माझी भूमिका ‘गांधी विचारांचा इतिहासकार’ अशी आहे..! – तुषार गांधी

राजीव देशपांडे -

अलीकडील काळात महात्मा गांधींची मानहानी करणारी खोटी आणि बेताल वक्तव्ये करणे, त्यांच्या खुनाचे उदात्तीकरण करणे, स्वातंत्र्य चळवळीला कमी लेखण्यासाठी स्वातंत्र्य भीक म्हणून देण्यात आले, असे म्हणून हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या असीम त्यागाचा अपमान करणे, यांसारख्या गोष्टी मोठ्या अभिमानाने वारंवार केल्या जात आहेत. अशा घटना पूर्वी घडत नव्हत्या असे नव्हे. अगदी महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यचळवळीतील उदयापासून अशा हल्ल्यांना त्यांना तोंड द्यावे लागले आहे. पण अलीकडे त्याला एक योजनाबद्ध स्वरूप आले आहे. या खोटेपणाची अतिशय अभ्यासपूर्वक, समर्थपणे भांडाफोड करण्याचे काम लेखक, मानवी हक कार्यकर्ता आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी करत आहेत. या त्यांच्या कामाचा इतका धसका सरकारी यंत्रणांनी घेतला की, या वर्षी ९ ऑगस्ट २०२३ ला सकाळी ‘भारत छोडो आंदोलना’च्या स्मृतिदिनानिमित्त होणार्‍या रॅलीसाठी दरवर्षीप्रमाणे तुषार गांधी ऑगस्ट क्रांती मैदानाकडे जाण्यासाठी घरातून निघाले, पण त्यांच्या रॅलीतील सहभागाने कायदा व सुव्यवस्था भंग पावेल असा दावा करत मुंबई पोलिसांनी त्यांना अडकवून ठेवले व अधिकृत सरकारी कार्यक्रम झाल्यावर त्यांना मुक्त केले. अशा तुषार गांधींच्या कामाचा व विचारांचा परिचय ‘अनिवा’च्या वाचकांना व्हावा या हेतूने आम्ही ही मुलाखत या अंकात देत आहोत. महात्मा गांधींच्या तिसर्‍या पिढीतील तुषार गांधी हे आजच्या संदर्भात गांधीजींना विचारवंत, राष्ट्रपिता, महात्मा आणि आपले पणजोबा या वेगवेगळ्या भूमिकांमधून कसे समजून घेतात याचे दर्शनही या मुलाखतीच्या निमित्ताने घडेल

थोडेसे तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावत आपण या मुलाखतीची सुरुवात करू. तुमचा जन्म महात्मा गांधींच्या कुटुंबात झाला. आपण एका महात्म्याचे पणतू आहोत याची जाणीव तुम्हाला कशी झाली? कोणी करून दिली? एखाद्या प्रसंगातून झाली की स्वाभाविकपणेच तुम्हाला ते जाणवले?

तुषार गांधी असा काही खास प्रसंग घडल्याचे मला आठवत नाही. तसेच माझ्या आईवडिलांनी, आजीने किंवा कुटुंबातील कोणा व्यक्तीने जाणीवपूर्वक पुढे बसवून तू एका महात्म्याचा पणतू आहेस, वारसदार आहेस असे काही सांगितल्याचे किंवा त्यांच्या काही खास वर्तणुकीतून तशी जाणीव झाल्याचे मला आठवत नाही. पण समज येण्याच्या वयात जसे आपण मुलगा आहोत, भारतीय आहोत अशी जाणीव स्वाभाविकपणे होत असते तसेच मी गांधी परिवारातील आहे अशी स्वाभाविक जाणीव मला झाली असावी. त्याचप्रमाणे साठचे दशक हे अनेक सामाजिक, राजकीय घडामोडींचे होते. त्यामुळे त्या वातावरणात मी वाढत असताना ही जाणीव स्वाभाविकपणेच झाली असावी असे वाटते. अनेक सार्वजनिक ठिकाणी आम्हाला विशेष प्रेम मिळे. यातूनच आपण एका थोर माणसाचे पणतू आहोत यांची जाण येऊ लागली होती. काही विशेष प्रसंगी उदाहरणार्थ २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्टला आम्हाला राजभवनात झेंडावंदनाचे आमंत्रण असायचे. तेथे मी गेल्याचे मला आठवते. १९६९ मध्ये बापूंची जन्मशताब्दी होती. मी तेव्हा नऊ वर्षांचा होतो. त्या वर्षभराच्या भारतभर होणार्‍या अधिकृत कार्यक्रमांना आमच्या परिवाराला आग्रहाने आणि आदराने बोलावले जायचे. अशा कार्यक्रमांना गेल्याचे मला आठवते. पंडित नेहरूंना माझ्या वडिलांबद्दल आत्मीयता, स्नेह होता. त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले होते, तू जेव्हा सहकुटुंब दिल्लीला येशील तेव्हा मला भेटायचेच किंवा मी मुंबईला येईन तेव्हाही माझी भेट घ्यायची आणि ते आमच्यासाठी एखादा तास काढायचेच. आम्ही राजभवनात जायचो. मी त्यांच्या मांडीवर खेळल्याचे व त्यांनी मला खेळणी भेट दिल्याचे माझ्या आईवडिलांनी मला सांगितले आहे. मी खूपच लहान होतो त्यामुळे मला या गोष्टी आठवणे शक्यच नाही.

प्रत्येक घरातील मुलांची वाढ ते कुटुंब जी मूल्ये मानते त्या मूल्यांवर आधारित होत असते. तुमच्या कुटुंबात तुम्हा मुलांना वाढवताना तुमच्या आईवडिलांचा कोणत्या मूल्यांवर भर होता?

इतर सर्वसामान्य कुटुंबात मूल जसे सहजपणे वाढते तसेच मला वाढवले गेले. माझ्या बाबतीत काही स्पेशल घडले असे काही मला आठवत नाही. पण माझ्या वडिलांच्या असो अगर आईच्या कुटुंबातील नातेवाईक, मित्र यांच्यात खादीधारी मंडळींचा जास्त राबता असे. त्यामुळे आपण कोणत्या परिवाराशी निगडित आहोत याची जाणीव मात्र लहानपणापासून पकी होती. त्यात माझे प्राथमिक शिक्षण मुंबईच्या खारमधील गुजराती माध्यमाच्या आदर्श बाल मंदिर विद्यालयात झाले आणि पुढे चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्याच संस्थेच्या ‘आदर्श विनय मंदिर’ येथे झाले. त्या शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक हे स्वातंत्र्यसैनिक होते. ते दोघेही प्रखर गांधीवादी होते. त्यामुळे शाळेतील वातावरणही गांधीवादीच असल्यामुळे गांधीवादी संस्कार नैसर्गिकपणेच येत राहिले. चौथी ते दहावीपर्यंत आम्ही दररोज सकाळच्या प्रार्थनासभेनंतर तासभर चरख्यावर सूत कातायचो. २ ऑक्टोबरला सुट्टी असली तरी शाळेत आम्ही सूतकताईसाठी जायचो. पुन्हा हे सारे केवळ परंपरा म्हणून किंवा कर्मकांड म्हणून केले जायचे असे नाही तर नैसर्गिकपणेच ते घडत असे. त्यामुळे गांधी विचारांचे हे सर्व संस्कार माझ्या परिवारातील लोकांच्या स्वाभाविक वर्तणुकीतून आणि शाळेतील वातावरणातून माझ्यावर नैसर्गिकपणे घडत गेले.

शालेय जीवनातून बाहेर पडल्यानंतर तुमची तरुणपणातील जी पुढील वाटचाल झाली त्यावर गांधीजी तुमचे पणजोबा असण्याचा तसेच गांधीजींच्या विचारवंत, राष्ट्रपिता आणि महात्मा असण्याचा कसा प्रभाव पडला?

प्रभाव तर पडलाच. माझ्या बाबतीत असे घडले, जेव्हा जेव्हा शाळेत इतिहासाच्या अभ्यासक्रमात भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास शिकविला जायचा तेव्हा मी वर्गात एकटाच होतो, ज्याच्या पणजोबांचे नाव इतिहासाच्या पाठपुस्तकात असायचे. त्यामुळे ते नाव आले की सर्व जण माझ्याकडे वळून वळून बघायचे. हीच गोष्ट माझ्या मुलाबाबतही घडली. हे सगळे घडत असताना असे जाणवू लागले की बापू आपले पणजोबा असले, तरी पण ते इतरांच्या दृष्टीने राष्ट्रपुरुष आहेत. त्यामुळे एखादी चूक केल्यावर काय होते हेही मी अनुभवले. शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती आणि मी भाषण करताना चुकून स्वातंत्र्यदिनाची तारीख १५ ऑगस्ट १९४८ अशी म्हणून गेलो. माझी चूक माझ्या लगेच लक्षात आली. मी ती लगेच दुरुस्तही केली. पण आमचे शिक्षक, मुख्याध्यापक रागावले. त्यांनी मला शाळेतून काढून टाकले. घरी जायला सांगितले. दुसर्‍या दिवशी मी शाळेत का जात नाही म्हणून वडिलांनी चौकशी केली. मी झालेली चूक सांगितली. वडील मला घेऊन शाळेत आले. माझ्या त्या चुकीबद्दल माझ्या वडिलांसमोर मुख्याध्यापक अक्षरश: रडले. त्यांच्या मते, माझी चूक अक्षम्य होती. मुलाने झालेली चूक कबूल केली आहे, मग इतका मोठा इश्यू कशाला करायचा असे वडिलांना वाटत होते. पण त्या सगळ्या प्रकारानंतर माझ्या मात्र लक्षात आले, बाकीची मुले चूक करू शकतात, ती सुधारू शकतात, पण काही बाबतीत आपली चूक अक्षम्य आहे. आपण खूप काळजी घ्यायला हवी. कारण माझ्या चुकीमुळे माझ्या मुख्याध्यापकांना जे दु:ख झाले होते ते पाहून मला वाटले, आपल्याकडून लोकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. माझा स्वभाव घटनांना थोडा विनोदाचा, उपहासाचा बाज देणारा आहे. त्यामुळे मला ज्या गोष्टी हास्यास्पद वाटतात त्यावर मी जरा जास्तच आवेशाने तुटून पडतो. जेव्हा ट्विटर नवीन नवीन आले होते तेव्हा आपण थोडे विशिष्ट आहोत, आपल्याकडून लोकांच्या काही अपेक्षा आहेत हे विसरून काही घटनांबाबत मी केलेल्या ट्विट्सवरून खूपच गदारोळ उठला. आता मागे वळून बघताना ती ट्विट्स मला खरोखरच बेजबाबदार वाटतात. त्याचा फायदा आजही घेतला जातो. जेव्हा मी सरकारला अडचणीत आणणारी ट्विट्स करतो तेव्हा भाजपची ट्रोल आर्मी माझी ती मागची ट्विट्स उकरून काढते व मी किती गिरा हुआ आदमी आहे हे दाखवत असते. मला बरेच जण सांगतात, तू ती ट्विट्स डिलीट कर. पण मी तसे करत नाही. कारण मी जर चूक केली असेल तर त्या चुकीची शिक्षा मी भोगायलाच पाहिजे. बाकी इतर कोणाच्या बाबतीत हे होईलच असे नाही, पण माझ्या विशिष्ट असण्यामुळे हे घडते. पण बापूंचा पणतू असल्याने लोकांचे खूप प्रेम, स्नेह देखील मला मिळतो. मी न कमावलेला आदर मला लोकांकडून मिळतो.

या अशा प्रसंगांतून पुढे जात गांधींची विचारसृष्टी समजून घेण्याची तुमची प्रक्रिया कशी होती?

अगदी सुरुवातीला आपण गांधी समजावून घेतले पाहिजेत असा विचार माझ्या मनात कधीच आला नव्हता. मी गांधींचा पणतू आहे म्हणजे मला गांधींबद्दल सर्वच माहिती असणार असा माझ्या बाबतीत लोकांचा समज होता. माझे आई-वडील गांधीविचारांचा प्रचार-प्रसार करतच होते. त्यामुळे जेवढे माझ्या वडिलांकडून, आईकडून बापूंबद्दल मला समजले आहे तेवढे पुरेसे आहे, अशी माझी समजूत होती. माझ्या परिवाराकडूनही कधी जबाबदारी तुझी आहे असे सांगितले नव्हते. त्यामुळे मला कधीच असे वाटले नाही की आपण गांधींचा अभ्यास केला पाहिजे. मी आपला माझ्या खासगी आयुष्यातच मग्न होतो. पण माझे आई-वडील अमेरिकेला गेले. त्यामुळे लोकांना असे वाटू लागले की मीही अमेरिकेला गेलो आहे. सगळे गांधी कुटुंबच अमेरिकेला गेले आहे. पण मी भारतातच राहिलो असल्याचे लोकांना कळले. मग माझ्यावर २ ऑक्टोबर आणि ३० जानेवारीच्या कार्यक्रमांची जबाबदारी यायला लागली आणि मीही ती स्वीकारू लागलो. त्या वेळेस मला अशी घमेंड होती की, गांधींविषयी मला सगळी माहिती आहे. लोकही मी गांधींचा पणतू असल्याने मी जे बोलतो ते खरे मानून चालायचे, त्या वेळीही मी गांधींचा सखोल अभ्यास केला होता असे नव्हते. पण एकदा कर्नाटकात एका छोट्याशा गावी होणार्‍या साहित्य संमेलनाला मला बोलावले गेले. तेथे ‘हिंद स्वराज्य’ या गांधींच्या पुस्तकावर प्रश्नोत्तरे होणार होती. त्यासाठी मला बोलावले होते. मी हिंद स्वराज्य वाचलेलेही नव्हते. घरात त्या पुस्तकावर जी चर्चा व्हायची तेवढाच माझा त्याबद्दल अभ्यास होता. तरीही मी तेथे गेलो. पण तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी मात्र हिंद स्वराज्य सखोलपणे अभ्यासले होते आणि त्यावर आधारित अगदी पान नंबर सकट तपशील देत ते मला प्रश्न विचारत होते आणि मी आपला कसाबसा वेळ निभावून नेत होतो. तेव्हा मला जाणीव झाली हे बरोबर नाही, आपण बापूंवर अन्याय करतोय. तेथे माझी ‘आपण गांधींचे पणतू आहोत’, ही घमेंड गळून पडली आणि मी गांधीना अभ्यासू लागलो. एक व्यक्ती म्हणून पहिल्यांदा गांधीना समजून घेऊ लागलो. तेथूनच माझा गांधींविषयीचा खरा प्रवास सुरू झाला. पण आज मात्र गांधीविचारांचा प्रचार आणि प्रसार हे मी माझ्या आयुष्याचे ध्येय बनवले आहे.

या प्रवासात संपूर्ण गांधीविचार समजून घेतल्यानंतर आजच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीत या विचारांशी तुमचे काय नाते आहे?

ते क्रमश: होत गेलेले आहे. ९० पासून अर्थव्यवस्थेचे जे उदारीकरण आणि जागतिकीकरण व्हायला लागले तेव्हा बापूंचा जो स्वदेशी आणि ग्रामोद्धाराचा मंत्र होता त्याची लाक्षणिकता काय आहे असे लोक विचारू लागले. अडवाणींची रथयात्रा, त्यातून निर्माण झालेल्या द्वेषाच्या भावनेतून बाबरी मशीद उद्ध्वस्त करणे या पार्श्वभूमीवर बापूंची सहिष्णुता आणि सर्वांना एकत्रित राखण्याची वृत्ती, बापू आणि धर्मनिरपेक्षता यावरील लिखाणाची लोक माझ्याकडून अपेक्षा करू लागले. वाढता गांधीद्वेष, त्याला मिळणारी अधिकृतता, तसेच आज सोशल मीडियावरून गांधींवर घेण्यात येत असलेले आक्षेप, त्यांची करण्यात येत असलेली बदनामी या सर्वाला लेखाद्वारे, भाषणाद्वारे उत्तरे देण्यासाठी, विरोध करण्यासाठी मला मैदानात उतरावे लागले. या साठी लागणारा सखोल अभ्यास माझा पूर्वीच झाल्यामुळे या प्रश्नांची मूलभूत उत्तरे मी देऊ लागलो. या अभ्यासाच्या आधारेच आज मी गांधीविचारांच्या इतिहासकाराची भूमिका पार पाडत आहे. किंबहुना, आज माझी तीच ओळख झाली आहे.

गांधीजींची हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेबाबत एक वेगळी भूमिका आहे. असाही विचारप्रवाह आहे की, दलित प्रश्नांकडे गांधीजींनी सहानुभूतीच्या, दयाशील दृष्टिकोनातून बघितले. त्यांच्या जातीव्यवस्थेबाबतच्या भूमिकेबाबत तुमचे मत काय आहे?

गांधीजींच्या बाबत हे लक्षात घेतले पाहिजे की गांधीजींनी आपल्या सार्वजनिक जीवनात कोणतीही गोष्ट खासगी ठेवलेली नाही. त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासूनचे त्यांचे संपूर्ण लेखन उपलब्ध आहे आणि ते अतिशय परखड आहे, कोणत्याही विषयावर त्यांनी हातचे राखून लिहिलेले नाही. त्यांच्या विचारांचा प्रवास जर आपण बघितला तर सुरुवातीच्या काळात त्यांचे लेखन वर्णव्यवस्थेचे भलामण करणारे आहे. पण तेव्हाही त्यांनी वर्णव्यवस्थेतील उच्च-नीचता मला मान्य नाही, हे सांगितले आहे. नंतर जसजसे त्यांचे अवलोकन वाढत गेले, समज वाढत गेली, वर्णव्यवस्थेमुळे झालेल्या अन्यायाची त्यांना जाणीव होत गेली तसतशी वर्णव्यवस्था म्हणजे मानवतेवरचा काळिमा आहे, सर्वांत मोठा गुन्हा किंवा पाप आहे इथपर्यंत त्यांच्या विचारात बदल झालेला आहे. सुरुवातीच्या काळात वर्णव्यवस्थेची भलामण करतानाही अस्पृश्यतेचे समर्थन त्यांनी कुठेही केले नव्हते. उलट अस्पृश्यता नष्ट करण्याचीच त्यांची भूमिका होती. याबाबत दक्षिण आफ्रिकेत असताना ते राजकोटला आले होते तेव्हा मुंबई इलाख्यात प्लेगची साथ पसरत होती. ती साथ राजकोटमध्ये पसरू नये म्हणून राजकोटचा जो सफाई विभाग होता त्यांना घरोघरी जाऊन संडास, बाथरूम स्वच्छतेबाबतचा अहवाल बनवायचा होता. राजकोटच्या सवर्ण पुढार्‍यांनी आपल्या भागात घरोघरी जाऊन तेथील स्वच्छतेचा अहवाल दिला. पण कोणीही अस्पृश्यांच्या वस्तीत जाण्यास तयार नव्हते. बापू त्या कमिटीत होते. ते स्वत: वस्तीत गेले, घरोघरी जाऊन त्यांनी अहवाल बनवला. बापूंच्या राजकोटच्या घरात अस्पृश्यतेची रूढी पाळली जायची. त्यामुळे अस्पृश्य वस्तीत जाऊन आलेल्या बापूंना अकरा बादल्या अंगावर घेऊन शुद्ध व्हावे लागायचे. बापू तेही करायचे. त्यांची भूमिका होती की तुम्हाला वाटते, मी अशुद्ध आहे आणि यामुळे मी शुद्ध होतो तर मी तेही करतो, पण मी काम बंद करणार नाही. दक्षिण आफ्रिकेत असताना चेंबर पॉट साफ करण्यावरुन ‘बां’बरोबर त्यांचा वाद झाला. एक सहायक जो दलित ख्रिश्चन होता, तो आपला चेंबर पॉट स्वच्छ करत नसे. बा किंवा बापू तो स्वच्छ करत असत. एक दिवस चेंबर पॉट स्वच्छ करायला बांनी नकार दिला. बापूंनी कारण विचारल्यावर बा वैतागल्या, त्यांनी रागाने चेंबर पॉट उचलला. पण बापूंनी त्यांना म्हटले, “रागात हे काम नाही करायचे ते राजीखुशीनेच व्हायला हवे.” त्यावर बांनी तो चेंबर पॉट पुन्हा तेथेच ठेवत तो स्वच्छ करण्यास नकार दिला. तेव्हा “तू जर हे करणार नसशील तर माझ्या घरात तुला स्थान नाही”, असे म्हणत बापूंनी त्यांचा हात धरून त्यांना दरवाजाबाहेर काढले व दरवाजा लावून घेतला. पण त्यांना आपण असे कसे वागू शकतो त्याचा पश्चात्तापही झाला. त्यानंतर त्या दोघांनी एकदुसर्‍याची माफीही मागितली. आपण हेही मान्य केले पाहिजे की जेव्हा ते वर्णव्यवस्थेची भलामण करत होते तेव्हा ते स्वत:च्या व्यक्तिगत आयुष्यात या अन्याय्य रूढीविरोधात विद्रोहही करत होते. पण आज अशी परंपरा होऊन गेली आहे की गांधीजींवर टीका करण्यापूर्वी त्यांना समग्रतेने समजून न घेता केवळ शब्द पकडून अनुमान बांधायचे आणि टीका करायची. असे करण्यामुळे ज्यांना त्यांची बदनामीच करायची आहे, मानहानी करायची आहे, द्वेष वाढवायचा आहे त्यांना ते सोपे पडते. त्यामुळे गांधींवर टीका करण्यापूर्वी त्यांना समग्रतेने समजून घेतले पाहिजे.

स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही अगदी खून केल्यानंतरसुद्धा गांधीजींबद्दल आजही पराकोटीचा द्वेष पसरविणे चालूच आहे. यामागे केवळ मुस्लीमधार्जिणेपणाचे आरोप, पाकिस्तानला दिलेले ५५ कोटी वगैरे कारणे आहेत की त्या पलीकडील काही कारणे असावीत असे तुम्हाला वाटते?

चाळीसच्या दशकातच गांधींबद्दलचा द्वेष उफाळून आला हे म्हणणे बरोबर नाही. १९३४ पासूनच गांधींच्या खुनाचे सहा प्रयत्न केले गेले आहेत. ज्याची नोंद आहे. यातील चार प्रयत्न झाले तेव्हा पाकिस्तानचा प्रश्नही उद्भवला नव्हता किंवा ५५ कोटींचाही विषय नव्हता. त्यामुळे मुस्लीमधार्जिणेपणा, पाकिस्तानला दिलेले ५५ कोटी वगैरे आक्षेप हे फक्त बापूंच्या खुनाला मान्यता मिळवण्यासाठी शोधून काढलेले विषय आहेत; हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. माझे स्पष्ट मत आहे, गांधीजींनी चालू केलेल्या हरिजन उद्धाराच्या कार्यामुळे, उच्चवर्णीयांच्या सत्तेला मिळालेल्या आव्हानामुळे उच्चवर्णीयांनी गांधीजींना लक्ष्य केले व त्यातून हा गांधीद्वेष पसरलेला आहे. महाराष्ट्रात हा गांधीद्वेष प्रखरपणे दिसायला लागला होता, कारण ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील ब्राह्मणी वर्चस्वाखालील पेशवाई संपुष्टात आणत आपली सत्ता देशभरात कायम केली होती. ब्राह्मणांना असे वाटत होते की ब्रिटिश जातील तेव्हा आपल्याकडून हिरावून घेतलेली सत्ता पुन्हा आपल्याकडेच सोपवून जातील व आपण पूर्वीप्रमाणेच जातीच्या आधारावर पुन्हा राज्य करू. पण त्या कल्पनेला तडा दिला बापूंनी. बापूंच्या पूर्वी काँग्रेस ब्राह्मणी वर्चस्वाखालीच होती. पण तेही वर्चस्व बापूंमुळे संपुष्टात आले. सावरकरांनीही गांधीजींना पर्याय देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे नेतृत्वही त्या वेळी देशव्यापी होऊ शकले नाही. देशातील अगदी छोट्या गटानेच ते मान्य केले. ब्राह्मणांचा नेता आणि त्यातही चित्पावन ब्राह्मणांचा नेता अशीच त्यांची ओळख राहिली. मला जे स्वाभाविक नेतृत्व मिळायला पाहिजे होते ते गांधीजींमुळे मला मिळाले नाही याचा त्यांच्या मनात गांधीजींबद्दल राग होता. त्यामुळेच गांधीजींच्या खुनाच्या प्रयत्नात आणि नंतर खुनात जे सावरकरवादी हिंदू होते त्यांचा प्रमुख सहभाग असलेला आपल्याला दिसतो. गोडसेने आपल्या कृत्याच्या समर्थनार्थ जे निवेदन कोर्टात केलेले आहे ते जर काळजीपूर्वक वाचले तर त्या पूर्वी त्यांनी कधीच असे भावनात्मक लिखाण केले नव्हते हे आपल्या लक्षात येईल. ‘अग्रणी’ किंवा ‘हिंदू राष्ट्र’मधील त्यांचे अग्रलेख फारच भडकाऊ भाषेत असत. पण हे निवेदन अत्यंत तज्ज्ञ भाषेत लिहिले गेलेले होते. त्या काळात देशातील जनतेत जी अस्वस्थता होती त्याचा फायदा घेत त्यांचे समर्थन आपण कसे मिळवून घेऊ शकतो या विचाराने लिहिले गेलेले ते निवेदन होते. त्या निवेदनाला आता हिंदुत्व प्रचाराची गीता, कुराण आणि बायबल बनवले गेले आणि गेली ७५ वर्षे त्याचा वापर गांधी द्वेष वाढविण्यासाठी केला गेलेला आहे आणि त्यात ते यशस्वीही झाले आहेत.

गांधी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेत. आजचे सनातनीत्व आणि गांधींचे सनातनी हिंदू असणे यातील फरक तुम्ही कसा सांगाल?

बाह्यत: फरक समजून घेण्याच्या आधी आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की हिंदू आणि हिंदुत्व या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हिंदू म्हणजे एक जीवनशैली होती. बापूंनी ही जी जीवनशैली स्वीकारली होती त्यालाच ते सनातनी म्हणायचे. हिंदुत्व हे राजनैतिक हत्यार आहे. धर्माचा राजनैतिक सत्तेसाठी वापर करण्याची जी एक विचारधारा आहे ती हिंदुत्व आहे. त्यामुळे सनातनी हिंदू आणि सनातनी हिंदुत्ववादी यात फार मोठा फरक आहे. ही जाणीव जर आपल्याला झाली तर आपल्याला कळेल की आज स्वत:ला सनातनी म्हणवून घेणारे लोक राजनैतिक पक्षाचे आहेत. राजनैतिक विचारधारेचे आहेत त्याचा धर्माशी काहीच संबंध नाही. हे आपण सर्वसामान्य जनतेला समजावून देऊ शकलेलो नाही. त्यामुळेच हिंदुत्व विचारधारा आज इतकी यशस्वी झालेली आहे. आजची हिंदू राष्ट्राची कल्पना आणि बापू जे रामराज्याची कल्पना करत होते त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. रामराज्य कसे असावे याबद्दल त्यांनी कितीतरी लिहिले आहे. त्याचा अभ्यास केला तर आज आपल्यावर जे हिंदू राष्ट्र म्हणून लादले जात आहे ती बापूंच्या कल्पनेच्या विपरीत गोष्ट आहे. बापूंचा जो सनातन हिंदू धर्म होता तो वसुधैव कुटुंबकम, समता आणि न्याय या मूल्यांवर आधारलेला होता. पण त्या विपरीत आज हिंदू आदर्शांना धर्म न मानता समाज कर्मकांडी हिंदू धर्माला धर्म मानत आहे.

एका बाजूला धर्मांध शक्ती तर दुसर्‍या बाजूला साम्राज्यवादी कॉर्पोरेट आर्थिक शक्ती या कात्रीत सापडलेल्या समाजात न्याय, समता, बंधुता ही मूल्ये मानत शेवटच्या माणसाचा विकास साधणार्‍या गांधीजींच्या रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते?

सध्याच्या काळात जर आपल्याला या दोन्ही शक्तींविरोधात लढायचे असेल व आपली धर्मनिरपेक्षतेची संकल्पना पुन्हा प्रस्थापित करायची असेल तर माझ्या मते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोघांचे शस्त्र उचलून हा लढा लढवला पाहिजे हे अनिवार्य होऊन गेले आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे भारतीय जनतेला न्याय, समता आणि बंधुतेची मूल्यचौकट दिली आहे आणि त्या संविधानाच्या आत्म्याविषयी गांधीजींनी सांगितले आहे. ते म्हणतात, ‘तुम्ही जेव्हा काहीही करायचे ठरवाल तेव्हा समाजातील सर्वांत शेवटच्या दलित, वंचित व्यक्तीचा चेहरा आठवा आणि तुमच्या कृतीमुळे त्याचे सशक्तीकरण, ज्ञानवर्धन होऊन तो आपल्या ताकदीवर उभा राहील का?’ असा प्रश्न विचारा. त्या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे आले तरच समजा तुम्ही बरोबर आहात. संविधानाची मूल्यचौकट आणि संविधानाचा आत्मा यांचा मेळ जेव्हा घातला जाईल तेव्हाच रामराज्याची कल्पना प्रत्यक्षात येईल…

जवळ जवळ दीड तास चाललेली ही मुलाखत संपताना तुषार गांधींनी अंनिवासाठी इतका वेळ दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानले. तेव्हा त्याला प्रतिसाद देताना ते म्हणाले, “आपण सर्व कार्यकर्ते जे काम करत आहात त्याचे मला खूपच कौतुक आहे. आधुनिक भारताच्या उभारणीसाठी जे जे शहीद झाले आहेत त्या सर्वांप्रति माझ्या मनात प्रचंड आदर आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर शहीद झाले म्हणून नव्हे, तर आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची उभारणी करण्यासाठी त्यांनी जे काम केले त्याबद्दल मला त्यांच्याप्रती खूपच आदर आहे आणि ते काम इतके पके होते की, त्यांच्यानंतरही अंनिस तितक्याच जोमाने वाटचाल करत आहे याचेही मला खूप कौतुक आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर जोडण्याची संधी मिळते तेव्हा तेव्हा ती संधी मी अचूक साधत असतो. त्यामुळे माझे विचार मांडण्याची अशी संधी दिल्याबद्दल मलाच तुमचे आभार मानले पाहिजेत.”

संवादक : राजीव देशपांडे, मुक्ता दाभोलकर


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]