अंनिवा -
भारत हा एकाच वेळी सतराव्या आणि एकविसाव्या शतकात जगणारा दुभंग व्यक्तिमत्त्वाचा देश आहे. एखाद्या बाईला चेटकीण, डायन किंवा डाकीण ठरवून जाळल्याची शेवटची घटना युरोपमध्ये घडली त्याला आता तीनशे वर्षे उलटून गेली. परंतु अजूनही भारतात अनेक ठिकाणी; विशेष करून स्त्रियांना डाकीण ठरवून मारले, जाळले किंवा गावाबाहेर काढले जाते. आसाम आणि झारखंड या राज्यांतील डाकीण प्रथेविरुद्ध लढा देणार्या बिरुबाला राभा आणि छुटनी देवी महातो यांचे आयुष्य या प्रथेविरुद्धच्या लढ्याची जितीजागती कहाणी आहे. डाकीण ठरवल्या गेलेल्या महिलांना मदत करण्यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत यावर्षी प्रजासत्ताक दिनी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
आसामच्या बिरूबाला राभा
आसाममधील गोलापारा जिल्ह्यातील ठाकूरव्हिला गावात राहणार्या बिरुबाला राभा यांचं लग्न वयाच्या 15 व्या वर्षी झालं, त्यांना 4 मुलं आहेत. त्यांचा एक मुलगा धर्मेश्वर गतिमंद आहे. बिरुबालांच्या पतीने धर्मेश्वरला गावातील भगताकडे नेले. भगताने संगितले की, त्याला डाकिणीने झपाटले असल्यामुळे तो फक्त पाच दिवस जगेल. पाच दिवसांनंतरही धर्मेश्वरला काही अपाय झाला नाही. तेव्हा बिरुबालांचा भगतावरचा विश्वास उडाला. त्यांच्या आजूबाजूला भगत, जादूटोणा यांचा आधार घेणारे बरेच लोक होते, बिरुबालांनी ‘आसाम महिला समता सोसायटी’च्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करायला सुरुवात केली. त्यांच्याच गावातील काही लोक भगतगिरी करतात, डाकीण ठरवून एकट्या राहणार्या विधवा, परित्यक्ता स्त्रियांना छळतात, हे लक्षात आल्यावर त्यांनी शाळांमध्ये जाऊन जादूटोणा, काळी जादू अस्तित्वात नाही, कोणतीच बाई भुताळी, डाकीण नसते, हे मुलांना सांगायला सुरुवात केली. कुण्या बाईला डायन ठरवून पंचायतीसमोर उभं केलं असं कळलं की, त्या तिथं जाऊन गावाला समजावतात, पंचायतीला विरोध करतात. ‘बिरुबायदेव’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या बिरुबाला, डाकीण ठरवल्या गेलेल्या स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या बचावासाठीचे सारे प्रयत्न करून त्यांना सोडवतात. आजवर त्यांनी बेचाळीसपेक्षा अधिक बायकांचा जीव वाचवला आहे. हे सारं सोपं नव्हतं, अनेकांनी त्यांनाच डायन ठरवलं. गावच्या गाव त्यांच्या घरावर कोयते घेऊन चालून आलं. मात्र, तरी त्यांनी हिंमत सोडली नाही. आता आसामभर त्यांच्या ‘मिशन बिरुबाला’ या मोहिमेशी 600 लोक जोडले गेले आहेत. ते गावागावांत जाऊन जादूटोणा, अंधश्रध्दा, डाकीण प्रथा याविरोधी जनजागृतीचे काम करतात. त्यांच्या या लढ्याचा परिणाम म्हणजे 2015 मध्ये आसाम सरकारने ‘डायन हत्याविरोधी कायदा’ मंजूर केला. त्याची अंमलबजावणी 2018 पासून सुरू झाली. सरकारने ही समस्या मान्य करून त्याविरुद्ध कायदा केल्याने बिरुबाला यांच्या कामाची माहिती अधिक लोकांपर्यंत पोचली. डाकीण प्रथेविरुद्ध झगडताना समाज, पोलीस व प्रशासन यांचे अधिक सहाय्य मिळू लागले. बिरुबाला यांनी आपल्या सहकार्यांना एक मंत्र कायमस्वरुपी शिकवलेला आहे; त्या म्हणतात, “काटीले काट, मारीले मार, मोय नारोकू! – म्हणजे – काय मला मारायचं असेल तर मारा, कापून काढायचं तर कापून काढा, पण मी माझं काम थांबवणार नाही!” आजही बिरुबाला नीडरपणे डाकीण प्रथेविरुद्ध लढत आहेत. पद्मश्री पुरस्काराने त्यांचा हा लढा आसामबाहेर, भारतातील इतर राज्यांपर्यंत पोचेल व अनेकांना त्यापासून प्रेरणा मिळेल.
झारखंडच्या छुटनी देवी महातो
झारखंड मधील सेरायकेला जिल्ह्यातील बिरबांस या गावात राहणार्या छुटनी महातो यांना 1995 मध्ये डाकीण ठरवून गावातून बहिष्कृत करण्यात आलं होतं. पतीनेही त्यांना साथ दिली नाही. चार मुलांना घेऊन छुटनी गावाबाहेर राहू लागल्या. त्यांनी डायन प्रथेविरुद्ध लढण्याचा मनाशी निश्चय केला. त्या म्हणतात, “महिलांना सन्मान मिळवून देणं हेच माझं काम आहे आणि मी ते करणार.” आजपर्यंत त्यांनी डाकीण ठरवल्या गेलेल्या अनेक महिलांची त्रासातून सुटका केली आहे. त्यापैकी ऐंशी ते नव्वद महिला छुटनी महातो यांच्याबरोबर काम करत आहेत. ‘डायन नहीं, यह नारी है,’ असा संदेश देणार्या छुटनी महातो आज असंख्य महिलांची ताकद आहेत. जेव्हा एखाद्या गावात कोणा महिलेला डाकीण ठरवले जात असल्याची माहिती त्यांना मिळते, तेव्हा त्या आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी पोचतात आणि डाकीण किंवा डायन असे काही अस्तित्वात नसते, हे लोकांना समजावून सांगतात. गरज पडल्यास संघर्ष करतात. ‘डायन नहीं, यह नारी है’ असा संदेश लोकांना देतात.
महाराष्ट्रात; विशेषतः नंदुरबार जिल्ह्यात अजूनही महिलांना डाकीण ठरवून त्यांचा छळ केल्याच्या घटना अधून-मधून उघडकीस येतात परंतु दुष्ट अतींद्रिय शक्तीने झपाटलेली व्यक्ती आपले आयुष्य उद्ध्वस्त करत आहे, ही डाकीण प्रथेच्या मुळाशी असलेली समजूत शहरी, शिक्षित लोकांच्या मनात देखील रुजलेली आढळते. जादूटोणा करण्याच्या संशयातून मारहाण, खूनाचा प्रयत्न अथवा खून केल्याचे अनेक गुन्हे जादूटोणाविरोधी कायद्याखाली नोंदवले गेले आहेत.. जादूटोणाविरोधी कायदा हा अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांविरोधातील प्रभावी कायदा आहे. या कायद्यात स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते किंवा भूत लावते किंवा मंत्र-तंत्राने जनावरांचे दूध आटवते, असे सांगून त्या व्यक्तीबाबत तशी समजूत निर्माण करणे, त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती अपशकुनी आहे किंवा रोगराई पसरविण्यास कारणीभूत आहे असे भासवणे, अशा व्यक्तीचे जगणे मुश्कील करणे, एखादी व्यक्ती सैतान असल्याचे किंवा सैतानाचा अवतार असल्याचे जाहीर करणे’ हा जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे.
डाकीण प्रथेसारख्या अंधश्रद्धांना आळा घालण्यासाठी समाज प्रबोधनासोबतच संपूर्ण भारतभर जादूटोणाविरोधी कायद्यासारखा प्रभावी कायदा अस्तित्वात येणे आवश्यक आहे.
– टीम अंनिवा
सहाय्य : संगीता पांढरे
दिशादर्शक जादूटोणाविरोधी कायदा : आसाममध्ये डाकीण प्रथेविरुद्ध काम करणे किती कठीण असावे, याचा अंदाज आम्हाला आसाममधील दीपज्योती सैकिया या तरुण कार्यकर्त्याशी बोलताना आला. दीपज्योती हे ‘ब्रदर्स’ या संस्थेमार्फत आसाममध्ये डाकीण प्रथेविरुद्ध जनजागृतीचे काम करतात. डाकीण प्रथेविरुद्ध कायदा करण्याच्या प्रक्रियेतही त्यांचा सहभाग आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम समजावून घेण्यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी एक छोटा महाराष्ट्र दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले की, “एखादी बाई डाकीण असते व ती मुले, माणसे, गुरे मारते, आपले वाटोळे करते, अशा स्वरुपाचा भ्रम तेथील लोकांच्या मनात खोलवर रुजलेला आहे. अशा बाईला शिक्षा करण्यात त्यांना काही चूक वाटत नाही.” आसाममधील डाकीण प्रथाविरोधी कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांना महाराष्ट्रातील जादूटोणाविरोधी कायद्याची खूप मदत झाली, असे त्यांनी आवर्जून संगितले. जादूटोणा, मंत्र-तंत्र, चमत्कार यातून होणार्या शोषणाला विरोध करणारा कायदा संदर्भासाठी अस्तित्वात असणे, त्याखाली अनेक गुन्हे दाखल झालेले असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरली. त्यामुळे आसामच्या यंत्रणेला असा कायदा तयार करण्यासाठी दिशा व बळ मिळाले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर मंजूर झालेला जादूटोणाविरोधी कायदा देशातील इतर राज्यांत दिशादर्शक ठरत आहे.
‘अंनिस’चे राहुल थोरात व विनायक सावळे हे दोन कार्यकर्ते डाकीण प्रथेच्या अभ्यासासाठी आसामला गेले असताना ते डायन ठरविल्या गेलेल्या लखमती या महिलेला भेटले होते. तिची कहाणी – अंनिवा वार्षिक (2015) पान 37, 39. डायन ठरविण्यामागील खरे कारण विचारल्यावर लखमतीने संगितले की, तिच्या दिराची तिच्यावर वाईट नजर होती. लखमतीने त्याला नकार दिल्यामुळे त्याने ओझाची मदत घेऊन हा प्रकार घडवून आणला. डाकीण प्रथेमुळे होणारे स्त्रीचे शोषण देखील इतर अंधश्रद्धांमधून होणार्या शोषणाप्रमाणे भौतिक परिस्थितीत रूतलेले आहे. पुरुषप्रधानता, सामाजिक दुय्यमत्व, गरिबी, असहायता हे या शोषणाच्या मुळाशी आहे.