किरण माने -
दाभोलकरांच्या काळात, ‘हा कोण आम्हाला शिकवणार? आम्हाला काय अक्कल नाही का? एम. एस्सी. फर्स्ट क्लासमध्ये पास झालोय मी. दाभोलकरांना काय कळतेय ग्रहतार्याची ताकद? माझ्या अष्टमात मंगळ नसता तर आत्ता मी डॉक्टर असता,’ अशी भाषा सुरू झाल्यावर प्रतिवाद कसा करायचा? म्हणूनच दाभोलकरांच्या काळात अंधश्रद्धाविरोधी लढा जास्त कठीण झाला, असं माझं मत आहे. शेजारीच राहायला असल्यामुळं जाता-येता नरेंद्रकाका दिसत. कधी हसून बोलत, कधी स्वत:च्याच विचारात असत. मी मात्र त्यांचं मूकपणे निरीक्षण करू लागलो.
“अरं, काय ऐकताय त्या दाभोलकराचं? धर्म-बिर्म वेशीला टांगलाय त्यानं; आनि आपल्याला ग्यान शिकवतोय. करनी, भानामती लै खतरनाक प्रकार असत्यात. दाभोलकराच्या डोक्याच्या पलिकडचं आहे ते. मी सांगतो ते ऐका. सोलापूरला लै मोठ्ठा मांत्रिक आहे. फी जरा जास्त घेतो, पन असली भयानक बाधा निपटवन्यात माहीर हाय त्यो. लवकर उपाय करा, नायतर अंगाशी यिल. घरादाराचा इस्कोट होईल. जीवावर बेतंल कुनाच्यातरी.” आमच्या कॉलनीतल्या नेर्लीकर काकांना त्यांचा मित्र सांगत होता. नेर्लीकर काकांच्या घरातले सगळे घाबरले होते. आम्ही सगळे मित्र एकमेकांकडं बघत होतो. आमच्यातल्या चार-पाच जणांच्या चेहर्यावर हसू होतं. खरं काय घडलंय, हे फक्त आम्हा मित्रांच्या टोळक्यालाच माहिती होतं. आम्हा काहीजणांना मात्र नरेंद्रकाकांचं वाईट वाटत होतं. ते अगदी खरं बोलून गेले; पण त्यांना उगाचंच शिव्या पडताहेत, याबद्दल आमचं मन थोडं उदास झालं होतं.
पुढची गोष्ट सांगण्याआधी हे स्पष्ट करतो, की मी सांगतोय ही घटना अगदी खरी आहे. पंचवीस वर्षांपूर्वी माझ्यासमोर घडलेली आहे. हा लेख लिहीत असताना मी फक्त काकांचं नांव बदललंय. बाकी सगळं ढळढळीत ‘सत्य’ आहे.
तर या घटनेच्या दुसर्या दिवशी खरोखरच सोलापूरहून मांत्रिक आणला गेला. साठ हजार रुपये फी होती त्याची. मोठी पूजा, मंत्र-तंत्र सुरू झाल्यावर मात्र आमच्या कॉलनीतले सगळे मित्र एकमेकांकडे पाहून हसायला लागले. काल नरेंद्र दाभोलकरांनी पायानं लाथाडलेली ‘ती’ बाहुली त्या मांत्रिकानं हातात घेतली आणि तिच्यात खोचलेल्या टाचण्या तो मोजू लागला…
…परवा पुर्ष्यानं आणि अभ्यानं एका दुकानातनं ती बाहुली आणि टाचण्या विकत आणून, त्या काळ्या बाहुलीत हाताला येतील तशा खचाखचा टोचल्या होत्या; मोजल्याही नव्हत्या. तो मांत्रिक जेव्हा म्हणाला, “बरोब्बर एकतीस टाचण्या हायेत. एकतीस म्हणजे लै भयंकर आकडा हाय. करनी करणारानं मोठा डाव टाकलाय तुमच्यावर.” आम्हाला हसू आवरेना… सगळे मिळून चारभिंतीच्या डोंगरावर जाऊन हसत, टाळ्या देत बसलो. ते वय अगदीच अडंनिडं होतं. धड ना इकडं, ना तिकडं. सगळे सतरा-अठरा वर्षांचे. कशाचंच गांभीर्य नव्हतं. नेर्लीकरकाकांची खेचायची, त्यांना घाबरवायचं असा प्लॅन केला आणि तो ‘सक्सेसफुल’ झाला, या आनंदात सगळेच होते. मी मात्र थोडा अंतर्मुख व्हायला लागलो होतो.
…खरंतर ती करणी, भानामती, मूठ काहीही नव्हतं. हे सगळं आमच्यातल्याच चार-पाच मित्रांनी केलं होतं.
सांगतो… पंचवीस वर्षांपूर्वीचा सगळा ‘फ्लॅशबॅक’ सविस्तर सांगतो. झालं होतं असं की, आमच्या कॉलनीत गणेशोत्सव होता. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची पोरं उत्साहानं तयारीला लागली होती… वर्गणीच्या पावत्या छापून आल्या.. वर्गणीसाठी गेल्यावर नेर्लीकरकाकांनी एकतर वर्गणी देताना ठरल्यापेक्षा खूप कमी दिली. वर, “तुम्ही या पैशांतून पार्ट्या करता, हिशोबात घोटाळे करता. पहिल्यांदा मला मागच्या वर्षीचा सगळ्या बिलांसह हिशोब दाखवा. आपल्या मंडळात सगळी नालायक मुलं आहेत. वाया गेलेली…” वगैरे-वगैरे खूप अपमान केला होता. नेर्लीकरकाकांबद्दल मुलांच्या मनात राग बसला होता. त्यात, गणपती बसल्यावर रोज काका कधी स्पीकरच्या आवाजावरून, तर कधी सजावटीवर केलेल्या खर्चावरून काही ना काही तक्रार करून मुलांना त्रास देत होते. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाच्या वेळीही देवापुढे सिनेमातल्या गाण्यांवर नाचायचं नाही, असं भांडण केलं होतं काकांनी. गणपती विसर्जन मिरवणुकीला, महागातलं ढोलपथक कशाला बोलवायचं, यावरून तडतड केली होती. विसर्जन झाल्यावर मुलांनी नेर्लीकरकाकांना चांगलाच धडा शिकवायचं ठरवलं.
मंडळातल्या चार-पाच पोरांनी जमून जबरदस्त प्लॅन ठरवला. नेर्लीकरकाकांची घाबरून तंतरली पाहिजे, असं काहीतरी करायचं ठरलं. किराणा दुकानवाल्या राजाने आयडिया सुचवली. सगळ्यांनाच आवडली. पोवई नाक्यावरच्या एका दुकानातून काळी बाहुली आणि टाचण्या आणल्या, हळदी-कुंकू आणलं. एकानं चिकन शॉपमध्ये जाऊन कोंबडीची पिसं, पाय वगैरे आणले. सगळे रात्र होण्याची वाट पाहू लागले. ‘त्या’ चार-पाच जणांव्यतिरिक्त आम्ही इतर सगळी मुलं जरा घाबरलो होतो. ‘असं नको करायला,’ असं त्यांना समजावून सांगत होतो. पण ती मुलं ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. काकांना धडा शिकवायचाच, यावर ठाम होती. त्यांच्या दृष्टीनं हा निव्वळ एक किरकोळ ‘प्रॅन्क’ होता. काकांना तात्पुरतं घाबरवायचं आणि मजा बघायची, एवढंच त्यांच्या डोक्यात होतं. मध्यरात्रीनंतर नेर्लीकरकाकांच्या घरापुढच्या व्हरांड्यात, दारापुढे हळदी-कुंकवाची काहीतरी मनाला येईल ती डिझाईन काढली. कोंबडीची पिसं, पाय वगैरे टाकले. त्या डिझाईनच्या मधोमध ती टाचण्या खुपसलेली काळी बाहुली ठेवली. ‘आता सकाळी काकांची गंमत बघायला येऊ,’ असं म्हणून ही पोरं आपापल्या घरी जाऊन झोपली.
सकाळी कॉलनीत बातमी पसरली की, नेर्लीकरकाकांच्या घरापुढं काहीतरी विचित्र प्रकार घडलाय. लोक जमले. ती बाहुली, हळदी-कुंकवाची डिझाईन वगैरे पाहून सगळे हादरले. काहीजण सांगू लागले की, ‘काकांच्या कुटुंबाच्या वाईटावर असणार्यानं ही करणी केलीय, मांत्रिकाला बोलवा.’ तेवढ्यात तिथं कॉलनीतले डॉ. नरेंद्र दाभोलकर आले. त्यांनी तो प्रकार बघितला. “हे सगळं थोतांड आहे. कुणीतरी तुम्हाला घाबरवण्यासाठी खोडसाळपणा केलाय. यावर विश्वास ठेवू नका. ते सगळं फेकून द्या आणि व्हरांडा धुवून स्वच्छ करा,” असं म्हणून त्यांनी बाहुली पायाने बाजूला सरकावली, तोच नेर्लीकरकाका चिडले. कॉलनीतले शेजारी असल्यामुळे राग आवरत, “दाभोलकर साहेब, तुम्ही जा. आम्ही बघू काय करायचं ते,” म्हणाले. नरेंद्रकाका जाताच तिथं जमलेल्या सगळ्यांनीच नरेंद्रकाकांची टवाळी केली. ‘ही करणीच आहे,’ यावर जवळजवळ सगळे ठाम होते. दाभोलकरांनी अत्यंत ‘लॉजिकल’ विचार करून काढलेला निष्कर्ष होता. हे तर होतेच; पण दाभोलकर अगदी शंभर टक्के ‘सत्य’ सांगत होते, हे फक्त आणि फक्त कॉलनीतल्या मुलांनाच माहिती होते.
…तो साठ हजार रुपये देऊन आणलेला मांत्रिक जेव्हा जमलेल्या माणसांना ‘त्या’ हळदी-कुंकवाच्या डिझाईनचा अर्थ सगळ्यांना सांगत होता… त्या काळ्या बाहुलीचं डोकं दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे असण्यामागचं ‘शास्त्र’ समजावून सांगत होता, तेव्हा कॉलनीतल्या आम्हा सगळ्या मुलांना ओरडून सांगावं वाटत होतं की, ‘अरे भुक्कड माणसा, खोटारड्या, ते सगळं या आमच्या मित्रांनी केलंय.’ रात्री घाईघाईत बाहुली कुठल्या दिशेला डोकं करून ठेवली होती, हे त्यांनाही कळालं नव्हतं. हाताला लागतील तशा टाचण्या त्या बाहुलीला टोचल्या होत्या. ‘तू काय फाल्तूगिरी सांगतोयस; करणी, भानामती, एकतीस टाचण्या, उत्तर दक्षिण वगैरे?’ पण कुणीच हे बोलू शकत नव्हतं. आपण जी गंमत केलीय, तिचा एवढा मोठा परिणाम होणार आहे, असं कुणालाच वाटलं नव्हतं. त्या मांत्रिकानं मंत्र-तंत्र करून नेर्लीकरकाकांवर आलेलं संकट निवारण्यासाठी मोठी पूजा बांधली, तेव्हा कॉलनीतले बहुतांश लोक काकांच्या घरी जाऊन मांत्रिकाच्या पाया वगैरे पडून आले. नेर्लीकरकाकांना साठ-सत्तर हजारांना चुना लावून तो मांत्रिक निघून गेला.
नंतर तर काकांच्या कुटुंबानं या घटनेचा धसका घेऊन वास्तुविशारदाला बोलावून त्याचा सल्ला घेतला. त्यानंही वाहत्या गंगेत हात धुऊन घेतला. भरपूर फी घेऊन या ‘भानामती’वरचा उपाय सांगितला. त्याचं ऐकून काकांनी व्हरांडा आणि दार फोडून घराच्या एन्ट्रीची दिशाच बदलून टाकली !
हळूहळू सगळे मित्र ही गोष्ट विसरून गेले; पण या घटनेचा माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. मी खूप विचार करू लागलो – समाजात अंधश्रद्धा कशा पसरतात? त्यानं माणसाचं कसं नुकसान होतं? मंत्र-तंत्र, जादूटोणा, बुवाबाजी करणारे लोक समाजातली असुरक्षितता, भीती हेरून त्यांना कसं लुबाडतात, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. चक्षुर्वै सत्यम्! माझ्या मनात डॉ. नरेंद्र दाभोलकरांविषयी आदर निर्माण होऊ लागला…
मी नरेंद्रकाकांचं काम पाहू लागलो, भाषणं ऐकू लागलो. जमेल तसं त्यांचे लेख, पुस्तकं वाचू लागलो. मला सुरुवातीला वाटत होतं की, आता समाज सुशिक्षित होतोय. समाजातल्या गरिबातल्या गरीब मुलापासून सगळे शिक्षण घेताहेत. मुलींना तर मोफत शिक्षण सुरू आहे. येत्या काही वर्षांत अशा गोष्टी बंद होतील. विज्ञान, लॉजिक हे शाळेत शिकण्याचे विषय असतात. हळूहळू समाजातून अंधश्रद्धा नाहीशा होणार, यावर माझा ठाम विश्वास होता.
या दरम्यान कधीतरी मला संतसाहित्याची गोडी लागली; विशेषत: ‘तुकारामगाथे’ची. आपल्या संतांनी अगदी पूर्वीपासून अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य नेटानं केलंय, हे दिसलं. नरेंद्रकाका जे काम करताहेत, ते एखाद्या संतापेक्षा कमी नाही, हे जाणवायला लागलं; फरक हा होता की, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी खपणार्या संत नामदेव-तुकोबारायांपासून गाडगेबाबांपर्यंत संतांच्या काळात बहुतांश समाज अशिक्षित, अडाणी होता. त्यांना शिक्षित करणे, अक्षरओळख करून देणे इथपासून ते जातपात-कर्मकांड-अंधश्रद्धेच्या जोखडातून त्यांना मुक्त करणे, इथपर्यंत अनेक पातळ्यांवर त्यांना लढा द्यायचा होता. नरेंद्रकाकांच्या काळात बहुतांश समाज शिकलेला होता. खरंतर काम सोपं व्हायला हवं; पण आश्चर्य हे की, लोक शिकूनही कर्मकांड-अंधश्रद्धेत वाढ झालेलीच दिसू लागली ! पूर्वीचा अशिक्षित समाज बरा; ‘किमान आपण अडाणी आहोत आणि आपल्याला वाट दाखवू पाहणारा शिकलेला आहे, त्याचं ऐकायला हवं,’ हे तरी त्यांना माहिती होते. दाभोलकरांच्या काळात, ‘हा कोण आम्हाला शिकवणार? आम्हाला काय अक्कल नाही का? एम. एस्सी. फर्स्ट क्लासमध्ये पास झालोय मी. दाभोलकरांना काय कळतेय ग्रहतार्याची ताकद? माझ्या अष्टमात मंगळ नसता तर आत्ता मी डॉक्टर असतो,’ अशी भाषा सुरू झाल्यावर प्रतिवाद कसा करायचा? म्हणूनच दाभोलकरांच्या काळात अंधश्रद्धाविरोधी लढा जास्त कठीण झाला, असं माझं मत आहे. शेजारीच राहायला असल्यामुळं जाता-येता नरेंद्रकाका दिसत. कधी हसून बोलत, कधी स्वत:च्याच विचारात असत. मी मात्र त्यांचं मूकपणे निरीक्षण करू लागलो.
दाभोलकरांचा खून झाल्यानंतर कधी नव्हे एवढं नैराश्य आलं मला. का? का झालं असं? समाजाला कुप्रथांमधून सोडवणार्यांचा शेवट आजही असाच होणार असेल तर काय मग उपयोग? मरू दे ना लोकांना अंधश्रद्धेच्या गटारात.. कशाला करायच्या अशा गाढवांना सुधारण्यासाठी चळवळी? अशा अनेक प्रश्नांचं काहूर माजलं माझ्या मना-मेंदूत.
पण नंतर मला कळलं की न थांबणारी प्रक्रिया आहे. जसं रोज शरीर मलिन होतं म्हणून रोज आपण अंघोळ करतो. ‘काय उपयोग अंघोळीचा?’ असं म्हणून आपण ती करणं सोडून देत नाही. तसंच समाजसुधारणेचं हे काम वर्षानुवर्षं आपण आपापल्या परीनं करत राहणं गरजेचं आहे. ही एक-दोन, दहा-वीस, शंभर-दोनशे नव्हे, तर हजारो वर्षांची निरंतर चालणारी चळवळ आहे; न थकता, न हरता, न थांबता सुरू ठेवायलाच हवी.
आजच्या काळात नरेंद्र दाभोलकरांना आठवताना मला असं वाटतं की, हा लढा आपल्याला आता अधिक तीव्रपणे लढायला हवा. जसजसे आपल्याकडे घराघरांत विज्ञान शाखेचे पदवीधर निर्माण होताहेत, तेवढ्याच प्रमाणात अंधश्रद्धांचं प्रमाण वाढत आहे, हे वास्तव आहे. टी. व्ही.वर वारंवार दिसणार्या वास्तुयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, कुबेर यंत्र, कासव, श्री यंत्र अशा घराची भरभराट करण्याची खात्री देणार्या वस्तूंच्या भरमसाठ जाहिराती… एका रात्रीत नशीब बदलवण्याचा दावा करणार्या, पुष्कराज, नीलम, वेगवेगळे मोती, हिरे यांच्या अंगठ्यांचा बाजार… अनेक सीरियल-सिनेमांमधून अशा अंधश्रद्धांना खतपाणी घालणारी कथानकं… ते सगळं मनापासून पाहून खरं मानणारा सुशिक्षित प्रेक्षकवर्ग…अशा पद्धतीची नवीन आव्हानं लक्षात घेऊन नरेंद्रकाकांचा हा लढा ताकदीनं पुढं नेण्याची गरज आहे, असं मला मनापासून वाटतं.
परिवर्तनाच्या चळवळीवर आज खूप मोठ्ठी जबाबदारी आहे. त्याचबरोबर इतिहास घडवण्याची संधीही आहे. आजचा भवताल जाणीवपूर्वक नासवला जातोय, कधी नव्हे एवढा गढूळ केला जातोय. मोठमोठे डॉक्टर्स, राजकीय नेते आणि साधू-बुवाच उघडपणे गायीचं शेण खाणं आणि मूत्र पिण्याचे फायदे सांगू लागलेत. लढाऊ विमानांची खरेदी झाल्यावर मंत्री-संत्रीच त्या विमानांची पूजा करून मिरच्या बांधण्याचे प्रकार करू लागलेत. परवाच मी एका भारतीय शास्त्रज्ञाच्या आयुष्यावरचा सिनेमा पाहिला. त्यात एका मिसाईलचं परीक्षण करताना, ते यशस्वी व्हावं म्हणून एक शास्त्रज्ञ देवाला ‘साजूक तुपातले लाडू’ देण्याचं नवस बोलताना दाखवला आहे! आपल्या देशातला सगळ्यात मोठा उद्योगपती भव्य घर बांधतो; पण वास्तुदोष असल्याच्या सल्ल्यावरून कित्येक महिने त्या घरात राहायला जात नाही… करोडो रुपये खर्चून इंटेरियर बदलून, वास्तू शांत करण्याची पूजा घालून त्या घरात राहयला जातो! एवढंच नव्हे, तर आता ज्योतिष‘विद्ये’चा डिप्लोमा कोर्स सुरू करण्याला अधिकृत मान्यता मिळालेली आहे !
अशा या भाकडकाळात आपल्याला नरेंद्र दाभोलकरांनी दाखवलेल्या दिशेने, नवीन मार्ग शोधत, संघर्ष करत या चळवळीला जोमानं सुरू ठेवायला हवं.
खरंतर कोरोनाकाळानं सगळ्या जगाचे डोळे उघडले होते. आपण असे दिवस बघितलेत की, भविष्य सांगणार्यांना स्वत:च्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय ते कळत नव्हतं. सगळे ज्योतिषी गोंधळून गेले होते. आजही एखाद्या ज्योतिषाकडं गेल्यानंतर मास्क लावल्याशिवाय तो आत घेत नसेल आणि सॅनिटायजर मारल्याशिवाय हात बघत नसेल, तर त्यालाच स्वत:चं भविष्य कळत नव्हतं, असा काळ अनुभवला आपण.
एरव्ही मेडिकल सायन्सची टिंगल उडवणारे सगळे धुरंधर साधू-बुवा, ज्योतिषी ‘व्हॅक्सिनेशन’च्या लाईनमध्ये गपगुमान उभे होते. एका छोट्याशा विषाणूनं सगळ्या जगाला वेठीला धरलं होतं, त्या वेळी कुठल्या मांत्रिक-तांत्रिकानं नव्हे, तर शास्त्रज्ञांनी आपल्याला वाचवलं, हे वर्तमान आपल्यासमोर आहे. या महाभयंकर संकटानं आणि त्या काळातल्या अनुभवांनी आपल्या चळवळीसाठी अनेक गोष्टी सोप्या केल्या आहेत. आपण त्याचा फायदा कसा करून घेतोय आणि या भवतालात आपल्या चळवळीतली पुढची पिढी कशी घडवतोय, यावर परिवर्तनाच्या लढ्याचं यशापयश ठरणार आहे…
चला तर मग, कंबर कसून इतिहास घडवण्यात आपला खारीचा का होईना; पण मोलाचा वाटा उचलूया.
तुकोबाराया चारशे वर्षांपूर्वी म्हणून गेलेत –
सांगो जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ॥
त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहो नावडती डोळा ॥
रिद्धीसिद्धीचे साधक । वाचासिद्ध होती एक ॥
तुका म्हणे जाती । पुण्यक्षये अधोगती ॥
‘आम्हाला शकुन-अपशकुन कळतं’, ‘आम्हाला भूतकाळ-भविष्यकाळ-वर्तमानकाळ यातलं सगळं अंतर्ज्ञान आहे.’ अशा भाकडकथा सांगून पोट भरण्यासाठी जे खोटारडे लोक जनसामान्यांना गंडा घालतात, अशांचा मला कंटाळा आहे. एवढंच नाही, तर या लोकांना मी डोळ्यांपुढंही उभं करू इच्छित नाही. हे लोक स्वत:ला रिद्धी-सिद्धी प्राप्त असल्याचा आव आणतात. ‘आम्ही वाचासिद्ध आहोत. आम्हाला दैवी शक्ती प्राप्त झालीय की आम्ही जे बोलतो ते खरं होतं,’ अशा थापा मारून जनतेला फसवतात आणि स्वत:चे खिसे भरून घेतात.
शेवटी तुका म्हणे! लोकांची अशा प्रकारे फसवणूक करणारे स्वत:च अधोगतीला जातात;मग ते इतरांचं कल्याण काय करणार?
हाच विचार नंतर गाडगेबाबांपासून डॉ. नरेंद्र दाभोलकरांपर्यंत सर्वांनी या मातीत रूजवला, जोपासला, वाढवला. आज पुन्हा क्रांतीची वेळ आलेली आहे. परिवर्तनाच्या चळवळीला नवी ताकद, नवा जोम, नवी ऊर्जा देऊया… विवेकाचा आवाज बुलंद करूया !