सुरक्षा घोंगडे -
आधुनिक भारतातील धर्मसुधारणेचा इतिहास तपासला असता त्यामध्ये समाजसुधारकांनी केलेली धर्म टीका आणि सुचवलेले उपाय आपल्याला भरपूर प्रमाणात आढळतात. ब्रिटिश काळात एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके देशी संस्थानिक धर्मसुधारणेबाबत सकारात्मक होते. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे अतिशय दूरदृष्टीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने कृतीकार्यक्रम यशस्वी करणारे महाराजा सयाजीरावांच्या ‘तोडीचे’ उदाहरण देशी संस्थानिकांतच काय, ब्रिटिश राजसत्तेतही आढळत नाही. ख्रिश्चन धर्माला प्रतिक्रिया किंवा ब्राह्मणांवर सूड उगवणे या अधिष्ठानावर भारतातील आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील धर्मसुधारणेचे उपक्रम झाले असल्याचे इतिहास सांगतो.
परंतु निखळ मानवतावादी, वैज्ञानिक अधिष्ठानावर आणि वैश्विक भूमिकेतून धर्मसुधारणेकडे पाहणारे सयाजीरावांएवढे प्रखर उदाहरण आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सापडत नाही. दृष्ट काढण्याची प्रथा कायदा करून बंद करणे असो किंवा ग्रहणाची सुट्टी बंद करणे असो, अशा छोट्या उपक्रमांबरोबरच हिंदू पुरोहित कायद्यासारखा भारतातीलच काय परंतु जगातील सर्वांत क्रांतिकारक कायदा यशस्वी करण्याचा महाराजांचा उपक्रम महाराजांच्या धर्मसुधारणा अभियानाचे अनन्यत्व अधोरेखित करणारा आहे. १६ जून १८९३ रोजी सयाजीराव महाराजांनी पुण्यप्राप्तीसाठी संस्थानाकडून पूर्वापार करण्यात येणार्या दानधर्माला ‘शिस्त’ लावणारा क्रांतिकारक निर्णय घेतला. प्रथेप्रमाणे येईल त्या व्यक्तीला खिचडी-ग्यारमी न देता जातीच्या निकषाशिवाय सर्व गरजू हिंदू धर्मियांना खिचडी आणि मुस्लीम धर्मियांना ग्यारमी देण्याचा हा आदेश होता.
आपल्या धर्माची तुलना इतर धर्माशी करण्याची कुवत हिंदू लोकांमध्ये निर्माण केली तर त्यामुळे लोकांची मनोवृत्ती अधिक व्यापक होईल आणि त्यांचे विचार अधिक प्रगल्भ व उदारमतवादी होतील. या माध्यमातून त्यांच्या प्रगतीला उत्तेजन देण्याची भूमिका सयाजीरावांनी १९३७ मध्ये स्टॅनले राईसच्या ‘हिंदू कस्टम्स अँड देअर ओरिजिन्स’ या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत मांडली आहे. अशी भूमिका मांडणारे सयाजीराव हे भारतातील पहिले राज्यकर्ते ठरतात. हीच बडोदा संस्थानची धर्मविषयक भूमिका होती, हे त्यांच्या ६४ वर्षांच्या कारकिर्दीतील धार्मिक सुधारणांवरून स्पष्ट होते.
सयाजीरावांनी त्यांच्या संस्थानात सर्व धर्मांना राजाश्रय दिला. बहुसंख्य प्रजा हिंदू असल्यामुळे वैज्ञानिक भूमिकेतून आपल्या प्रजेला धर्मसाक्षर करण्याच्या उद्देशाने धर्मशिक्षण, धार्मिक सुधारणा, ग्रंथ प्रकाशन, अनिष्ट धार्मिक प्रथांना पायबंद घालणारे कायदे अशा विविध मार्गांनी धार्मिक संवाद वाढवणारी धर्मसाक्षरता आपल्या देशाने लोकशाही स्वीकारण्याआधी रुजवली. सयाजीरावांची एकूणच धर्मविषयक भूमिका आजही तितकीच कालसुसंगत आहे.
प्रत्येक सुधारणेची सुरुवात सयाजीराव ज्याप्रमाणे स्वत:पासून करत होते त्याचप्रमाणे धार्मिक सुधारणांची सुरुवातही त्यांनी राजवाड्यातील देवघरापासून केली. राजघराण्यातील धर्मभोळ्या व्यक्तींचा फायदा घेत काही बाबी साध्य करण्यासाठी ब्राह्मणांकडून राजघराण्यातील व्यक्तींना विविध प्रकारचे धार्मिक विधी करण्याचा आग्रह केला जात असे. बर्याचदा हे धार्मिक विधी अर्थहीन असत. मि. पेस्तनजी यांच्या सांगण्यावरून विनायकराव बहुलकर हे पुण्यातील विविध मंदिरांमध्ये बडोदा राजघराण्यातील व्यक्तींच्या नावाने धार्मिक विधी करत असत. बडोदा राजघराण्यात अशा विविध कर्मकांडांचे स्तोम माजले होते.
विविध ग्रहांच्या स्थितीचा राजघराण्यातील व्यक्तींच्या आयुष्यावर पडणारा वाईट परिणाम दूर करण्यासाठी केल्या जाणार्या ग्रहांच्या शांतीचा विधीदेखील मोठ्या प्रमाणावर केला जात असे. याचबरोबर राजघराण्यातील व्यक्तींची दृष्ट काढण्याची पद्धत अशाच कर्मकांडाचा एक भाग होती. राजघराण्यातील व्यक्तींचा सर्वसामान्य जनतेशी संपर्क आल्यानंतर किंवा एखाद्या विशेष प्रसंगानंतर दृष्ट लागून त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून त्या व्यक्तीची दृष्ट काढली जात असे. परंतु अशी दृष्ट कोणत्या प्रसंगी, किती वेळा, कोणत्या व्यक्तीने काढावी या संदर्भात कोणतेही नियम निश्चित केलेले नव्हते. त्यामुळे बडोद्यातील ब्राह्मण व्यक्तींकडून याचा गैरफायदा घेतला जाई. दक्षिणेच्या हव्यासापायी या ब्राह्मणांकडून राजघराण्यातील व्यक्तींची विनाकारण दृष्ट काढण्याचे प्रसंग वारंवार घडवून आणले जात असत. मुंग्यांना साखर घालणे हा देखील अशाच प्रकारचा एक विधी होता.
सुरुवातीच्या काळात राजघराण्यातील व्यक्तींचा या विधींना असणारा पाठिंबा आणि प्रशासनातील अनागोंदी कारभार यामुळे सयाजीरावांना हे सर्व प्रकार शांतपणे सहन करावे लागत होते. या विधींसाठी लागणारा खर्च अगोदर मंजूर करून न घेता ऐनवेळी महाराजांकडून या खर्चास मान्यता मिळवण्याची सवय प्रशासनास लागली होती. अशावेळी हे विधी थांबवून महाराज कोणतीही चौकशी करू शकत नसल्याने या खर्चाला मान्यता देणे त्यांना भाग पडत असे. या परिस्थितीचा फायदा स्वार्थी पुजार्यांकडून घेतला जात असे. परंतु एकदम अधिकाराच्या जोरावर कोणताही बदल न करता हळूहळू लोकांचे मत परिवर्तन करण्यावर सयाजीरावांनी भर दिला.
सयाजीरावांनी राजवाड्यात होणार्या धार्मिक विधींचे अर्थ सर्वांना समजावेत यासाठी या विधींचे मंत्र अर्थासह प्रकाशित करण्याचा विचार केला. महाराजांनी त्या दृष्टीने २३ नोव्हेंबर १८८६ ला हु.हु.नं. ५० नुसार राजवाड्यात होणारी सर्व धार्मिक कृत्ये शास्त्रार्थासह तपशीलवार लिहून काढण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर रा.रा. शंकर मोरो रानडे, कृष्णदेव महादेव समर्थ आणि भाऊ मास्तर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानुसार या तिघांनी धर्मविधींचा तपशीलवार शास्त्रार्थ विशद करणारा ‘ऐनेराजमेहेल’ नावाचा ग्रंथ तयार केला.
या ग्रंथाविषयीची सयाजीरावांच्या मनातील आपुलकी आणि आदर विशद करताना सरदेसाई लिहितात, हे पुस्तक म्हणजे महाराजांच्या नवीन प्रवृत्तीचा केवळ पाया होय. ऐनेराजमेहेलच्या अनेक आवृत्ती आजपर्यंत झाल्या आहेत आणि त्यातील प्रकरणे पुन:पुन: चर्चा व विचार करून संपूर्ण करण्याकडे महाराजांनी इतके परिश्रम केले आहेत की, बहुधा दुसर्या कोणत्याही विषयावर ते केले नसतील. सर्वसामान्य जनतेतील धर्मविषयक ज्ञानाच्या प्रसारासाठीची सयाजीरावांची धडपड यातून अधोरेखित होते.
१८८६ चा महाराजांचा हा निर्णय म्हणजे भारतातील धर्मसाक्षरतेचा पहिला प्रयोग ठरतो. कारण राजाने आदेश काढला आणि समाज सुधारला असे होत नसते. कायदा आणि सत्ता हे जरी परिवर्तनासाठी आवश्यक असले, तरी त्याबरोबर हजारो वर्षांच्या परंपरा अचानकपणे संपुष्टात येत नसतात. त्यामुळे सरदेसाई म्हणतात त्याप्रमाणे ‘ऐनेराजमेहेल’ या पुस्तकाच्या लेखनाच्या वेळी महाराजांनी कोणत्याही विषयावर केले नसतील एवढे कष्ट का केले होते हे स्पष्ट होते.
सर्वसामान्यांना धर्मविषयक ज्ञान उपलब्ध करून देण्याबरोबरच राजवाड्यातील धार्मिक खर्चाचा लेखाजोखाही सयाजीरावांनी त्यांच्यासमोर ठेवला. सयाजीरावांनी १८९२ मध्ये राजवाड्याच्या देवघरातील धार्मिक विधींच्या खर्चाचे १,००० पानांचे तपशीलवार बजेट छापून पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. स्वत:च्या राजवाड्यातील खासगी धार्मिक विधींचा आर्थिक लेखाजोखा जनतेसमोर पुस्तकरूपाने मांडणारे सयाजीराव कदाचित एकमेव प्रशासक ठरावेत. या पुस्तकामुळे राजवाड्यातील धर्मविधी आणि त्यावर होणार्या खर्चाची अचूक स्थिती सयाजीरावांच्या लक्षात येऊन पुढील धर्मविषयक सुधारणा त्यांना शक्य झाल्याचे निरीक्षण सयाजीरावांच्या खासगी वृत्तांतात सरदेसाईंनी नोंदविले आहे.
या संदर्भात सरदेसाई लिखित सयाजीरावांच्या खासगी वृत्तांतात वर्णन केलेली १८९७ मधील घटना उल्लेखनीय आहे. बडोद्याच्या महाराजांचे कापलेले केस नर्मदा नदीच्या प्रवाहात नेऊन टाकण्याचा रिवाज पूर्वापार चालत होता. त्यानुसार, सयाजीरावांचे कापलेले केस नर्मदा नदीत टाकण्यासाठीचा खर्च म्हणून १ जून १८९७ रोजी खाजगी कारभार्यांनी त्यांच्या अधिकारात ८८ रु. १२ आणे मंजूर केले. परंतु या संदर्भात मागण्यात आलेला इतर खर्च त्यांनी नामंजूर केला. सयाजीरावांनी धार्मिक खर्चाला लावलेल्या शिस्तीचे हे उदाहरण आहे.
सयाजीरावांनी राजवाड्यात होणार्या अनावश्यक धर्मविधींचे प्रमाण शक्यतो कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता कमी करण्यावर भर दिला. त्याप्रमाणे राजघराण्यातील व्यक्तींची दृष्ट काढण्याची पद्धत बंद करण्यासंदर्भात २९ मे १९०१ ला आदेश दिला. या हुकूमात सयाजीराव म्हणतात, दृष्टी काढण्याचा रिवाज बंद करावा; परंतु देवभोळ्या समजुतीमुळेही खास प्रसंगी कोणास दृष्ट काढल्याने सुख वाटत असल्यास तशी त्याच्या समजुतीस्तव काढण्यास हरकत नाही; मात्र होतकरू मुलांना देवभोळ्या समजुतीचा कित्ता होता होईतोपर्यंत देऊ नये. धर्मविधी बंद करत असताना समाजाची मानसिकता समजून घेण्याची सयाजीरावांची वृत्ती यातून अधोरेखित होते. लहान मुले धार्मिक बाबींच्या आहारी जाऊ नयेत यासाठी घेतलेली काळजी सयाजीरावांची सामान्य जनतेचा धार्मिक दृष्टिकोन निकोप होण्यासाठीची तळमळ स्पष्ट करते.
सयाजीरावांच्या शिक्षणादरम्यानच त्यांच्या शिक्षकांकडून याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. राज्याभिषेकाआधी सयाजीरावांना सर टी. माधवराव यांनी इतर शिक्षकांच्या सहाय्याने विविध विषयासंदर्भातील व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. २० जुलै १८८१ ला शिक्षण विषयावर देण्यात आलेल्या व्याख्यानात सयाजीरावांना धर्मविषयक शिक्षण हे केवळ मानसिक पातळीवरील असावे. विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना कोणत्याही प्रकारच्या विशेष धार्मिक सूचना दिल्या जाऊ नयेत, अशी सूचना करण्यात आली होती. दृष्ट काढण्यासंदर्भातील सयाजीरावांचा आदेश ही या सूचनेची अंमलबजावणीच आहे.
ग्रहणाच्या दिवशी सरकारी कार्यालयात घेण्यात येणारी सुट्टी हा देखील सरकारी पातळीवर पाळण्यात येणार्या अंधश्रद्धेचाच भाग होता. प्रशासकीय व आर्थिक लाभ मिळविण्यासाठी ग्रहणाच्या दिवशी सरकारी कार्यालय बंद ठेवून धार्मिक विधी करण्याकडे कर्मचार्यांचा कल असे. परंतु सयाजीरावांनी हुकूम काढून ग्रहणाची ही सुट्टी बंद केली. हा आदेश काढत असतानाच त्यांनी पाळलेली धार्मिक सहिष्णुता गोत्री लिखित सयाजी चरित्रामध्ये अधोरेखित झाली आहे. गोत्री म्हणतात, ‘पृथ्वीची छाया चंद्रावर पडते त्यास ‘ग्रहण’ म्हणतात, हे सर्व सुशिक्षित लोकांना ठाऊक आहे; परंतु भोळे व भाविक लोक या दिवशी राहू किंवा केतू हे पापग्रह चंद्रास किंवा सूर्यास पीडा करतात, अशा समजुतीने तो दिवस धार्मिक कृत्यात किंवा बहुतेक निरुद्योगात घालवितात. ही त्यांची अज्ञानी समजूत दूर व्हावी व त्यांना उद्योगाचे महत्त्व कळावे म्हणून बडोदे राज्यातील सरकारी कचेर्यांत ग्रहणाच्या दिवशी रजा पाळीत असत, ती बंद करण्यात आली आहे व फक्त धार्मिक कारणानेच कोणास रजा पाहिजे असेल, तर त्याने रिपोर्ट करून रजा घावी, असे ठरविले आहे. यात लोकांच्या धार्मिक समजुतीसही महत्त्व दिल्याचे दिसून येते.
राजवाड्यातील धर्मविधींना शिस्त लावत असतानाच या विधींवर होणारा अनाठायी खर्च कमी करणेदेखील अत्यावश्यक होते. ब्राह्मणास अन्नदान केल्यामुळे महत्पुण्य लाभते या हिंदू धर्मातील समजुतीमुळे १७८२ पासून बडोद्याच्या राजवाड्यात दररोज ब्राह्मण भोजनाची प्रथा सुरू झाली. कालांतराने या भोजनासाठी येणार्या लोकांची संख्या वाढू लागली. त्यामुळे १८०८ पासून या भोजनपंक्तीऐवजी महाराष्ट्रीय ब्राह्मणांना २ भाग तांदूळ व १ भाग डाळ या प्रमाणात कोरड्या खिचडीचा शिधा देण्यास सुरुवात झाली.
सयाजीरावांचे दत्तक वडील खंडेराव महाराजांची इस्लाम धर्मावर विशेष श्रद्धा असल्यामुळे १८५८ मध्ये मुसलमान लोकांना भोजन देण्यासाठी ग्यारमीचा कारखाना सुरू करण्यात आला. यात दररोज येतील तितक्या मुस्लीम लोकांना भोजन देण्यात येई. ग्यारमी (मुसलमानी महिन्याचा ११ वा दिवस) व एकविसमी (मुसलमानी महिन्याचा २१ वा दिवस) दिवशी मुसलमानांना पुलाव व रोकड चिराखी (दक्षिणा) देण्यात येत असे. अन्नदान करत असताना व्यक्तीची गरज व उदरनिर्वाहाची अपरिहार्यता लक्षात घेतली जात नसल्यामुळे या भोजनाचा लाभ गरजूंबरोबर दरबारातील मानकरी लोकदेखील घेत. त्यामुळे महत्पुण्यासाठी केले जाणारे हे दान सत्पात्री होत नव्हते. १८७७-७८ मध्ये खिचडी व ग्यारमीवर ३,७१,६५२ रु. खर्च करण्यात आले होते. राज्याच्या उत्पन्नातील मोठा भाग या प्रथेवर विनाकारण खर्च होत होता.
राजवाड्यात चालत आलेल्या या अन्नदान प्रथेमध्ये सयाजीरावांनी बदल करत या प्रथेवर होणारा खर्च कमी केला. सयाजीरावांना त्यांच्या शिक्षकांकडून मिळालेले या संदर्भातील मार्गदर्शन अभ्यासल्यास त्यांची भूमिका समजून घेणे सोपे जाते. २७ जुलै १८८१ ला सयाजीरावांना ‘राजवाडा विभाग’ या विषयावर दिलेल्या व्याख्यानात सर टी. माधवराव सांगतात, धार्मिक कार्ये आणि दानधर्मावर होणारा खर्च जास्त आहे. त्यामुळे या खर्चात वाढ होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्यात यावी. आवश्यक आणि शक्य असेल तेव्हा या खर्चाचे पुनर्समायोजन करण्यात यावे.
या शिकवणीनुसार समाजातील श्रीमंत व्यक्तींऐवजी केवळ गरजू व्यक्तींनाच खिचडी व ग्यारमीचा लाभ मिळावा यासाठी सयाजीरावांनी १८९३ मधील आपल्या चौथ्या परदेश प्रवासात एक हुकूम काढला. जातीचा निकष न लावता सर्व जातीतील निराश्रित, अपंग, अंध, विधवा स्त्रिया, लहान मुले व गरजू व्यक्तींची समितीच्या माध्यमातून निवड करून त्यांना पास देण्यात यावेत आणि पासधारक व्यक्तीलाच खिचडी-ग्यारमी द्यावी असा हुकूम सयाजीरावांनी १६ जून १८९३ ला काढला. त्यामुळे ब्राह्मण आणि मुसलमान व्यक्तींबरोबरच इतर जातीतील गरजू व्यक्तींना देखील याचा लाभ मिळू लागला. १९०५-०६ मध्ये १०४१ हिंदू व ८०८ मुसलमान व्यक्तींना हे पास देण्यात आले.
खिचडी-ग्यारमीप्रमाणेच श्रावण महिन्यात ब्राह्मण वर्गाला दिली जाणारी दक्षिणा ही देखील पूर्वापार चालत आलेली परंपरा होती. पेशवाईच्या काळात ब्राह्मणांकडून प्राचीन विद्या आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी केल्या जाणार्या कार्याचा मोबदला म्हणून श्रावण महिन्यात त्यांना दक्षिणा देण्याची प्रथा सुरू झाली. पुढे हीच परंपरा बडोद्यात रुजली. याबरोबरच १८०२ मध्ये बडोद्यात विद्वान ब्राह्मणांना विशेष दक्षिणा देण्याची पद्धत सुरू झाली. तर १८०८ पासून संस्थानाबाहेरील ब्राह्मणांनादेखील दक्षिणा देण्यात येऊ लागली. मल्हारराव महाराजांच्या काळात श्रावणमास दक्षिणेवर होणार्या खर्चात प्रचंड वाढ झाली. हीच स्थिती सयाजीरावांच्या सुरुवातीच्या काळात कायम होती. १८७७-७८ मध्ये श्रावणमास दक्षिणेवर १ लाखांहून अधिक रकम खर्च करण्यात आली.
तत्कालीन दिवाण सर टी. माधवराव यांना श्रावणमास दक्षिणेवर केला जाणारा हा अवाढव्य खर्च चिंतेची बाब वाटत होती. त्यांनी ७ जुलै १८८१ रोजी सयाजीरावांना ‘राजवाडा विभाग’ या विषयावर दिलेल्या व्याख्यानात ही चिंता व्यक्त केली आहे. या व्याख्यानात ते म्हणतात, श्रावण दक्षिणा, बिदागी रमणा व इतर बाबींवर होणार्या खर्चावरील नियंत्रण सुटले आहे. महाराजांनी या विषयात लक्ष घालून दानधर्मावर होणारा अवास्तव खर्च शिक्षणास प्रोत्साहन व दारिद्य्र निर्मूलनासारख्या योग्य कारणासाठीच होईल याची काळजी घ्यावी. या सूचनेबरहुकूम सयाजीरावांनी राज्याधिकार प्राप्तीनंतर हा अनावश्यक खर्च कमी करण्यास सुरुवात केली. सयाजीरावांनी या खर्चाचा आढावा घेण्यासाठी १८९२ मध्ये एक समिती नेमली. या समितीमध्ये इंग्रजी शिकलेल्या पदवीधरांबरोबरच पारंपरिक शास्त्री, पंडितांचाही समावेश करण्यात आला होता.
या समितीच्या शिफारशीवरून दरवर्षी श्रावण महिन्यात विविध विषयांवर आधारित परीक्षा घेऊन ही परीक्षा उत्तीर्ण होणार्या उमेदवारांनाच दक्षिणा देण्याचा नियम सयाजीरावांनी १८९४-९५ मध्ये केला. सुरुवातीच्या काळात एकदा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला ५ वर्षे दक्षिणा देण्यात येत होती. नंतरच्या काळात हा कालावधी कमी करून ३ वर्षे करण्यात आला. शेवटी दरवर्षी परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण होणार्या व्यक्तीलाच दक्षिणा देण्याचा सयाजीरावांनी आदेश दिला. या दक्षिणेची रकम ३० ंपासून १५० रुपयांपर्यंत होती. या परीक्षेच्या माध्यमातून दरवर्षी आपले ज्ञान अद्ययावत करण्याची जबाबदारी ब्राह्मणांवर टाकण्यात आली. १८७७-७८ मध्ये श्रावणमास दक्षिणेवर झालेला १ लाखाहून अधिकचा खर्च या नियमाच्या अंमलबजावणीनंतर ५ हजारांवर आला. या दक्षिणेतील बचतीपैकी प्रतिवर्षी ५,५०० रु. ची तरतूद नवीन ग्रंथांच्या लेखनासाठी करण्यात आली. पुढे सयाजीरावांनी या बचतीपैकी प्रतिवर्षी १०,००० रु. धर्मशास्त्रावरील उत्तम पुस्तके मराठीतून प्रसिद्ध करण्यासाठी खर्च करण्याचा आदेश दिला.
या संदर्भात कोल्हापूरच्या राजर्षी शाहूंनी सयाजीराव महाराजांचा आदर्श स्वीकारल्याचा पुरावा सुमारे ३० वर्षांनंतर २२ ऑक्टोबर १९२० रोजी त्यांनी बडोद्याच्या खासेराव जाधवांना लिहिलेल्या पत्रात मिळतो. ‘आपण कोल्हापूर संस्थानामार्फत पंढरपूरच्या देवस्थानासाठी नैवेद्य इत्यादींवर होणारा खर्च बंद करून त्याचा वापर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करावा असा हुकूम दिल्याचे’ या पत्रात शाहू महाराज मोठ्या समाधानाने खासेरावांना सांगतात.
१८८१-८२ मध्ये बडोद्याच्या धर्मादाय खर्चात आधीच्या वर्षापेक्षा ७८,१२१ रुपयांची बचत झाली. १८८७-८८ मध्ये धर्मादाय खर्चात झालेली १,०५,९८९ रु. ची वाढ ही या २० वर्षांच्या कालखंडातील सर्वांत मोठी वाढ होती. परंतु ३ वर्षांच्या आतच १८९०-९१ मध्ये दानधर्मावरील खर्चात १,०८,०७९ रु. ची कपातदेखील करण्यात आली. तर १८९९-१९०० अखेर या खर्चात तिप्पट घट झाली. कोणताही बदल करत असताना हुकुमाच्या आधारे बदलाची अपेक्षा न करता सातत्यपूर्ण प्रयत्नातून अपेक्षित बदल साध्य करण्याची सयाजीरावांची हातोटी या प्रक्रियेत स्पष्ट होते.
सयाजीरावांनी सरकारी आणि खाजगी व्यवस्थापनाखालील हिंदू आणि मुस्लीम देवस्थानांच्या खर्चाचे नियोजन करून वाचलेल्या पैशातून सर्वसाधारण निधी आणि राखीव निधी असे दोन प्रकारचे निधी उभारले. या निधीतून दरवर्षी आरोग्य शिक्षण व समाजसुधारणा यासाठी नियमित खर्चाची तरतूद करण्यात आली. प्रबोधनकारांनी त्यांच्या ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या ग्रंथात मांडलेल्या ‘सार्वजनिक वाचनालये, संशोधन शाळा, वेधशाळा, शास्त्रीय प्रयोगशाळा, दवाखाने, अनाथाश्रम, सोशल क्लब, व्याख्यानमंदिरे, तालीमखाने, सहभोजनशाळा इत्यादी नाना प्रकारच्या, देशोद्धारक गोष्टींकडे देवळाचा सदुपयोग अभेद भावाने करता येणे शक्य आहे’ या विचाराचे हे ‘सयाजीकालीन प्रात्यक्षिक’ आहे.
महाराजांचा हा निर्णय त्यांच्या तुलनात्मक धर्मचिंतनाचा परिपाक होता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, हिंदू आणि मुस्लीम धर्मियांसाठीच्या दानधर्माच्या नियमांत एकाचवेळी केलेला बदल होय. भारतासारख्या बहुधार्मिक देशात उद्देश कितीही सकारात्मक असला, तरी कोणत्या तरी एका धर्माला अधिकची सहानुभूती इतर प्रबळ धर्माला नकारात्मक आणि मूलतत्त्ववादी दिशेला नेण्यास कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच सयाजीरावांचे धर्मचिंतन हेच भारताला तारण्याचा सर्वांत सक्षम पर्याय म्हणून पुढे येते.
– सुरक्षा घोंगडे, वारणानगर