हिम्मतराव मलमे -
दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी अंधश्रद्धेतून घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने वाझर (ता. खानापूर, जि. सांगली) येथील एक कुटुंब पुरते घाबरून गेले होते. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असणार्या सुतार मळ्यात राहणारे नाथा बाबुराव सुतार यांच्या घरी अज्ञाताकडून मंतरलेले लिंबूला हळदी कुंकू लावून त्यात चारी बाजूंनी सुईसदृश काड्या घालून चारचाकी गाडी खाली ठेवलेले होते. सकाळी सकाळी हा प्रकार या कुटुंबाच्या लक्षात आला. या घटनेने पूर्ण कुटुंब घाबरून गेले. अज्ञाताकडून या कुटुंबाला करणी करण्याचे उद्देशाने हा भीती दाखवण्याचा अघोरी प्रकार घडलेला होता. तातडीने या कुटुंबाने वाझरमधील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सल्लागार मारुती शिरतोडे यांना फोन केला व घडलेला प्रकार सांगितला. मारुती शिरतोडे परगावी असलेने त्यांनी घडलेला प्रकार फोनवरून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांच्या निदर्शनास आणला. त्यानंतर पलूस तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष हिम्मतराव मलमे, समिती सदस्या कल्पना मलमे, वरदराज मलमे, पृथ्वीराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजय देवकर, विशाल शिरतोडे आदींनी या कुटुंबाच्या घरी भेट देऊन घडलेल्या आघोरी प्रकाराची पाहणी केली.
यावेळी घाबरलेल्या या कुटुंबाला समितीच्या कार्यकर्त्यांनी अज्ञानपणातून अंधश्रद्धेच्या नावाखाली अशा घटना घडत असतात तेव्हा घाबरून जाण्याचे कुठलेच कारण नाही असा आत्मविश्वास दिला. आवश्यक असल्यास जादूटोणा विरोधी कायद्याचा वापर करून अशा प्रकरणात आपण पोलीस सहकार्य घेऊ शकतो त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा टेन्शन मुक्त व्हा, असे सांगितले. अंनिसचे पदाधिकारी हिम्मतराव मलमे व विजय देवकर यांनी गाडीखाली ठेवण्यात आलेले लिंबू हातात घेतले, त्यात टोचलेल्या सुईसदृश काड्या काढल्या, लिंबू धुतले व त्याचा सरबत करुन देण्यास सांगितले. तसेच भूत भानामती करणी जादूटोणा असा कुठलाही प्रकार समाजात अस्तित्वात नसून त्यातून घडलेल्या घटना या अंधश्रद्धा असतात. आपण चिकित्सकपणे सर्व गोष्टींचा विचार करायला हवा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठीची डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ व ‘बुवाबाजी’ ही पुस्तके या कुटुंबाला वाचनासाठी भेट देण्यात आली.
यावेळी बोलताना अंनिसचे तालुकाध्यक्ष हिम्मतराव मलमे स्पष्ट शब्दांत म्हणाले की, २१व्या शतकात अशा प्रकारच्या घटना निंदनीय आहेत. अशा प्रकारची भीती निर्माण करून लोकांची दिशाभूल करणार्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. अंधश्रद्धेच्या भस्मासुराचा नायनाट करण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे.
प्रसंगी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनी अनावश्यक भीतीच्या छायेखाली असणार्या या कुटुंबाला मोठा दिलासा देऊन आत्मविश्वास निर्माण केला. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
– हिम्मतराव मलमे, पलूस
