जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येच्या निमित्ताने

अशोक राजवाडे -

वर्णद्वेषाविरुद्ध अमेरिकेच्या समाजजीवनात अनेक आंदोलनं झाली असली, अनेक कायदे संमत झाले असले, तरी वर्णद्वेषाच्या घटना तिथे पुन्हा-पुन्हा घडताना दिसतात. या देशावर आपलं वर्चस्व असलं पाहिजे आणि तिथे असलेले गौरेतर उपरे आहेत, अशी भावना अनेक गोर्‍या अमेरिकन माणसांच्या डोक्यात असते. वास्तविक पाहता अमेरिकेतले मूळ रहिवासी वगळले तर गोर्‍यांसकट बाकीचे सगळेच तिथे उपरे आहेत; पण गोरे वंशवादी याकडे साफ दुर्लक्ष करतात. अशा विवेकहीन गोर्‍यांचे अतिरेकी गट अमेरिकेत आढळून येतात.

अमेरिकेतल्या मिनिसोटा राज्यातल्या मिनिआपोलिस शहरात 25 मे ला एका कृष्णवर्णियाची हत्या झाली. हत्या करणारा गोरा पोलीस अधिकारी होता. अगदी अनपेक्षित पद्धतीने ही हत्या झाली. जॉर्ज फ्लॉइड नावाचा एक कृष्णवर्णीय सिगारेट खरेदी करण्यासाठी तिथल्या एका दुकानात गेला; पैसे देताना त्याने वीस डॉलरची खोटी नोट दिली. दुकानातल्या एका नोकराने त्यावर पोलिसांना फोन केला. तिथे चार पोलीस अधिकारी आले आणि त्याला बेड्या ठोकण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे फ्लॉइडने बेड्या ठोकून घ्यायला विरोध केला. त्यावर त्यातल्या डेरेक शोविन नावाच्या एका पोलीस अधिकार्‍याने फ्लॉइडला जमिनीवर पाडलं; आपल्या गुडघ्याखाली त्याची मान दाबली. त्याबरोबर फ्लॉइड विव्हळू लागला आणि नंतर ‘मी गुदमरतो आहे’ (आय कॅनॉट ब्रीद) असं म्हणून ओरडू लागला, गयावया करू लागला. आजूबाजूला माणसं जमा झाली; पोलीस अधिकार्‍याने आपला गुडघा जॉर्ज फ्लॉइडच्या मानेवरून बाजूला करावा, अशी विनवणी जमलेले लोक करू लागले. पण डेरेक शोविनने काही न ऐकता आपला गुडघा त्या माणसाच्या मानेवर तसाच दाबून ठेवला. सुमारे सहा मिनिटं हा प्रकार सुरू होता. हळूहळू फ्लॉइडचा आवाज बंद झाला, त्याचा श्वास थांबला आणि सुमारे नऊ मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हे सारं बघणार्‍या एका व्यक्तीने या प्रकाराचं -एकूण नऊ मिनिटांचं- चित्रण केलं होतं. ते चित्रण थोड्याच वेळात समाजमाध्यमांत सर्वदूर पसरलं आणि पोलिसी क्रौर्याचा हा भीषण प्रकार सार्‍या दुनियेला पाहायला मिळाला. या घटनेनंतर केलेल्या तपासात पोलिसांनी जेव्हा त्या दुकानाच्या सीसीटीव्हीचं चित्रण पाहिलं, तेव्हा फ्लॉइडने बेड्या ठोकून घ्यायला विरोध केला होता, असं कुठे त्यात दिसलं नाही. त्यामुळे लोक अधिकच चिडले.

या प्रकारानंतर घडलेल्या गोष्टी अमेरिकेतल्या जनतेत – विशेषतः कृष्णवर्णियांमध्ये – चीड उत्पन्न करणार्‍या होत्या. शोविन आणि इतरांना नोकर्‍यांतून काढून टाकण्यात आलं; पण कोणाला तातडीने अटक झाली नाही. जनक्षोभ उफाळून आल्यावर नंतर शोविनला अटक करण्यात आली. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. शोविनबरोबरच्या तीन अधिकार्‍यांवर या गुन्ह्याला मदत करण्यावरून गुन्हे दाखल करण्यात आले.

साक्षात् शासनाचा भाग असलेल्या पोलीस खात्याकडून असा प्रकार घडलेला होता. त्यामुळे जनतेत संतापाची जी लाट उसळली. ती लवकर शमली नाही. कृष्णवर्णियांच्या मनातला संताप उफाळत राहिला. अमेरिकेच्या अनेक शहरांतून निदर्शनं झाली. अशा निदर्शनांत काही ठिकाणी लाखो व्यक्तींनी सहभाग घेतला होता.

जुलै 2014 मध्ये एरिक गार्नर नावाच्या कृष्णवर्णीय माणसावर असाच प्रसंग ओढवला होता. पोलिसांनी गार्नरला क्षुल्लक गुन्हा करण्यावरून पकडलं होतं, तेव्हाही गार्नरचा गळा एका पोलिसाने दाबला होता. ‘मी गुदमरतोय,’ हेच शब्द गार्नरच्या तोंडी तेव्हा होते. या गुदमरण्याने गार्नरचं मरण ओढवलं होतं. दरम्यान ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ (अर्थ : काळ्यांच्या जीवनाला सुद्धा काही अर्थ आहे) या नावाची एक चळवळ अमेरिकेत आकार घेत होती. गार्नरच्या मरण्याने ही चळवळ अधिक फोफावली. अमेरिकेत अनेक ठिकाणी निदर्शनं झाली होती.याखेरीज आणखी काही ठिकाणी हत्या झाल्या; तसंच काही कृष्णवर्णियांचा पोलीस कोठड्यांत मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणा कृष्णवर्णीय व्यक्ती, गोरगरीब आणि तत्सम इतर अल्पमतातल्या (दुर्बल) व्यक्तींवर जाणीवपूर्वक बळाचा वापर करत आहेत, असे पोलीस दलावर आरोप होऊ लागले. याविरुद्ध होणार्‍या निषेधांनी सुद्धा अशा तर्‍हेच्या घटनांना काही आळा बसला नाही.

जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर झालेल्या निदर्शनांविषयी सावध आणि सुजाण वक्तव्यं करण्याऐवजी निदर्शक ‘ठग’ असल्याचा उल्लेख अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येची घृणास्पद घटना अमेरिकेत घडली असली, तरी तिच्याबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांची प्रतिक्रिया एखाद्या देशाच्या प्रमुखाला न शोभणारी होती. अख्ख्या जगाने ‘त्या’ व्हिडिओद्वारे या घटनेतील क्रौर्य पाहिलं होतं. त्याविषयी एखादं जुजबी आणि वरवरचं काहीतरी ते बोलले. त्यांची वक्तव्यं एखाद्या संवेदनशील नेत्यासारखी नव्हती. त्यांच्या बोलण्यात हळहळ किंवा त्यातल्या क्रौर्याबद्दल व्यथित झाल्याची भावना कुठे जाणवत नव्हती. ‘आपण अमेरिकेतली बेरोजगारी 13.5 टक्क्यांपर्यंत खाली आणली, हे पाहून आकाशातून जॉर्ज फ्लॉइड हा अमेरिकन अर्थव्यवस्थेची तारीफ करत असेल,’ असं हास्यास्पद विधान करून डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनाहीनतेचं दर्शन जगाला घडवलं. जो बायडेन हे नोव्हेंबरमध्ये होणार्‍या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षातर्फे ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी असतील. ट्रम्प यांच्या वक्तव्यावर त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. ‘मी गुदमरतो आहे,’ हे फ्लॉइडचे अखेरचे शब्द जगाने ऐकले आहेत. तेव्हा त्याच्या तोंडी दुसरे काहीतरी शब्द घालणं हे निंदनीय आहे, असं जो बायडेन म्हणाले.

जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त त्यातल्या जाळपोळीवर बोट ठेवलं आणि भविष्यात लष्कराचा वापर करायलासुद्धा आपण मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा दिला. हे बोलणं अमेरिकेतल्या जनसंघटना आणि विरोधी पक्षातल्या सर्वांना खटकल्याशिवाय राहिलं नाही. अशी एखादी घृणास्पद घटना आपल्या देशात घडली, तर त्यावेळी राष्ट्रप्रमुख जनतेला एकत्र येण्याचं आवाहन करतो, देशात शांतता नांदायला हवी हे पाहतो आणि गुन्हेगाराला शासन होईल, असं म्हणून जनतेला आश्वस्त करणारी वक्तव्यं करतो. पण असा कोणताही प्रयत्न ट्रम्प यांच्या वक्तव्यांत दिसला नाही. उलट या घटनेचं निमित्त करून आपल्या स्वतःच्या हातातल्या सत्तेचा आणि आपल्या कर्तृत्वाचा डांगोरा पिटण्याचं काम ट्रम्प यांनी केलं. लष्कराचा वापर करून जनतेत आपण कशी जरब निर्माण करू शकतो, हे सांगण्यावर त्यांनी भर दिला. एका देशाचे प्रमुख म्हणून जबाबदारीने बोलण्याऐवजी डेमोक्रेटिक पक्षावर दोषारोप करण्यासाठी त्यांनी या प्रसंगाचा वापर केला. मिनिआपोलिस शहराचे महापौर जेकब फ्राय हे (पक्ष : डेमोक्रेटिक फार्मर लेबर) डावे असून ते दुर्बल आहेत आणि त्यांनी जर वेळेवर तिथली परिस्थिती आटोक्यात आणली नाही, तर आपल्याला नॅशनल गार्डना तिथे पाठवून परिस्थिती काबूत आणावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

2016 च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळवून देण्यामागे गोर्‍या वर्णाच्या व्यक्तींचा मोठा मतदारवर्ग होता. कृष्णवर्णियांनी अमेरिकेतल्या आपल्या रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्याची भावना या वर्गात होती. येत्या नोव्हेंबरमध्ये या वर्गाचा पाठिंबा पुन्हा एकदा ट्रम्प यांना मिळवायचा असल्याने अशा वर्णद्वेषाच्या घटनांबद्दल त्यांनी विशेष काही केलं नाही; उलट कृष्णवर्णीय जनतेत जरब निर्माण करणारी वक्तव्यं आपण केली तर गौरवर्णीयांची मतं पुन्हा आपल्याकडे येतील, असा ट्रम्प यांचा हिशोब असल्याची अशी टीका त्यांच्यावर झाली.

अमेरिकेला कृष्णवर्णियांच्या हत्यांचा इतिहास आहे. असं घडल्यावर तिथे अनेक वेळा निदर्शनंही झाली आहेत. 1968 साली मार्टिन ल्यूथर किंग या प्रसिद्ध अमेरिकन कृष्णवर्णीय नेत्याची एका माथेफिरूने हत्या केली होती. त्यावेळीही अमेरिकेत अशीच निदर्शनं झाली होती आणि दंगली उसळल्या होत्या. नंतर 1992 मध्ये रॉडनी किंग नावाच्या एका व्यक्तीला काही पोलिसांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्या पोलीस अधिकार्‍यांवर खटले भरले गेले. ते पोलीस अधिकारी त्या खटल्यात निर्दोष म्हणून सुटले, तेव्हाही असाच प्रक्षोभ उसळला होता. मग पूर्वीच्या काळी जे प्रक्षोभ झाले, त्यात आणि आजच्या प्रक्षोभात साम्यस्थळं कोणती आणि फरक कोणता? पूर्वीच्या काळातल्या निदर्शनांत आणि आजही मुख्यत्वेकरून गोरेतरांचा आणि त्यात पुन्हा कृष्णवर्णियांचा प्रमुख सहभाग होता/आहे, हे यातलं साम्य आहे. ते समजण्यासारखं आहे; पण मुख्य फरक असा की, आज गोर्‍या वर्णाच्या व्यक्तींचासुद्धा यातल्या निदर्शनांत वाढत्या प्रमाणात सहभाग आहे. किमान यातल्या वर्णभेदाविरुद्ध अनेक गौरवर्णियांनी सुद्धा ठाम भूमिका घेतली. अमेरिकेतल्या सर्व म्हणजे पन्नास राज्यांत याविरुद्ध किमान निदर्शनं तरी झाली, हा एक विशेष इथे नोंदवण्यासारखा आहे आणि या पन्नासपैकी काही राज्यं गोर्‍या लोकांच्या प्रभावाखाली आहेत, असं असूनही हे घडलं हे विशेष. आणखी एक महत्त्वाची घटना अमेरिकेत गेल्या दशकात आकार घेते आहे, ती म्हणजे डाव्या विचारांच्या व्यक्तींचा काही प्रमाणात वाढलेला प्रभाव. बर्नी सँडर्स यांनी गेल्या दोन निवडणुकांत आपले स्वतःचे नव्या दमाचे पाठीराखे मैदानात आणले आहेत. पर्यावरणापासून ते वर्णभेदापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे गोरेतर डाव्या मतदारांचा एक हिस्सा त्यांच्यामागे उभा आहे. त्यांच्या पाठीराख्यांत अनेक गोरेतर व्यक्ती आहेत. हा मतदारसमूह छोटा असला तरी दुर्लक्षणीय नाही. जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर बर्नी सँडर्स यांनी आपली सर्वसमावेशक आणि डावी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जॉर्ज फ्लॉइडचा गळा पोलीस अधिकार्‍याच्या गुडघ्याने दाबला जाण्याच्या घटनेचं एकूण नऊ मिनिटांचं संपूर्ण चित्रण केलं गेलं आणि ते अनेक माध्यमांतून जगाला कळलं. जे दिसत होतं ते भीषण होतं. आणखी एक गोष्ट म्हणजे बहुतांश जग कोरोना लॉकडाऊनच्या अवस्थेत असल्यामुळे जास्तीत जास्त लोक हे चित्रण पाहू शकले. ‘ब्लॅक लाइव्ज मॅटर’ या चळवळीला आमचा मुळात पाठिंबा होताच; पण टीव्हीच्या पडद्यावर जे क्रौर्य आम्हाला दिसलं, त्यामुळे आम्ही घरात गप्प बसू शकलो नाही,’ असं यातल्या काही तरुण निदर्शकांनी ‘बीबीसी’ला सांगितलं.

खुद्द अमेरिकेत याविरुद्ध सर्वाधिक निदर्शनं आणि दंगली घडल्या, हे खरंच; पण एकूणच पश्चिमी जगात वर्णभेदाला आपला सक्त विरोध आहे, असं अनेकांनी दाखवून दिलं. त्या मानाने इंग्लंड वगळता गौरवर्णियांच्या सत्तेचा उदो-उदो करणार्‍या संघटनांनी विशेष काही केलं नाही. त्यांच्याजवळ काही मुद्दाच नव्हता; शिवाय अमेरिकेत बेरोजगारीचं प्रमाण 13.5 टक्के झाल्याने आणि कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रस्त्यावर येणार्‍या कोणाला कामावर जाण्याची घाई नव्हती. जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येच्या संदर्भात ‘एबीसी’ वृत्तसंस्था आणि इप्सॉस पोल यांनी मिळून अमेरिकेत एक जनमत चाचणी केली. तिच्यात आलेली टक्केवारी लक्षात घेण्यासारखी आहे. कायदा- सुव्यवस्थेचे राखणदार आणि कृष्णवर्णीय या दोहोंच्या मध्ये काही व्यवस्थात्मक दरी आहे काय, हा प्रश्न त्यात नागरिकांना विचारण्यात आला. त्यामध्ये अशी दरी असल्याचं कबूल करणार्‍यांची टक्केवारी अशी : गोरे : 70 %, कृष्णवर्णीय : 94 %, हिस्पॅनिक्स * : 75 %, डेमोक्रेटिक पक्षाला पाठिंबा देणार्‍या व्यक्ती : 92 %, रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा देणार्‍या व्यक्ती : 55 %, कोणत्याही पक्षाला न मानणार्‍या स्वतंत्र व्यक्ती : 71 %

(* ‘हिस्पॅनिक्स’ म्हणजे अमेरिका खंडाच्या दक्षिण आणि मध्य भागातून अमेरिकेत (म्हणजे यू. एस. ए. मध्ये) स्थलांतरित झालेले लोक. या भागांत मुख्यत्वेकरून स्पॅनिश भाषा प्रचलित आहे. त्यांच्यात बहुसंख्येने गोरेतर आहेत.)

हे पाहिल्यावर वर्णभेदाला किती व्यापक प्रमाणात विरोध होतो आहे, हे लक्षात येतं. अगदी रिपब्लिकन पक्षाचे पाठीराखेसुद्धा बर्‍यापैकी प्रमाणात याला विरोध करताना दिसून आले आहेत. मिनिसोटा राज्यातल्या पोलीस दलात व्यापक आणि दूरगामी बदल करण्यात येतील, असं तिथल्या गव्हर्नरांनी जाहीर केलं आहे. भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत, म्हणून विशेष काळजी घेतली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

हे सारं अमेरिकेत घडलं; पण अमेरिकेबाहेर याच्यावर काय प्रतिक्रिया उमटल्या?

ओटावा ही कॅनडाची राजधानी. तिथले पंतप्रधान जस्टिन ट्रृडो यांनी तिथल्या ‘ब्लॅक लाइव्ज मॅटर’च्या निषेध सभेत स्वतः होऊन भाग घेतला. इतर अनेकांप्रमाणे एक गुडघा जमिनीवर टेकवून ते बसले आणि वर्णवर्चस्वाला आपला विरोध त्यांनी जाहीर केला. जमिनीवर एक गुडघा टेकवून बसण्याची ही नवी ‘पोझ’ आता जगभर अशा निषेधाची सर्वमान्य देहबोली झाली आहे. अमेरिकेतही अनेक ठिकाणी वर्णवर्चस्वाला विरोध करण्यासाठी अशी ‘पोझ’ निदर्शकांनी घेतली होती.

विविध देशांतल्या निषेधांत तिथल्या वास्तवाचं प्रतिबिंब उमटणं अटळ होतं. सीरियातल्या इडलिब शहरातल्या एका चित्रकाराने बॉम्बिंग झालेल्या एका इमारतीवर जॉर्ज फ्लॉइडचं चित्र काढून वर्णवर्चस्वाला आपला विरोध प्रकट केला. त्यातून सीरियामधलं भयाण वास्तव समोर येत होतं. ब्राझीलमधल्या निदर्शनांना तिथले कट्टर उजवे अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांच्या विरोधाचं स्वरूप येणं अपरिहार्य होतं. कारण ब्राझीलमधल्या अमेझॉनच्या प्रचंड मोठ्या वर्षावनांत वास्तव्य करून राहणार्‍या आदिम टोळ्यांविरुद्ध आणि इतर कृष्णवर्णियांबद्दल जाइर बोल्सोनारोंना वाटणारा तिरस्कार त्यांच्या वक्तव्यांतून आणि कृतीतून सतत डोकावत असतो.

ब्रिटनमध्ये काही ठिकाणी गुलामांचा व्यापार करणार्‍यांचे पुतळे आहेत. यावेळच्या निदर्शनांत ब्रिस्टॉलमध्ये एडवर्ड कोल्स्टन नावाच्या एका व्यापार्‍याचा पुतळा उखडून निदर्शकांनी समुद्राच्या पाण्यात टाकला. या एडवर्ड कोल्स्टनने 1672 ते 1689 या काळात हजारो कृष्णवर्णीय गुलामांचा व्यापार करून पैसे कमावले होते. कृष्णवर्णियांच्या मोर्चानंतर तिथल्या चर्चिल यांच्या पुतळ्याखाली कुणीतरी ‘तो वर्णवर्चस्ववादी होता’ अशा अर्थाचा मजकूर लिहिला होता. गोर्‍या ‘राष्ट्रवादी’ मंडळींना हे फारच झोंबलं. चर्चिल आणि इतर ‘राष्ट्रभक्त महानायकां’च्या पुतळ्यांची होणारी विटंबना त्यांना पाहावली नाही. त्यांनी अशा राष्ट्रीय स्मारकाचं संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निवासस्थानासमोर एक प्रतिमोर्चा काढला. त्यात ‘इंग्लंड, इंग्लंड’ अशा घोषणा ते देत होते. गोरे निदर्शक आणि पोलीस यांच्यात चकमकी झाल्या. काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

हाँगकाँगमध्ये चीनच्या वर्चस्वाविरुद्ध निदर्शनं सुरू आहेत. तिथे निदर्शकं अमेरिकन वकिलातीसमोर जमले आणि त्यांनी ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ चळवळीचे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या.

ऑस्ट्रेलियाला एक वेगळाच इतिहास आहे. तिथल्या मूळ निवासी जमातींनी ब्रिटीश साम्राज्यवाद्यांकडून बराच काही त्रास सोसला होता. त्यात हिंसाचारदेखील होता. त्यामुळे तिथे वर्णद्वेषाविरुद्ध झालेल्या निदर्शनांत ऑस्ट्रेलियामधल्या वर्णद्वेषाचा मुद्दा येणं अपरिहार्य होतं. विविध देशांतल्या प्रचलित राजवटींनी जॉर्ज फ्लॉइडच्या संदर्भात आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. बर्‍याच जणांनी ‘आपल्याकडे वर्णभेदाला थारा नाही,’ असं म्हणून अनुषंगिक हिंसाचार सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. आता या सगळ्या गदारोळात आपण भारतीय कुठे आहोत?

अमेरिकेत राहणार्‍या काही भारतीयांनी तिथे आपला निषेध नोंदवला असला, तरी त्यांचं अस्तित्व सामूहिक पातळीवर कुठे जाणवण्याजोगं दिसलं नाही. मोदी आणि ट्रम्प यांच्यात 3 जूनला दूरध्वनीवर जे संभाषण झालं, त्यात मुख्यतः भारत आणि चीन यांच्यातल्या आताच्या तणावाचा उल्लेख आहे. अमेरिकेत वर्णभेद विरोधकांतल्या वाढत्या अस्वस्थतेचा तिथे जाता-जाता केलेला उल्लेख आहे. मोदींनी वर्णभेदाच्या मुद्द्याला त्यापेक्षा अधिक महत्त्व दिलं नाही. वर्णवर्चस्वाला आपला ठाम विरोध आहे, असं कोणतंही विधान यात दिसलं नाही, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे.

भारतात असलेले वंशभेदाचे आविष्कार आपल्याला परिचित आहेत. त्यांच्या गुंतागुंतीत जाणं इथे अस्थायी ठरेल. एकीकडे, हिंदू समाजातल्या जातिभेदांचा आविष्कार आपल्याला माहीत आहे. त्याविषयी एका वेगळ्या पद्धतीचं नवं राजकारण इथे सुरू आहे. बुद्ध आणि आंबेडकरांचा वापर करून दलितांना जवळ करायचं आणि मुस्लिमांना दूर लोटायचं, असा हा ‘समरसते’चा नवा फंडा आहे. पण स्थानिक पातळीवर वेगळं दृश्य दिसतं. दलितांना त्रास देण्याच्या घटनांमागे अनेकदा संघपरिवारातल्या व्यक्ती असतात, अशीही दृश्यं दिसतात. धर्मासारख्या जन्माधारित गोष्टीच्या आधारे माणसांत भेदाभेद करणारी व्यवस्था अधिक बळकट करणं, हा आपल्या आजच्या सत्ताधीशांच्या व्यवस्थेचा स्थायीभाव आहे. अमेरिकेतल्या वर्णवर्चस्वाच्या विरोधात बोलल्यामुळे त्यांची गैरसोय होते – कारण लगेच देशाच्या आत चाललेल्या भेदाभेदाच्या राजनीतीबद्दल गैरसोयीचे प्रश्न विचारले जातील, ही त्यांना भीती आहे – त्यामुळे वर्णवर्चस्वाविरुद्ध अमेरिकेत चाललेल्या लढ्यांकडे सरळसरळ दुर्लक्ष करण्याचा मार्ग आपल्या शासकांनी स्वीकारला आहे. जगातल्या विविध देशांतल्या संघटनांत दोन प्रकार स्थूलमानाने दिसतात. एकीकडे, काही संघटना जन्मजात भेदांवर आधारित राजनीतीचा अवलंब करतात. हे भेद वापरून त्यातल्या एकाची बाजू घ्यायची, त्या गटाला काही विशेषाधिकार आहेत, असं मानून त्यांना उच्च स्थानी बसवायचं आणि दुसरे गट त्या मानाने दुय्यम स्थानावर आहेत, असं मानायचं. अशा पद्धतीने त्यांचं अस्मितेचं राजकारण चालतं.

दुसरीकडे, सगळ्या माणसांना समान अधिकार असतात, असं मानणार्‍या सर्वसमावेशक अशा संघटना किंवा पक्ष जगातल्या प्रत्येक देशात असतात. जातिभेद, धर्मभेद, लिंगभेद, भाषाभेद अशा गोष्टींना तिथे वाव नसतो. पहिल्या प्रकारचे लढे स्थूलमानाने उजव्या शक्ती देत असतात, तर दुसर्‍या प्रकारचे लढे डाव्या संघटना देतात. अर्थात, हे फरक स्थूल आहेत. प्रत्यक्षात राजकीय वास्तव अधिक गुंतागुंतीचं असतं; पण एखाद्या प्रश्नाबाबत आपली भूमिका ठरवण्यासाठी हे भेद समजणं महत्त्वाचं आहे. कारण त्या दोन प्रकारांतून वेगळ्या आणि विरोधी मूल्यव्यवस्था सूचित होत असतात.

ताजा कलम : हा लेख लिहित असताना पुन्हा एकदा अमेरिकेत निदर्शनांची नवी लाट आली आहे. कृष्णवर्णियांपैकी दोन तृतीयपंथीय व्यक्तींच्या हत्या चोवीस तासांच्या आत अमेरिकेत झाल्या. समाजातल्या पूर्वग्रहांमुळे हत्येला बळी पडण्याची शक्यता तृतीयपंथीयांमध्ये इतरांपेक्षा नेहमी अधिक असते. अशा व्यक्तींचे हक्क-संरक्षणासाठी ओबामांच्या काळात केलेले उपाय हे ट्रम्प यांनी पुन्हा काढून टाकून घड्याळाचे काटे उलटे फिरवले आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींचे समूह पुन्हा आपल्या हक्कांची मागणी करत आहेत. ‘ब्लॅक लाइव्ज मॅटर’ऐवजी ‘ऑल ब्लॅक लाइव्ज मॅटर’ ही आताच्या नव्या निदर्शनांतली घोषणा आहे. प्रचलित चौकटीत न बसणार्‍या अनेक समूहांना आपण कोणता न्याय देणार आहोत, असा प्रश्न सगळ्या जगभर या निमित्ताने पुन्हा विचारला जातो आहे. तृतीयपंथीय हा स्त्री आणि पुरुष या दोन कोटींच्या (म्हणजे कॅटेगरींच्या) बाहेर असणारा मानवसमूह आहे आणि त्यातही कृष्णवर्णीय म्हणजे वाईट अवस्था. आपल्याकडे तृतीयपंथी वा तत्सम इतर समूहांचा मुळात जगण्याचाच प्रश्न भीषण आहे. या वर्गाला निव्वळ पूर्वग्रहांमुळे संधी उपलब्ध नाहीत. मग अशा सगळ्यांना सामावून घेणारा विचार आपण मानतो की, आपल्या पूर्वग्रहांवर आधारित जळमटं तशीच डोक्यात बाळगून अशा माणसांना त्रासाला सामोरं जायला लावतो, असा प्रश्न इथे आहे. हा प्रश्न जसा मानवी मूल्यांचा आहे, तसाच तो विचारप्रणालींचा सुद्धा आहे. त्यांच्या सोडवणुकीतूनच आपलं राजकारण सिद्ध होत असतं.