प्रा. प. रा. आर्डे -

जनरल ने विन एकेकाळचा म्यानमार म्हणजे जुन्या ब्रह्मदेशाचा हुकुमशहा. एका अंकज्योतिषाने त्याचा लकी नंबर काढून दिला. ने विनची अंकज्योतिषावर प्रचंड श्रद्धा. तो होता 9 हा अंक. ने विनने ब्रह्मदेशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी 100 च्या व 50 च्या नोटा एकाएकी बदलून त्या 90 आणि 45 अशा नंबरच्या केल्या. 90 = 9 + 0 = 9 आणि 45 = 4 + 5 = 9 ने विनचा लकी नंबर. पण ब्रह्मदेशाची अर्थव्यवस्था या बदलामुळे सुधारण्याऐवजी पुरती कोलमडली. सामान्य लोकांच्या आयुष्यभरीच्या ठेवी बुडाल्या. हाहा:कार माजला. पुढे ने विन याला दुसर्या हुकूमशहाने पदच्युत केले आणि त्याला नजरकैदेत ठेवले. अशा अवस्थेतच तो मृत्यू पावला. हा अनर्थ अंक ज्योतिषामुळे घडला.
न्यूमरॉलॉजी म्हणजेच अंकज्योतिष. विशिष्ट अंक म्हणजेच तुमचे लकी नंबर, जे तुमच्या नावावरून किंवा जन्मतारखेवरून ठरविले जातात. तुमचं भूत-भविष्य सांगतात म्हणजे अंकज्योतिष, कुंडली ज्योतिष, हस्तरेषा ज्योतिष, पेपरवाले ज्योतिषी असे ज्योतिषाचे विविध प्रकार. तुमचं-आमचं भविष्य सांगायला आणि घडवायला नाना प्रकारांची चलाख मंडळी टपलेली असतात. कुणी ग्रहांना वेठीस धरतात, तर कुणी हातावरच्या रेषांना तुमचे भविष्य विचारतात. अंकज्योतिषवाले आकड्यांचा खेळ करून आपणाला लुबाडतात. अंकज्योतिषी यांच्याकडून लकी नंबर मिळवायचा आणि झटपट श्रीमंत होण्याचा मूर्खपणा केवळ भारतातच घडतो, असे नाही, तो जगभर आढळतो. हॅरी हॉवर्ड्स या ऑस्ट्रेलियन चिकित्सक विचारवंताने पर्दाफाश केलेली ऑस्ट्रेलियातील न्यूमरॉलॉजीची घटना आपल्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरेल. झटपट श्रीमंत होण्यापायी तथाकथित अतिशहाण्या; पण मूर्ख लोकांनी स्वत:चा खिसा रिकामा करून अंकज्योतिषाचा बँकबॅलन्स दहा लाख डॉलर्सनी वाढवला. लकी नंबर मिळण्याच्या संबंधित अंक ज्योतिषाचा दर प्रतिप्रश्नास 75 डॉलर्स म्हणजे अंदाजे 5000 रुपये असा होता. पु. ल. देशपांडे यांच्या भाषेत गाढवांना तोटा नाही.
अंकज्योतिष हे नकली विज्ञान आहे. कसे ते सविस्तर पाहूया. अंकज्योतिषामधील नकली विज्ञान समजायला कठीण नाही. मनात आणलं तर तुम्ही देखील अंकज्योतिषी बनू शकता. तुमची जन्मतारीख आणि तुमचे पूर्ण नाव यावरून तुमचा लकी नंबर ठरविला जातो. अंकज्योतिषाच्या पायथागोरीयन पद्धतीत लॅटीन मुळाक्षरांना नंबर चिकटवले जातात. कोणत्या अक्षरांना कोणता नंबर याला तसे वैज्ञानिक स्पष्टीकरण नाही. अंकज्योतिषी म्हणतो म्हणून तर खरं शनि कोपतो. कसा कोपतो? त्याच्यापासून असं काय उत्सर्जित होतं आणि ते ज्याच्यावर कोपायचे त्याच्या अंगावर आदळत माहीत नाही. ज्योतिषी हा ब्रह्मदेवाचा बाप. शनिने त्याच्या कानात सांगायचे, मग ज्योतिषी सांगणार “तुला साडेसाती आहे।” याला म्हणतात बादरायणी संबंध. तसंच अंकज्योतिषाच्या लकी नंबरचं आहे. लकी नंबरपासून कुठलीशी गूढ शक्ती बाहेर पडते आणि ती तुम्हाला लखपती करते. याला काहीच लॉजिकल स्पष्टीकरण नाही.
आपल्या नावाचा लकी नंबर अंकज्योतिषी कसा काढतात? विशिष्ट अक्षरे आणि त्यांना दिलेला अंक खालील प्रमाणे.
1 = a, j, s 2 = b, k, t 3 = c, l, u
L = d, m, v 5 = e, n, w 6 = f, o, x
7 = g, p, y 8 = h, q, z 9 = i, r
लकी नंबर ठरवण्यासाठी तुमच्या पूर्ण नावातील सर्व अक्षरांचे वरील टेबलनुसार नंबर ठरवा. नंतर यांची बेरीज करून आलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून एक अंकी नंबर काढा. तोच लकी नंबर. खालील उदाहरणावरून हे स्पष्ट होईल.
नाव – SANJAY LAXMAN GALGALE
* SANJAY = 1 + 1 + 5 + 1 + 1 + 7 = 16
* LAXMAN = 3 + 1 + 6 + 4 + 1 + 5 = 20
* GALGALE = 7 + 1 + 3 + 7 + 1 + 3 + 5 = 27
SANJAY LAXMAN GALGALE = 16 + 20 + 27 = 63
लकी नंबर = 6 + 3 = 9
हा अंक तुमचं बाह्यस्वभाव ठरवतो (outer nature) हा अंक म्हणजे आजूबाजूच्या लोकांना तुमचं व्यक्तिमत्त्व कसे दिसते, याची माहिती देतो. लकी नंबरची खोच अशी आहे की, या नंबरला दिलेला स्वभाव जर रागीट असा असेल, तर तो अंकज्योतिषी प्रेमळ बनवू शकतो. कसा? तर तुमच्या नावाचे स्पेलिंग थोडेसे बदलून. मध्यंतरी एक अंकज्योतिष बाई कोल्हापूरला आल्या होत्या. त्यांच्या जाहिरातीत तानाजीवरच्या सिनेमामध्ये तानाजीचे स्पेलिंग ‘तान्हाजी’ असे केल्यास हा सिनेमा जोरात चालेल, अशी सूचना केल्यामुळे तो सिनेमा जोरात चालला, अशी दर्पोक्ती होती. नावात बदल करून तुमचा लकी नंबर बदलतो आणि तुमचे भाग्य त्यामुळे बदलू शकते. असल्या भंकसपणावर लोक विश्वास कसा ठेवतात? तानाजीचा पराक्रम आणि इतिहासाबद्दल लोकांना वाटणारे कुतूहल हे संबंधित सिनेमा चांगला चालण्याचे खरे कारण.
जन्मतारखेवरून लकी नंबर अंकज्योतिषी काढतात. हा लकी नंबर म्हणे तुमचं अंतर्स्वभाव आणि जीवनउद्देश ठरवतो. हा लकी नंबर काढण्याची पद्धत अशी – जन्मतारखेतील सर्व अंकांची बेरीज करा, येणारी संख्या दोन अंकी असेल, तर त्या दोन अंकांची सुद्धा बेरीज करा. येणारा अंक हा तुमचा लकी नंबर. उदाहरण –
संजय लक्ष्मण गलगले याची जन्मतारीख –
09-04-1984
= 9 + 4 + 1 + 9 + 8 + 4 = 35
लकी नंबर = 3 + 5 = 8
अशा प्रकारच्या लकी नंबरना विशिष्ट आशय दिला जातो. म्हणजे कला गुण, हुशारी, रागीटपणा, श्रीमंती, गरिबी इत्यादी वर वर्णन केलेल्या लकी नंबर काढण्याच्या पद्धतीला ‘पायथागोरीयन’ पद्धत म्हणतात. अशाच इतरही पद्धती आहेत. त्यांची नावे अशी – चाल्डिन पद्धत (chaldean), अॅबजड (Abjad) पद्धत; चायनीज पद्धत चाल्डिन पद्धतीप्रमाणे – (1 = a, g, y, i, j) तर पायथागोरीयन पद्धतीप्रमाणे (1 = a, j, s) अशीच तर्हा इतर अंकांची सुद्धा आहे. आहे का काही ताळमेळ? म्हणजे एका पद्धतीप्रमाणे मिळालेला तुमचा भाग्यांक दुसर्या पद्धतीने मिळालेल्या भाग्यांकांपेक्षा वेगळा असणार, म्हणजे एक भाग्यांक तुमचे नशीब उजळणार तर… दुसर्या पद्धतीचा भाग्यांक तुम्हाला खड्ड्यात घालणार. याला विज्ञान म्हणता येईल का? म्हणजेच सहा आंधळे आणि एक हत्ती असा प्रकार आहे. एका आंधळ्याने हत्तीच्या पायाला स्पर्श केला, तो म्हणाला, हत्ती खांबासारखा भासेल. दुसर्याने त्याच्या कानाला स्पर्श केला, तो म्हणाला हत्ती सुपासारखा आहे. ज्याने सोंडेला स्पर्श केला तो म्हणाला, हत्ती अजगरासारखा….
कोणत्याही व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक गुण-अवगुण हे आकाशातील ग्रह-तारे अगर हाताच्या रेषा किंवा अंकज्योतिषाचे लकी नंबर ठरवित नाहीत. व्यक्तीचे व्यक्तित्व त्याचे ‘जेनेटिक कोड’ ठरवते. म्हणजेच गुणसूत्रेच ठरवतात. याचबरोबर जन्मानंतर व्यक्तीच्या सामाजिक संस्कृतीत वावरते, वातावरणात वावरते. त्याचाही परिणाम त्याच्या गुण-अवगुणानुसार होतो. कोणत्याही गूढ प्रकारच्या स्पंदनांनी भाग्यांक (Lucky Number) व्यक्तीचे जीवन बदलू शकते. याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. अंकज्योतिषाबाबत वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून संशोधन झाले आहे. त्याचे निष्कर्ष नकारात्मक आहेत. त्यातील एक संशोधन 1993 साली ब्रिटनमध्ये झाले आहे, तर दुसरे 2012 मध्ये इस्त्रायलमध्ये. पहिल्या संशोधनात 96 लोकांनी अंकज्योतिषानुसार तपासणी झाली. यांचा भाग्यांक 7 होता. या लोकांच्या मानसिक क्षमतांबाबत अंकज्योतिषाचा निष्कर्ष चुकीचा निघाला. इस्त्रायलमधील प्रयोगात 200 लोकांचे अंकभविष्य एका व्यावसायिक अंकज्योतिषाकडून काढण्यात आले. या 200 लोकांमध्ये वाचनक्षमतेचा अभाव असलेली (dyslexia), एकाग्रतेचा अभाव असलेली (ADHD) आणि स्वमग्नता असलेल्या (Autism) मुलांचा समावेश होता. त्यांच्याबाबतचे अंकज्योतिषाचे निष्कर्षही चुकीचे निघाले.
आकडा तुमचे भाग्य कसे बदलेल? अंकज्योतिष, कुंडली ज्योतिष, हस्तरेषा हे सर्व प्रकार म्हणजे जादूचेच प्रकार होय. जादू म्हणजे विज्ञान नव्हे. रेडिओ स्टेशनपासून निघालेल्या रेडिओलहरी आपल्या घरातील रिसिव्हर पकडतो व आपल्याला संगीत ऐकता येतं, हे विज्ञान होय. विद्युतचुंबकीय लहरीचा हा खेळ विज्ञानाच्या नियमाने चालतो. तो कुणालाही तपासता येतो. त्याचे तंत्रविज्ञान आपण मिळवू शकतो. पण नकली विज्ञानात भाषा विज्ञानाची; पण प्रसार अज्ञानाचा असतो. तुमच्या लकी नंबरमधून अशी कोणती गूढ शक्ती निघते, असे विचारले तर नकली विज्ञानवाले सांगतील, तसे आमचे सिक्रेट आहे. विज्ञानात असं सिक्रेट काहीही नसतं. सगळा बनवाबनवीचा मामला आहे.
अंक ज्योतिषाला बळी पडतात सत्तासम्राट, नटसम्राट, नटसम्राज्ञी; आणि तसेच इतर धनवान. त्यांची फसवणूक झाली, तरी आपले काही बिघडत नाही. पण प्रश्न आहे घाम आटवून आणि रक्त गाळून थोडीफार पुंजी जमविणार्या मध्यमवर्गीयांचा आणि श्रमिकांचा. त्यांची अंक ज्योतिषाकडून होणारी फसवणूक अक्षम्य आहे. डॉक्टरांकडून रिझल्ट आला नाही किंवा त्यांची चूक नसतानाही पेशंटला त्रास झाला, तर त्यांच्यावर हल्ले होतात. पण फसवे विज्ञानवाल्या मंडळींची कार्यालये फसवणूक झालेले का उद्ध्वस्त करीत नाहीत? सगळ्यात भयंकर म्हणजे जनरल ने विन सारखा एखादा खुळचट आपल्याकडच्या उच्च सत्ताधार्यांत असणारच नाही, याची खात्री कोण देणार? उद्या भारताची डळमळती अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी एखाद्या सत्ताधार्याने त्याचा लकी नंबर वापरून नव्या नोटा छापल्या तर…? तेव्हा लोकहो, सावध राहा आणि अंकज्योतिषातील फोलपणा विरोधात अंनिसने सुरू केलेल्या अहिंसात्मक संघर्षाला साथ द्या.