डॉ. नितीन अण्णा - 8956445357
महिला सक्षमीकरणाचं आदर्श उदाहरण म्हणजे मेरी युरी. आज जगात जगात कोणत्याही देशात एखादी महिला विज्ञानक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असेल, तर तिला आमच्या देशाची ‘मेरी युरी’ असे म्हणतात. यावरून आपल्याला तिच्या महानतेची कल्पना यावी. उच्च शिक्षण घ्यायला बंदी असलेल्या देशात जन्मलेल्या, ज्या घरात खायचे वांदे आहेत, अशा गरीब घरातून कमवा आणि नंतर शिका, असा वेगळाच मार्ग चोखळणार्या मुलीचा हा थक्क करणारा प्रवास…
‘नोबेल’ मिळवणारी पहिली महिला, दोन नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती, दोन वेगळ्या विषयात नोबेल मिळवणारी पहिली व्यक्ती, विज्ञान विषयात डॉटरेट मिळवणारी पहिली महिला, युरोपीय विद्यापीठातील पहिली महिला प्राध्यापक… संपूर्ण आयुष्यभर जगाला आश्चर्याने तोंडात बोट घालायला लावणारी, संपूर्ण जगाला ‘प्रेरणेचा किरणोत्सार’ ठरणारी ही मेरी मृत्यूनंतर देखील अजरामर झाली आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या फ्रान्सच्या ‘पँथिऑन’ राष्ट्रीय स्मारकात दफन करण्यात आलेली पहिली महिला देखील तीच ठरली.
मेरीचे मूळ नाव मारिया स्लोडोव्ह्स्का (हे आडनाव एकदाच बरं का.. टाईप करायला लय अवघड आहे). ७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंडची राजधानी वॉर्सामध्ये एक कृश बाळ जन्माला आलं. आधीची चार पोरं असलेल्या शिक्षक दाम्पत्याच्या पोटी जन्मलेलं मारिया हे शेंडेफळ. किरट्या अंगाचं.. अगदीच नाजूक. तिचा बालपणीचा काळ पोलंडमध्ये सुरू असलेल्या रशियाविरोधी धामधुमीचा होता. रस्त्यावर कधीही हिंसाचार सुरू व्हायचा. त्याचा तिच्या बालमनावर खूपच विपरीत परिणाम झाला. तिने या हिंसाचाराची एवढी धास्ती घेतली होती की, कधी भावंडं खेळत असतील तर त्यात कधी सामील झाली नाही. मारिया नुसती घरकोंबडी झाली होती.
मग घरात बसून काय करणार..? तर ती दिवसभर पुस्तकं चाळत बसायची. वयाच्या चौथ्या वर्षीच मारियाला अगदी उत्तम वाचता येत होतं. तिच्या आईला क्षयरोग झाला होता. लहान मारियाला तेव्हा समजलं नाही की आई तिला जवळ घेऊन लाड का नाही करत. मारिया दहा वर्षांची असताना आई मरण पावली. या छोट्या लेकराला प्रेम, माया-ममता मिळाली, ती मोठी बहीण ब्रोनीस्लाव्हा आणि पुस्तकांकडून.
मारिया शाळेत हुशार होती. अभ्यासक्रम झपाट्याने पूर्ण करत तिच्यापेक्षा दोन वर्षेमोठ्या असलेल्या मुलींच्या वर्गात दाखल झाली. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने शाळेत सुवर्णपदक जिंकलं देखील. मात्र पुढे काय..? कारण पोलंडमध्ये महिलांना महाविद्यालयात प्रवेश नव्हता आणि आपल्या मारियाचा जन्म काही चारचौघींसारखं शिवणकाम, भरतकाम करण्यासाठी झाला नव्हता. स्वप्नं साकार करायची असतील तर तिला संघर्ष करणं अटळ झालं.
पोलंडमध्ये बंदी असली तरी शेजारचा देश फ्रान्समध्ये जाऊन पुढचं शिक्षण घेता आलं असतं; पण मारियाकडे तेवढे पैसे नव्हते. रशियन राजवटीविरुद्ध झालेल्या राष्ट्रीय उठावामध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून मारियाच्या कुटुंबास आपली सगळी संपत्ती गमवावी लागली होती; अगदी हातावर पोट असल्यागत परिस्थिती झाली होती. बापाची नोकरी गेली. पैसे आणायचे कुठून? पण म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग. मारियाने मार्ग शोधला.
मारियाचा जीव की प्राण असलेली मोठी बहीण – ब्रोनी, तिलादेखील वैद्यकीय उच्च शिक्षण घ्यायचं होतं. दोघींनी आपापसांत ठरवलं की पहिल्यांदा मोठ्या बहिणीने परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं आणि मारियानं मिळेल ते काम करून त्याचा खर्च उचलायचा. पाच वर्षांमध्ये मोठी बहीण शिक्षण पूर्ण करेल आणि धाकट्या बहिणीलाही तिकडे बोलवून घेईल, तेव्हा मारियाच्या शिक्षणाचा खर्च मोठी बहीण उचलेल.
ठरल्याप्रमाणे मारिया एका वकिलाच्या मुलांना शिकवण्याचे काम करत आपल्या बहिणीला पॅरिसला पैसे पाठवत असे. गव्हर्नेसचे काम करताना मारियाच्या आयुष्यातील पहिलं प्रेम, पहिला ब्रेकअप तिथंच झाला. एवढंच नाही, तर या प्रेम प्रकरणामुळे तिला कामावरून देखील काढून टाकण्यात आलं. मात्र अशा अडचणींतून खचेल ती मारिया कसली..? मिळेल त्या नोकर्या करून पैसे जमवत राहिली आणि बहिणीला डॉटर केलंच. स्वतःला शिकायची इच्छा असताना लहान बहिणीनं मोठ्या भावंडांना शिकवण्याचं उदाहरण तसं दुर्मिळच. त्यानंतर मारिया स्वतः १८९१ मध्ये फ्रान्सला गेली.
मारिया महाविद्यालयात दाखल झाली.. मारियाची मेरी झाली ती तिथंच. मेरीची बहीण आता विवाहित होती. त्यामुळं तिच्याकडं राहण्यापेक्षा वसतिगृहात राहणं मेरीने पसंत केलं. पैशांच्या बाबत मेरी अतिशय काटकसरी होती; एवढी की, ती स्वतःची उपजीविका चहा-ब्रेड, बटर एवढंच खाऊन भागवत होती. आधीच बारीक शरीर.. त्यात असलं खाणं.. पार मातेरं झालं शरीराचं; मात्र उत्साह तसाच दांडगा… रोज रात्री एक वाजेपर्यंत जागून काम केलं तरी न थकता पहाटे पाच वाजता दिवस सुरू व्हायचाच.
१८९३ साली फ्रान्समधील सोरबॉन विद्यापीठाची भौतिकशास्त्राची पदवी मेरीनं मिळवली. बहिणीनं देखील तिचं वचन पूर्ण केलं. मेरीला पदवी मिळाली आणि आता तिची जबाबदारी संपली होती. तिला अधिक त्रास देणं मेरीला नकोसं वाटतं होतं. ती पोलंडला परतली. वॉर्सा शहरामध्ये नोकरी शोधू लागली. पण तिच्या योग्यतेचं काम काही तिला मिळालं नाही. पुन्हा एकदा तिच्या पदरी निराशाच आली. भौतिकशास्त्र शिकून आलेल्या एका स्त्रीला नोकरी मिळणार कुठं आणि देणार तरी कोण?
यादरम्यान परदेशी गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेली फेलोशिप मेरीला देऊ करण्यात आली. मेरी पुन्हा पॅरिसला आली. मात्र तिला ‘मॅग्नेटिझम प्रॉपर्टीज अँड केमिकल कंपोझिशन’ यावर संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा लागणार होती. त्यासाठी शोधाशोध सुरू असतानाच तिची ओळख झाली पीएर युरी याच्याशी; फक्त संशोधनातील साथी नाही तर जीवनसाथी सापडला मेरीला.
तेव्हा नुकताच रोंटेजन याने ‘एस-रे’चा शोध लावला होता. हेन्री बेक्वरेलने युरेनियममधून काही अज्ञात किरण बाहेर पडतात, हे शोधलं होतं. पीएर युरी यांनी रेडिएशन मोजण्यासाठी ‘युरी स्केल’ नावाची मोजमापपट्टीही तयार केली. (रेडिएशन मोजण्यासाठी आजही ‘युरी’ हेच एकक वापरतात) मेरीने देखील या विषयात उतरण्याचा निर्णय घेतला. मेरीने संशोधनासाठी ‘पिचब्लेंड’ नावाचं खनिज घेतलं. तोवर असा समज होता की ‘पिचब्लेंड’मध्ये युरेनियम आणि ऑसिजन हे दोनच घटक असतात. पण मेरीने तर्क केला ‘पिचब्लेंड’मधून रेडिएशन्स बाहेर पडतात, याचा अर्थ त्यामध्ये आजवर ज्ञात नसलेली काही मूलद्रव्यं असणार. मेरीनं ‘पोलोनिअम’ (पोलंड या तिच्या देशाच्या नावावर तिने हे नाव ठेवले आहे.) आणि रेडियम या दोन किरणोत्सारी मूलद्रव्यांचा शोध लावला.
१९०३ मध्ये मेरीला या संशोधनासाठी डॉटरेट मिळाली. संशोधनादरम्यान तब्बल ३२ रिसर्च पेपर तिने प्रसिद्ध केले होते. (आपल्याकडे कॉपी-पेस्ट करून किंवा दुसर्याकडून लिहून घेऊन दोन रिसर्च पेपरची अट बरेच संशोधक पूर्ण करत असतात. त्यांना यातून प्रेरणा मिळावी). त्याच वर्षी मेरीला पीएर आणि बेक्वरेल यांच्याबरोबर ‘रेडिओअॅटिव्हिटी’साठी नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलं. तिच्या कामाची दखल संपूर्ण जगानं घ्यायची वेळ आली. मात्र गुणवत्ता असूनही पुन्हा तिच्या वाट्याला नाकारलेपण आलं. कारण काय तर तिचं स्त्रीत्व. इतर शास्त्रज्ञांनाही तोपर्यंत कोणी महिला शास्त्रज्ञ असल्याचं पचत नव्हतं. नोबेल समितीनं पीएर आणि बेक्वरेल या दोघांचीच नावं पुढं केली होती. पीएरनं नोबेल समितीला ठणकावून सांगितलं की, हे मूळ काम मेरीचेच आहे, तिला नोबेल मिळणार नसेल तर आम्हाला कुणालाच देऊ नका. खंबीरपणे तिच्या पाठीशी होता तिचा जोडीदार.! मेरीचे नाव त्याच्यामुळेच जगभर चमकू शकले.. याशिवाय महिला शास्त्रज्ञांना ‘नोबेल’चा दरवाजा देखील खुला झाला.
मेरी आणि पीएरचे सहजीवन आदर्शवत म्हणावं असं होतं. दोघांचा ध्यास एक, श्वास एक. पीएर तिच्यासाठी काहीही करायला तयार असायचा. पीएर हा बुजरा आणि मितभाषी होता. लाजाळू तर एवढा की, नोबेल पारितोषिक घेताना खूप लोकांना सामोरे जायला लागेल म्हणून घाबरला होता. मात्र यांच्या सुखी संसारात अचानक एक संकट आलं आणि एकामागून एक संकटांची मालिकाच सुरू झाली.
सगळं छान सुरू असताना १९०६ साली पीएर युरीचा घोडागाडी धडकल्याने अपघाती मृत्यू झाला. जीवापाड प्रेम करत असलेला साथी हरपल्यामुळे मेरी एकटी पडली. पदरी दोन मुली होत्या. मात्र मातृत्व आणि संशोधन या दोन्ही आघाड्यांवर चांगलं धीरानं तोंड देत मेरीनं स्वतःला सिद्ध करून दाखवलं. १९११ साली रसायनशास्त्रातील ‘नोबेल’देखील पटकावलं. दोन दोन ‘नोबेल’ मिळवणारी मेरी जिवंतपणीच एक दंतकथा बनून प्रसिद्ध होऊ लागली.
आता मात्र मेरीचं यश पाहून अनेक लोकांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि समोर स्त्री असेल तर मग काम सोप्पं.. चारित्र्यावर शिंतोडे उडवलं की झालं. विधवा मेरी आणि तिचा प्रयोगशाळेतील सहकारी लांगेविन यांचे प्रेमप्रकरण आहे, अशी काही पत्रकं प्रसिद्ध करण्यात आली, रस्त्यावर वाटण्यात आली. तिच्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड द्वेष निर्माण तयार केला गेला. मात्र आइन्स्टाइनसारखे काही नावाजलेले शास्त्रज्ञ मेरीच्या मागे भक्कमपणे पाठीमागे उभे राहिले. मात्र झाल्या प्रकाराचा मेरीला खूपच मनःस्ताप झाला. यातून बाहेर पडण्यासाठी मेरी मुलींना घेऊन पुन्हा पोलंडला गेली. पहिल्या महायुद्धाच्या काळात युद्धजखमींसाठी क्ष-किरण व्हॅन उभारली, पोर्टेबल क्ष-किरण यंत्रं पुरवली; तसेच क्ष-किरण यंत्र वापरू शकणारे शेकडो तंत्रज्ञ प्रशिक्षित केले. मात्र यादरम्यान तिची तब्येत कमालीची ढासळली.
कर्करोगाच्या आजारावर काम करण्यासाठी मेरीने रेडियम संशोधन संस्था उभारली होती. ज्या वेळेस मेरी रेडिएशनवर काम करत होती, त्यावेळेस त्याचे दुष्परिणाम कोणालाच माहीत नव्हते. मेरी तर अगदी बिनधास्तपणे या मूलद्रव्यांच्या टेस्ट ट्यूब ओव्हरकोटच्या खिशात घेऊन फिरायची. मेरीच्या अंगावर चट्टे उठले. त्याची आग-आग व्हायला लागली (कुणी कॅन्सरसाठी रेडिएशन घेतलेला ओळखीचा असेल तर त्याला विचारा काय अवस्था होते.) शेवटी त्यातच ती १९३४ साली मरण पावली. ज्ञात नसलेला आजार मेरीला झाला होता, असं डॉटरनं निदान केलं. जोतिबांनंतर सुरू असलेलं सामाजिक काम सावित्रीमाईंनी बंद पडू दिलं नाही आणि प्लेग निवारण करताना लागण होऊन त्यात सावित्रीमाईंचा मृत्यू झाला. मेरीचं पण अगदी तसंच म्हणावं लागेल.. मानवहितासाठी काम करताना पूर्णपणे झोकून देऊन त्या कामामध्येच मृत्यू येणे.
आज तिच्यावर टीका करणार्यांची नावे इतिहासाला माहीत नाहीत. मेरीचं नाव मात्र अजरामर झालं आहे. अल्बर्ट आइनस्टाइन मेरीचं कौतुक करताना म्हणतो – “मेरी अशी एक व्यक्ती आहे, जी कधीही प्रसिद्धीमुळे भ्रष्टाचारी झाली नाही, तिच्यामुळे विज्ञानाचीही प्रतिमा बदलेल.” विज्ञानाची प्रतिमा बदलण्याचा मेरीचा ध्यास होताच. अतिशय साधेपणाने राहणारी आणि केवळ विज्ञानात सौंदर्य पाहणारी स्त्री ती. संशोधनाचा उपयोग अधिकाधिक मानवजातीला झाला पाहिजे हा तिचा अट्टाहास. त्यामुळंच तिनं कधी कोणत्या शोधाचे पेटंट देखील घेतलं नाही.
विज्ञान तिनं स्वतःच्या घरात असं रुजवलं की, नंतर मोठी मुलगी, मोठा आणि लहान असे दोन्ही जावई या सर्वांनी ‘नोबेल’ मिळवलं. मेरी आणि पीएर यांचे मिळून एकाच कुटुंबात पाच नोबेल पुरस्कार.. (इथे नेपोटिजम नसतो बरं का.. जे काही मिळवायचे ते स्वतःच्या मेहनतीवर). फ्रेंच सरकारने मेरीच्या महानतेची योग्य दखल घेतली. १९९५ साली तत्कालीन फ्रेंच अध्यक्षांच्या विनंतीवरून मेरी आणि पीएर यांचे अवशेष फ्रान्सच्या ‘पँथिऑन’ राष्ट्रीय स्मारकात दफन करण्यात आले, जिथं शेकडो वर्षांपासून केवळ राजघराणे आणि अतिमहत्त्वाच्या पुरुषांनाच स्थान होतं.
स्वतः नास्तिक असलेल्या मेरी मानववंशासाठी फार उपकार करून गेल्या आहेत. आज कर्करोगबाधित लाखो लोक ‘किमोथेरपी’ आणि रेडिएशनचा वापर करून रोगमुक्त झाले आहेत. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी; तसेच संपूर्ण मानववंशाने मेरीला धन्यवाद दिले पाहिजेत. अशी ही ‘प्रेरणेचा किरणोत्सार’ ठरणारी मुलगी मेरी.. इच्छा तिथे मार्ग याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. विज्ञानक्षेत्रात तिचे स्थान अढळ झाले आहे, जगाला प्रेरणा देणार्या मेरी युरीकडून नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळाली असेल.
लेखक संपर्क ः ८९५६४ ४५३५७