व्ही. टी. जाधव -
नाशिक अंनिसच्या वतीने व्याख्यान
वटपौर्णिमेच्या निमित्ताने 23 जून रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नाशिकच्या महिला विभागाच्या वतीने ‘स्त्रिया व अंधश्रद्धा’ या विषयावर सुजाता म्हेत्रे (कोल्हापूर) यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने त्यांनी समस्त महिला वर्गाला मानसिक गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर पडण्याचे आवाहन केले.
‘स्त्रिया व अंधश्रद्धा’ या विषयावर व्याख्यान देऊन सुजाता म्हेत्रे यांनी सहभागी महिलांशी संवाद साधला. विविध धार्मिक व्रतवैकल्ये ही महिलांमधील अंधश्रद्धावाढीची मुख्य कारणे आहेत, असे त्यांनी सांगितले. समाजात अशा व्रतवैकल्यांमुळे, उपास-तापासामुळे अंधश्रद्धांना दुर्बल घटक, महिलाच बळी पडतात. परंपरेच्या दडपणाखाली व भीतीमुळे घरात नवीन आलेल्या सुना; विशेषत: श्रद्धेच्या गोंडस नावाखाली बळी पडतात व पुढे त्या अंधश्रद्धांच्या वाहकही बनतात. कधी-कधी बुवाबाजीच्या शोषणालाही बळी पडतात. अशी अनेक उदाहरणे घडल्याची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. ‘कुठलेही व्रतवैकल्य का करायचे,’ असा प्रश्न आधी स्वत:ला विचारून व नंतर इतरांना विचारून मगच तर्काला पटले, तरच ते व्रत करावे. परंपरेनुसार आलेले सण, उत्सव साजरे करताना सकारात्मक पर्याय देता येईल, असे त्यांनी सुचविले. उदाहरणार्थ, वटपौर्णिमेला वडाच्या झाडाच्या खोडाला दोरा गुंडाळून पूजा करण्याऐवजी वडाचे रोप देऊन, दुसरे एखादे झाड लावून (वृक्षारोपण) साजरे करणे अधिक श्रेयस्कर आहे. वृक्ष मोठे झाल्यावर पशु-पक्ष्यांना निवारा, आपल्याला सावली व भरपूर ऑक्सिजन मिळेल. पर्यावरणाची हानी (र्हास) न होता, उलट संरक्षण होणार असल्याचे त्यांनी संवादातून पटवून दिले. समाजाची भीती व दडपणामुळे किंवा (अंध) श्रद्धेपायी व्रतवैकल्ये करणार्या उपस्थित स्त्री-पुरुषांना ‘ऊठ वेड्या, तोड बेड्या’ अशा शब्दांत मानसिक गुलामगिरी तोडण्याचे आवाहन सुजाता म्हेत्रे यांनी केले.
कार्यक्रमाच्या आरंभी छोटी आनंदी हिने ‘आम्ही प्रकाशबीजे रुजवित चाललो’ हे चळवळीचे गीत सुरेल आवाजात सादर केले. नीलांबरी पंडित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वक्त्यांचा परिचय ज्योती लांडगे यांनी करून दिला. आभार प्रा. राजश्री ढेरंगे यांनी मांडले. सूत्रसंचालन आनंदी जाधव हिने केले. कार्यक्रमाचे संयोजन म.अं.नि.स. नाशिकच्या महिला विभागाने केले होते.
– व्ही. टी. जाधव, नाशिक