डॉ. कल्याणी मांडके -
आपल्याभोवती सतत आवाज असतो. घरामध्ये लोकांची होणारी उठबस, स्वयंपाकघरात चुलीवर शिजणारे चिकन, कुकरमधून निघणारी वाफ, नळाची टिपटिप, दाराबाहेर झाडावरील पक्ष्यांचा किलबिलाट, रस्त्यावरून जाणारी वाहने हे सारे आवाज आपल्याला कधीच त्रासदायक वाटत नाहीत, उलट आपल्या मेंदूच्या पेशींना हा आवाज हवाहवासा वाटतो. ही आवाजाची जाणीव आपल्याला सुरक्षितता देते, माणसात असल्याचा विश्वास देते. कानाला अशा प्रकारची आवाजाची जाणीव सतत होणे आवश्यक आहे. आपण कोणीही कधीही आवाज विरहित स्थितीत राहात नाही. आता मात्र आपल्याभोवती अर्थहीन गोंगाट आणि त्याची दिवसेंदिवस आवाजाची वाढणारी पातळी पिच्छा सोडत नाही. या आवाजाच्या पातळीने सर्वांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला आहे.
ध्वनिप्रदूषण २००० नियम १४ फेब्रुवारी २००० मध्ये अस्तित्वात आले. त्या वेळी प्रथमच आवाजाची क्षेत्रे निश्चित झाली. या क्षेत्रात दिवस आणि रात्रीच्या आवाजाच्या पातळीची निश्चिती केली. त्यामध्ये शांतता क्षेत्र, निवासी क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र अशी विभागणी आणि आवाजाची पातळी दिवसा आणि रात्रीसाठी निश्चित केली, त्या वेळी ही कल्पनाच नवीन होती आणि त्या वेळी सामान्य जनतेला याबद्दल माहिती दिली गेली नाही. दुर्दैवाने आपल्या येथील गावे ही नियोजित पद्धतीने विकसित झालेली नाहीत. त्यामुळे गावांचा विस्तार सोयीप्रमाणे होत गेला आणि निवासी क्षेत्र किंवा व्यावसायिक क्षेत्र आणि शांतता क्षेत्राची एकमेकांत मिसळत गेली आहेत.
२००० च्या नियमानुसार, शांतता क्षेत्रात शैक्षणिक संस्था, न्याय पालिका, हॉस्पिटल, नर्सिंग होम, धार्मिक स्थळे नोंदली गेली. ध्वनिप्रदूषण नियम आणि त्याची अंमलबजावणी या सर्वांवर पोलीस विभागाचे नियंत्रण असावे, असे निर्देश दिले गेले.
२००५ मध्ये ध्वनिप्रदूषण नियम २००० मध्ये काही दुरुस्त्या केल्या गेल्या. त्यानुसार, शांतता क्षेत्रातील धार्मिक स्थळे वगळण्यात आली. त्याचप्रमाणे वर्षातील १५ दिवस, दिवसाची आवाजाची पातळी रात्री बारापर्यंत वाढविण्यात आली. हे १५ दिवस कोणते याचे अधिकार कलेक्टर/आयुक्त यांना देण्यात आले. तसेच प्रदूषण बोर्डाने विविध ठिकाणांची आवाजाची क्षेत्रे आणि आवाजाची पातळी निश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले.
२०१० मधील दुरुस्तीमध्ये फटाक्यांचे आवाज, लाऊडस्पीकर, डीजे/ डॉल्बी यांच्या आवाजावर निर्बंध घालण्यात आले. तसेच रात्रीच्या वेळी मोकळ्या वातावरणातील संगीत, बँड यांच्या कार्यक्रमाच्या परवानगीचे नियम कडक करण्यात आले, त्याचप्रमाणे अति तीव्र आवाज करणारी साधने जप्त केली जातील. तसेच नियमांचे उल्लंघन करणार्यांच्या शिक्षा अधिक कडक करण्यात आल्या. रात्रीच्या वेळी बांधकामास बंदी घालण्यात आली.
२०१७ मधील मुंबई उच्च न्यायालयाने जनहितार्थ याचिकेमध्ये ध्वनिप्रदूषण नियम २००० अनिवार्य आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले. दुर्दैवाने या सर्व गोष्टींकडे समाज आणि सरकारी यंत्रणेने संपूर्ण दुर्लक्ष केलेले दिसते आहे. लाऊडस्पीकरचा उपयोग हा कोणत्याही धर्मातील अनिवार्यता नाही, हे सांगितले गेले. सध्या आपल्याला सर्वत्र नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
कोणत्याही ठिकाणी आवाज झाला तर तो हवेच्या माध्यमातून सर्व दूर पसरतो. कोणता आवाज ऐकायचा? कोणता आवाज ऐकायचा नाही हा निर्णय आपण घेऊ शकत नाही. कानावर पडणारा प्रत्येक आवाज मेंदूतील श्रुती केंद्रात पोहचतो. आपल्या कानाला चालू-बंद करण्याचे बटण नाही, तसेच आवाज लहान-मोठा करण्याचे देखील बटण नाही. त्यामुळे सर्व प्रकारचे आवाज ऐकण्याची सक्ती सर्वांना होते. सतत कानावर पडणार्या आवाजामुळे कानाच्या पेशी थकतात आणि आपली आवाज सहन करण्याची सहनशीलता कमी होऊ लागते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात बदल दिसू लागतो. किरकोळ कारणाने चिडचिड होऊ लागते, रक्तदाबात बदल होणे, मधुमेही लोकांच्या साखरेच्या पातळीत बदल, निद्रानाश, एकाग्रतेचा अभाव असे अनेक बदल दिसू लागतात. या सार्याला भोवतालचा तीव्र आवाज कारणीभूत आहे, हे आपल्या लक्षात येत नाही.
हा आवाजाचा त्रास फक्त आपल्याला होतो असे नाही, तर पक्षी, प्राणी यांना देखील या आवाजाचा त्रास होतो. प्राणी, पक्षी गोंगाटापासून दूर पळतात. भक्षक किंवा भक्ष्याचा शोध घेणे हे पक्षी, प्राणी आवाजाचा वेध घेऊन ठरवितात. सभोवतालच्या गोंगाटामुळे त्यांच्या या विशेष कौशल्यावर खूप परिणाम होत आहे. त्यांना देखील असुरक्षित वाटू लागलेले आहे. प्राण्यांमध्ये हृदयाच्या ठोक्यांमध्ये वेगाने वाढ होणे किंवा प्राण्यांना श्रवणदोष येणे या गोष्टींच्या नोंदी आहेत. रस्त्यावरील जोरदार आवाज, मोठ्या आवाजातील संगीत याचा पाळीव प्राण्यांवर परिणाम होतो, हे अनेकांनी पाहिले असेल, अनुभवले असेल. गोंगाटामुळे पक्ष्यांमधील आपापसातील कूजन कमी होते, संवाद कमी होतो आणि त्यांच्यामध्ये असुरक्षितता निर्माण होते. म्हणूनच आपल्या परिसरातील अनेक पक्षी आपल्यापासून दूर गेलेले आपण पहात आहोत.
सर्वसाधारणपणे सर्वांनाच या आवाजाचा त्रास जाणवू लागला आहे. उत्सवाच्या काळात हीच आवाजाची पातळी प्रमाणाबाहेर वाढते (१०० डेसिबलपेक्षा अधिक होते.) भोवतालचा आवाज वाढला की आपली आपापसातील बोलण्याची पातळीदेखील मोठी होते, नकळत बोलणारी व्यक्ती मोठ्या आवाजात बोलू लागते, त्याचा परिणाम म्हणून चेहर्यावरील हावभाव बदलू लागतात. शांत स्वभावाची व्यक्ती देखील चिडखोर वाटू लागते.
सतत आवाजात काम करणार्या व्यक्तीच्या कानावर देखील आवाजाचा परिणाम होत असतो. त्याला कोणीही अपवाद नाही. ढोल-ताशा वादक, डीजेवर नाचणारी तरुणाई यांच्याही कानावर परिणाम होत असतात. तरुण मंडळींना लगेच श्रवणदोष येईल असे नाही, पण तीव्र आवाजाने थकणे, कानात दडे बसणे, कानांत कर्णनाद जाणवणे हे घडत असते. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणताही आवाज वय, लिंगभेद जाणत नाही, सर्वांच्या कानावर तितकाच परिणाम घडत असतो. खरे पाहता वादकांनी आपल्या कानांची काळजी घेणे आवश्यक आहे. वादनाचा सराव ही आवश्यक गोष्ट असली, तरी कानाला विश्रांती देणे आवश्यक आहे. सराव करताना कानात ईअर प्लग घालणे जरुरीचे आहे, त्यामुळे कानाच्या पडद्यावर सतत आघात होण्याची तीव्रता कमी होऊ शकते. त्याचबरोबर सराव करताना कानाला विश्रांती हा विचार महत्त्वाचा आहे.
दर एक तासाच्या अथक वादनानंतर वीस मिनिटांची विश्रांती हा मंत्र खूप उपयोगाचा ठरेल, त्या वेळी काही वादकांनी वादन थांबवायचे आणि दुसर्या गटाने वादन चालू ठेवायचे हे अपेक्षित नसून, एकाच वेळी सर्व प्रकारचे वादन पूर्णपणे थांबविणे आवश्यक आहे. ही विश्रांती कानाच्या पेशींना आवश्यक आहे. ही विश्रांती वादक आणि परिसरातील सर्व ऐकणार्या मंडळींना आवश्यक आहे. या दोन्ही लोकांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर अति तीव्र आवाजाचा सारखाच परिणाम होतो.
श्रवणदोष हा हलक्या पावलांनी आत येत असतो, होणारा परिणाम हळूहळू होत असल्यामुळे श्रवणदोषाची जाणीव होत नाही, तरीही हा दोष कायमस्वरूपी असतो. त्यासाठी श्रवण चाचणी हा एक सोपा आणि उत्तम मार्ग आहे.
पुढील चार-पाच महिने विविध प्रकारचे उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतील. त्यातील विविध आवाजाचे, संगीताचे प्रकार, मांडवांमुळे वाहनांची गर्दी, त्यातून निर्माण होणारे अनियंत्रित आवाज आपल्या कानाला दमवतील. आनंद घेताना चोरपावलांनी येणारे कानाचे विकार आपल्याला समजत नाहीत. आपण आपल्या कानांची काळजी घेणे अनिवार्य आहे.
- चला तर, निर्धार करू या.
- गोंगाटाचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करू या.
- गोंगाटाचे प्रदूषण नियम २००० यांचे पालन करू या.
- डीजेचा आवाज आणि इतर वादनाचे आवाज ८५ डेसिबलच्या आत ठेवण्याचा प्रयत्न करू या.
- कानात इअर प्लग घालू या.
- दर तासामागे वीस मिनिटे कानाला विश्रांती देऊ या.
- कानात दडा बसला तर कानाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- तीव्र आवाजाशी संबंध असलेल्या सर्व व्यक्तींनी कानांची श्रवण चाचणी नियमित करून घ्या.
-डॉ. कल्याणी मांडके, विद्यावाचस्पती
संचालिका, मांडके हिअरिंग सर्व्हिसेस, पुणे
