देवसहायम यांचे संतपद आणि चमत्कार

अ‍ॅड. देविदास वडगावकर - 9423073911

नुकतेच केरळमधील 17 व्या शतकातील ख्रिस्ती धर्मगुरु ‘देवसहायम’ यांना पोपनी संतपद बहाल केले. यासाठी मागील वर्षी एका महिलेचा चमत्काराचा अनुभव ग्राह्य धरला गेला. 10 वर्षांपूर्वी मदर तेरेसा यांनाही संत पद देताना चमत्काराची अट होती. याविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पोप यांना पत्र लिहून याविषयी आपली भूमिका मांडली होती.

देवसहायम यांचे संतपद आणि चमत्कार’ यावर अंनिस उस्मानाबाद शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अ‍ॅड. देविदास वडगावकर यांचा लेख, त्यासोबत या विषयावर डॉ. हमीद दाभोलकर यांचा लेख आणि डॉ. दाभोलकर यांनी पोप यांना लिहिलेले पत्र वाचकांसाठी देत आहोत.

ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी नुकतेच देवसहायम पिल्लाई यांना ‘संत’ म्हणून घोषित केले. प्रथमच एखाद्या भारतीयाला असे संतपद मिळाले आहे. या आधी मदर तेरेसाना असे संतपद मिळाले होते. त्यांचे कार्यक्षेत्र जरी भारत असले तरी त्या मुळच्या भारतीय नव्हत्या. देवसहायम यांच्याबरोबर इतर नऊ जणांना संतपद बहाल करण्यात आलेले आहे.

हिंदू धर्मशास्त्रानुसार संतपद कोणी बहाल करण्याची गोष्ट नव्हे, तर सामान्य जनता संतपद बहाल करते. हिंदू धर्मानुसार त्यासाठी कोणतेही योग्य-अयोग्य निकष नाहीत. इतिहासकाळात हिंदूंमध्ये मोठी संतपरंपरा होती. ती अव्याहतपणे चालू आहे. हिंदू धर्मात सध्या तर संतपदाची वाटणी इतकी सवंग आहे की कोणीही संत, राष्ट्रसंत, संतशिरोमणी अशा उपाधीस पात्र ठरतो. हिंदू धर्मात असा कोणी एक धर्मगुरू असत नाही; त्यामुळे असेल कदाचित. एवढे मात्र खरे की, संतपद मिळवण्यासाठी हिंदू धर्मात कुठल्याही चमत्काराची गरज पडत नाही, म्हणजे चमत्कार आणि संतपद याचा हिंदू धर्मात तसा परस्पर संबंध नाही.

याउलट ख्रिश्चन धर्माची परिस्थिती आहे. ख्रिश्चन धर्मशास्त्रानुसार संतपद मिळण्यासाठी त्या व्यक्तीने आपल्या जीवनात लौकिक मानवतावादी कार्याबरोबरच काहीतरी अलौकिक चमत्कार केलेला असावा लागतो. थोडक्यात, अशा व्यक्तीकडे अलौकिक दैवी शक्ती आहे, अशी आख्यायिका प्रसृत व्हायला हवी, तरच ‘संत’ म्हणून व्हॅटिकनकडून तशी घोषणा केली जाते.

ज्या पहिल्या भारतीयाला संतपदाचा मान मिळाला आहे, ते देवसहायम पिलाई हे 1712 मध्ये कन्याकुमारी येथे हिंदू नायर कुटुंबात जन्मले. त्रावणकोरचे राजा मार्तंड वर्मा यांच्या दरबारात ते काम करत होते. त्याच दरम्यान त्यांचा डच नौदलाच्या कमांडरशी संपर्क आल्यानंतर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तो 1745 मध्ये. त्यानंतर त्यांनी आपले नाव ‘लेझररस’ म्हणजे ‘देवसहायम’ असे स्वीकारले. सर्व जाती-धर्मांचे लोक एकसमान आहेत, असा प्रचार त्यांनी त्या काळात केला. त्यामुळे उच्चवर्णीयांचा रोष पत्करून त्यांना 1749 मध्ये अटक झाली आणि 1752 मध्ये त्यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. वास्तविक, त्या काळात जाती-धर्मापलिकडचा एक समानतेचा संदेश देणे ही गोष्ट मोठी होती. कदाचित याच गोष्टीसाठी त्यांना दिले असते, तर मला तरी जास्त आनंद झाला असता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे तब्बल तीनशे-साडेतीनशे वर्षांनंतर त्यांच्या नावावर एक चमत्कार जमा झाला आणि मग त्यांना संतपद द्यायचे किंवा नाही, याबाबतचा निर्णय झाला.

त्याचे झाले असे की, भारतात 2013 मध्ये एक कॅथलिक महिला 24 आठवड्यांची गर्भवती असताना तिच्या पोटातील बाळाची हालचाल अचानकपणे थांबल्याचे तिला जाणवले, म्हणून तिने आपल्याला गुरुस्थानी असलेल्या देवसहायम पिलाई यांची आराधना केली आणि तिला असे जाणवले की, एका तासाच्या आत तिच्या बाळाचे हृदयाचे बंद पडलेले ठोके पुन्हा सुरू झाले. ही कृपा देवसहायम पिल्लई यांचीच असल्याची तिची समजूत झाली, यालाच चमत्कार समजले गेले. 1752 मध्ये मयत झालेला माणूस 2013 मध्ये चमत्कार करू शकतो, हीच गोष्ट चमत्कारिक आहे. परंतु तिला ख्रिश्चन धर्मशास्त्रज्ञांनी मान्यता दिली आणि पिलाई यांना संतपद बहाल केले गेले.

चमत्कार आणि विज्ञान याचे नाते अंधार आणि प्रकाश यासारखे आहे. जेथे विज्ञान आहे, तेथे चमत्काराला थारा नाही, अशी सैद्धांतिक मांडणी अनेक शास्त्रज्ञांनी केलेली आहे त्यात ख्रिश्चनही आहेत. परंतु त्यांना आपल्या धर्ममार्तंडांना ही गोष्ट समजून सांगणे शक्य झाले नाही. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या वीस वर्षात सुद्धा ख्रिश्चन धर्मगुरूंना समजून सांगता आली नाही, हे यानिमित्ताने सिद्ध झालेले आहे; म्हणजे एकाच धर्मात टोकाच्या विचारधारा असणारे लोक वावरत असतात. धर्म आणि धर्मगुरू अशी गंभीर गोष्ट आहे की, तिच्यावर प्रभाव पाडणे हे भल्याभल्यांना शक्य झाले नाही. शास्त्रज्ञांनाही ते शक्य झाले नाही. एकूण, ख्रिश्चन धर्माचा विचार करता एका बाजूला संशोधनाच्या, विज्ञानाच्या आणि आधुनिकतेच्या पातळीवर ही मंडळी खूप आघाडीवर असल्याचे जगात सांगितले जाते. ते खरेही आहे. त्याचबरोबर धर्म म्हणून ख्रिश्चन लोकांचा विचार केला तर ते अजूनही चमत्कारावर विश्वास ठेवणारे आहेत; किंबहुना चमत्कारावर विश्वास ठेवून मोठे पद बहाल करणे त्यांना योग्य वाटते, ही विसंगती विरोधाभास आहे.

भारतात येऊन सेवा करणार्‍या मदर तेरेसा यांनाही काही वर्षांपूर्वी संतपद बहाल करण्यात आले. त्यांच्याही नावावर चमत्कार असल्याचे दाखविण्यात आले, त्यावेळी महाराष्ट्रातील एका मान्यवर दैनिकाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. तेव्हा त्या दैनिकाच्या व्यवस्थापनाने आणि वाचकांनी एवढा दबाव आणला की त्या संपादकाला दुसर्‍याच दिवशी तो अग्रलेख परत घ्यावा लागला; (त्यावेळेस डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी पोप जॉन पॉल दुसरे यांना निषेधाचे पत्र लिहिले होते ते याच अंकात इतरत्र दिले आहे.) म्हणजे संघटित धर्म कशाप्रकारे दबाव आणत किती टोकाची भूमिका घेऊ शकतात, याचे हे उदाहरण होय.

एका बाजूला ख्रिश्चन धर्मातील लोक विज्ञानाच्या संशोधनात आघाडीवर होते, आहेत. चमत्कार जगात नसतात; जे असतात ती एकतर हातचलाखी, फसवणूक असते. त्यामागील विज्ञान अनेक संशोधकांनी उलगडून दाखवले आहे, त्यात अनेक ख्रिश्चन संशोधक आहेत. पण आपल्याच एका बांधवाने लावलेल्या शोधाला धर्ममार्तंड केराची टोपली दाखवतात, हा विरोधाभास मला विशेष जाणवला. धर्म ही किती मोठी शक्ती असू शकते, याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. धर्माच्या आधारे समाजाची, राष्ट्राची रचना होऊ नये, धर्माधिष्ठित राष्ट्र असू नये, असे म्हणणार्‍या धर्मनिरपेक्ष विचारधारेमध्ये सुद्धा ख्रिश्चन विचारधारेचे, ख्रिश्चन धर्म असणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासमोर देखील ख्रिश्चन धर्माचे आजचे स्वरूप; जे संतपद बहाल करण्याच्या निमित्ताने उघड झालेले आहे, ते मोठे आव्हान आहे. ख्रिश्चन धर्मातील या दोन टोकाच्या अंतर्विसंगत बाबी अधोरेखित करत वाचकांच्या समोर याव्यात व वाचकानी चमत्कारावर विसंबून न राहाता वैज्ञानिक सत्यावर आधारित आपले दैनंदिन आचरण करावे यासाठीच ख्रिश्चन धर्मातील या अंतर्विसंगतीवर मी प्रकाश टाकला आहे.

अ‍ॅड. देविदास वडगावकर

लेखक संपर्क – 94230 73911


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]