कोरोना काळात मुलांचा वाढलेला ‘स्क्रीन टाईम’

मुक्ता चैतन्य - 9823388828

कोविड महामारीने आपल्या आयुष्यात विविध स्तरांवर उलथापालथ केली आहे. आपल्या जगण्याचा ढंग आणि पोतच पुरता बदलून टाकला आहे आणि गेल्या वर्षभरात घडलेल्या अनेक नकोशा गोष्टींमध्ये अजून एका गोष्टीची भर पडलेली आहे, ती म्हणजे आपला सगळ्यांचाच वाढलेला ‘स्क्रीन टाईम!’

‘आता वर्क फ्रॉम होम आहे, तर करणार काय ना, दिवसभर ‘ऑनलाईन’च असतो. मग ऑफिसच्या कामातून मोकळीक मिळाली की, रिलॅक्स होण्यासाठी एखादा गेम, नाही तर ‘सोशल मीडिया.’ पालकांकडून सहजच दिलं जाणारं एक्सक्यूज.. हो, एक्सक्यूजच! हे कितीही टोकदार वाटलं तरी परिस्थिती अशीच आहे. बरं, हे फक्त पालक म्हणताहेत का? तर, नाही! मुलंही पालकांच्या पाठोपाठ त्यांचीच री ओढायला कधीच शिकली आहेत. कुणी, कुणाला, काय समजावून सांगायचं, हा प्रश्नच आहे, इतकी एकुणात ‘स्क्रीन टाईम’ची परिस्थिती बिकट आहे. ‘ओएलेक्स इंडिया’ने मध्यंतरी एक सर्वेक्षण केलं होतं, त्यात सहभागी झालेल्या पालकांपैकी 50 टक्के पालकांचं म्हणणं होतं की, महामारीच्या काळात आणि आता नंतरही अशैक्षणिक कारणांसाठीचा मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ जवळपास पाच तासांनी वाढलेला आहे; म्हणजे शाळा आणि विविध प्रकारचे क्लास वगळता मुलं दिवसाकाठी जवळपास 5 तास ‘ऑनलाईन’ असतात. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे महामारीच्या आधी मुलांचे पाच-एक तास शाळेतच जायचे. एखाद-दोन तास क्लास, मग उरलेल्या वेळात अभ्यास आणि स्क्रीन, अशी विभागणी होती. पण आता काय झालंय, शाळा आणि क्लासेस तर ऑनलाईन आहेतच; पण मुलांच्या गप्पा, वाढदिवसाच्या पार्ट्या, त्यांचे कट्टे आणि छंद वर्गही ऑनलाईनच आहेत. त्यामुळे शाळा आणि या सगळ्या गोष्टी झाल्यावर जो काही वेळ मुलांकडे उरतो, त्यात करायचं काय, हा मोठा प्रश्न असल्याने बर्‍याचदा मुलं ऑनलाईन गेमिंग, यू ट्यूब, ओटीटी प्लॅटफॉर्म्स बघण्यात व्यस्त असतात.

हीच आणि अशीच परिस्थिती पालकांचीही आहे. पालकांचं त्रांगडंही भलतंच होऊन बसलं आहे. त्यात त्यांचीही चूक आहे, अशातला भाग नाही. गेली सहा-आठ महिने सगळे घरात डांबलेले होतो. मुलांबरोबर कलात्मक गोष्टी घरात करा, त्यांना रोज नवनवीन कामात गुंतवून ठेवा, हे सांगणं, लिहिणं खूप सोपं आहे; आदर्शवादी पण आहे. परंतु प्रत्यक्षात प्रत्येक पालकाकडे सतत काहीतरी नवं आणि क्रिएटिव्ह करण्यासाठी लागणारी ऊर्जा, कल्पनाशक्ती असेलच असं नाही. या संपूर्ण काळात मोठी माणसं प्रचंड दमत होती. मग ती अनपेक्षितपणे कराव्या लागलेल्या घरकामाने असेल किंवा एकूण कोविडमुळे निर्माण झालेल्या ताणामुळे; अशात ‘बघ बाबा तुला काय बघायचं ते; पण भुणभुण करू नकोस,’ असं म्हणणं खूप स्वाभाविक होतं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झालाय की, पालक, मुलं, घरातले ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांचाच ‘स्क्रीन टाइम’ प्रचंड वाढलेला आहे.

थोडक्यात काय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत संपूर्ण कुटुंबच ‘स्क्रीन’मध्ये अडकलेलं आहे. मोठ्यांवर याचे परिणाम होतातच; पण लहान मुलांवरही याचे फार गंभीर परिणाम होऊ शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे परिणाम मनोसामाजिक आहेत, शारीरिकही आहेत. एक छोटं उदाहरण देते. गेमिंगमध्ये अनेकदा ‘रोल प्लेज’ असतात: म्हणजे गेम खेळताना खेळणार्‍याने एखादी व्यक्तिरेखा उसनी घ्यायची असते. मग ते उसनी व्यक्तिरेखा स्त्री किंवा पुरुष काहीही असू शकतं. या व्यक्तिरेखेला स्वभाव असतो, रंग-रूप असतं, बांध्याची ठेवण असते, कपडे, अ‍ॅक्सेसरिज; वॉर गेम असेल तर शस्त्र किंवा इतर साधनसामग्री या व्यक्तिरेखेकडे असते. खेळणारा तो खेळ खेळण्यापुरता ती व्यक्तिरेखा झालेला असतो; पण मुलांसाठी, विशेषतः जी मुलं सातत्याने गेमिंग करतात, त्यांच्यासाठी तो आभास राहत नाही. ते त्यांचं समांतर वास्तव तयार होतं आणि तो एक आभासी खेळ आहे आणि आपण त्यात जे काही बनलेलो आहोत, तो फक्त एक आभास आहे, एक ‘इमॅजिनेशन’ आहे, हे मुलं हळूहळू विसरायला लागतात आणि खरं जग आणि आभासी जग यातलं अंतर कमी-कमी होतं जातं. मुलांना त्या समांतर वास्तवात घडणार्‍या गोष्टीच खर्‍या आयुष्यतही हव्या-हव्याशा वाटायला लागतात आणि गडबड होते. यातूनच इंटरनेटवरील अवलंबित्व (इंटरनेट डिपेंन्डसी) तयार होते. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी मुलं इंटरनेटवर अवलंबून राहायला सुरुवात होते. शाळेत एखादा निबंध लिहायचा आहे, उघड ‘गुगल मावशी’ आणि कर सर्च. बरं, हे ‘सर्फिंग’ फक्त माहिती गोळा करण्यापुरतं राहत नाही, तर मुलं निबंधच्या निबंध उतारवायला सुरुवात करतात. ‘कॉपी-पेस्ट’ची सवय मुलांना आपण पालकच लावतो का, हाही मुद्दा आहेच. कालपर्यंत सायन्स प्रोजेक्ट्स बाजारातून विकत आणणारे पालक आज ‘गुगल’वरून निबंध कॉपी-पेस्ट करायला त्यांच्याही नकळत मुलांना शिकवताहेत. मुळात या सगळ्यात आपण आपला विचार करणं किंवा ‘गुगल’वरून जे काही वाचलं त्यावर आपलं मत काय आहे, ते ठरवून मग ‘गुगल’वरून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वतःच्या भाषेत निबंध लिहिणं, ही सगळी विचारांची, आकलनाची जी प्रक्रिया अपेक्षित असते, तीच आपण इथे जवळपास ‘डिलीट’ करून टाकतो.

आज कुठल्याही लहान-सहान कामांसाठी आपण आज इंटरनेटवर अवलंबून आहोत. मोठे तर आहेतच आहेत आणि त्यांचं बघून लहान मुलंही आहेत. पालक किंवा घरातली मोठी माणसं त्यांच्या इमोशन्सचा ‘बूस्टर डोस’ येता-जाता सोशल मीडियावर शोधत असतात. आज जरा कसंतरी होतंय, जा सोशल मीडियावर, टाक एखादी ‘पोस्ट’.. बरं नाहीये, टाक ‘पोस्ट’.. मस्त आवरलंय टाक ‘पोस्ट’.. क्षणाक्षणाला स्वतःच्या आयुष्याची, विचारांची, भावनांची ‘अपडेट्स’ देण्याची सवय असलेल्या पालकांची ‘इंटरनेट डिपेन्डसी’ मुलांपेक्षाही अधिक तीव्र आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. मुलं अनेक गोष्टी पालकांकडून शिकतात, तसंच हेही शिकतात. तो काळ गेला, जेव्हा पालकांच्या आणि मुलांच्या हातात फोन नव्हते आणि घरातल्या एकाच ‘डेस्क टॉप’वर अत्यंत धीम्या गतीने चालणार्‍या इंटरनेटवर सार्‍या कुटुंबाची भिस्त होती. त्यावेळचं मुलांचं इंटरनेटला चिकटून असणं आणि आजचं काळ्या स्क्रीनला नाक लावून बसणं पूर्णतः निराळं आहे. कारण त्यावेळी इंटरनेटचा पसाराही आजच्या इतका अवाढव्य नव्हता आणि हातात फोन घेऊन, त्यात डोकं खुपसून बसलेले पालकही त्यांच्या आजूबाजूला नव्हते.

‘स्क्रीन टाइम’ किती आणि तो कसा कमी करायचा, यापेक्षाही ‘इंटरनेट डिपेंन्डन्सी’ हा आपल्या पुढचा आताचा सगळ्यात गंभीर आणि क्लिष्ट प्रश्न आहे. आपल्या आनंदासाठी, सुखासाठी, संधीसाठी, जगाशी ‘कनेक्ट’ होण्यासाठी, मनोरंजनासाठी प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींसाठी आपण आज इंटरनेटवर अवलंबून आहोत आणि ही डिपेंन्डसी आपल्याला आणि आपल्या मुलांना कणाकणाने व्यसनाकडे नेत आहे. प्रश्न फक्त प्रत्येकाच्या खासगी माहितीचा नाहीये, प्रश्न आपल्या प्रचंड अवलंबित्वाचा आहे, आयुष्यातली सगळी उत्तरे बाहेर कुठेतरी; आणि बहुतेककरून ‘गुगल’कडे शोधण्याचा आहे. या सगळ्या गडबडीत आपल्याला पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे अनेकदा आपल्याकडेच असू शकतात किंवा आपल्या आजूबाजूलाच ती विखुरलेली असतात, हे सांगायला, मुलांना दाखवायला आपण विसरून जातोय का, हा आहे. ‘बी’ मधून अंकुर कसे फुटतात, याचा व्हिडिओ बघण्यापेक्षा घरात ते प्रत्यक्ष करून बघण्याने इतर अनेक प्रश्नांनाही उत्तर मिळू शकतात. हेच आपल्याला लक्षात येईनासं झालंय.

मूलतः माणूस नेहमीच सोप्या उत्तरांच्या दिशेने धावत असतो; पण आता आपण त्यातही अधिक सोप्या उत्तरांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतोय, जे अतिशय हानिकारक आहे. कारण आपलं हे प्रचंड अवलंबित्व आपल्याला ‘इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसऑर्डर’कडे नेतंय; मग ते गेमिंगचं अ‍ॅडिक्शन असेल, नाहीतर फेसबुकचं! इंटरनेटच्या महासागरात गेमिंगपासून, पॉर्नपासून, बिंज वॉचिंगपासून ते यू ट्यूब व्हिडिओपर्यंत कशाचंही किंवा सगळ्यांचं व्यसन मुलांना आणि पालकांना लागू शकतं. ‘इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसऑर्डर’ म्हणजे काय, तर सतत इंटरनेटवर जाण्याची तीव्र इच्छा होत राहणं. जरा वेळ फोन बघितला नाही तर अस्वस्थ वाटणं, थोडा वेळ गेमिंग केलं नाही, तर चुकल्या-चुकल्यासारखं होणं, पॉर्न बघितलं नाही तर रात्री झोप न येणं, सकाळी उठल्याबरोबर जगाला सकारात्मक संदेश पाठवले नाहीत, तर गिल्टी वाटत राहणं आणि मग ती भावना घालवण्यासाठी एखादा का होईना ‘फॉरवर्ड’ पाठवणं, कसलंही ‘नोटिफिकेशन’ आलेलं नसताना पुन्हा-पुन्हा फोन उघडून बघणं किंवा उगीचच ‘स्क्रोल’ करत राहणं. बराच वेळ आपल्याला कुणाचाच फोन आला नाही तर एक प्रकारचं ‘डिसकनेक्ट’ वाटायला लागणं, एक ना अनेक…

हे सगळे प्रश्न आता संपूर्ण कुटुंबाचे आहेत. आपण सतत एका ‘इन्फायनाईट ब्राउजिंग मोड’मध्ये अडकलेलो आहोत; म्हणजे काय, तर इंटरनेटच्या या जादुई आणि मायावी जगात आपण सतत काहीतरी शोधत असतो. आपल्याला शोधायचं नसलं तरीही आपण कसल्या तरी शोधात असतो. दोन-चार तास इंटरनेटवर ‘सर्फिंग’ करण्यात घालवलेल्या अनेकांशी मी बोलले आहे. माझा प्रश्न एकच असतो, तास-दोन तास काय केलंत, ते तपशिलाने सांगा. फार कमी जणांना आपण ‘गुगल’वर, ‘सोशल मीडिया’त किंवा ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर काय केलं, हे सांगता येतं. माणसं ‘झॉम्बी’ झाल्यासारखी इंटरनेटच्या आधारे गुंगून सतत काहीतरी शोधत असतात; म्हणजे आपण काहीतरी शोधतोय, वाचतोय, बघतोय, असा आभास निर्माण होत असतो; पण प्रत्यक्षात मन-मेंदूपर्यंत काय आणि किती पोचतं, हा प्रश्नच आहे. या ‘इन्फायनाईट ब्राउजिंग मोड’मधून किंवा ‘एन्डलेस स्क्रोल’च्या सवयीतून मोठ्यांना तर बाहेर पडावं लागणारच आहे; पण ही सवय लहान मुलांमध्ये निर्माण होऊ नयेत, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

मग प्रश्न येतो यातून बाहेर पडायचं कसं? काय मार्ग आहेत ही डिपेंन्डसी कमी करायचे? व्यसन लागूच नये मुळात म्हणून काय करता येईल आणि ‘स्क्रीन टाईम’ कमी कसा होईल? बघूया पुढच्या भागात

मुक्ता चैतन्य

muktaachaitanya@gmail.com


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]