना दिल्या आणि पुन्हा असे घडल्यास मला तत्काळ संपर्क करण्याविषयी सांगितले.

श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली बेलापूर पोलीस चौकीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळगे, नंदू लोखंडे, भारत तमनर, संपत बडे हे घटनास्थळी असल्यामुळे काम करणे सोपे झाले.

पुजारी कुटुंबीयांनी घाबरून जाऊ नये, आग नेमकी कशामुळे लागली, याचा पोलीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने शोध घेऊन तपास करतील, अशा शब्दात देशमुख यांनी पुजारी कुटुंबीयांना आश्वासित केले.

अचानक आग लागल्याची घटना हा प्रकार जादूटोणा किंवा भानामती आहे काय, अशीच चर्चा घटनास्थळी ग्रामस्थांत सुरू होती, परंतु अंनिस व पोलीस प्रशासनाने या दोन्ही शक्यता फेटाळून लावल्या.

कोणतीही घटना ही आपोआप घडत नसून त्यामागे कार्यकारण भाव असतो. त्यामुळे आपोआप वस्तू पेटणे ही केवळ अंधश्रद्धा असून त्यामागे वैज्ञानिक कारण असल्याचे मी त्यांना सांगितले.

उपस्थित ग्रामस्थ व पुजारी कुटुंबीय या सर्वांना जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती दिली असे प्रकार करणे कायद्याने गुन्हा आहे. असे कृत्य करणार्‍याला सात वर्षांपर्यंत कारावास व पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो याची माहिती दिली.

कुटुंबप्रमुखांना सर्वांसमोर जादूटोणाविरोधी कायद्याची पुस्तिका देऊन त्याबद्दलची माहिती जाणून घेणे विषयी सांगितले.

त्यानंतर सातत्याने पुजारी कुटुंबीयांच्या संपर्कात राहून विचारपूस केली. त्यांच्याकडूनही मला वेळोवेळी परिस्थितीची माहिती मिळाली. पुढे दोन दिवसांवर गुढीपाडवा सण होता. रिकामे घर स्वच्छ करून बाहेर काढलेले सर्व साहित्य घरात घेऊन मनात कुठलीही भीती न बाळगता आनंदाने सण साजरा करणेविषयी त्यांना सांगितले. त्या दिवसापासून आजपर्यंत पुन्हा असा प्रकार घडला नाही. हा प्रकार थांबविण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या सहकार्याबद्दल पुजारी कुटुंबीयांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आभार मानले.

मधुकर अनाप

कार्याध्यक्ष, अंनिस अहिल्यानगर जिल्हा

संपर्क : ९८५०१४४७०९


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]