कोविड -19 व्हायरस : उगम, उद्रेक व मिथके

डॉ. श्रीधर पवार - 9619195198

वुहान व्हायरस?

वुहान हे शहर वर्षभरापूर्वी फार चर्चेतील नाव नव्हते. या वर्षी हे नाव मात्र घरोघरी चर्चेत आले आहे. शतकापूर्वी (1911) वुहान शहर ‘झिनहाई क्रांती’चे केंद्र होते. चैन्ग कै शेक यांनी काही काळ हे शहर चीनची राजधानी म्हणूनही घोषित केले होते. वर्तमान काळात या शहराने अद्वितीय स्थान निर्माण केले. हे शहर प्रामुख्याने राष्ट्रीय बँकांचे जाळे, नूतन वास्तुकलांचे (आर्किटेक्चर) अनेक प्रकल्प, विद्यापीठ, मुक्त व्यापारी क्षेत्रे आणि अकरा दक्षलक्ष लोकांचा रहिवास व द्रुतगतीने विस्तारित जाणारी लोकसंख्या यांच्या तुलनेत न्यू यॉर्कपेक्षाही मोठे ‘मेट्रोपोलिस’ असा या शहराचा सद्यःस्थितीत लौकिक आहे. चीनचे पाचवे मोठे शहर, 3200 चौरस मैल क्षेत्रफळाचे आहे. हे शहर हॅनकॉ, वूचांग आणि ह्नयांग या तीन जिल्ह्यात विभागले आहे. शहराच्या मधोमध वाहणार्‍या यंगझी नदीने या शहराचे दोन भाग केले आहेत.

परंतु सध्या जागतिक स्तरावर अत्यंत अपकीर्ती प्राप्त झालेले हे शहर आहे. जागतिक स्तरावर ‘कोविड-19’ रोगाची लागण व तद्नंतर या रोगाच्या जागतिक विस्तारासाठी वुहानला जबाबदार समजण्यात आले. वुहान शहराच्या काही भागात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात फ्लूसदृश लक्षणे (ताप, खोकला, अशक्तपणा, न्यूमोनिया इत्यादी) असलेले रुग्ण इस्पितळात दाखल होऊ लागले. पुढे असे दिसून आले की, शहराच्या केंद्री असलेल्या हुआनेनं (चीनी अर्थ दक्षिण चीन) मधील होलसेल सीफूड बाजारात काम करणारे किंवा संबंधित हे लोक रोगग्रस्त होते. ‘कोविड-19’ रोगाचा प्रादुर्भाव येथील वयोवृद्ध लोकात अधिक दिसत होता आणि वयोवृद्ध लोकांत प्रसारासोबतच त्यांच्यात मृत्यूचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसत होते. डिसेंबर 30 रोजी प्रयोगशाळांच्या अहवालात या रोगाचे कारण म्हणजे ‘नोवेल कोरोना व्हायरस’ असल्याचे निष्पन्न झाले. हाच व्हायरस सद्यःकालीन महामारीस कारणीभूत आहे, हे सिद्ध झाले. अमेरिकेत या रोगाला ‘वुहान व्हायरस’ असे संबोधण्यात येऊ लागले. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने वैज्ञानिक हस्तक्षेप करीत निश्चित नाव ‘कोविड-19’ (कोरोना डिसीज ऑफ 2019) असेच जाहीर केले. व्यक्ती व स्थानसापेक्ष असे नाव जागतिक आरोग्य संघटनेने ठेवले. मात्र अमेरिकेने एकतर्फी प्रचार सुरूच ठेवला व हा रोग म्हणजे ‘वुहान व्हायरस’ किंवा ‘चायनीज व्हायरस’ असा उल्लेख कायम ठेवला.

कोरोनाचा उद्भव कसा झाला, याविषयी अनेक मतभिन्नता आहेत. काही संशोधकांच्या मते, वुहान बाजारातील खवले मांजर (जंगली पँगोलिन) द्वारा विषाणूचे संक्रमण झाले असावे; तर काहींच्या मते, वटवाघळांच्याद्वारे हा रोग संक्रमित झाला असावा, असे मानले जाते. आशिया व आफ्रिकेत आढळणारा पँगोलिन हा लघु आकाराचा सस्तन प्राणी आहे. त्याच्यावरील असणारे खवले त्याच्या वजनाच्या वीस टक्के असतात. गेल्या अनेक दशकांत त्यास खाद्य पदार्थ म्हणून खाण्याचे प्रमाण वाढले आहे. नेहमीच्या पारंपरिक मांसाहाराची मंडई असलेल्या चीनच्या वुहान या शहरात या विशिष्ट मांसाची (exotic) मांसाहारासोबत ‘पँगोलिन’ही लोकप्रिय झाला. पँगोलिन या प्रजातीच्या तीव्र गतीने कमी होणार्‍या संख्येमुळे दक्षिण आशियातील; विशेषतः म्यानमार, व्हिएतनाममधून त्याची निर्यात होऊ लागली. प्रतिवर्षी ही निर्यात 20 टन होत आहे, असे काहींचे मत आहे. जिवंत, फ्रोझन किंवा ड्राईड अवस्थेत ही उत्पादने निर्यात केली जात आहेत. आता मासे सोडून अन्य मांसाहार उत्पादित करणारे मोठे उद्योग जगभर उदयास आले आहेत; तसेच मोठे औद्यगिक उत्पादक या मांसाहार क्षेत्रात भांडवल गुंतवित आहेत; परिणामी औद्योगिक उत्पादन व या विशिष्ट मांसाचे उत्पादन यामधील फरक नाहीसा होत आहे. (आपल्या देशात गोदरेज उद्योगसमूहाने व वेंकी समूहाने कोंबड्यांच्या मांसाचे उत्पादन सुरू केले आहे.) ही उत्पादनप्रक्रिया पार जंगलांत वा जंगलांच्या सीमारेषेजवळ केली जाते. औद्योगिक उत्पादनप्रक्रियेचे दुष्परिणाम मांसाहार उत्पादनांवर होतात. औद्योगिक मांसाहार उत्पादनामुळे जंगले कमी-कमी होत आहेत. याचा दुष्परिणाम नेहमीच्या मांसाहार उत्पादनावर होतो. या एकूण उत्पादन प्रक्रियेत विषाणूंना अन्नसाखळीत प्रवेश होण्यास सहज मार्ग मिळतो. मांस उत्पादित होत असतानाच काही विषाणू शिरकाव करतात. ‘कोविड-19’सारखे विषाणू औद्योगिक उत्पादन चालू असताना निर्माण झाले. सुमारे 60 टक्के नवीन जीवाणू जंगली प्राण्यांद्वारा स्थानिक माणसांमध्ये संक्रमित होतात व उरलेले उर्वरित बाहेरील जगात पसरतात. (मंथली रिव्ह्यु मासिकेच्या मे- 2020. अनुवाद : शिरीष मेंढी) 1980 नंतर, उदारमतवादी धोरणाच्या अवलंबानंतर, बेकायदेशीर बाजारातील व्यापारासाठी प्रोत्साहन मिळाले, ज्यामुळे अनेक चिनी लोक श्रीमंत झाले. अशा श्रीमंत लोकांत स्वयंपाकपद्धतीत, पाककला व खाद्यसंस्कृतीत अनेक बदल घडून आले, ज्यात वरील उल्लेख केलेल्या (exotic) मांसाहारासोबत पँगोलिन हा सर्वांत लोकप्रिय ठरला. सध्या चीनमध्ये ‘वेटमार्केट’वर प्रतिबंध लावण्यात आला आहे.

कोरोना आणि डॉ. ली वेनलियांग

चीनच्या कोविड उद्रेकासोबत आणखी एक नाव जोडले गेले आहे व त्याचीही चर्चा अनेक माध्यमांतून होत होती, ते म्हणजे डॉ. ली वेनलियांग (18 ऑक्टोबर 1986- 7 फेब्रुवारी 2020). वुहान केंद्रीय इस्पितळात कार्यरत असलेल्या या तरुण नेत्रतज्ज्ञाने प्रथमतः न्यूमोनियाच्या रुग्णांची माहिती दिली. 30 डिसेंबर 2019 रोजी स्थानिक सी. डी. सी. शाखेने या रुग्णांची दखल घेत स्थानिक इस्पितळांना अंतर्गत मेमो नोटीस दिली होती व या रुग्णांची चौकशी सुरू केली. याबाबत ‘प्रोमिड’ (इंटरनॅशनल सोसायटी फॉर इन्फेक्सियस डिसीज) या अंकात हा अहवाल प्रसिद्ध झाला. त्याच दिवशी डॉ. ली यांना निदानाबाबतचा अंतर्गत अहवाल प्राप्त झाला, ज्यात हे रुग्ण एस. ए. आर. एस.ने (सार्स) संशयित बाधित रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. वुहान केंद्रीय इस्पितळाच्या आपत्कालीन विभागाचे निर्देशक डॉ. एआय फेन यांच्या वैद्यकीय अहवालात पारंपरिक उपचारास प्रतिसाद न देणार्‍या रुग्णांची नोंद घेतली होती. त्यांच्या अहवालात ‘सार्स – कोरोना व्हायरस’ अशी रोगाची प्रथम नोंद करण्यात आली होती. डॉ. एआय यांनी आपले निरीक्षण इतर इस्पितळांतील डॉक्टरांना कळवले, ज्याद्वारे शहराच्या वैद्यकीय वर्तुळात हे वृत्त पसरले. डॉ. ली यांनी त्याच दिवशी या अहवाल पाहिला व खासगी ‘वुई-चॅट’ समूहावर हुआनेनं होलसेल सीफूड बाजारातील सात व्यक्ती बाधित असल्याची ‘पोस्ट’ केली होती. त्यांनी या रुग्णांच्या सी. टी. स्कॅनच्या प्रतिमाही ‘पोस्ट’ केल्या होत्या. डॉ. ली ने संबंधित रुग्ण कुटुंबातील लोकांना उचित काळजी घेण्याची सूचना या ‘पोस्ट’द्वारे केली होती. डॉ. ली च्या ‘पोस्ट’चे ‘स्क्रीन शॉट’ चिनी इंटरनेटवर लक्षवेधी होत, प्रसारित होत गेल्याने पर्यवेक्षण विभागाने त्यांना पाचारण केले आणि माहितीची सत्यता पडताळणी न करता माहिती बाहेर पसरविण्याचा आरोप ठेवण्यात आला. ही माहिती जाहीर न करण्याची सूचना असतानाही त्यांनी जाहीर केली व ती तात्काळ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत गेली. स्थानिक वुहान पोलीस विभागाने डॉ. ली यांच्या विरोधात कारवाई सुरू केली. ‘पुष्टता न केलेला एस. ए .आर. एस.च्या साथ रोगाने बाधित झाल्याचा रुग्ण अहवाल उघड करीत मिथ्या अभिप्राय देणे,’ असा त्यावर आरोप ठेवण्यात आला. परंतु काही काळातच हा ‘सार्स’ साथरोग नव्हे, तर ‘नूतन कोरोना – सार्स कोवि-2’ या व्हायरसची साथ सुरू झाल्याचे सिद्ध झाले. कोणतेही आक्षेपार्ह वर्तन केल्यास अभियोगानुसार कारवाई करण्यात येईल, अशी डॉ. ली यांना ताकीद देण्यात आली. डॉ. ली परत नोकरीत परतल्यावर 8 जानेवारी रोजी त्यांना या व्हायरसचा संसर्ग झाला. त्यांनी 31 जानेवारी रोजी पोलीस ठाण्यातील प्राप्त सूचनापत्राबाबत सखोल ‘पोस्ट’ समाजमाध्यमांतून प्रसारित केली. ही ‘पोस्ट’ लगेचच विस्तृतरित्या पसरली. लोक अशा डॉक्टरांना शांत का केले जात आहे, असे प्रश्न करू लागले. डॉ. ली यांच्या वैयक्तिक ‘ब्लॉग’वरील माहिती इटालियन वर्तमानपत्राने 1 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली. डॉ. ली यांना ‘व्हीसल ब्लोवर’ म्हणून घोषित करण्यात आले. चिनी माध्यमांतून डॉ. ली यांच्या नावाची उद्घोषणा होत होती. 3 जानेवारी रोजी त्यांना पुन्हा समज देण्यात आली. डॉ. ली हे अफवा पसरवणारे म्हणून त्यांची निर्भत्सना होत राहिली. याप्रकरणी कडक शब्दांत त्यांच्यावर ठपका ठेवण्यात असल्याचे वृत्त चीनच्या केंद्रीय ‘दूरदर्शन’द्वारा प्रसारित करण्यात आले. तथापि, चीनच्या सुप्रीम पीपल्स कोर्टने सजा देणे योग्य नसल्याचा निर्वाळा दिला.

डॉ. ली हे आपल्या एका रुग्णावर (अ‍ॅक्युट अँगल-क्लोजर ग्लुकोमाने व्याधीग्रस्त) उपचार करीत असताना त्यांना संसर्ग झाला. ज्या रुग्णावर ली उपचार करीत होते, तो हुआनेनं सीफूड बाजारात स्टोअर कीपरचे काम करीत होता. या स्थानी प्रचंड व्हायरल लोड होता. 12 जानेवारी रोजी डॉ. लीयांना होउहू हॉस्पिटलमध्ये जिल्हा, वुहान केंद्रीय इस्पितळाच्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले. इस्पितळात दाखल असतानाही डॉ. ली हे ‘आपण बरे झालो की रुग्णसेवेसाठी परत येऊ,’ अशा ‘पोस्ट’ समाजमाध्यमांतून करीत होते. पाच फेब्रुवारी रोजी त्यांची स्थिती अधिक खालावली. सहा फेब्रुवारी रोजी त्यांनी फोनवर आपले ऑक्सिजनचे प्रमाण 85 टक्क्यांपेक्षा खाली जात असल्याचे कळविले. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आणि ‘एक्सट्रा कॉर्पोरेल मेम्बरेन ऑक्सिजनेशन’द्वारा त्यांची स्थिती नियंत्रणाखाली व स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हॉस्पिटलद्वारा त्यांचा मृत्यू 7 फेब्रुवारीला झाल्याचे औपचारिकरित्या कळविण्यात आले. वुहान केंद्रीय इस्पितळात ज्या सहा डॉक्टरचा ‘कोविड-19’मुळे मृत्यू झाला, त्यापैकीच डॉ. ली हे एक होत. वुहान केंद्रीय इस्पितळाला नंतर ‘व्हीसल ब्लोवर हॉस्पिटल’ असेही ओळखले जाऊ लागले. डॉ. ली यांच्या मृत्यूनंतर समाजमाध्यमांतून प्रचंड दुःख आणि संताप व्यक्त करण्यात आला. We Want Freedom Of Speech या मथळ्याखाली प्रचार मोहीम राबविण्यात आली. वीस लाख लोकांनी ही मोहीम पाहिली, पाच तासात 5,500 पोस्ट ‘शेअर’ करण्यात आल्या. वुहान केंद्रीय इस्पितळात नागरिकांनी पुष्पगुच्छ अर्पण केले. ‘द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनिझशन’ने ट्विटरवरून डॉ. ली यांना आदरांजली वाहिली. चिनी कम्युनिस्ट पक्षाने या प्रकरणी डॉ. ली यांच्या कुटुंबीयांकडे क्षमायाचना केली, असे म्हटले जाते.

कोविड-19’ रोग उद्रेकाची माहिती, मिथके व प्रचार

‘कोविड-19’ हा रोग उद्रेकाच्या प्रारंभी, समाजमाध्यमांतून विशेषतः ‘व्हाट्सअ‍ॅप फॉरवर्ड’मधून अधिक ठामपणे मांडण्यात येऊ लागले की, ‘कोविड-19’ हा हेतुपुरस्सर चीनद्वारा संक्रमित केला आहे, तो चीनच्या प्रयोगशाळानिर्मित आहे. तथापि, वैज्ञानिक पुराव्यानिशी सिध्द झाले की, हा व्हायरस नैसर्गिक उत्परिवर्तनातून निर्माण झाला आहे. चीनच्या ‘गुप्तधोरण’ पद्धतीमुळे या व्हायरसवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्याचा जगभर सत्वर प्रसार झाला व त्या बेजबाबदार कृत्यास चीनच जबाबदार आहे, असा प्रचार अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी प्रथम सुरू केला. जागतिक आर्थिक प्रभुत्व निर्माण करण्याच्या हेतूतून ‘कोविड-19’चे नियोजनबद्ध संक्रमण चीनने घडवून आणले आहे. सबब, चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही अनेक राष्ट्रांनी केले. मात्र आता अनेक महिने उलटल्यानंतरही जगातील सरकारे या रोग उद्रेकावर परिणामकारक नियंत्रण निर्माण करू शकलेली नाहीत. दुसर्‍या बाजूस, चुकीच्या माहिती प्रचाराचा संच विविध सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत होता, ‘ज्योतिष’ आणि ‘संख्याशास्त्रा’चे तथाकथित तज्ज्ञ लोक दावा करीत होते की, आम्ही या महामारीविषयी आणि तिच्या अंताविषयी पूर्वीच भविष्य वर्तवले आहेत. काही ‘स्वयंघोषित’ तज्ज्ञ मंडळी सकारात्मक ऊर्जेबाबत बोलत होते. भारताचे पंतप्रधान जनतेला केलेल्या प्रतीकात्मक आवाहनांबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया व स्पष्टीकरण देत होते. त्यांच्या प्रत्येक विधानामागे वैज्ञानिक आधार असल्याचे स्पष्टीकरण देत होते. गोमूत्र, शेण आणि पंचगव्याचा वापर केल्यास ‘कोविड-19’चा उद्रेक रोखला जाऊ शकतो, असे दावे प्रत्यक्ष व समाजमाध्यमांतून केले जात. अर्थात, हे सर्व उपाय कामाचे नाहीत, हे पुन्हा-पुन्हा सिद्ध होत होते. उपयुक्त लस व निश्चित औषधे यांच्या अभावामुळे अनेकजण घरगुती उपचारांसाठी प्रयत्न करीत आहेत. अशा मिथकीय परिप्रेक्ष्यात 27 मार्चमध्ये ‘लांसेन्ट’ या वैद्यकीय मासिकात या रोगाबाबत निवेदन प्रकाशित झाले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘कोविड-19’चे मूळ नैसर्गिक नाही, अशा कंड्या पिकवणार्‍या वादग्रस्त सिद्धांतांचा आम्ही एकत्रितपणे निषेध करतो. अनेक राष्ट्रांतील वैज्ञानिकांनी याबाबत संशोधन केले असून त्यांचा निष्कर्ष आहे की, कोरोना विषाणूचा उगम जंगलातून झालेला आहे. त्यांनी पुढे चिनी वैज्ञानिक समाजाचे अभिनंदनही केले आणि त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत या विषाणूविरोधातील लढाईत आम्हीही तुमच्यासोबत असल्याचे आश्वासन दिले.

वर्तमानात, या महामारी निवारणासाठी सामूहिक प्रयत्न; विशेषतः सार्वजनिक आरोग्यव्यवस्था अधिक बळकट व विस्तारित करणे अगत्याचे ठरेल. आधुनिक व वैज्ञानिक उपचार पद्धतीचा अवलंबच या रोगावर नियंत्रण करू शकेल.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]