चक्रीवादळाचं विज्ञान आणि नियोजन

प्रभाकर नानावटी - 9803334895

काही वर्षांपूर्वी ‘वादलवारं सुटलं गो। वार्‍यानं तुफान उठलं गो।’ हे कोळीगीत बहुतेकांच्या तोंडी असायचे. गाणे गुणगणत असताना या गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे वादळाचा जोर वाढतच गेल्यास तो आपल्या जीवावर उठू शकेल, याची कल्पना गाण्याचा आस्वाद घेणार्‍यांना कदाचित नसेल. परंतु वादळाच्या – त्यातल्या त्यात चक्रीवादळाच्या – तडाख्यात घर-दारं, मुल-बाळं गमावलेल्यांना याची कल्पना नक्कीच येत असावी. वादळाच्या त्या अल्प काळात वार्‍याचा वेग वाढत असल्यामुळे वार्‍याच्या तडाख्यात घरदारं जमीनदोस्त होऊ शकतात, झाडं मुळासकट उन्मळून पडतात व या वादळाच्या जवळपास असलेला भूप्रदेश उद्ध्वस्त होतो. निसर्गाच्या अशा प्रकारच्या प्रकोपाकडे असहाय्यपणे बघत राहण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय त्यावेळी वादळग्रस्तांसमोर नसतो. परंतु वाढत्या प्रमाणातील हे वादळ; फक्त निसर्गप्रकोप म्हणून वादळग्रस्तांसाठी काहीतरी जुजबी मदत करून दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट नसून त्याचा संबंध आपली वैज्ञानिक साक्षरता व हवामान बदलासंबंधीचा दृष्टिकोन यांच्याशी आहे, हे सहजपणे लक्षात येत नाही.

हेन्री पिडिंग्टन (1797-1858)

आपल्या आयुष्यभरात घडणार्‍या कुठल्याही लहान-मोठ्या घटनांचा संबंध दैवीशक्तीशी जोडण्याच्या मानसिकतेमुळे वादळ हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो, याची कल्पनाच दोनशे वर्षांपूर्वी नव्हती. परंतु 1830च्या सुमारास कलकत्त्यात आलेल्या हेन्री पिडिंग्टन या ब्रिटीश नाविक अधिकार्‍याला वादळाबद्दल प्रचंड कुतूहल होते. 1839 मध्ये या प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे हाहाकार उडाला. त्यावेळी कर्नल विलियम रीड यांनी याविषयी लिहिलेले An Attempt to Develop a Law of Storms हे पुस्तक त्याच्या हाती पडले व ते वाचत असताना वादळाविषयी जास्त अभ्यास करण्यास त्याला प्रेरणा मिळाली. वादळांची उत्पत्ती, वादळाची दिशा, त्यावेळीचा वार्‍याचा वेग, त्याच्या तीव्रतेची पातळी, त्याची वारंवारता, वादळाची कालावधी इत्यादी सर्व तपशील गोळा करण्यासाठी तो प्रयत्न करू लागला. रीडचे उरलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी त्याने स्वतःच्या अंगावर घेतली. जहाजावरील खलाशांना प्रश्न विचारून माहितीची नोंदी ठेवू लागला. स्वतःच्या लंडन ते कलकत्ता या समुद्रमार्गावरील अनुभवांचासुद्धा त्याला याकामी उपयोग झाला.

एका प्रकारे जणू काही तो वादळाच्या प्रेमात पडला. त्या सुमारास कलकत्त्याजवळच्या सुंदरबन भागात पोर्ट कॅनिंग इन्व्हेस्टमेंट कंपनी ब्रिटीश अधिपत्याखालील देशातून मालवाहतूक करणार्‍या जहाजांसाठी कलकत्तासारखे एक आधुनिक बंदर बांधत होती. पिडिंग्टनला या बंदराच्या कामाविषयी उत्सुकता होती. पिडिंग्टन तो करत असलेल्या अभ्यासाच्या आधारे कित्येक वेळा धोक्याची सूचना कंपनीला देत असे. परंतु त्याच्या या सूचनांना त्या कंपनीने केराची टोपली दाखविली. बंदर पूर्ण क्षमतेनिशी काम करण्यापूर्वीच चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे जमीनदोस्त झाले. पिडिंग्टन मात्र नाउमेद न होता या बंगाल उपसागरातील वादळांचा अभ्यास तसाच सुरू ठेवला. त्या बांधकामाचे घोस्ट टाऊनच्या स्वरुपातील उरले-सुरले अंश पिडिंग्टनच्या भविष्यवाणीची साक्ष देत होते. त्यामुळे वादळाविषयी काही कायदे-नियम करता येतील का, याचा भारतातील ब्रिटीश प्रशासन विचार करू लागले.

हेन्री पिडिंग्टन अमेरिकेतील वादळाविषयी चौकशी करणार्‍या आयोगाच्या संपर्कात होता. भारतातील ब्रिटीश प्रशासनालासुद्धा वादळाविषयक कायदे-नियम करण्यासाठी वेगवेगळे खाते व लोकसुद्धा उपयोगी पडतील, असे त्यांनी लिहून कळविले होते. सूर्यास्त न होणार्‍या ब्रिटीश साम्राज्याच्या अस्तित्वालाच वादळामुळे प्रचंड धक्का बसत होता. या साम्राज्याचा व्यापार, व्यवहार सागरी मार्गानेच होत असत. वादळामुळे त्यांच्या जहाजांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत होते. जहाजांचा एकमेकांशी व बंदरांशी संपर्क तुटत होता. त्यांच्या अनेक राष्ट्रांना वेळोवेळी सागरी प्रवासात व समुद्रकिनार्‍यावर आपटणार्‍या वादळांचा सामना करावा लागत होता. हे नुकसान टाळण्यासाठी वादळाच्या संबंधात काही नियम करण्याची जबाबदारी वसाहती सरकारवर येऊन पडली.

सायक्लोनालॉजी

1840 ते 1858 म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंतच्या या कालखंडात त्याचे वादळाविषयीचे एकूण 18 शोधनिबंध जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या पत्रिकेत प्रसिद्ध झाले. जहाजावरील खलाशांसाठी त्याने एक मार्गदर्शक पुस्तक लिहिले. अशा प्रकारचे हँडबुक 15 व्या शतकापासून कारागिरांसाठी लिहिले जात होते व कारागिरांना ते फार उपयोगी पडत होते. पिडिंग्टनची ही मार्गदर्शिका थोडीशी अकादमीय स्वरुपाची असली तरी खलाशांकडे दुसरे काहीच नसल्यामुळे अडचणीच्या वेळी ते त्याचा वापर करत होते. त्याच्या अनेक आवृत्ती निघाल्या. त्याचे शोधनिबंध खलाशांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे लिहिलेले होते. अशा प्रकारे वादळ विज्ञानाची मुहूर्तमेढ हेन्री पिडिंग्टनने रोवली व ही वादळविज्ञान शाखा कुठल्याही बंदिस्त प्रयोगशाळेतून आलेली नव्हती. लोकांच्या सहभागातून उदयास आलेली ही विज्ञान शाखा सामान्यांसाठी होती. आजच्या भाषेत त्याला ङ्गलोकविज्ञानफ असे म्हणता येईल. विज्ञानाच्या व्याख्येत सहजपणे न बसणार्‍या प्रयोगातून ही शाखा त्याने विकसित केली. या त्याच्या ज्ञानाचा उपयोग करून घेणारे सामान्य अशिक्षित व जहाजावर शारीरिक श्रम करणारे होते. माहिती संग्रहासाठी तो समुद्र प्रयाणावरील खलाशांना हाताने लिहिलेले एक स्टॉर्म कार्ड देत होता. त्यात वादळासंबंधीच्या माहितीचा एक रिकामा तक्ता होता व खलाशांनी आपल्या शब्दांत ते भरून द्यायचे होते. या कार्डमधील माहितीवरून वादळाचा मार्ग शोधला जात होता; शिवाय या कार्डवरील इतर माहितीसुद्धा खलाशांच्या ज्ञानात भर घालणारी होती. या शाखेला त्याने सायक्लोनालॉजी (चक्रीवादळ विज्ञान) असे नामकरण केले. नंतरच्या काळात ही शाखा हवामानशास्त्राची उपशाखा झाली.

या कार्डाच्या नोंदीवरून वादळाच्या वेळच्या हवेच्या दिशेचा मागोवा घेणे शक्य झाले. उत्तर गोलार्धात चक्रीवादळातील हवा घड्याळाच्या काटेच्या विरुद्ध दिशेत, तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरते, हे लक्षात आले. हवा वर्तुळाकार न फिरता सापाच्या वेटोळ्याप्रमाणे ते वर-वर चढत जाते. ‘कुक्लो’ या ग्रीक शब्दावरून अशा प्रकारच्या वादळाचे त्याने ‘सायक्लोन’ असे नामकरण केले. मुळात त्याला स्टॉर्म (वादळ) पेक्षा सायक्लोन (चक्रीवादळ) पूर्णपणे वेगळे आहे, हे अधोरेखित करायचे होते. त्याकाळी कुठल्याही प्रकारचे वादळ असले, तरी ते अत्यंत भीतिदायक व विध्वंसकारी अशी प्रतिमा सामान्यांच्या मनात घर करून होती. पिडिंग्टन याने नैसर्गिक प्रकोपाचा योग्य प्रकारे अभ्यास केल्यास चक्रीवादळासारख्या प्रकोपाबद्दल पूर्वसूचना मिळू शकते, हे सिद्ध करून दाखविले.

चक्रीवादळाची निर्मिती

वातावरणविज्ञानात वादळ ही सर्वसाधारण संज्ञा हवामान, वारे, दाब वगैरेंमधील अस्थिरतेमुळे वातावरणीय क्षोभांना म्हणजे खळबळाटांना लावण्यात येते. वातावरणात कधी-कधी निर्माण होणार्‍या अस्थिरतेमुळे क्षोभांची निर्मिती होते. क्षोभांचे क्षेत्रीय प्रमाण निरनिराळे असते. क्षोभांतील आविष्कार क्षोभांच्या क्षेत्रीय प्रमाणावर अवलंबून असतात. चक्रीवादळ निर्मितीची एक जटिल प्रक्रिया आहे. चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी काही मूलभूत गोष्टी असाव्या लागतात. एक तर समुद्रात योग्य हवा, तिची दिशा आणि तापमान असणे आवश्यक असते. समुद्राच्या पृष्ठपाण्याचे तापमान; तसेच वातावरणातील ‘ट्रोपोस्फेर’चे (7 ते 12 किलोमीटरचा पट्टा) तापमान चक्रीवादळ निर्मितीत खूप मोठे योगदान देत असतात. बंगालच्या खाडीतील पृष्ठपाण्याचे तापमान सामान्यपणे 28 डिग्री सेल्सिअस इतके असते आणि हे तापमान चक्रीवादळ निर्मितीसाठी अगदी योग्य असते. या तापमानामुळे पाण्याच्या पृष्ठ आणि ‘ट्रोपोस्फेर’दरम्यान ऊर्जा अभिसरण सहजपणे घडून येते. जमीन व समुद्रातील तापमान विसंगतीमुळे काही ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. अशा पट्ट्यातील परिसरात आजूबाजूची हवा धाव घेते व तिथे जर योग्य तापमान असेल; जेणेकरून या हवेत मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ सामावत असेल, तर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता कैक पटीने वाढते.

अतिउंच वाढलेल्या ढगामुळे गडगडाटी वादळं निर्माण होतात. वातावरणात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे हवेस उभ्या दिशेत गती प्राप्त होते आणि हवा भूपृष्ठावरून वर जाते. त्यामुळे घनदाट ढग निर्माण होऊन त्यांची उंची वाढत जाते आणि त्यांचे रूपांतर गडगडाटी वादळात होते. विजा चमकणे, गडगडाट, जोरदार वृष्टी, गारांचा पाऊस इत्यादी आविष्कार या वादळात निर्माण होतात; तसेच वर गेलेली आणि थंड झालेली हवा तीव्र गतीने (जोराने) खाली येऊन अल्पावधीत एकाएकी जास्त प्रमाणात वाढून नंतरच्या कित्येक मिनिटांत क्रमशः कमी-कमी होत जाते. गडगडाटी वादळाचे क्षेत्र सुमारे 15 किलोमीटर ु 15 किलोमीटर एवढे असते आणि कालावधी अर्धा ते एक तास असतो; परंतु कधी-कधी एका वादळापासून जवळपास दुसरी वादळे निर्माण होऊन गडगडाटी वादळ दोन ते तीन तासांपर्यंत चालू राहते आणि एकंदर वादळी क्षेत्राची वाढ होते. उष्ण कटिबंधीय प्रदेशांत ही वादळे प्रामुख्याने दुपारी वा संध्याकाळी होतात. उष्ण कटिबंधीय चक्रीवादळात हवेला भोवर्‍यासारखी चक्राकार गती असते. हे वादळ म्हणजे एक कमी दाबाचे क्षेत्र असते. कमी दाबाची तीव्रता एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे पोचली म्हणजे कमी दाब क्षेत्राला चक्रीवादळ असे संबोधिले जाते. चक्रीवादळाची तीव्रता कमी दाब क्षेत्राशी संबंधित असलेल्या वार्‍याच्या गतीवरून ठरविली जाते. चक्रीवादळाचा उगम 26 ते 27 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या सागरी पृष्ठभागावरून येणार्‍या वार्‍यांमुळे होतो.

चक्रीवादळात वार्‍याचा वेग त्याने केलेल्या विध्वंसाचे मुख्य कारण ठरते. या वार्‍यांमध्ये असलेल्या बाष्पाच्या प्रमाणामुळे चक्रीवादळ जेथून प्रवास करते, तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे पूरही येऊ शकतो. चक्रीवादळ म्हणजे वातावरणात चक्राकार फिरणारा; तसेच पुढे सरकणारा एक स्तंभ असतो. त्यामुळे या स्तंभाच्या आसपास वातावरणातील हवेची जी गती असते, त्या गतीवर चक्रीवादळ सरकण्याची गती अवलंबून राहते. चक्रीवादळ अतितीव्र असते, तेव्हा त्यात मध्यभागी नेत्र असतो. येथे हवेचा दाब फारच कमी असतो. या भागात समुद्राची पातळी वर उचलली जाते. त्यामुळे जेव्हा अतितीव्र चक्रीवादळ समुद्रकिनार्‍यावर आदळते, तेव्हा समुद्रकिनार्‍यावर व आतील भागात पाण्याचा मोठा लोंढा पसरतो. त्यामुळे भयंकर प्राणहानी आणि मालमत्तेची हानी होते. ही लाट 3 ते 6 मीटर उंच असू शकते. अतितीव्र वार्‍यामुळे समुद्रकिनार्‍याजवळ भरती येते. अशी भरती 1 ते 3 मीटर उंच असू शकते. नेहमीची भरती आणि चक्रीवादळामुळे निर्माण झालेली भरती यांची वेळ जुळून आली, तर भरतीमुळे अतोनात नुकसान होते.

पिडिंग्टनने बंगालच्या उपसागरातील वादळाला सायक्लोन (चक्रीवादळ) म्हणून नाव दिले असले, तरी जगभरातील कुठल्या समुद्रात वादळाची उत्पत्ती झाली, त्यावरूनही ते वेगवेगळ्या नावाने ओळखले जात आहे. वादळ अटलांटिक महासागर व ईशान्य पॅसिफिक महासागरातील असल्यास त्याला ङ्गहरिकेनफ असे म्हटले जाते. परंतु त्याच प्रकारचे वादळ नैऋत्य पॅसिफिक महासागरात उत्पन्न झाल्यास त्याला ‘टायफून’ असे म्हटले जाते. जर वादळ दक्षिण पॅसिफिक महासागर व हिंदी महासागरातून येत असल्यास त्याला उष्ण कटिबंधीय (ट्रॉपिकल) सायक्लोन असे संबोधले जाते.

चक्रीवादळाच्या तीव्रतेचे मापन श्रेणींमध्ये (कॅटेगरी) करण्यात येते. चक्रीवादळातील वार्‍याच्या वेगावरून त्याला श्रेणी देण्यात येतात. हे वारे ताशी 90 किलोमीटर ते कमाल ताशी 280 किलोमीटर या वेगाने वाहतात. वार्‍याच्या वेगावरच त्याची विध्वंसक शक्ती अवलंबून असते. ग्रीनलँड, सैबेरिया व अंटार्क्टिकासारख्या ध्रुवीय प्रदेशातील वादळांना ‘पोलार सायक्लोन’ असे म्हटले जाते. या प्रदेशातील तापमान अत्यंत कमी असल्यामुळे येथील जनसंख्या अत्यंत कमी असते. त्यामुळे येथील वादळांची तीव्रता इतर ठिकाणच्या वादळांच्या तुलनेने कमी प्रमाणात जाणवते.

पूर्वसूचना

सागरावर असलेल्या कमी दाब क्षेत्रावर हवामान कार्यालयातील अधिकारी लक्ष ठेवतात. विशेष निरीक्षणांची गरज भासली, तर त्या भागातील जहाजांना व संबंधित किनार्‍यावरील वेधशाळांना विनंती करून दर तासाला हवामानविषयक निरीक्षणे मागवितात. ही निरीक्षणे नकाशावर मांडून त्यांचे विश्लेषण केले जाते. अशा प्रकारे दर तासाला केलेल्या विश्लेषणाच्या आधारे चक्रीवादळाच्या निर्मितीसंबंधी कळते. त्याशिवाय ढगाचे जागतिक छायाचित्रण कृत्रिम उपग्रहाकडून प्राप्त होते. त्यावरूनही चक्रीवादळ निर्माण झाल्याचे कळू शकते. चक्रीवादळाशी संबंधित ढगाचे वलयाकार पट्टे ढगाच्या छायाचित्रात दिसतात. ज्या सागरावर जहाजांचे दळणवळण फार कमी आहे, त्या सागरावर चक्रीवादळ निर्माण झाले, तर ढगाच्या जागतिक छायाचित्रावरूनच ते कळू शकते.

चक्रीवादळ व हवामान बदल

एके काळी वादळप्रवण किनारपट्टीवरील कित्येक किलोमीटरपर्यंत पसरलेल्या खारफुटी जमिनीवरील उंच – उंच झाडे वादळांची भीषणता कमी करत होती. ही उंच-उंच झाडे वादळाच्या वार्‍याचा वेग कमी करून व जीवितहानी-वित्तहानी कमी करण्यास मदत करत होती. परंतु माणसाच्या विकासाच्या लोभामुळे झाडांची कत्तल होऊ लागली. खारफुटी जमिनीवर बंगले व रेसॉर्ट्स उभी राहिली. वादळाच्या तडाख्यापासून किनारपट्टीचे रक्षण करणे अवघड व जिकिरीचे होऊ लागले.

त्याचप्रमाणे अलिकडील 20-30 वर्षांच्या काळात चक्रीवादळांची संख्या वाढत असल्याचे लक्षात आले आहे. त्याची कारणमीमांसा करणार्‍या तज्ज्ञांना कदाचित हवामानबदलामुळे हे होत असावे, अशी दाट शंका येत आहे. अटलांटिक महासागरावरील चक्रीवादळांच्या अभ्यासकांना त्यांच्या संख्यावाढीबरोबरच त्या वादळाच्या केंद्राभोवतालच्या 100 किलोमीटर परिसरात नेहमीपेक्षा 20 टक्के जास्त पाऊस पडत आहे व या पावसामुळे महापूर येत आहेत, हेही लक्षात आले आहे. महापुरामुळे मालमत्तेचेमोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. चक्रीवादळाच्या उत्पत्तीच्या प्रमुख कारणांत सागराच्या पृष्ठभागावरील तापमानातील बदल असून हवामानबदलाचा संपूर्ण रोख या वाढत्या तापमानावर आहे. धोकादायक रसायने, प्लास्टिक व खनिजतेलांच्या अतिवापरातून बाहेर पडणार्‍या कार्बन उत्सर्जनामुळे जगभरातील प्रदूषण पातळीत वाढ झाली आहे. या वाढीमुळे सागराची पातळी वाढत आहे व त्याचप्रमाणे जलवायूच्या तापमानातही वाढ होत आहे. यासाठीच्या गणितीय प्रारुपातून हवामानातील कार्बनचे प्रमाण वाढल्यामुळे वातावरणाचे संतुलन बिघडत आहे, हे स्पष्ट झाले आहे. वेळीच काही उपाय न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता तज्ज्ञांच्या अनेक अहवालातून व्यक्त होत आहे.

कोरोनाची लागण झाल्यास ज्या तीव्रतेने मृत्यूला झुंज द्यावी लागते, तेवढ्या तीव्रतेने हवामानबदलामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. हवामानबदलामुळे होणारे मृत्यू तेवढ्या लगबगीने होत नाहीत. त्यामुळे ‘कोविड-19’सारखे हवामानबदलामुळे एवढ्या व्यक्तींची चाचणी, एवढ्या व्यक्तींना लागण, एवढ्या व्यक्ती बर्‍या झाल्या, एवढे मृत्यू असे आकडे भरलेले तक्ते रोजच्या रोज जाहीर करण्याची गरज भासली नाही. हवामानबदल हे खरोखरच गंडांतर असल्यास जगभरातील महत्त्वाच्या शहरांतील प्रदूषण पातळी, ते कमी करण्यासाठी योजलेले उपाय, उपायांचे परिणाम इत्यादी गोष्टींचा तक्ता माध्यमातून प्रसारित झाला असता व जगभरातील समुदायांनी आपापले पूर्वीचे सर्व हेवेदावे विसरून प्रदूषणामुळे होणारा र्‍हास थांबविण्यासाठी प्रयत्न केले असते.

याच काळात काही उद्वेगजनक बातम्याही येऊन थडकल्या. पर्यावरणासंबंधीच्या कायद्यात सूट देत अनेक राष्ट्रे उद्योगव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न करू लागली. अमेरिकेतील ऊर्जा उद्योगाच्या दबावामुळे एखाद्या कंपनीने प्रदूषणासंबंधीच्या कायद्यांचा उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करणार नाही, अशी सूट तेथील प्रशासनाने जाहीर केली. चीनमधील अनेक उद्योग प्रदूषणासंबंधीच्या कायद्याला स्थगिती देण्यास राजकीय दबाव आणू लागले. प्लास्टिक वस्तूवर कोरोना विषाणू विसावत नाही, हा धागा पकडून ‘प्लास्टिक लॉबी’ यासंबंधात प्रचार करत जनमत त्यांच्याकडे वळविण्याचा प्रयत्न करू लागली.

सामान्य जनतेने राजकीय नेत्यांवर, सत्ताधार्‍यांवर दबाव आणून उपाययोजना करण्यास भाग पाडल्याशिवाय ही आपत्ती दूर होणार नाही. सामान्यांनीच पुढाकार घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हवामानबदलासंबंधी वेळीच जागे न झाल्यास कोरोना विषाणूप्रमाणे चक्रीवादळंसुद्धा जगावर मोठे संकट आणू शकतात, याची नोंद घेणे गरजेचे आहे.

चक्रीवादळांची तीव्रता

चक्रीवादळाच्या तीव्रतेच्या मापन श्रेणींमध्ये (कॅटेगरी) करण्यात येते. चक्रीवादळातील वार्‍यांच्या वेगावरून त्याला श्रेणी देण्यात येतात. हे वारे ताशी 90 किलोमीटर ते कमाल ताशी 280 किलोमीटर वेगाने वाहतात. वार्‍यांच्या वेगावरच त्यांची विध्वंसक शक्ती अवलंबून असते.

वातावरणीय स्थिती – वार्‍यांचा वेग (प्रतितास किलोमीटरमध्ये)

कमी दाबाचा पट्टा (लो प्रेशर) – 32 पेक्षा कमी

कमी दाब (डिप्रेशन) – 32 ते 50

खोल कमी दाबाचे क्षेत्र (डीप डिप्रेशन) – 50 ते 60

चक्रीवादळ (सायक्लोनिक स्टॉर्म) – 60 ते 90

तीव्र चक्रीवादळ (सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म) – 90 ते 120

अतितीव्र चक्रीवादळ (व्हेरी सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म) – 120 ते 220

सुपर सायक्लोन – 220 पेक्षा अधिक

चक्रीवादळांची नावे कशी ठरतात?

दरवेळी कुठलेही चक्रीवादळ तयार झाले, की त्याला दिले जाणारे नाव कुतूहल निर्माण करते. मग ते ‘पायलीन’ असो की ‘फयान’, ‘हुदहुद’ असो की ‘नीलोफर’ ही नावे कशी दिली जातात? त्यामागे कोणती प्रक्रिया असते, हे जाणून घेण्याची जिज्ञासा सगळ्यांनाच असते. चक्रीवादळांना हवामान खात्याच्या सांकेतिक आणि शास्त्रीय नावांनी ओळखण्याऐवजी त्यांना त्या-त्या देशातील वैशिष्ट्यपूर्ण नावे देण्याचा प्रघात 1950च्या दरम्यान सुरू झाला. आधी गमतीने महिलांची नावे या चक्रीवादळांना दिली जात. अमेरिकेत चक्रीवादळाला आजही महिलांचेच नाव दिले जाते. भारतीय उपखंडात थडकणार्‍या चक्रीवादळासाठी रिजनल स्पेशलाइज्ड मेटिअरोलॉजिकल सेंटर, दिल्ली ही नावे ठरवते.

चक्रीवादळाची नावे ठरवताना पुढील निकष पाळले जातात.

नावे छोटी आणि लक्षवेधी असावीत. नाव सामाजिक-धार्मिक तेढ निर्माण करणारे नसावे. उपखंडातील त्या-त्या देशाची ओळख किंवा वैशिष्ट्यपूर्ण बाब त्यात असावी.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स, सकाळ

अरबी समुद्रातही चक्रीवादळं!

पूर्वेकडील बंगालचा उपसागर आणि पश्चिमेकडील अरबी समुद्र हे भारतीय महासागराचे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. पण या दोन्ही सागरांत काही मूलभूत फरक आहेत व त्यामुळे या महासागरात होणार्‍या नैसर्गिक घडामोडी एकमेकांपेक्षा फारच भिन्न असतात. उत्सुकतेपोटी असा प्रश्न उपस्थित झाला होता की, अरबी समुद्रात अशा प्रकारची वादळं निर्माण होत नाहीत किंवा फारच कमी प्रमाणात निर्माण होतात. हे असे का घडते?

जागतिक तापमानात वाढ झाल्याकारणाने पूर्ण ग्रहावर अनेकानेक बदल घडत आहेत. त्याला अरबी समुद्र कसा अपवाद राहणार? या समुद्रावर वाहणारे वारे बंगालच्या खाडीपेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यामुळेच अरबी समुद्रात वादळं निर्माण होत नाहीत. पण गेल्या काही दशकांत वाढलेल्या प्रदूषणामुळे इथे अनेक प्रकारचे रासायनिक धूळकण वातावरणात मिसळले गेले आहेत. या क्षेत्रात अनेक प्रकारचे ङ्गएरोसोलफ निर्माण झाले आहेत. हे धूळकण काळ्या, तपकिरी रंगांच्या ढगांच्या रुपात आपल्याला अरबी समुद्रात विहरताना दिसतात. त्याचबरोबर प्रदूषणामुळे साचलेल्या धूळकणांचा प्रतिकूल परिणाम इथल्या हवेच्या वेगावर होतो. वार्‍याचा वेग कमी झाल्याने अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता वाढलेली आहे. काही हवामान संशोधकांच्या मते या ढगांमुळे इथले हवामानसुद्धा बदलत चालले आहे.

तापमानवाढीमुळे अनेक ठिकाणी पर्यावरणीय बदल घडत आहेत. काही दशकांपूर्वी अरबी समुद्रात अपवादानेच वादळ निर्माण व्हायचे. पण 1995 नंतर एका संशोधनानुसार चक्रीवादळांच्या संख्येत पाचपट वाढ झालेली आहे. त्यांची तीव्रतासुद्धा वाढलेली आहे. अशीच वाढ बंगालच्या खाडीतसुद्धा दिसून आलेली आहे. या खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या वाढत्या पृष्ठीय तापमानामुळे भारतीय उपखंडातसुद्धा अनेक प्रतिकूल बदल घडत आहेत. येत्या काही वर्षांत अरबी व बंगालच्या खाडीत चक्रीवादळांचे प्रमाण वाढण्याचे संकेत जाणकारांना मिळत आहेत.

– प्रवीण गवळी (‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिक’ येथे संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]