बॅरिकेड

सुभाष थोरात - 9869392157

सुप्रसिद्ध अभिनेते, नाटककार, नाट्यकर्मी, पथनाट्याचे प्रवर्तक उत्पल दत्त यांचे बॅरिकेड नावाचे गाजलेले नाटक आहे. बॅरिकेड म्हणजे शत्रूला रोखण्यासाठी उभारलेले अडथळे, जे आज शेतकर्‍यांच्या आंदोलनात उभारण्याचे ‘ऐतिहासिक’ कार्य मोदी सरकारने सुरू केले आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात असे काम कुठल्याही सरकारने केले नाही, हे ‘महान’ कार्य मोदी सरकारने आपल्याच नागरिकांविरुद्ध त्यांना शत्रू समजून सुरू केले आहे. बॅरिकेड या नाटकात भांडवलदार वर्गविरुद्ध कष्टकरी वर्ग असा संघर्ष चितारलेला आहे. या संघर्षात पत्रकार, कलावंत कुठली बाजू घेतात, कुठली बाजू त्यांनी घेतली पाहिजे, सत्य कुठल्या बाजूला आहे, यावरून तुम्ही जनतेचे मित्र की शत्रू ठरणार आहात. आज नेमकी तीच वेळ आली आहे. अशा वेळी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर आणि त्यासारख्या अनेक चित्रतारका, पत्रकार, लेखक, खेळाडू यांनी मोदी सरकारची बाजू घेऊन आपण कुठल्या बाजूला उभे आहोत, हे दाखवून दिले आहे. खरेतर सर्व क्षेत्रांतील कलावंत, पत्रकार, लेखक, खेळाडू हे आपल्या कला-गुणांच्या जोरावर जनतेच्या प्रेमास, आदरास पात्र झालेले असतात. जनता त्यांना ‘आपले’ समजत असते. अशावेळी त्यांनी लाचार होऊन सत्तेपुढे गुडघे टेकणे म्हणजे जनतेशी विश्वासघात करणे आहे. ज्यांना स्वतःची उघड राजकीय मते असतात, अशा कलावंतांना आपण सोडून देऊ; पण जे स्वतःला राजकीय मानत नाहीत, अशांनी सत्याच्या बाजूला उभे राहावे, अशी अपेक्षा जनतेकडून होणे स्वाभाविक आहे. तुम्ही ‘भारतरत्न’ असता, अशा वेळी तर ही जबाबदारी खूपच असते. पण तुमचे रूपांतर एकदम ‘मोदीरत्ना’मध्ये जर झाले तर जनतेला जरूर दुःख होईल. कारण सरकार उघड-उघड अन्याय करत आहे. जनतेचे लढे चिरडून टाकण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरत आहे. तीन महिने शेतकरी भल्या थंडीत, उन्हात, पावसात दिल्लीच्या सीमेवर राहत आहेत. त्यामुळे दोनशेवर शेतकरी आंदोलक मृत्युमुखी पडले आहेत. अशावेळी तुम्ही सरकारच्या बाजूने उभे राहत असाल तर ती जनतेविरुद्ध गुन्हेगारी आहे. तुम्ही या अन्यायात सामील आहात. आज मोदी सरकारची हुजरेगिरी करण्यात कलावंत, पत्रकार, सर्वच क्षेत्रांतील बुद्धिजीवी; आणि सर्वांत धोकादायक गोष्ट म्हणजे न्यायाधीश यात सामील आहेत.

हीच परिस्थिती ‘फॅसिझम’साठी सुपीक जमीन ठरते. जर्मनीमध्ये हिटलरच्या काळात जे झाले ते अगदी असेच. ‘फॅसिझम’ येतो तो अशा लोकांच्या सहकार्याने, मूक संमतीने आणि आपापले ‘हितसंबंध’ शाबूत ठेवण्याच्या गरजेतून. हिटलरचा खातमा झाल्यानंतर अनेक कलावंतांनी, बुद्धिवंतांनी आपली चूक कबूल केली आणि असे म्हटले की, ‘फॅसिझम’ नेमका काय आहे, इतका अमानुषपणा ‘फॅसिझम’मध्ये असतो, हे आम्हाला माहीत नव्हते. त्यांच्यासाठी सबब ठीक होती; पण आता ही सबब चालणार नाही. तुम्ही सरळ-सरळ जनतेचे गुन्हेगार असाल, जनतेचा विश्वासघात करणारे सत्ताधार्‍यांचे दलाल असाल.

अमेरिकन पॉप गायिका रिहाना, पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आदी कलावंतांनी, विचारवंतांनी शेतकरी आंदोलनाला सहानुभूती व्यक्त केली, ती यासाठी की ज्या पद्धतीने सरकारने त्यांचे पाणी तोडले, वीज तोडली, त्यांची इंटरनेट सेवा बंद केली, याबद्दल मानवाधिकाराच्या दृष्टीतून त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी सरकारच्या शेतकी धोरणावर टीका केली नाही किंवा मतप्रदर्शन केले नाही; फक्त त्यांच्या आंदोलनाच्या अधिकाराला पाठिंबा दिला आहे आणि जगभरचे विचारवंत, कलावंत मानवाधिकाराला कुठल्याही देशात जेव्हा ठेच पोचते, तेव्हा आपली भूमिका व्यक्त करतात, ही सामान्य गोष्ट आहे. त्यात अंतर्गत कारभारात ढवळाढवळ काय आहे. आपण ‘ब्लॅक-लाईव्ह मॅटर’ आणि ‘कॅपिटल हिल’वर झालेल्या ट्रम्प समर्थकांच्या हल्ल्यात भूमिका घेतली नव्हती काय? पण भाजपने, ‘आमच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करतात,’ या नावाखाली रान उठवले आणि आपले विकाऊ कलावंत, खेळाडू बाजारात आणले; अगदी कळसूत्री बाहुल्या ज्या प्रमाणे नाचवल्या जातात, तसे त्यांना नाचवले गेले आहे. सरकारने त्यांना जे लिहून दिले, ते अगदी तसेच, शब्दाचा फेरफार न करता त्यांनी आपल्या नावावर खपवले आहे. पूर्वी राजे-महाराजांच्या दरबारात भाट आणि कलावंत असत राजाची खूषमस्करी करण्यासाठी, अगदी तसेच हे सर्व वागले. यात शेतकर्‍यांबद्दल एखादा शब्द सहानुभूतीचा असता तरी आपण त्यांचा हा गुन्हा खपवून घेतला असता. पण डोके गहाण ठेवलेला माणूस कसा वागतो तसे त्यांचे वर्तन आहे. त्यात प्रामाणिकपणा बिलकुल नाही. केवळ आपले हितसंबंध शाबूत ठेवण्याची कसरत आहे. शेतकर्‍यांच्या बाजूने बोलणे, याचा अर्थ केवळ सरकारच्या विरोधात बोलणे, असा होत नाही, तर अंबानी, आदानींच्या विरोधात बोलण्यासारखे होते. हे कलावंत आणि खेळाडू लोक त्यांच्याच कंपन्यांच्या मालाच्या जाहिराती करून गब्बर झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध बोलल्यानंतर या सर्व धनावर पाणी पडणार, हे याचे मुख्य कारण आहे. लता मंगेशकर या सावरकरवादी असल्यामुळे हिंदुत्वाच्या समर्थक आहेतच; आणि त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. त्या गरिबांच्या फार मोठ्या कैवारी आहेत, असा काही त्यांचा लौकिक नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार बोलण्यात अर्थ नाही. अक्षयकुमार मोदींचा चेलाच आहे; पण मग बाकीच्या सगळ्यांनी जी लाईन लावली, ती आपले आर्थिक हितसंबंध शाबूत ठेवण्यासाठी. अदानी-अंबानींच्या कंपन्यांमध्ये यांचे प्रचंड प्रमाणात शेअर असणार. त्यामुळे अदानी-अंबानींचा फायदा म्हणजे यांचाच फायदा, असे सरळ गणित आहे. काही कलावंतांचा अपवाद वगळता आपले हे कलावंत, खेळाडू कायम विकाऊ राहिले आहेत. त्यांची कला त्यांनी कायम बाजारात विक्रीसाठी ठेवली आहे. क्रिकेटच्या खेळाबद्दल तर आपण विचारच करता कामा नये. तो निव्वळ धंदा झाला आहे. खेळाडूंचा लिलाव होतो, खरेदी-विक्रीचा ‘व्यवहार’ होतो, त्याला आपण काय म्हणू शकतो? मुस्लिमद्वेषाच्या राजकारणाची परंपरा आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ‘आरएसएस’ने जोपासलेली आहे. आज ती मोठ्या प्रमाणात खोट्या प्रचारातून जनमानसात रुजवली गेली आहे. ‘फॅसिझम’चे सर्वांत खतरनाक हत्यार म्हणजे तर्कहीन खोटा प्रचार. या प्रचाराला तर्काने उत्तर देता येत नाही, कुठल्याही विचारसरणीने उत्तर देता येत नाही; बौद्धिकतेने तर नाहीच नाही. कारण बौद्धिकता हाच ‘फॅसिझम’साठी गुन्हा असतो. हा अशा स्वरुपाचा प्रचार असतो. उदाहरणार्थ पाकिस्तान जिंकल्यानंतर मुंबईच्या भेंडी बाजारात फटाके वाजवले जातात. असला प्रचार याला उत्तर देता येत नाही आणि हा प्रचार तद्दन खोटा असतो. आज ‘गोदी मीडिया’ भाजपचा मीडिया सेल म्हणून काम करीत आहे. ही पत्रकारिता नाही तर शुद्ध राजकारण आहे; तर मुस्लिमद्वेष हिंदू जनतेमध्ये इतका भिनवला आहे की, मुस्लिमधर्मीय कलावंतांना काही बोलण्याची सोयच राहिली नाही, तरीही नसिरुद्दीन शहांसारखे कलावंत परिणामांची पर्वा न करता वेळोवेळी आपली मते व्यक्त करतात. आमीर खान, शाहरुख खान यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या, तेव्हा त्यांना कसेे ‘ट्रोल’ केले गेले, हे आपण पाहिलेच आहेच. मुस्लिम देशाचे शत्रू आहेत, हे गृहीतक त्यांनी जनमानसांत चांगलेच रुजवले असल्यामुळे मुस्लिमांना, दलितांना ‘मॉब लिंचिंग’ करून मारले जाते. त्या विरोधी सर्वसाधारण हिंदू समाजात आवाज उठत नाही; उलट मूक संमती असल्यासारखे वर्तन होत आहे.

अमेरिकेत एकेकाळी कम्युनिस्ट विचारांचे कलावंत, विचारवंतांविरोधात (ज्याला ‘मॅकार्थी’ कालखंड संबोधले जाते) मोहीम राबवण्यात आली होती. आपल्या कलेतून मानवतावादाची, कामगार, शेतकरी, जनतेबद्दल हितचिंतकांची भूमिका मांडणार्‍या कलावंतांना कम्युनिस्ट, रशियाचे एजंट असल्याचा शिक्का मारून देशद्रोहासारखे खटले भरले गेले. त्यातले बरेच कलावंत हे कम्युनिस्ट नव्हते. पण अन्यायाच्या विरोधात उभे राहणारे होते. यामध्ये अतिशय श्रेष्ठ अभिनेते, निर्माते, पटकथाकार, नाट्यकलावंत होते. ते या मोहिमेत भरडले गेले. ‘अंधार यात्रा’ हे गो. पु. देशपांडे यांचे मराठीतील पहिले राजकीय नाटक याच परिस्थितीवर बेतले होते. जगप्रसिद्ध थोर मानवतावादी अभिनेते, चित्रपटनिर्माते, ज्यांची प्रसिद्धी आजही जगभर टिकून आहे, त्या महान चार्ली चॅपलिन यांना या मोहिमेचा फटका बसला होता. त्यांच्यावरही कम्युनिस्ट असल्याचा ठपका ठेवला होता.

आपल्याकडे नेमकी तीच परिस्थिती भाजप सत्तेवर आल्यापासून सुरू झाली आहे. डावे आणि आंबेडकरवादी विचारवंत, कलावंत, शाहीर, डाव्या विचारांच्या संघटना, दलित-आदिवासी समाजासाठी काम करणारे मानवतावादी कार्यकर्ते, लोकशाहीवादी पुरोगामी कार्यकर्ते, पत्रकार, विचारवंत, कलावंत यांच्यावर देशद्रोहासारखे आरोप ठेवून हल्ला करण्यास सुरुवात झाली आहे आणि गेल्या सहा वर्षांत घडलेल्या घटना आपल्याला माहीत आहेत, ज्यांची भली मोठी जंत्री होईल. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश यांच्या हत्या याच विद्वेषी राजकारण्यांची परिणती आहे.

लोकांची अशी समजूत आहे की, हे पंतप्रधान मोदी आणि शहांमुळे घडते आहे. दोघे नसले की सर्व काही ठीक होईल. हे खरे नाही. हे खरे की ते ‘चांगले’ ‘अंमलबजावणी’कार आहेत. एकीकडे, कायम विकास, लोकशाही, जनतेचे कल्याण अशी भाषा बोलत राहायचे आणि दुसरीकडे नेमके त्याच्या उलट कृती करत राहायचे, असे धोरण आहे. भारतातील ‘क्रोनी कॅपिटल’चे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्राह्मण्यवादी राष्ट्रवादाचे हे धोरण आहे. मोदी-शहा त्याचे पाईक आहेत. देशावर ‘क्रोनी कॅपिटल’चा आणि ब्राह्मण्यवादी राष्ट्रवादाचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. हे आपल्या देशातील सत्ताधारी भांडवलदार वर्गाचे धोरण आहे. त्यामुळेच सत्तेवर असताना काँग्रेसनेही हीच आर्थिक धोरणे राबवली आहेत.

आज बॅरिकेड नाटकात तुम्ही कुठल्या बाजूच्या आहात, हा प्रश्न विचारला गेला होता. अन्यायाच्या विरोधात आहात की बाजूने? हाच प्रश्न थोर लेखक मॅक्झिम गॉर्की यांनी त्यांच्या काळात कलावंतांना विचारला होता, ‘संस्कृतीच्या मिरासदारांनो, तुम्ही कुठल्या बाजूचे आहात?’ आज हा प्रश्न प्रत्येकासाठीच आहे आणि त्याचे उत्तर प्रत्येकालाच द्यावे लागणार आहे. तुम्ही गप्प बसलात तरी तुमचे अन्यायाला समर्थन आहे, असाच अर्थ निघणार आहे. त्यामुळे बाजू घ्यावीच लागणार.

कारवाँ लुटा जा रहा है और आप चुप बैठे हो।

आप अपराधी हो! समय लिखेगा आपका अपराध।

रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या कवितेत हे लिहून ठेवलेले आहेच.

लेखक संपर्क : 9869392157


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]