राजीव देशपांडे -
२३ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्रावर उतरले आणि भारताची चांद्रयान मोहीम यशस्वीपणे पार पडली, ही २०२३ सालातील सर्वांत महत्त्वाची आणि भारताच्या विज्ञान जगतासाठी अभिमानास्पद अशी घटना होती. भारतीय शास्त्रज्ञांनी मिळविलेले हे यश अवघ्या मानवजातीसाठीचे होते. या घटनेचा वापर करीत खरे तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसाराच्या मोहिमेचा देशभरात धडाका लावावयास हवा होता. पण भारतीय सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने घेणे, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) ने अभ्यासक्रमातून डार्विनच्या उत्क्रांतीवादासारख्या मूलभूत संकल्पना वगळणे, इथल्या प्रसारमाध्यमांनी बुवा-बाबा ज्योतिषी तथाकथित साधू संतांच्या अवैज्ञानिक वक्तव्यांना, कृत्यांना, वक्तव्यांना प्रसिद्धी देत राहणे, २०१४ पासून अशा प्रकारच्या विधानांना सत्ताधार्यांची मान्यता मिळू लागणे. त्यामुळे या वक्तव्याच्या सुरात ‘इस्रो, आयआयटी’सारख्या संस्थांतील वैज्ञानिक, प्राध्यापकही आपला सूर मिसळू लागले आहेत. त्यामुळे बुवा- बाबांच्या बुवाबाजीला तसेच छद्मविज्ञानालाच चालना मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे, ह्या आपल्या घटनेतील कलमालाच आव्हान मिळू लागले आहे आणि २०२४ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या विवेकवादी चळवळींना या आव्हानाला सामोरे जाणे भाग आहे. या दृष्टीने आम्ही या वर्षी विविध शास्त्रज्ञ, विवेकी विज्ञानवादी विचारवंत आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा म्हणून कार्य करणारे कार्यकर्ते यांच्याकडून वैज्ञानिक दृष्टिकोनाचे विविध पैलू ‘अंनिवा’च्या वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तथाकथित ‘विकासा’च्या हव्यासापायी पर्यावरण आणि निसर्गावरील अतिक्रमण दिवसेंदिवस भयावह पद्धतीने वाढत चालले आहे. एका बाजूला नैसर्गिक परिसंस्थांचा विध्वंस तर दुसर्या बाजूला वाढत्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उर्जेचा अनिर्बंध वापर, त्यातून वाढत्या कार्बन डाय ऑक्साइडसारख्या घातक वायूची निर्मिती. त्यामुळेच आज केवळ आपल्या देशासमोरच नव्हे, तर एकूणच जगापुढे जागतिक तापमानात होणार्या वाढीचे, हवामानातील बदलाचे जबरदस्त आव्हान उभे आहे. संपूर्ण जगालाच अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. त्याचा जबरदस्त फटका गरिबांना बसत आहे. दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्नमेंट’ ही संस्था हवामानाच्या अतिरेकी घटनांतून येणार्या आपत्तीची दिनदर्शिका प्रसिद्ध करते. त्यानुसार २०२२ मध्ये भारताला ३६५ दिवसांपैकी ३१४ दिवस तीव्र हवामानाच्या घटनांना तोंड द्यावे लागले. त्यात ३०२६ जणांचा मृत्यू झाला, २० लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. तर २०२३ मध्ये ९ महिन्यांच्या २७३ दिवसांपैकी २३५ दिवस तीव्र हवामानाच्या घटनांना तोंड द्यावे लागले. त्यामध्ये २९२३ जण मृत्युमुखी पडले आणि १९ लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. (लोकरंग-१०डिसेंबर, २०२३, अतुल देऊळगावकर यांचा लेख) या पर्यावरणीय संकटाची जाणीव करून देणारे आणि त्यावरील उपायांची चर्चा वैज्ञानिक दृष्टिकोनातून करणारे लेख देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
हल्ली फसव्या विज्ञानाचे प्रस्थ खूपच वाढले आहे. आजच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीमुळे निर्माण होणार्या ताणतणावांवरील उपाय आणि तोडगे आधुनिक वैज्ञानिक भाषा वापरत सांगून त्याद्वारे फसवणूक, शोषण करणार्या फसव्या विज्ञानाची चिकित्सा करणार्या लेखातून वाचकांना फसव्या विज्ञानाचे सत्य स्वरूप कळून येईल. या बरोबर अर्थकारण, आहार आणि लिंगभाव या संदर्भातील सदरेही वाचकांच्या भेटीला येतील. बुवाबाजीच्या विरोधातील संघर्षाचे रिपोर्ताज, संघटनेच्या कार्यक्रमांचे वार्तांकन वगैरे नेहमीची सदरे असतीलच.