राजीव देशपांडे -

नुकतीच आंध्र प्रदेशातील मदनापल्ली येथे दोन तरूण मुलींना डम्बेल्स आणि त्रिशुळाच्या सहाय्याने घरातच ठार मारल्याची घडली आहे. हे कृत्य त्या मुलींच्या उच्चशिक्षित आणि श्रीमंत आई वडिलांनीच केल्याचे आणि तसे कृत्य करण्यास त्या मुलीनीही आपल्या आईवडिलांना भाग पाडल्याचे व हे सर्व घर चमत्कारांनी भारलेले असून कोरोना हा कलियुगातील वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी आलेला शिवाचा अवतार असल्याची धर्मांध, अंधश्रद्ध मानसिकता या मागे असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
अंधश्रद्धा समाजात पसरण्यामागे अशिक्षितपणा आणि शिक्षणाचा अभाव हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते त्यामुळे शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार झाला, लोक उच्चशिक्षित झाले तर ते वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करण्यास प्रवृत्त होतील व समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनाची प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होईल असा आशावाद नेहमीच व्यक्त केला जातो. पण समाजातील शिक्षितांचे, उच्चशिक्षितांचे प्रमाण वाढूनही या आशावादाला तडा देणार्या अनेक घटना आजकाल घडताना दिसत आहेत. त्याचा अनुभव आपण शास्त्रज्ञाच्या सभेत प्लास्टिक सर्जरीचा तथाकथित सिद्धांत मांडण्यापासून फलज्योतिष, वैदिक गणित, विद्यापीठीय अभ्यासक्रमात घुसविणे, पंचगव्य, गायीचे शेण, मूत्र यावर संशोधन, कोरोनाच्या साथीच्या काळात गो कोरोना गो, थाळ्या वाजवणे, कोरोना काळात आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या वादग्रस्त गोष्टी वगैरे प्रकारातून आपण घेत आहोतच.
मिथकांनाच विज्ञानाचा साज चढवत मिरवण्याची अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. मुख्य मुद्दा हा आहे या सगळ्याला आजच्या सत्ताधार्यांचा सक्रीय पाठिंबाच आहे. त्याच बरोबर जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाच्या धोरणामुळे अवघी समाजव्यवस्था एका अवघड आणि विध्वंसक वळणावर येऊन ठेपली आहे. त्यातूनच अनेक मानसिक, शारीरिक व्याधी निर्माण होत आहेत. स्वाध्याय, सिद्ध सायन्स, रेकी, सहजसिद्ध योग, कुंडलिनी जागृती अशा मार्गांनी मन:शांतीपासून आर्थिक समृद्धीपर्यंतच्या शेकडो गोष्टी देण्याचे आमिष दाखवत अनेक शास्त्री, बापू, महाराज, श्रीश्री सद्गुरू, अशांचे समाजात अक्षरश: पेव फुटलेले आहे.
अशा या काळात फलज्योतिष, वास्तूशास्त्र या सारख्या अवैज्ञानिक गोष्टींच्या विरोधात ठामपणे उभे राहणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही वाळवंटातील हिरवळच म्हणावी लागेल. या निवडीबद्दल डॉ.जयंत नारळीकरांचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वतीने हार्दिक अभिनंदन..!