राहुल माने -
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित दरवर्षी पुणे येथे स्मृतिव्याख्यान आयोजित करण्यात येते. त्यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या स्मृतिव्याख्यानासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांना आमंत्रित केले होते. सदर स्मृतिव्याख्यान हे १७ ऑगस्ट २०२५ रोजी साने गुरुजी स्मारक, पुणे येथे पार पडले.
या व्याख्यानाच्या निमित्ताने न्यायमूर्ती अभय ओक यांनी ‘भारताचे संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर विस्तृत व सखोल मांडणी केली. त्यांच्या संपूर्ण व्याख्यानाचे शब्दांकन या अंकात इतरत्र वाचता येईल. तसेच त्यांचे संपूर्ण भाषण पुढील लिंक वर उपलब्ध आहे. https://www.facebook.com/share /v/1B4t8xGYxU/

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी अध्यक्षीय भाषण केले. ते म्हणाले, “लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. आजकालच्या काळात अल्पसंख्याक समाजाला होणारा त्रास हा पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधात आहे. कारण, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा समाज हा समतेचा पाठीराखा असतो. त्यामुळेच विवेकवादी परंपरेतील आगरकर, र. धों. कर्वे, दाभोलकर, पानसरे यांचे योगदान अमूल्य आहे. न्या. गोखले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिकित्सक दृष्टिकोनाचा या वेळी विशेष उल्लेख केला.
विचारमंचावर या वेळी मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील तसेच डॉ. दाभोलकर यांच्या खटल्यात अथकपणे सेवा देणारे अॅड. अभय नेवगी, अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नंदिनी जाधव, अंनिस ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले हे उपस्थित होते.

अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनावर आजच्या काळात होणार्या आक्रमणांवर भाष्य केले तसेच या संदर्भात व्यापक जागृती घडवून आणण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार आजही कसे प्रस्तुत कसे आहेत याचे विवेचन केले. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य फारूक गवंडी यांनी दोन्ही न्यायमूर्तींचा परिचय करून दिला. पुणे शाखेचे श्रीपाल ललवाणी यांनी आभार मानले.
कार्यक्रमास विविध समविचारी संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, युवक क्रांती दलाचे साथी अन्वर राजन, ‘मिळून सार्याजणी’च्या संपादक गीताली वि. म., मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे डॉ. शमसुद्दीन तांबोळी, ज्येष्ठ आयपीएस निवृत्त अधिकारी अशोक धीवरे, कायद्याचे अभ्यासक प्रा. नितीश नवसागरे व अनेक सजग नागरिक उपस्थित होते. अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुक्ता दाभोलकर, अरविंद पाखले, प्रवीण देशमुख, मिलिंद देशमुख, डॉ. अरुण बुरांडे, अनिल वेल्हाळ, धनंजय कोठावळे हे देखील या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी डॉ. दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या मानसिक आरोग्यावर काम करणार्या परिवर्तन संस्थेतील मानसमित्रांनी चळवळीची गाणी सादर केली. यात सहभागी व्यक्ती पुढीलप्रमाणे: राजू इनामदार, ऋषिकेश दळवी, रेशमा कचरे, ब्रह्मनाथ निळकंठ, ययाती, चंद्रकिरण, मुक्ता देशपांडे, मुक्ता, लीना, शारदा, निलेश, मृणाल, आशिष, गजानन बिराजदार, राजू जाधव आणि इतर.

– राहुल माने, पुणे
