जातिअंताची ही लढाई बुद्धिवंतांच्या संस्थापासून ते वस्त्या-वस्त्यांपर्यंत लढण्याची गरज!

राजीव देशपांडे -

१२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील पवईच्या आयआयटीत दर्शन सोळंकी नावाच्या केमिकल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या १८ वर्षांच्या दलित विद्यार्थ्याने आपल्या वसतिगृहाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे उच्च शिक्षणाच्या केंद्रीय संस्थातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून केस नोंद केली आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे. आयआयटीतील ‘दस्तक’ या संघटनेने त्याच रात्री विद्यार्थ्यांचा कॅन्डल मार्च काढला, तर दुसर्‍या दिवशी आयआयटी प्रशासनाने विद्यार्थ्यांची शोकसभा आयोजित केली होती. आयआयटी प्रशासनाने दर्शन सोळंकीच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी समिती नेमल्याचे जाहीर केले. त्याचा अहवाल नुकताच आला. त्यात या बारा सदस्यीय समितीने अपेक्षेप्रमाणे या आत्महत्येमागे जातीय भेदभावाची कारणे नसून उच्च शिक्षणाच्या अभ्यासाचा भार न पेलता आल्यामुळे झालेली शैक्षणिक घसरण हे कारण असण्याचा संभव असल्याचे म्हटले आहे.

दर्शन मूळचा अहमदाबादचा होता. त्याचे वडील प्लंबर, महिना १५ हजार रुपये कमविणारे. बहीण अहमदाबादला एमसीए करत आहे. साडेतीन महिन्यांपूर्वीच तो आयआयटीत दाखल झाला होता. त्याच्या आत्महत्येनंतर आयआयटी प्रशासन जरी यात जातीचा भाग नसल्याचा दावा करीत असले, तरी त्याच्या कुटुंबीयांना ते मान्य नाही. दर्शन सोळंकीला त्याच्या राखीव जागेवरून जातीय दूषणे सोसावी लागत होती, असे त्यांचे म्हणणे असून या आत्महत्येची चौकशी एसआयटी नेमून करावी अशी त्यांची मागणी आहे. तर हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमुला, मुंबईच्या टोपीवाला मेडिकल कॉलेजमधील पायल तडवी, याच आयआयटीमधला अनिकेत अंभोरे यांच्याप्रमाणेच दर्शन सोळंकीची आत्महत्या हा ‘संस्थात्मक खून’च असल्याचा आरोप मुंबई आयआयटीतील फुले, आंबेडकर, पेरियार स्टडी सर्कलने केलेला आहे. एसएफआय, जातिअंत संघर्ष समितीसारख्या डाव्या आणि पुरोगामी संघटना आणि फुले- आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल, आंबेडकर स्टडी सर्कल, दस्तक सारखे आयआयटीमधील विद्यार्थ्यांचे अनौपचारिक गट यांनी आयआयटीवर जोरदार निदर्शने करून दलित आदिवासी अत्याचारविरोधी कायदा तसेच रॅगिंगविरोधी कायद्याखाली या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी केली.

पण त्याचबरोबर या संघटनांनी इतर ज्या मागण्या केल्या आहेत त्याही महत्त्वाच्या आहेत. यात या संघटनांनी विद्यार्थी कल्याण केंद्रे अधिक सक्षम करण्याची मागणी करताना एससी/एसटी समुपदेशकांची संख्या वाढविली पाहिजे, तसेच सर्वसाधारण विद्यार्थी समुपदेशन कार्यक्रमात एससी/एसटी समुपदेशनाचा कार्यक्रम सक्तीचा केला पाहिजे ज्यामुळे नवीन एससी/एसटी विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. त्याचबरोबर संस्थेच्या आरोग्य विम्याबाबतच्या धोरणात मानसिक आरोग्याच्या सुविधांचा समावेश केला पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच प्रत्येक वसतिगृहात आणि शिकविण्याच्या ठिकाणी अनिष्ट जातीय चालींची उदाहरणार्थ, सर्वसाधारणपणे केले जात असलेले जातीय उल्लेख तसेच आरक्षणविरोधी शेरेबाजी याची यादी लावली गेली पाहिजे आणि याचे उल्लंघन करणार्‍यांना शिक्षा दिली गेली पाहिजे. वंचित समाजातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी प्रत्येक विभागाने दिली पाहिजे. संस्थेतील सर्व विद्याशाखेतून जात, लिंग आणि मानसिक आरोग्यासंदर्भातील जाणीव जागृतीचे पाठ दिले गेले पाहिजेत. तसे पाहिले तर मुंबई आयआयटीसारख्या आधुनिक शिक्षण देणार्‍या आणि जगप्रसिद्ध केंद्रीय शिक्षण संस्थेच्या दृष्टीने या मागण्या अगदीच प्राथमिक आहेत. पण आजच्या काळात फुले-आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल, आंबेडकर स्टडी सर्कलमधील विद्यार्थ्यांना या मागण्या कराव्या लागतात, यावरूनच या केंद्रीय संस्थांवर नियंत्रण असणार्‍यांच्या एकूण सामाजिक हेतूविषयी शंका निर्माण होतात.

मुंबई आयआयटीचा एससी/एसटी सेल आहे. या सेलने गेल्या वर्षी दोन अहवाल कॅम्पसवरील विद्यार्थ्यांशी बोलून प्रसिद्ध केले. त्यापैकी एक अहवाल कॅम्पसवरील एससी/एसटी विद्यार्थ्यांचे जीवनमान आणि त्यांचे प्रश्न या संदर्भात होता तर दुसरा अहवाल एससी/एसटी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला केंद्रस्थानी ठेवून तयार केला गेला होता. हे दोन्ही अहवाल मुंबई आयआयटीने अधिकृतपणे अद्याप प्रसिद्ध केलेले नाहीत. पण ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी दैनिकात आलेल्या बातमीनुसार या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, कॅम्पसवरील एससी/एसटी विद्यार्थ्यांत असलेल्या मानसिक समस्यांचे प्रमुख कारण ‘जातीय भेदभाव’ हे आहे. हा जातीय भेदभाव वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त होत असतो. सराईतपणे इंग्रजी बोलता न येण्यावरून केलेली जातीय शेरेबाजी, आरक्षणावरून केलेली शेरेबाजी वगैरे, वगैरे.

एससी/एसटीचा विद्यार्थी हा ग्रामीण भागातून आणि त्याच्या कुटुंबाच्या अत्यंत विदारक परिस्थितीतून सामाजिक-आर्थिक पातळीवर कठोर संघर्ष करत अशा केंद्रीय शिक्षण संस्थांच्या त्याला अपरिचित असणार्‍या वातावरणात आलेला असतो. त्यामुळे अगदी वेगळ्या वातावरणात रुळण्यासाठी वेळ द्यावा लागतो, तसे वातावरण निर्माण करावे लागते. पण ‘आयआयटी’सारख्या उच्च शिक्षणाच्या संस्थांत विद्यार्थ्यांना या वेगळ्या वातावरणात रुळवण्यासाठी जी सक्षम ‘व्यवस्था’ हवी. तिचीच आजवर वानवा आहे. अशी सक्षम ‘व्यवस्था’ निर्माण करावी असे प्रयत्न पूर्वीच्या राज्यकर्त्यांनीही कधी केली नाहीत आणि आजच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीत तर ते होतील, अशी अजिबात शक्यता नाही. उलट या संस्थांच्या कॅम्पसमधील ही परिस्थिती म्हणजे भोवतालच्या परिस्थितीचे प्रतिबिंबच आहे. या कॅम्पसबाहेर इंदर मेघवाल आहे, ऊना आहे, हाथरस आहे. कॅम्पसच्या आत रोहित वेमुला, अनिकेत अंभोरे, पायल तडवी, दर्शन सोळंकी आहे. दोन्हीकडे समान एकच गोष्ट आहे, त्यांची जात.

या सर्व पार्श्वभूमीवर जातिअंताची ही लढाई बुद्धिवंतांच्या संस्थांपासून ते वस्त्या-वस्त्यांमध्ये लढण्याची गरज आजही आहे. जातीयवादी आणि धर्मांध शक्ती आज सत्तेत असल्याने आजच्या घडीला तर ती अग्रक्रमाची गरज आहे. त्यामुळे जातीविरोधी संघर्षाचे आव्हान स्वीकारून जातीयवादी आणि धर्मांध शक्तींना पराभूत करण्यासाठी सर्व डाव्या, पुरोगामी आणि विवेकवादी शक्तींनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. हेच ११ एप्रिल – जोतिबा फुले आणि १४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त या दोन महामानवांना अभिवादन ठरेल.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ]