बिनभिंतीची डिजिटल शाळा – डॉ. नरेंद्र दाभोलकर लोक विद्यापीठ

रमेश माने -

आजचे युग हे डिजिटल आणि तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. माहितीचा स्फोट, इंटरनेटची व्याप्ती, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑनलाइन शिक्षण, सोशल मीडियाचा प्रभाव या सगळ्यांमुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. ज्ञानाचे स्रोत आता काही मोजक्या लोकांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत; उलट, ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आज उपलब्ध झाले आहेत. मात्र, या डिजिटल क्रांतीसोबत एक मोठे आव्हानही निर्माण झाले आहे. माहितीबरोबरच चुकीची माहिती, अफवा, अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक विचारसरणीही तितक्याच वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत समाजाला विवेक, विज्ञाननिष्ठा आणि तर्कशुद्ध विचारांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) गेल्या ३८ वर्षांपासून समाजमनाला विवेकी दिशा देण्याचे कार्य सातत्याने करत आहे. अंधश्रद्धा, भोंदूगिरी, चमत्कार याविरुद्ध जनजागृती करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. या कार्याचा केंद्रबिंदू म्हणजे, लोकांमध्ये प्रश्न विचारण्याची सवय निर्माण करणे, निरीक्षण वृत्ती विकसित करणे आणि श्रद्धेपेक्षा तर्काला महत्त्व देण्याची जाणीव जागृत करणे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी त्यांच्या हयातीमध्ये शोषण, फसवणूक व दिशाभूल करणार्‍या अंधश्रद्धांना विरोध, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार, धर्माची विधायक व कालसुसंगत चिकित्सा, संत व समाज सुधारकांचा कृतिशील विचार वारसा व परिवर्तनाच्या विचाराशी स्वतःला जोडून घेणे ही पंचसूत्री घेऊन काम केले. समाजाला विज्ञान, विवेक आणि मानवतावादाचा पर्याय दिला. डॉ. दाभोलकर यांचा  विचार वारसा पुढे नेण्यासाठी आणि डिजिटल युगाशी सुसंगतपणे अधिक व्यापक पातळीवर जोडून घेण्यासाठी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर लोक विद्यापीठ’ ही संकल्पना आकारास आली.

हे लोक विद्यापीठ म्हणजे केवळ एक शैक्षणिक प्लॅटफॉर्म नसून एक विचारप्रवाह आहे. हे एक असे विचारपीठ आहे, जे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवते, त्यांना विचार करायला प्रवृत्त करते आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्यासाठी प्रेरित करते. आजच्या डिजिटल युगात, जेथे प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे, इंटरनेट उपलब्ध आहे, याच संधीचा फायदा  घेत, ह्या विद्यापीठात ऑनलाइन स्वरूपात विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या लोक विद्यापीठाची महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, त्याचे बहुभाषिक स्वरूप. भारत हा विविध भाषांचा देश आहे. त्यामुळे ज्ञान जर फक्त काही निवडक भाषांमध्ये मर्यादित राहिले, तर मोठा समाजघटक त्यापासून वंचित राहतो. हे लक्षात घेऊन https://anisvidya.org.in/ या प्लॅटफॉर्मवर एकूण  २४८ भारतीय व परकीय भाषांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील, अल्पशिक्षित, तसेच मातृभाषेत शिकण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसह परकीय भाषा जाणणारे व परदेशातील लोकांना हे शिक्षण सहज उपलब्ध होणार आहे.

या अभ्यासक्रमांची रचना अत्यंत सुबोध, सुसंगत आणि परिणामकारक पद्धतीने करण्यात आलेली आहे. सध्या या लोक विद्यापीठाच्या संकेत स्थळावर ६ कोर्सेस उपलब्ध आहेत. प्रत्येक कोर्स सुमारे २००० शब्दांचा असून, त्यामध्ये विविध उपघटकांचा समावेश आहे. विषयाचे सखोल आकलन व्हावे यासाठी उदाहरणे, संदर्भ, वास्तव जीवनातील घटना आणि वैज्ञानिक स्पष्टीकरण यांचा योग्य समन्वय साधलेला आहे. त्यामुळे केवळ माहिती देण्यावर भर न देता, समज वाढवण्यावर आणि विचारक्षमतेला चालना देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे. लवकरच आणखी १० कोर्सेस उपलब्ध होतील.

या अभ्यासक्रमांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यामध्ये दिलेली बहुपर्यायी प्रश्नपत्रिका. कोणत्याही शिक्षण प्रक्रियेत मूल्यांकन हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. या प्रश्नपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांना त्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाची चाचणी घेता येते. यामध्ये प्रमाणपत्र मिळवण्यासठी ५०% गुणांची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. आपल्यला ५० % पेक्षा कमी गुण मिळाले तर परत परत वाचन करून ही परीक्षा देता येते व प्रमाणपत्र मिळवता येते. वेळोवेळी परीक्षा दिल्याने  विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्याची प्रेरणा मिळते. या परीक्षेत पात्र झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रख्यात लेखक आणि विचारवंत अच्युत गोडबोले यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र त्या व्यक्तीने वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकनिष्ठ विचारसरणी अंगीकारण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे, याची साक्ष देणारे प्रतीक आहे.

या लोक विद्यापीठात प्रवेश घेण्यामागील उद्दिष्टे अत्यंत स्पष्ट आणि समाजाभिमुख आहेत. सर्वप्रथम, विज्ञान आणि तर्कशुद्ध विचार शिकणे हे या उपक्रमाचे प्रमुख ध्येय आहे. आजच्या काळात, अनेकजण अंधश्रद्धेच्या आहारी जातात, कारण त्यांच्याकडे योग्य माहिती आणि तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता विकसित झालेली नसते. या अभ्यासक्रमांमुळे ही कमतरता दूर होण्यास मदत होते.

दुसरे म्हणजे, या कोर्सेसमुळे व्यक्तीची विचारशक्ती, विश्लेषण क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता यामध्ये वाढ होते. त्यामुळे तो केवळ अंधश्रद्धेपासून दूर राहात नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात अधिक सक्षम बनतो.

तिसरे म्हणजे, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात पारंगत होणे. जे लोक या क्षेत्रात काम करू इच्छितात, त्यांच्यासाठी हे कोर्सेस पायाभूत प्रशिक्षण आहेत. त्यांना विविध अंधश्रद्धांचा अभ्यास, त्यामागील सामाजिक व मानसशास्त्रीय कारणे, त्यावरील उपाययोजना याबाबत सखोल माहिती मिळते.

चौथे आणि सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे, विवेकी आणि अंधश्रद्धामुक्त समाजाची निर्मिती. कोणताही समाज प्रगत होण्यासाठी त्यातील नागरिक विवेकी असणे आवश्यक आहे. जेव्हा लोक अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त होतात, तेव्हाच ते खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याचा अनुभव घेतात. या सर्व कार्यामागे भारतीय राज्यघटनेतील कलम ५१ (अ) (ह) मध्ये नमूद केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी यांचा अंगीकार करण्याचे कर्तव्य हे मूलभूत तत्त्व आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, प्रश्न विचारणे, नव्या गोष्टींचा शोध घेणे आणि समाजातील चुकीच्या प्रथांना विरोध करणे हे त्याचे कर्तव्य आहे. या लोक विद्यापीठाच्या माध्यमातून हे कर्तव्य पार पाडण्याची एक सशक्त संधी उपलब्ध होत आहे. डिजिटल युगात शिक्षणाचे स्वरूप बदलत आहे. पारंपरिक वर्गखोल्यांच्या मर्यादा ओलांडून, आता शिक्षण आपल्या हातात आले आहे. अशा वेळी, जर या माध्यमाचा वापर केवळ मनोरंजनासाठी किंवा निरर्थक माहितीच्या उपभोगासाठी केला गेला, तर त्याचा समाजावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण जर त्याच माध्यमाचा उपयोग विवेक, विज्ञान आणि मानवतावाद प्रसारासाठी केला, तर तो समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी साधन ठरू शकते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर लोक विद्यापीठ हे त्याच दिशेने उचललेले  एक महत्त्वाचे  पाऊल आहे. हे विद्यापीठ केवळ ज्ञान देत नाही, तर विचार करायला शिकवते. हे केवळ माहिती पुरवत नाही, तर विवेक जागृत करते. व्यक्ती व समाज बदलासाठीचे समाजमन तयार करते.

आजच्या काळात, सोशल मीडियावर अफवा, अंधश्रद्धा, अवैज्ञानिक दावे मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत, तेव्हा अशा उपक्रमांची गरज अधिकच वाढली आहे. लोकांनी कोणतीही माहिती अंधपणे स्वीकारू नये, तर तिचे परीक्षण करावे, तिच्यामागील वैज्ञानिक सत्य समजून घ्यावे, ही जाणीव निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक जागरूक नागरिकाने या लोक विद्यापीठात प्रवेश घेणे ही केवळ वैयक्तिक प्रगतीची संधी नसून, सामाजिक जबाबदारी देखील आहे. आपण स्वतः विवेकी बनलो, तर आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात, समाजातही त्या विचारांचा प्रसार व्हायला मदत होते. अशा प्रकारे, एक साखळी निर्माण होते आणि हळूहळू संपूर्ण समाज बदलाची प्रक्रिया सुरू होते.

शेवटी, असे म्हणता येईल की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरू केलेले हे लोक विद्यापीठ म्हणजे आधुनिक काळातील एक ज्ञानयज्ञ आहे. या यज्ञात सहभागी होणे, हे प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य आहे. चला, आपण सर्व जण या ज्ञानप्रवासाला सुरुवात करू या, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारू या आणि विवेकी, प्रगतीशील भारत घडवण्यासाठी आपले योगदान देऊ या.

-रमेश शकुंतला दौलतराव माने
कार्यवाह, डॉ. नरेंद्र दाभोलकर लोक विद्यापीठ
संपर्क : ८२७५९२४१७२


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]