दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद

-

माणगाव परिषदेची शंभरी

मूकनायक’च्या शनिवार, 10 एप्रिल 1920 (वर्ष 1 ले अंक सहावा) मध्ये माणगाव परिषदेचा दोन दिवसांचा वृत्तांत छापण्यात आलेला आहे. 14 एप्रिलच्या निमित्त्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना ‘मूकनायक’मध्ये छापलेले माणगाव परिषदेच्या पहिल्या दिवशी झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण व परिषदेचा वृत्तांत आम्ही जसाच्या तसा पुनर्प्रकाशित करीत आहोत व दुसर्‍या दिवशीच्या वृतांत्ताचा संपादित गोषवारा देत आहोत. यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या वसंत मून यांनी संपादित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत (1927-1929) आणि मूकनायक (1920) या ग्रंथाचा आधार घेतलेला आहे.

दिवस पहिला

वरील परिषदेची पहिली बैठक मुक्काम माणगाव. संस्थान कागल येथे ता. 21/22 मार्च सन 1920 रोजी भरली होती. पहिला दिवस पाडव्याचा होता. तरी पण सभेस जवळजवळ पाच हजारांवर समुदाय जमला होता. याहीपेक्षा जास्त समुदाय जमला असता; परंतु आजूबाजूच्या कित्येक खेड्यापाड्यांतील बहिष्कृत लोकांची कुलकर्णी, तलाठी वगैरे लोकांनी अशी समजूत करून दिली की, ही सभा बाट्या लोकांची असून अध्यक्ष देखील बाटलेलेच आहेत. यास्तव अशा सभेस जाणे अप्रशस्त आहे. असे सांगून बर्‍याच लोकांची मने या सभेबद्दल कलुषित केली होती. सभेस कोल्हापूर दरबारातील वरिष्ठ दर्जाची व बहिष्कृतांची हितेच्छु मंडळी हजर होती. काही मोठे ब्राह्मण गृहस्थही हजर होते. परंतु डिप्रेसक्लास मिशन व इतर बहिष्कृतांच्या हितासाठी झटणार्‍या कोणत्याही संस्थेचे एक पिलू देखील आले नव्हते हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे.

परिषदेच्या कामास ता. 21 रोजी पाच वाजता सुरुवात झाली. प्रथमत: स्वागतकमिटीचे अध्यक्ष श्री. दादासाहेब राजेसाहेब इनामदार यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी प्रतिनिधींनी अशा लहानशा खेडेगावात सण, वार, घरगुती अडचणी इत्यादी काही न पाहता सभेस येण्याची तसदी घेतली याबद्दल त्यांचे आभार मानले. आजच्या परिस्थितींचे वर्णन करून ही परिषद का बोलावण्यात आली, याचे दिग्दर्शन केले. हल्लीच्या स्वराज्याच्या काळात इतर लोक आपले बरे करतील असे समजून त्यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या स्वजनोद्धाराचे महत्कार्य आपण स्वत:च केले पाहिजे असे सांगून त्यांनी आपले भाषण संपविले. नंतर रितीप्रमाणे सूचना व अनुमोदन मिळाल्यावर परिषदेचे नियोजित अध्यक्ष श्री. भीमराव आंबेडकर हे टाळ्याचंया कडकडाटांत स्थानापन्न झाले.

अध्यक्षांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभी ही परिषद किती द़ृष्टीने अपूर्व आहेे, याचे विवेचन केले. मुंबई इलाख्यातील परिषदेचा हा तसा पहिलाच प्रसंग आहे व आपल्या लोकांत आपल्या उन्नतीबद्दल दिसून येत असलेली कळकळही देखील तितकीच अपूर्व आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गात दिसून येत असलेली विचारशक्तीही तशीच अपूर्व आहे. आजवर आपल्या लोकांना वाटत होते की, आपली वाईट स्थिती होण्याचे कारण आपले दुर्भाग्य होय आणि दुर्भाग्याला आळा घालणे आपल्या हाती असल्याकारणाने आहे ती बिकट स्थिती आपण निमूटपणे सोसली पाहिजे. हल्लीच्या पिढीला मात्र आपली परिस्थिती ईश्वरी निष्ठेचा परिपाक आहे, असे वाटत नसून ती इतराच्या दुष्कृत्याचा परिणाम आहे, असे वाटू लागले आहे. अशा रितीने परिषदेची अपुर्वता सभासदाच्या निदर्शनास आणून बहिष्कृत वर्गाच्या स्थितीचे त्यांनी मुद्देसूद पर्वालोचन केले. ज्या हिंदू धर्माचे आपण घटक आहोत, त्या हिंदू धर्माच्या व्यवहारात मनुष्य मपट्टम दोन आदि तत्वाला धरून आलेले दृष्टीस पडते एक जन्मसिद्ध योग्यायोग्यता व दुसरी जन्मसिद्ध पवित्रअपवित्रता या दोन तत्त्वानुरूप हिंदू लोकांची विभागणी केली, तर त्याचे तीन वर्ग होतात. 1. सर्वांत जन्माने श्रेष्ठ व पवित्र ज्याला आपण ब्राह्मण वर्ग असे म्हणतो तो 2 रा ज्याची जन्मसिद्ध श्रेष्ठता व पवित्रता ब्राह्मणांपेक्षा कमी दर्जाची आहे, असा जो वर्ग तो ब्राह्मणेतर वर्ग. 3 रा जे जन्मसिद्ध कनिष्ठ व अपवित्र अशाचा जो वर्ग तो आपला बहिष्कृत वर्ग होय. अशा रितीने वर्गीकरण करून धर्माने ठरवून दिलेल्या श्रेष्ठतेच्या व पवित्रतेच्या विषम प्रभागाचा या तीन वर्गांवर काय परिणाम झाला आहे, याचे त्यांनी विवेचन केले. जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणांचे देखील तसे कल्याण झाले आहे, हे त्यांनी सांगितले. ब्राह्मणेतरास जन्मसिद्ध अयोग्यतेचा भाग आहे. त्यांच्यात विद्या नाही म्हणून आज मागे राहिले आहेत. तरीपण विद्या व द्रव्य मिळविण्याचे मार्ग त्यांना मोकळे आहेत. ही दोन्ही जरी त्यांचेजवळ आज नसतील, तरी त्यांना. ती उद्या मिळणार आहेत. आपल्या बहिष्कृत वर्गाची स्थिती मात्र जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे फारच शोचनीय झाली आहे. अनेक दिवस अयोग्य व अपवित्र मानून घेतल्यामुळे नैतिक दृष्ट्या आपल्यातील आत्मबल व स्वाभिमान ही जी उन्नतीची आद्यकारणे ती अगदी लोपून गेली आहेत. सामाजिकद़ृष्ट्या हिंदूधर्मियांप्रमाणे त्यांना हक्क नाहीत. त्यांना शाळेत जाता येत नाही. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरता येत नाही व रस्त्यावर चालता येत नाही. वाहनाचा उपयोग करून घेता येत नाही. इत्यादी प्रकारच्या कनिष्ठ हक्कांना देखील ते दुरावले आहेत. जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे आर्थिक दृष्ट्या त्यांचे तितकेच नुकसान झाले आहे. व्यापार, नोकरी व शेती हे जे धनसंचयाचे तीन मार्ग आहेत. ते त्यांना खुले नाहीत. विटाळामुळे गिर्‍हाईक मिळत नसल्याकारणाने त्यांना व्यापार करण्याची सोय उरली नाही. शिवाशिवीमुळे त्यांना नोकरी मिळत नाही व कधी कधी गुणाने योग्य असूनही खालचे जातीचे असल्यामुळे इतर लोक त्यांच्या हाताखाली नोकरी करण्यास कचरतात. म्हणून त्यांना नोकरी मिळणे जड जाते. याच भावनेमुळे मिलिटरीतून त्यांचा कसा उठाव झाला, हे त्यांनी उदाहरणादाखल विषद करून सांगितले. शेतीच्या मानाने त्याची तशीच दशा आहे. हाडकी हडवळ्यापेक्षा भुईवर तुकडा विशेष कोणाला आहे. अशा प्रकारे नाडलेल्या समाजाची उन्नती कशी होणार, याचे विवेचन करताना असे सांगण्यात आले की, नैसर्गिक गुण व अनुकूल परिस्थिती ही दोन उन्नतीची आद्य कारणे आहेत. बहिष्कृत वर्गात नैसर्गिक गुणांची बाण नाही, हे सर्वांस मान्य आहे; परंतु त्याचा विकास होत नाही, याचे मूळ कारण त्याला परिस्थिती अनुकूल नाही, हे होय. परिस्थिती अनुकूल करून घेण्यास अनेक उपाय सुचविले जातात. परंतु अध्यक्षांनी आपण राजकीय सामर्थ्य संपादिले पाहिजे, असे सुचविले व जातवार प्रतिनिधी मिळाल्याशिवाय आपल्या हाती राजकीय सामर्थ्य येणार नाही, असे त्यांनी सांगितले. शेवटी ‘सत्यमेव जयते’ हे तत्त्व पोकळ आहे, असे सांगून सत्याचा जय होण्यास आपण आपली चळवळ कायम ठेवली पाहिजे, असे सांगून त्यांनी आपले प्रास्ताविक भाषण संपविले. नंतर विषयनियामक कमिटी नेमण्यात येऊन पहिल्या दिवसापुरते परिषदेचे काम संपले.

दिवस दुसरा

दुसर्‍या दिवशी तीन वाजता परिषदेची सुरुवात शाहू महाराजांच्या भाषणाने झाली. सुरुवातीला बाबासाहेबांनी सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले, याबद्दल आनंद व्यक्त करत ‘त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मी शिकारीतून मुद्दाम येथे आलो आहे,‘ असे सांगत त्यांनी आपल्या भाषणात अस्पृश्यांच्या हजेरीची पद्धत म्हणजे गुलामगिरीच असल्याचे सांगितले. अस्पृश्य लोकांची हजेरी आपण माफ का केली, याचा उहापोह करताना ते म्हणाले, “गावात बारा आणे मजुरीचा दर असला तरी गैरहजेरीची भीती घालून त्या गरीब लोकांकडून अधिकारी लोक फुकट काम करून घेतात. फार झाले तर त्यांच्या पोटाला म्हणून काही तरी थोडेसे देत होते.

मला ज्यावेळी मुखत्यारी मिळाली, त्यावेळी ब्राह्मणेतर एकही वकील अगर नोकर नव्हता. परंतु त्यांना वकिलीचे ज्ञानामृत पाजल्यापासून ते वाक्बगार झाले आहेत. त्याचप्रमाणे अस्पृश्य मानलेल्या लोकांना नोकर्‍या व स्पेशल केस करून वकिलीच्या सनदा दिल्या आहेत. यात ते इतर लोकांप्रमाणे वाक्बगार होतील, अशी उमेद आहे. मी लवकरच ‘सेल्फ गव्हर्मेन्ट’ थोड्या प्रमाणावर देणार आहे, त्याचा फायदा सर्वांना; विशेषत: अस्पृश्यांना मिळावा म्हणून ‘कम्युनल रिप्रेझेंन्टेशन’ही देणार आहे,” असे सांगत शाहू महाराजांनी आपल्या भाषणात सर्वांना समान संधी आणि ज्यांना पिढ्यान्पिढ्या संधी नाकारली आहे, त्यांना विशेष संधी या राखीव जागांच्या तत्त्वाचे प्रतिपादन केले.

“आज त्यांना ‘पंडित’ ही पदवी देण्यास काय हरकत आहे? विद्वानात ते एक भूषणच आहेत,” असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव शाहू महाराजांनी आपल्या भाषणात केला व “योग्य नेता नसेल तर समाजाची प्रगती होत नाही, असे सांगत अस्पृश्यांना सुयोग्य नेता मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला व त्यांनी जाण्याचे पूर्वी मेहरबानीने माझ्या रजपूतवाडीच्या क्यांपवर माझेबरोबर भोजनाला येण्याची तसदी घ्यावी.” असे आमंत्रण देत महाराजांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

त्यानंतर मृत जनावरांचे मांस खाणे हा गुन्हा मानावा, अस्पृश्यांनी मेलेली जनावरे ओढू नयेत, मुला-मुलींना सहशिक्षण असावे, स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्या शाळा एकत्र असाव्यात, शिक्षण मोफत, सक्तीचे, सार्वत्रिक असावे, सार्वजनिक रस्ते, विहिरी, तलाव, शाळा, धर्मशाळा, भोजनगृहे, वाहने, करमणुकीच्या जागा अस्पृश्यांना खुल्या असाव्यात, अस्पृश्यांना व्यापार करण्याचा व नोकरी मिळविण्याचा हक्क असावा, पडीक जमिनी अस्पृश्यांना कसायला द्याव्यात, या ठरावाबरोबरच माणगाव परिषदेने श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार, इलाखा करवीर यांनी आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिले आहे, याबद्दल त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा, असे या परिषदेचे मत आहे, असाही ठराव मंजूर केला व परिषदेचे दोन दिवसांचे कामकाज संपले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]