सम्राट हटकर - 9422187967

मागील 20 वर्षांपासून नांदेडजवळील रत्नेश्वरी मंदिर परिसरात मुक्ताबाई नावाची एक महिला राहते. तिच्या केसात असलेल्या लिखा, उवा, डोक्याला झालेली जखम, घोंगावणारी चिलटं व माशा यातून मुक्ताबाईला मुक्त व्हायचं होतं. परंतु जट सोडल्यावर त्या जटाधारी व्यक्तीवर देवीचा कोप होतो, ही भीती इतरांप्रमाणे मुक्ताबाईच्याही मनात होतीच. जट सोडलेल्या गावात जनावरे दगावतात, रोगराई येते, दुष्काळ पडतो, अतिवृष्टी, पूर यांसारखी संकटे येतात; तसेच जट सोडवणारा वेडा होतो, आंधळा होतो, पटकी येऊन मरतो किंवा देवी त्याला लुगडं नेसवते; म्हणजे नपुंसक करते, असाही एक गैरसमज करून दिला जातो. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नांदेडच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन करून मुक्ताबाईला जटामुक्त केले.
नांदेडपासून 17-18 किलोमीटर जवळ असलेल्या एका टेकडीवर रत्नेश्वरीचे पुरातन मंदिर आहे. ही टेकडी ‘रत्नागिरी’ म्हणून सुद्धा ओळखली जाते. या मंदिर परिसरात ‘त्रिशूळ कुंड’ आहे. एक महादेवाचे मंदिर आहे, फुल-हार, नारळाची दोन- चार छोटी दुकाने आहेत, विस्तारलेली वडाची झाडे व बाजूला एक लहान सरोवर आहे. सामाजिक वनीकरण विभाग आणि काही सामाजिक संस्थांनी झाडे लावली आहेत. रविवार सोडला तर फारशी गर्दी नसलेले हे ठिकाण नांदेडवासीयांसाठी एक सहलीचे केंद्र आहे.
गेली 20 वर्षांपासून रत्नेश्वरी मंदिर परिसरात मुक्ताबाईचा मुक्त संचार आहे. या परिसरातच; पण दूर, एका कोपर्याला छोटे महादेव मंदिर आहे. या मंदिराची देखभाल तीच करते. इकडे वर्दळ नसल्यामुळे हे मंदिर दिवसासुद्धा सुनसान असते. त्यामुळे ती रत्नेश्वरी मंदिराच्या परिसरातच राहते. मंदिर परिसराची झाडलोट करायची, येणार्या भाविकांनी किंवा पर्यटकांनी दिलेलं खायचं आणि रात्रीच्या वेळी बंद झालेल्या दुकानासमोर झोपायचं, ही मुक्ताबाईची दिनचर्या आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे, केसांची निगा न राखल्यामुळे केसांचा गुंता वाढला, त्याकडे दुर्लक्ष झालं. धूळ, माती साचून हा गुंता वाढून शेवटी सर्व केसांची एकच वजनदार जट तयार झाली. मानेला ओझं झालं. मान वळवायला त्रास, झोपेला त्रास, नीट झोपता येईना, कूस बदलता येईना. परंतु हा त्रास सहन करायचा असतो, असा समाज रुढी-परंपरेने करून दिलेला आहे. परंपरा नाकारली तर काहीतरी नुकसान होणार, ही भीती मनात घर करून असते. जटा कापल्या तर देवीचा कोप होणार, काहीतरी अनर्थ होणार, ही काल्पनिक भीती मुक्ताबाईच्या मनात देखील होती. ‘अंनिस’ने मुक्ताबाईच्या मनातील ही भीती दूर केली. सहलीसाठी रत्नेश्वरीला गेलेल्या ‘महाअंनिस’ नांदेडच्या जिल्हा प्रधान सचिव इंजि. रंजना यांनी ही भीती घालवली. मुक्ताबाई जट काढण्यासाठी तयार झाली; पण तिला हवा होता बुधवारचा मुहूर्त.
मुक्ताबाईची कौटुंबिक पार्श्वभूमी व इतर माहिती घेण्यासाठी तिची व तिच्या परिचितांची कार्याध्यक्ष इंजि. सम्राट हटकर यांनी भेट घेतली. तिच्या परिवारात कोणी नाही. जवळचे नातेवाईक आहेत; पण तिच्या संपर्कात नाहीत. त्यांच्याशी चर्चा केली; पण जबाबदारी घेण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. त्यामुळे पूर्ण संवाद तिच्याशी साधावा लागला. तिच्या मनावरचं दडपण दूर करूनच आम्हाला तिच्या जटा काढायच्या होत्या. महाराष्ट्रात इतर ठिकाणीही केलेल्या जटा निर्मूलनाचे व्हिडिओ आणि फोटो सर्वांना दाखवले. बरीच चर्चा झाली. यात मुक्ताबाईंनी बुधवार मुहुर्ताचा आग्रह सुद्धा सोडला. चांगल्या कामाला उशीर कशाला, असा विचार करत सर्वांना सोयीचा असा शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 हा दिवस आम्ही निवडला.
पूर्वसूचना असल्यामुळे तेथील दुकानदार मधुकर अंभोरे यांनी शेजारच्या इतर दुकानदारांना व त्यांच्या कुटुंबीयांना उपस्थित राहण्याबद्दल कळवले होते. त्यामुळे ते सर्व उपस्थित होते. ‘काय हवं, नको ते आम्हाला सांगा,’ असं म्हणत होते. पूर्ण सहकार्य करत होते.‘कोविड-19’ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सम्राट हटकर यांनी जटा कापायला सुरुवात केली. काही भाविक आणि पर्यटक हे डोकावून बघत होते. हा अनुभव मात्र फार वेगळा होता. केसांच्या मुळापासून जट तयार झालेली होती; अगदी त्वचेपासून. जट कडक व न वाळणारी होती. उवा होत्या, चिलटांसारखे कीटक घोंगावत होते. जटेवर खालच्या बाजूला मुंग्या होत्या. डोक्यात जखमा (फोड) होत्या, त्यावर कापसाचे बोळे ठेवले होते. जखमा ओल्या असल्यामुळे बोळे जखमेवर राहत नव्हते, दुर्गंधी येत होती. कात्री खूप काळजीपूर्वक हाताळावी लागत होती. शेवटी व्यवस्थितपणे जट निघाली.
जटामुक्त झाल्यावर मुक्ताबाईंनी मान वळवून इकडे-तिकडे बघितलं, थोडं स्मित दिलं आणि खाली बघत ‘महादेव तुमचं चांगलं करेल,’ असं म्हणाली. ‘काही लोकं तर आम्हाला नेहमीच शिव्या देतात,’ असं तिला सांगितलं. त्यावर ती म्हणाली, ‘बेखूब लोक आहेत ते.’ कापलेली जट तिने एका नवीन कोर्या ब्लाऊज पीसमध्ये गुंडाळली. ‘आता या जटेचं काय करणार,’ असं विचारल्यावर, ‘गंगाजीबापूला (गोदावरी नदीवर एक देवस्थान आहे) वाहणार,’ असं तिने सांगितलं. निरोप घेताना तिची प्रतिक्रिया विचारली, तेव्हा खूप हलकं वाटतं, असं ती म्हणाली.
तेथील स्थानिक दुकानदार मधुकर अंभोरे, निर्मला काशिनाथ फुलारी, उत्तम भाले, शांताबाई झांबरे, शालिनी पेन्शनवार, चंद्रकांत, शोभाताई प्रकाश फुलारी, संजय भाले यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमात ‘अंनिस’चे इंजि. रंजना, युवा कार्यवाह प्रतिभा कोकरे, नितीन ऐंगडे, नांदेड शाखा सचिव श्रीनिवास शिंदे, माजी राज्य प्रशिक्षण सहकार्यवाह इंजि. आनंद बिरादार व इंजि. सम्राट हटकर यांनी सहभाग नोंदविला.
–सम्राट हटकर
संपर्क – 9422187967