व्यथा मांडणारा मांडो फक्त तो व्यथेच्या खोलीचा मिळो…

प्रथमेश पाटील -

प्रसिद्ध पॅलेस्टिनी लेखक आणि विचारवंत एडवर्ड सैद त्यांच्या ‘रिफ्लेक्शन्स ऑन एक्झाईल अँड अदर एसेज’मध्ये लिहितात-

निर्वासित अवस्थेचा विचार करणं काहीसं रोचक असलं, तरी त्याचा प्रत्यक्ष अनुभव भयंकर असतो. ती एक न भरता येणारी दरी असते, जी एका मनुष्य आणि त्याच्या मूळ भूमीवर लादलेली असते. त्याच्या ‘स्व’ आणि त्याच्या घरामध्ये लादलेली असते: तिचं अंतर्भूत दुःख कधीही पचवलं जाऊ शकत नाही. हे जरी खरं असलं की साहित्य आणि इतिहासात निर्वासित नायकांच्या कथांमध्ये रोमांचक, गौरवशाली, अद्भुत नायकत्व चित्रित झालेलं आहे, तरी हे सर्वकाही फक्त मायभूमीपासून दुराव्याच्या दुःखावर मात करण्याचे प्रयत्न मात्र असतात.”

‘काश्मीर फाईल्स’ या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित चित्रपटावरून नुकताच वादंग उठला आहे. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीपासून काश्मिरी पंडितांच्या काश्मीर खोर्‍यातून झालेल्या निर्वसनाची इजा ही आधुनिक भारताच्या इतिहासातल्या फाळणीनंतरच्या अनेक भळभळत्या जखमांपैकी एक.

हजारो वर्षं जिथं एखादा समूह जगतो, वाढतो, समृद्ध होतो, त्या जमिनीशी; अर्थातच जडलेलं नातं कोणत्याही इतर भावनिकतेहून, ओळखीतून जास्त घट्ट, जास्त नैसर्गिक आणि जास्त सेंद्रिय असतं. ती मानवनिर्मित ओळख नसते; उलट तीच त्या व्यक्तीची मानवता निर्माण करते, तिला आकार देते. विस्थापन, स्थलांतर आणि निर्वसनात आपण अनेकदा गफलत करतो. स्थलांतर स्वेच्छेनं केलं जातं, विस्थापन संकटांमुळं किंवा काही कारणांमुळं घडतं; तर निर्वासन तुमच्यावर लादलं जातं, व्यवस्थेकडून, इतरांकडून. आणि अशा आपल्या जमिनीशी ताटातूट जेव्हा एखाद्यावर लादली जाते, तेव्हा त्याचं दुःख हे कुठंतरी खोल कुरतडणारं आणि एखाद्याला आजन्म हतबलतेचा अनुभव देणारं ठरतं.

हजारो वर्षं जिथे एखादा समूह जगतो, त्या जमिनीशी जडलेलं नातं कोणत्याही इतर भावनिकतेहून, ओळखीतून जास्त घट्ट आणि जास्त सेंद्रिय असतं.

काश्मिरी पंडितांचे अनुभव याहून खचितही वेगळे नसावेत. आपल्या जमिनी, आपली संस्कृती, आपली घरं, आपल्या आठवणी आणि आपल्या माणसांपासून ताटातूट होऊन दूर कुठेतरी आपली घरटी पुन्हा उभी करण,ं यामागचं दुःख आपल्या जमिनीच्या सान्निध्यात सुरक्षित राहणार्‍या भारतातील इतर राज्यांतील जनतेसाठी मात्र एक कल्पना असू शकते. तिची वेदना फक्त उसनी घेऊन अनुभवता येऊ शकते. या वेदनेची कथा सांगता येणं, हे कुठल्याही निर्वासित समूहासाठी जखमेवरचं औषध नसलं तरी किमान एक अलवार फुंकर तरी ठरूच शकते…आणि म्हणूनच अशा कथा सांगताना, ती कथा सांगणारा कथाकार त्या संवेदनेचा असावा लागतो, जो त्यांच्या वेदनेचा विच्छेद करणार नाही, तर तिला न्याय देईल. काश्मिरी पंडितांच्या दुर्दैवाने त्यांचा सर्वांत प्रसिद्ध कथाकार त्यांच्या वेदनेची जबाबदारी घेण्याच्या खोलीचा निघाला नाही.

काश्मिरी पंडितांचं दुःख आणि त्यांची सल ही जगाच्या इतिहासात अनेक शोषकांच्या, अनेक हिंसात्मक संघर्षांच्या आणि अनेक राजकीय डावपेचांच्या मानवी भरपाईची किंमत मोजणार्‍या समूहांपैकीच आहे. आपल्याच घरात परका झालेला पॅलेस्टिनी, त्यांच्या घरापासून दूर जमिनीवर गुलाम झालेले आफ्रिकन्स, आपला तरंगता संसार घेऊन देशोदेशी भटकणारे रोहिंग्ये आणि हिंसेच्या सावटात उद्ध्वस्त झालेले लॅटिन अमेरिकी निर्वासित, या सर्वांच्या कथा वेगवेगळ्या आहेत; मात्र त्यांच्या कथांची सूत्रं एकसमान आहेत, त्यांच्या वेदनेचा आशय तोच आहे; आणि तो म्हणजे आपल्या जमिनीशी ताटातूट होण्याचं दुःख.

जगभरात या दुःखांचा आशय हा एका जागतिक संवेदनेच्या भावनेतून सर्वांनाच तिचा अनुभव घेता यावा म्हणून कला आणि साहित्य ती भावना उधार घेतात.

या दुःखांची मांडणी अनेक प्रकारे झाली आहे. जगभरात या दुःखांचा आशय हा एका जागतिक संवेदनेच्या भावनेतून सर्वांनाच तिचा अनुभव घेता यावा म्हणून मघाशी म्हटल्याप्रमाणं कला आणि साहित्य ती भावना उधार घेतात. कोणी कितीही आणि कोणताही सिनेमा पाहून किंवा पुस्तक वाचून कितीही रडलं, कितीही अस्वस्थ झालं, तरी त्याला त्या मूळ दुःखाची अनुभूती आली, असं म्हणताच येऊ शकत नाही. कारण ते केवळ अशक्य आहे.

आणि अशावेळी मग अशा दुःखाची व्यक्तता करणारी कला, कथा हिचा उद्देश काय असू शकतो? तिचा उद्देश हा असू शकतो का, की त्या कथेत असलेली हिंसा, क्रौर्य आणि द्वेष यांची पुनर्निर्मिती व्हावी? तिचा उद्देश हा असू शकतो का, की ज्या माणसांची ती कथा आहे, त्यांचं जे दुःख आहे, त्या कथेच्या माध्यमातून ते दुःख कोणाच्या तरी नशिबी पुन्हा यावं? वेदनेची कथा सांगणारी कला ही या जगात आणखी वेदनेच्या निर्मितीसाठी सांगितली जाऊ शकत असते का? आणि तशी सांगितली जात असेल तर तिचा उद्देश खरंच त्या मूळ वेदनेला न्याय देण्याचा असू शकतो का?

‘काश्मीर फाईल्स’ ही एका अशा व्यक्तीने लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली ‘कला’ आहे. जो स्वतः काश्मिरी पंडित नाही, ज्याला काश्मीरमध्ये नक्की काय झालं, याचा ना प्रत्यक्ष, ना अप्रत्यक्ष अनुभव आहे, ना त्याची काश्मीरच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची दावेदारी आहे आणि ज्याचा ही कथा सांगण्यामागचा हेतूच संशयास पात्र आहे, अशा वेळी कोणत्याही सूज्ञ समाजाला हे तपासण्याची गरज असते की, ही कथा त्या निर्वासितांच्या न्यायासाठी आहे की त्यांच्या वेदनेचा एखाद्या हेतूसाठी, अपमान करण्यासाठी?

काश्मिरी पंडितांची कथा सांगितली जाणं महत्त्वाचं नाही का? तर ते नक्कीच महत्त्वाचं आहे. 4 लाख व्यक्तींना त्यांच्या मातीचा निरोप घेत निर्वासित व्हावं लागणं, ही एक अवर्णनीय मानवी शोकांतिका आहे. तिची वाच्यता व्हायलाच हवी. ती कथा आपण अनुभवायलाच हवी आणि त्यामुळंच त्या कथेचा संदर्भ, तिची योग्य प्रस्तुती महत्त्वाची ठरते.

2020 मध्ये विधू विनोद चोप्रा, या स्वतः काश्मिरी पंडित परिवारात जन्मलेल्या दिग्दर्शकानं ‘शिकारा’ ही फिल्म प्रस्तुत केली. तिची कथा राहुल पंडिता या काश्मिरी पंडित लेखक-पत्रकाराच्या पुस्तकावर आधारित होती. दोन काश्मिरी पंडित आपली वेदना एका सुंदर सिनेमातून सांगत होते. ते सांगत होते की, त्यांची मायभूमी, त्यांची ‘वादी’, त्यांचं काश्मीर कसं होतं! ते सांगत होते की त्यांचे शेजारी कसे होते, त्यांची ‘कश्मिरीयत’ काय होती आणि ते सांगत होते की त्यांची ती ओळख, त्यांची जमीन त्यांच्याकडून कशाप्रकारे हिरावून घेतली गेली. मात्र 2020 मध्ये कुठेही या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर ‘गोली मारो सालों को…’ च्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत, कुठेही मुसलमानांच्या कत्तलीच्या चर्चा झाडल्या नाहीत. कारण त्या कथेतून दर्शवलेली वेदना काश्मिरी पंडितांच्या दुःखाची व्यक्तता होती. ते दुःख पाहून जर कोणाला सर्वांत पहिली भावना ‘ते’ क्रौर्य आणखी कोणावर तरी करावं, हे मनात येत असेल तर ती फक्त विकृती असली असती. ‘शिकारा’ पाहून तुम्हाला अशी कोणतीही क्रोधाची भावना दाटून येणार नाही. तुम्हाला राग जरूर येईल. तुम्हाला यातली हिंसा पाहून स्वतः हिंसक होण्याची इच्छा होणार नाही. तुम्हाला यामध्ये हिंसेचे संदर्भ दिसतील, माणसांची माणुसकी दिसेल, निर्वासितांची पीडा दिसेल आणि साध्यासुध्या माणसांचा आपमतलबीपणादेखील दिसेल. हे सर्व एका मोठ्या, व्यापक पटावर पाहताना तुम्हाला या दिग्दर्शकाची आणि लेखकाची आत्मीक वेदना जाणवेल आणि सिनेमा संपेपर्यंत डोळ्यांत दाटलेले अश्रूंचे काही थेंब असतील आणि मनात काश्मिरी पंडितांसाठीच्या न्यायाची अपेक्षा असेल.

‘काश्मीर फाईल्स’ तसा नाही. म्हणायला तो सत्य घटनांवर आधारित आहे, म्हणायला त्यातील सर्व घटना सत्य आहेत; मात्र त्यातली अभिव्यक्ती आत्माहीन आहे. त्यातील आशय काश्मिरी पंडित आणि त्यांची वेदना यांचा थांगपत्ताही नसलेल्या एका व्यक्तीच्या हातून निर्माण झाल्याचं दिसतं. त्यातली हिंसा मनामध्ये करुणा निर्माण करण्यासाठी नाही, तर एका विशिष्ट दिशेनं त्या हिंसेची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीनं दर्शवली गेली आहे. अनेक संदर्भ गाळत, अनेक व्यक्तींची पात्रांमध्ये सरमिसळ करत एका विकृत हेतूने निर्माण केलेली ही अभिव्यक्ती आहे. हिंदी सिनेमामध्ये ज्या प्रकारे बलात्कारदेखील लैंगिक भावना चाळवण्यासाठी ज्या अतिरंजित पद्धतीनं दाखवला जातो, या सिनेमातील हिंसादेखील तशीच आहे. ती सत्य आहे; मात्र तिची प्रस्तुती आणि चित्रण खोडसाळ आहे, चेतवणारं आहे. हा म्हणजे आपल्या देशबांधवांचं दुःख ‘उधार’ घेऊन त्याच्या विद्रुपीकरणातून आपल्या मनातील इतर देशबांधवांविरोधातलं शत्रुत्व साध्य करण्याचा कुटिलपणा झाला. तुम्ही तुमच्या मनातील द्वेष सिद्ध करण्यासाठी त्या कलाकृतीचं निमित्त करत असता. हा एका अर्थानं काश्मिरी पंडितांचा, त्यांच्या दुर्दैवाचा अपमान ठरतो. आपल्यासारख्या सभ्य समाजाला हे शोभणारं नाही.

दुसरीकडं, आज ‘काश्मीर फाईल्स’ पाहून हतबल वाटून घेणार्‍या, कष्टी झालेल्या प्रागतिक, पुरोगामी विचारांच्या आणि सद्भावना इच्छिणार्‍या व्यक्तींनी विचार करायला हवा. हे का झालं? ही परिस्थिती का ओढावली? अशी सर्वसाधारण भावना का निर्माण झाली किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती का निर्माण ‘करता’ आली की काश्मिरी पंडित हा विषय दडपला गेला? त्याला न्याय मिळाला नाही? जर 2020 मध्ये ‘शिकारा’ इतका प्रसिद्ध झाला असता, त्याबाबत इतकी चर्चा केली गेली असती, राहुल पंडितांच्या पुस्तकावर चर्चा झाली असती, काश्मीरच्या वेदनेवर सांगोपांग मांडणी झाली असती, तर आज कोणत्या विखारी मांडणीला प्रतिसाद मिळण्याची जागा निर्माण झाली असती का? सरतेशेवटी या सर्व लिखाणाचा उद्देश हा तुम्ही ‘काश्मीर फाईल्स’ पाहावा की न पाहावा, याबाबत नाही. या लेखनाचा उद्देश काश्मिरी पंडितांचं कथानक चीड आणणारं नाही, असं म्हणणं हादेखील नाही आणि काश्मीर प्रश्नावर कुठलंही मत मांडणं, हादेखील नाही. तुम्ही ‘काश्मीर फाईल्स’ जरूर बघा. मात्र थोडा वेळ काढून ‘शिकारा’देखील बघा. ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर तो उपलब्ध आहे. या दोन्ही गोष्टींना लागोपाठ बघा आणि तुम्हीच अर्थ लावा, काश्मिरी पंडितांच्या वेदनेचा अर्थ लावून पाहा आणि विचारा स्वतःला की, ‘शिकारा’मधली वेदना पाहून आमचा आक्रोश का झाला नाही? आम्ही ‘शिकारा’ला अमान्य का केलं? आणि विचारा स्वतःला की, काश्मिरी पंडितांना त्यांच्या कथेचा सर्वांत प्रसिद्ध कथाकार त्यांना कसा मिळायला हवा होता?

(साभार : इंडी जर्नल)

लेखक संपर्क : 97300 06091


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]