छद्मविज्ञान ओळखायचं कसं?

प्रा. प. रा. आर्डे -

प्रसारमाध्यमे, आपले तथाकथित हितचिंतक आणि अन्य घटकांद्वारे आपल्या समस्या सोडविण्याचा जणू काही मक्ता घेतलेली मंडळी आपल्याला छद्मविज्ञानाच्या वाटाकडे आकर्षित करतात. आपले व्यक्तिगत आणि सामाजिक नुकसान टाळण्यासाठी फसव्या विज्ञानापासून सावध राहायलाच हवे. पण समोर थडकलेली माहिती ही खरंखुरं विज्ञान की, छद्मविज्ञान यातील भेद आपणास ओळखता यायला हवा.

छद्मविज्ञान बहुधा तीन प्रकारे आपणांसमोर आणलं जातं. आपल्या आरोग्याबाबतचा उपाय देणारी पेडंटसारखी वस्तू दूरचित्रवाहिनीद्वारे आणि पेपर मीडियाद्वारे जाहिरातीच्या रुपात समोर येते. काहीवेळा प्रसारमाध्यमांत एखादा मोठा शोध लागल्याची बातमी वाचनात येते, तर काही वेळा कुणाला तरी परामानस स्वरुपाची गूढ शक्ती मिळाल्याची वार्ता कानावर आदळते. नवसंशयवादाचा उपयोग करावयाचा, तर अशा माहितीची चिकित्सा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. म्हणून माहितीच्या रुपात आपणापर्यंत पोचलेली गोष्ट विज्ञान की छद्मविज्ञान, हे ओळखण्याच्या काही खुणा किंवा कसोट्या आपण वापरायला हव्यात. विज्ञान आणि मानसशास्त्राच्या क्षेत्रात सखोल चिकित्सक वृत्तीने मिळालेल्या कसोट्या आपणास उपलब्ध आहेत.

प्रख्यात खगोल वैज्ञानिक कार्ल सेगन याने अशा कसोट्यांचा संच त्यांच्या ‘डेमन हाँटेड वर्ल्ड’ या ग्रंथात प्रथम दिला. नंतर ‘क्वॅकवॉच’ या वेबसाईटचे निर्माते डॉ. स्टीफन बॅरेट आणि ‘अँटीएजिंग क्वॅकरी’चे टॉम पर्लस् यांनी या कसोट्यांमध्ये भर घातली. स्केप्टिक सोसायटीचे डॉ.मायकेल शर्मर यांनी या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. या सर्वांच्या अथक प्रयत्नांतून मिळालेली छद्मविज्ञानाची लक्षणे आणि कसोट्या नीट समजून घेतल्या तर छद्मविज्ञानाच्या मोहमयी जगातून आपणास मुक्त होता येईल.

१) विज्ञान म्हणून केलेला दावा हा सिद्धांतांच्या कसोटीला उतरतो का?

छद्मविज्ञानातील काही तथाकथित सिद्धांत विज्ञानातील सिद्धांताच्या कसोट्यावर खोटे ठरतात. एखादं गृहितक सिद्धांत तेव्हाच होतो, जेव्हा तो पुढील चार कसोट्यांना उतरतो. सिद्धांताची सुरुवात प्रायोगिक पुराव्यांपासून होते आणि त्याला प्रायोगिक निरीक्षणाचाच भक्कम आधारही द्यावा लागतो. सांगोवांगी किंवा अविश्वसनीय अहवालांना शून्य किंमत असते. अनेकविध पुराव्यांचा भक्कम आधार असेल, तरच तो सिद्धांत विज्ञान जगताला मान्य होतो. केवळ कच्च्या, तकलादू, एकाच पायाभूत गोष्टीचा आधार मान्य केला जात नाही.

सिद्धांताचा खरेखोटेपणा तपासण्यायोग्य असायला हवा. जर तो तपासता येत नसेल किंवा त्याचा प्रतिवाद करता येत नसेल, तर तो वैज्ञानिक सिद्धांत होऊ शकत नाही. शिवाय जर तो तपासता येत असेल, तर इतरांना तो तपासण्यास मान्यता हवी आणि त्यांनी प्रयोग रिपीट केले तर तेच निष्कर्ष मिळाले पाहिजेत. ही वैशिष्ट्ये छद्मविज्ञानात आढळत नाहीत. छद्मवैज्ञानिक त्यांचे सिद्धांत इतरांना तपासून देण्यास नाखूष असतात आणि यासाठी ते थातूरमातूर कारणे पुढे करून तपास होऊ देत नाहीत.

अजूनपर्यंत निरीक्षणात न आलेल्या एखाद्या गोष्टीच्या सिद्धांतातून निदान करता आले पाहिजे.

नवीन पुराव्याच्या प्रकाशात सिद्धांतात योग्य तो बदल करायला हवा. सिद्धांत हा डायनॅमिक, तात्पुरत्या स्वरुपाचा आणि दुरुस्त करण्याजोगा असावा. छद्मविज्ञान हे आपल्या सिद्धांतात नव्या संशोधनाच्या प्रकाशात बदल करण्यात तयार नसते.

२) विज्ञान म्हणून पुढं केलेला दावा हा पूर्वजांच्या शहाणपणावर आधारित आहे असा युक्तिवाद केला जातोय का?

पूर्वीच ऋषिमुनींनी सांगून ठेवलंय किंवा प्राचीन ग्रंथात उल्लेख आहे म्हणून विमानविद्या प्राचीन भारतीयांना माहीत होती, असा दावा कोणी करत असेल तर तो तथ्यहीन असतो. हे खरं विज्ञान नसतं. वस्तुत: अनेक नवे सिद्धांत हे अगदी अलिकडे मांडलेले असतात. ते जुन्या चुकीच्या गोष्टींच्या जागी आलेले असतात. कारण ज्ञानाच्या प्रकाशात जुन्या समजुती गळून पडतात. सर्वसाधारण सिद्धांत जितका नवा, तितका तो अधिक विश्वसनीय.

३) नवीन मांडलेला सिद्धांत पहिल्यांदा प्रसिद्धीस कसा दिला? वृत्तपत्र आणि इतर माध्यमांतून की नवीन विज्ञान प्रकाशित करणार्‍या नियतकालिकातून वा जर्नलमधून?

विज्ञान संशोधन हे इतरांनी पुनर्तपासणी करण्यासाठी प्रथम वैज्ञानिक संशोधनाचे मूल्यमापन करणार्‍या जर्नल अगर नियतकालिकातून प्रसिद्ध करावं लागतं. फ्लिशमन आणि पॉन्स या केमिस्टनी कोल्ड फ्यूजनचं आपलं संशोधन प्रथम मीडियाच्या कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं. जेव्हा त्यांचे प्रयोग पुन्हा केले गेले, तेव्हा निष्कर्ष उलट निघाले आणि त्यांचे संशोधन बोगस असल्याचं सिद्ध झालं.

४) तथाकथित संशोधनामध्ये विज्ञानात परिचित असणार्‍या संकल्पनांऐवजी गूढ संज्ञाचा वापर केला आहे का?

छद्मविज्ञानात ‘ऊर्जा’ हा शब्द अत्यंत अर्थहीन आणि निश्चित व्याख्या न दिलेला आढळतो. हा शब्द जर एखाद्या तथाकथित विज्ञानात वापरला असेल, तर तो चुकीच्या वाटेने नेणारा आहे, हे खुशाल समजावे. ऊर्जा क्षेत्रात ऋण ऊर्जा, ऑर्गान, ऑरा (तेजोवलय), साय ऊर्जा या संकल्पना निश्चित अर्थहीन असतात. म्हणून त्यांचा उपयोग केलेल्या विज्ञानापासून सावध राहा.

५) एखाद्या तथाकथित वैज्ञानिक शोधाचा दावा करणार्‍यांचा असा आरोप आहे का, की त्यांचे विज्ञान हे अधिकारी व्यक्तीकडून दाबून टाकलं जातंय?

छद्मविज्ञानाचे समर्थक, विज्ञानाच्या मुख्य प्रवाहातील प्रमुख व्यक्ती मुद्दामहून आमच्या संशोधनाकडे दुर्लक्ष करतात, अन्न आणि औषध प्रशासन आमच्या प्रॉडक्टला मंजुरी देत नाही आणि विज्ञानाची जर्नल्स आमचे संशोधन प्रसिद्ध करीत नाहीत, अशी केविलवाणी तक्रार करतात. मेडिकल असोसिएशन किंवा औषधनिर्माण नियंत्रण संस्था या आपल्या नव्या संशोधनाला बाजारात येऊ न देण्यासाठी कट करतात, असा खोटा आरोप छद्मविज्ञानवाले करीत असतात. खरं पाहता एखादं नवीन औषध खरंच परिणामकारक असेल, तर औषध कंपन्या त्यांचे उत्पादन वाढवून भरपूर नफा कमावू शकतात. त्यांनी विरोध करण्याचे काय कारण? ऑटोमोबाईल क्षेत्रात नवीन इंजिन तंत्रज्ञान दाबले जाते, असा आरोप करणार्‍या फसव्या वैज्ञानिकांना हे कळत नाही का की, असं तंत्रज्ञान जर खरंच उपयोगी असेल, तर ते नक्कीच स्वीकारून ऑटो उद्योग प्रगती साधेल.

६) दावा असाधारण असेल, तर तसाच असाधारण पुरावा दिला जातोय का?

असाधारण दाव्याला तसाच असाधारण पुरावा हवा. शून्यातून ऊर्जानिर्मिती करण्याचा दावा कोण करत असेल, तर त्यासाठी तसाच सामर्थ्यवान पुरावा देता आला पाहिजे. कारण असा दावा करणं म्हणजे निसर्गाचा नियम उलटापालटा करणं होय. म्हणून अशा दाव्याकडे पूर्ण संशयाने बघायला हवं आणि त्याच्या सिद्धतेसाठी तसाच समर्थ पुरावा देण्याचा आग्रह धरायला हवा.

७) दाव्यासाठी फसव्या जाहिरातीद्वारा ‘मार्केटिंग’च्या क्लृप्त्या केल्या जातात का?

            तसं पाहिलं तर खर्‍याची जाहिरात करण्याची गरज नाही. ते स्वसामर्थ्यावर लोकमान्य होते; पण फसवे दावे आणि फसवी उत्पादने खपविण्यासाठी नाना प्रकारच्या क्लृप्त्या वापरून ‘मार्केटिंग’ केलं जातं. त्या क्लृप्त्यांमध्ये मला गुण आला, असं सांगणार्‍या व्यक्तींचे फोटो आणि त्यांनी केलेली औषधांची भलावण, नटनट्यांच्या शिफारशी, खोटी सर्टिफिकेटस्, पदव्या इत्यादींचा समावेश होतो. दातावरच्या टी.व्ही.वरील जाहिराती पाहा. पांढरा अ‍ॅप्रन घातलेला तरुण डॉक्टर त्यांनी संबंधित टूथपेस्टमधील गुणांची कशी खात्री करून घेतली आहे, याचं रसभरीत वर्णन पडद्यावर दाखविलं जातं. त्यात तथ्य असतंच असं नाही. खरी चाचणी आणि ती इतरांनी अनुभवलेली, हाच सत्याचा निकष असतो.

८) दावा ओकॅम रेझरच्या चाचणीत पास होतो का?

            दाव्याच्या समर्थनासाठी पुढं केलेला पुरावा हा साधा सोपा आणि नैसर्गिक पद्धतीचा असावा. त्यासाठी अतिनैसर्गिक स्पष्टीकरणाची गरज नसावी. पण तसं असेल तर तो दावा छद्मवैज्ञानिक असतो. तसेच या दाव्यात ‘प्लॅसिबो’ परिणाम तपासला गेलाय काय आणि शरीराच्या नैसर्गिक प्रतिकाराचा वाटा आहे का, हेही लक्षात घ्यायला हवे. मनोसामर्थ्याचा दावा करणार्‍या व्यक्तीने केलेला चमत्कार जादूगार करून दाखवत असेल, तर तो दावा खोटा असला पाहिजे. तुमच्या नातेवाईकाला अपघात झाला आणि त्याचवेळी तुम्हाला स्वप्न पडले तर हे टेलिपथीने घडले असं समजायचं का? यासाठी संख्याशास्त्रीय नियम असं सांगतो की, लाखात एखाद्याचं असं स्वप्न खरं ठरतं, हे स्पष्टीकरण ‘टेलिपथी’पेक्षा अधिक स्वीकारार्ह धरायला हवं.

९) ज्या दाव्याच्या सिद्धतेसाठी एखादी संस्था किंवा व्यक्ती संशोधन करत असेल, त्यांनीच संबंधित दावा खरा ठरल्याचे समर्थन केले आहे काय?

विज्ञानात कोणत्याही गृहितकाची सुरुवात तटस्थपणे होत असते. काय सिद्ध करायचे किंवा नाकारायचे, असे पूर्वग्रहदूषित गृहीत विज्ञानाच्या संशोधनाच्या सुरुवातीला मानले जात नाही. याला शून्य गृहितक म्हणतात. उलट छद्मविज्ञान हे एखाद्या विशिष्ट सत्य समजल्या जाणार्‍या दाव्यापासून सुरुवात करते आणि मग त्याला अनुकूल पुरावे आणि सांगोवांगी कथांची पुष्टी दिली जाते. हे तथाकथित संशोधन प्रश्नांकित स्वरुपाचे असते. छद्मविज्ञानातील संशोधन आणि पुरावे नेहमीच एकांगी आणि अपुरे, अविश्वसनीय असण्याची संभवनीयता अधिक असते.

१०) एखाद्या दाव्याचे समर्थक, त्यांनी केलेल्या तपासातील सर्व वस्तुस्थिती समोर ठेवतात काय?

कोणत्याही चांगल्या संशोधनात संशोधनातील सर्व माहिती, पुरावे, निष्कर्ष प्रामाणिकपणे पुढं आणले जातात. अगदी विरुद्ध गेलेल्या पुराव्यांचाही त्यात समावेश असतो. पण याऐवजी एखाद्या दाव्यासाठी पुढं केलेल्या संशोधनाचा पूर्ण तपशील दिला जात नसेल, त्यांची संशोधनाची पद्धती इतरांना माहीत करून दिली जात नसेल आणि त्यांनी केलेले संशोधन पडताळण्यासाठी इतरांना मज्जाव होत असेल, तर असं संशोधन फसवं असण्याची दाट शक्यता असते.

११) दाव्यासाठी सादर केलेले पुरावे आणि माहितीची गुणवत्ता काय?

दाव्याचे समर्थन करणारे अनुकूल पुरावे पुढं रेटतात, तर प्रतिकूल दडपून टाकतात. पुरावे अनुकूल आहेत, असं भासविण्यासाठी निरीक्षणात पळवाटा ठेवतात. दाव्यासाठी जे सँपल निवडले जाते, ते लहान असेल तर शक्यता सिद्धांतानुसार ओळीने अनुकूल घटना घडू शकतात. समजा नाणे चारवेळा फेकले तर चारपैकी तीनवेळा छाप वर येऊ शकतो. म्हणून सँपल मोठ्यात मोठे हवे, तरच निष्कर्ष विश्वासार्ह धरता येतात. होमिओपॅथीवाले अशा छोट्या सँपलमधून त्यांची पॅथी खरी ठरल्याचे निष्कर्ष काढतात आणि कधीकधी उपचारानंतर गुण आला, तर तो उपचारामुळेच, असा दावा केला जातो. हे म्हणजे कोंबडा आरवला म्हणून सूर्य उगवला, अशा तर्‍हेचं लॉजिक झालं. वास्तविक उपचारांमुळेच गुण आला की, इतर कारणांनी याची ‘डबल ब्लाईंड’ चाचणीच घेणे आवश्यक असते.

१२) एखाद्या संशोधनाचा दावा करणार्‍या व्यक्तिला त्याबाबतची कायदेशीर गुणवत्ता आहे का?

विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन केल्याचा दावा करणार्‍या मान्यताप्राप्त नसलेल्या संस्था-संघटनेची संख्या जगभर मोठ्या प्रमाणात आढळते. अशा संस्था कोणालाही कोणत्याही प्रकारची पदवी मिळण्याची व्यवस्था करताना आढळतात. यातील काही संस्था, मूल्यमापन करणार्‍या बोगस संस्थांच्या आधारे स्वत:ला मान्यताप्राप्त करवून घेतात आणि शेवटी मान्यताप्राप्त विद्यापीठात सुद्धा अवैज्ञानिक पद्धतीचे संशोधन करणार्‍या ज्योतिष, कायरोप्रॅक्टिक, नॅचरोपॅथी अशा छद्मविज्ञान संशोधनाला परवानगी दिली जाते. आपल्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठात ज्योतिषाचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. म्हणून आपण सतर्क राहायला हवं. किती सतर्क, याचं उदाहरण द्यायचं झालं तर ‘थंडरवूड कॉलेज’ नावाच्या शिक्षण संस्थेची वेबसाईट पहा (Thunderwoodcollege.com) या संस्थेत कोणत्याही विषयातील पीएच. डी. एक मिनिटात मिळण्याची सोय आहे, ती सुद्धा कोणतीही फी न देता.

१३) सिद्ध स्वीकृत विज्ञान कसं चुकतंय, याबाबत बोंबाबोंब करणे, कडवा आवाज उठविणे, असं काही घडतंय काय?

जेव्हा खरं संशोधन प्रसिद्धीस दिलं जातं, तेव्हा त्याचे संशोधक योग्य पुरावे सादर करतात आणि सिद्धांत मांडतात. त्यांचा निष्कर्ष पुरेशा प्रायोगिक चाचण्यांवर दिला जातो. पण बोगस संशोधनाचे समर्थक मोठ्या प्रमाणात बोंबा मारतात. आपण खात असलेले सगळं अन्न कसं विषवत होत चाललं आहे, आपण पृथ्वीला कसे विध्वंसाकडे नेत आहोत, सरकार काही दुष्ट कृत्याकडे कसं डोळेझाक करीत आहे आणि उत्क्रांतीवाद स्वीकारून आपण कसे नरकाकडे ढकलले जात आहोत, अशा तर्‍हेच्या किंकाळ्या बोगस विज्ञानवादी मारत सुटतात. जेव्हा प्रचलित प्रतिष्ठित विज्ञान संशोधनाच्या विरोधात आवाज उठविला जातो, तेव्हा त्याचा उगम कोणत्या तरी धार्मिक किंवा तत्सम सांस्कृतिक विचारसरणीत किंवा तत्त्वज्ञानात असतो. तो वैज्ञानिक कसोट्यांवर आधारित नसतो. उत्क्रांतीवादाला विरोध बायबलप्रणीत निर्मिती तत्त्वज्ञानाची भलावण करण्यासाठी कसा केला जातो, हे लक्षात घेता वरील निष्कर्ष चुकीचा ठरणार नाही.

१४) एखादा दावा आम्ही पूर्णत: नैसर्गिक साधने आणि पद्धती वापरतो, असं म्हणत असेल तर त्यांचं विज्ञान स्वीकारायचं?

सर्व काही नैसर्गिक (Natural) म्हणण्यानं, ते पूर्ण सुरक्षित आणि आरोग्यकारक, असा दावा करणं चूक  आहे. हेमलॉक, पारा, शिसे, जेलीफिश न्यूरोटॅक्सिन, अ‍ॅसबेस्टॉस ही यादी आणखी लांबविता येईल. नाना प्रकारचे निसर्गात अस्तित्वात असणारे बॅक्टेरिया आणि विषाणू (प्लेग, देवी, कॉलरा यांचे जंतू) हे सुरक्षित समजायचे काय? याउलट नैसर्गिक पदार्थांवर प्रक्रिया करून बनविलेली औषधे आणि इतर प्रॉडक्टस् तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सुरक्षित केलेले असतात आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादनही घेता येतं.

१५) एखाद्या दाव्याच्या समर्थनार्थ राजकीय, धार्मिक किंवा सांस्कृतिक संघटनेचे पाठबळ घेतलेले आहे का?

एखाद्या दाव्याचे समर्थक विविध शक्तिमान धार्मिक, राजकीय संघटनांच्या विचारसरणीचे पाठबळ घेत असेल, तर असा दावा वैज्ञानिकदृष्ट्या विश्वसनीय नसण्याची शक्यता अधिक असते. निर्मितीवादाबाबत कोर्टात धाव घेऊन अमेरिकेतील काही राज्यांत उत्क्रांतीच्या बरोबरीने निर्मितीवादही शिकविला जावा, यासाठी प्रयत्न झालेत. सर्वसाधारणपणे एखादा सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या विश्वसनीय असेल, तर तो सहजस्फूर्तपणे शिक्षणक्रमात समाविष्ट केला जातो. सत्य विज्ञान हे प्रयोगशाळेतून बाहेर येते; कोर्टातून नव्हे, निषेध मोर्चाद्वारे नव्हेच नव्हे; ब्लॉग आणि मंदिर, मशीद चर्चद्वारे तर नव्हेच नव्हे. राजकीय किंवा सांस्कृतिक चळवळीतून एखाद्या प्रॉडक्टला मान्यता मिळवून त्याचा प्रसार करणं ही ते प्रॉडक्ट बोगस असल्याची खूण समजावी.

वरील कसोट्यांची गाळणी वापरून एखादं संशोधन किंवा दावा किंवा वस्तू ही रसाळ आहे की नुसता चोथा याबाबत योग्य निष्कर्ष काढता येईल. वरील कसोट्यांद्वारे उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे मिळविण्याची पद्धत शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवी. त्यातून ही मुलं मोठी झाल्यावर आपल्या अवतीभवती चौकसबुद्धीनं अज्ञानमूलक पसारा स्वीकारायला किंवा नाकारायला समर्थ बनतील. सत्य आणि कल्पित यातील भेद ओळखायला शिकणं, हे माणूस म्हणून आपलं प्रथम कर्तव्य आहे. याद्वारे तरुणपिढी भविष्यकाळात औषधविज्ञान, अंतरिक्ष संशोधन, माहिती तंत्रज्ञान ऊर्जानिर्मिती आदी क्षेत्रात भरीव योगदान करण्यास समर्थ होईल.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]