इंदुरीकर महाराजांच्या ‘त्या’ वक्तव्यास अंनिसचा आक्षेप

डॉ. नितीन शिंदे - 9860438208

‘स्टँड अप कॉमेडी शो इन कीर्तन’ हा कीर्तनाचा नवीन फॉर्म रूजवू पाहणारे इंदुरीकर (इंदोरीकर) महाराज पुराणातील दाखल्यांचा हवाला देत मुलगा आणि मुलगी होण्याची जाहिरात करून रिकामे झाले. अर्थात, अशी जाहिरात करणं कायद्यानं गुन्हा आहे. नवी मुंबईतल्या उरण येथे जानेवारी महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये दि. 2 जानेवारी 2020 रोजी इंदुरीकर महाराजांनी ‘कपाळ म्हणजे काय,’ याचं उत्तर सांगतो असं म्हणत ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो; स्त्रीसंग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. याचा पुरावा विचाराल तर, पुलश्य नावाच्या ॠषीनं कैकशी नावाच्या स्त्रीसोबत सूर्य अस्ताला जाताना संग केला, तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आले. आदिती नावाच्या ॠषीनं पवित्र दिवशी संग केला, तर त्याच्यापोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपूनं नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला,’ असे वक्तव्य केले. यापूर्वीसुध्दा त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. उलट त्यावेळी ‘टायमिंग हुकलं की क्वालिटी खराब’ हे वाक्य अधिकचं जोडलेलं होतं. अशी वाक्यं टाळ्या मिळवायला, शिट्या फुकायला आणि हशा निर्माण करायला मदतगार ठरतात. कीर्तनाची क्वालिटी वाढली की श्रोत्यांची अभिरूची, याचा मात्र जरूर विचार करावा लागेल. या वाक्याला ‘गुरुचरित्रा’चा आधार आहे, असं म्हणत त्यांनी ‘गुरुचरित्रा’तल्या सदतिसाव्या अध्यायाचा दाखला दिलेला आहे. वरील वाक्य गर्भलिंगनिदान करण्याशी संबंधित आणि अवैज्ञानिक असल्याने महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने महाराजांच्या विरोधी तक्रार दाखल केलेली आहे. इंदुरीकरांचे वक्तव्य, कायदा व संविधानविरोधी आहे. ‘पीसीपीएनडीटी’ कायदा कलम 22 अंतर्गत गर्भलिंग निदान निवडीबाबत जाहिरातीस बंदी आहे. इंदुरीकर महाराजांनी हे वक्तव्य करून कायद्याचे उल्लंघन केले आहे. या तक्रारीला उत्तर देताना ‘मी असं म्हटलोच नाही,’ असा वकिली भाषेतील खुलासा त्यांनी दिला. अध्यात्माच्या माध्यमातून समाजप्रबोधन करताना वकिली भाषेतून खुलासा करावा लागतो, हेही नसे थोडके. तसेच कीर्तनकार संतांच्या अभंगाचा दाखला न देता ‘मनुस्मृती’चा पगडा असलेल्या ‘गुरुचरित्रा’चा दाखला द्यायला लागलेले आहेत, हे आधुनिक कीर्तनाचे रूप आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढूनही पुराणातील वाक्यांचा आधार घेत अशास्त्रीय विचारसरणीला पुढे घेऊन जाणारा विचार इंदोरीकर महाराज देत असतील तर समाजाला ते भ्ाूषणावह नाही.

कीर्तन सर्वांगसुंदर होण्यासाठी विनोदाचा वापर केला असेल, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही. मात्र या विनोदातून महिलांच्या प्रती अनादर व्यक्त होऊ नये, एवढीच माफक अपेक्षा. वारकरी संप्रदायाचा अनुयायी म्हणवून घेणार्‍यांनी तरी असे वर्तन कदापिही करता कामा नये. वारकरी संप्रदाय स्त्री-पुरुष समानता आणि धर्मनिरपेक्षतेला बांधील असलेला आहे. ज्या संतपरंपरेने कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचे काम केले, त्याला काही अंशी छेद देण्याचं काम इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या काही वक्तव्यांतून केलेलं आहे. याची प्रचिती त्यांच्या ‘यू ट्यूब’वरील कार्यक्रमांतून दिसून येते. सर्वसामान्यांना सुखावणार्‍या माहितीचा डोस महाराज आपल्या विनोदी शैलीत देत असल्यामुळे त्यांचे प्रवचनवजा कीर्तन उठून दिसते. परंतु त्यांच्या कीर्तनामध्ये महिलांवरील टोमण्यांचाच समावेश अधिक असतो. सुनेबद्दल बोललेलं सासूला आणि सासर्‍याला बरं वाटतं, तसाच काहीसा प्रकार. गाडगेबाबांच्या कीर्तनासारखी अपेक्षा आज करणं उचित नाही. काळ बदललेला आहे, याची कल्पना आहे. परंतु धर्म आणि वारकरी संप्रदायाचा वापर स्वत:च्या प्रसिध्दीसाठीच करून घेणं सुध्दा योग्य नाही. कीर्तनातून इंदोरीकर महाराज सतत महिलांना लज्जा आणणार्‍या; तसेच त्यांचा अपमान करणारी वाक्ये उच्चारून स्त्रीव्देष उत्पन्न करतात.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी या गावचे रहिवासी असलेले निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज हे कोतुळे येथे डी. एड. कॉलेजवर शिक्षक होते. ज्ञान चांगले असल्यामुळे विनोद बुध्दीच्या सहाय्याने व्याख्यानामध्ये लोकांना खिळवून ठेवायचे. सन 2000 साली त्यांनी कीर्तनाचे कॅसेट काढले आणि तिथून पुढे मात्र त्यांचा कीर्तनाचा वारू चौफेर उधळला. त्यांची तारीख मिळवण्यासाठी आजही 5 ते 7 महिने थांबावे लागते. प्रसिध्दी मिळायला लागल्यानंतर त्यांच्या विनोद बुध्दीने महिलांना मात्र जेरीस आणलेलं जाणवतं. अर्थात, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांच्या हे लक्षातच येत नाही की महिलावर्गाची बदनामी होत आहे. कारण परंपरा आणि संस्कृतीचे पाईक. ‘बीबीसी मराठी’चे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी दि. 9 एप्रिल 2019 व 13 फेब्रुवारी 2020 रोजी लिहिलेल्या लेखामध्ये इंदोरीकर महाराजांनी उच्चारलेली वाक्ये दिलेली आहेत. केवळ एवढंच करून श्रीकांत बंगाळे थांबले नाहीत, तर त्यांनी महाराजांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला; परंतु महाराजांच्या अनुयायांनी त्यामध्ये खोडा घातला. महाराजांच्या काही वाक्यांचा समाचार घेतला तर महिलांविषयी महाराजांची भ्ाूमिका काय आहे, हे समजण्यास मदत होईल.

1. ‘लव्ह मॅरेज’विषयीचे इंदुरीकर महाराज मत व्यक्त करताना महिलेची तुलना चपलेशी करतात. ते म्हणतात, ‘लव्ह मॅरेज करणार्‍या माणसाची बायको नवर्‍याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण पुरुष आहोत. नवरा! महया बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार तिचे? चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो, चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं.” शिक्षणातून स्त्री-पुरुष समानता आली असेल तर बायकोने नावानं हाक मारलेली महाराजांना का चालू नये? कोणत्या संस्कृतीचे आपण वारसदार आहोत, महिलेला दुय्यम लेखणार्‍या की समानततेचा पुरस्कार करणार्‍या संवैधानिक संस्कृतीचा?

2. महिलांच्या कपड्यांवर टिप्पणी करताना इंदुरीकर महाराज महिलेला ‘जनावर’ संबोधतात. ते म्हणतात, “आपली पोरगी घरातून बाहेर पडताना कसे कपडे घालून बाहेर पडते, हे तिच्या आईला माहिती नाही का? का पारायणाला बसली तिची आई? आपलं जनावर पाहतंय कुणीकडं, चालतंय कुणीकडं, थोबाड कुणीकडं वाशीतंय? आपलं जनावर कसं राहतंय, हे तिच्या आईला कळत नाही का? लोकांनी सांभाळायच्या का तुमच्या पोरी? पोरीच्या अंगात जितके कपडे कमी तितकी पोरगी पटकावली पाहिजे.” कोणते कपडे घालावे हे ठरवण्याचा अधिकार मुलीला का नाही? महिलेला ‘जनावर’ म्हणून संबोधणारे महाराज हे कीर्तन करण्यापूर्वी डी. एड.वर शिक्षक म्हणून कार्यरत होते.

3. जीन्स पँट घातलेल्या आईविषयी आक्षेप नोंदवताना ते म्हणतात, “आमच्या आईचं पोरगं दूध पित होतं तर शेजारच्या बाईला कळत नव्हतं, ते पोरगं दूध पितंय. इतका खानदानी आमच्या आईचा पदर होता. पोराला पूर्वी पदर मिळत होता. आज पोराची आई जीन्स-पँट आणि टी-शर्ट घालते. पोर झाकावं कुठं आणि पोरानं घाईघाई प्यावं कसं? याला नाव दिलंय चेंज.” हे महाराजांचं वक्तव्य हल्लीच्या मुलींना झोंबणारच! हो, पण परंपरागत संस्कृतीचा पगडा असलेल्या महिलेला महाराजांचे हे बोल सुखावणारे आहेत. घरकाम करणारी, नवरा आणि मुला-बाळांचं संगोपन करणारीच महिला अशा काही कीर्तनकारांच्या जिव्हाळ्याचा आणि कीर्तनाचा विषय असते. महिलांनी पुढेच जाऊ नये, असं तर महाराजांना सुचवायचं नाही ना? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आपली पत्नी आणि मुलीसहित भारताला भेट देण्यासाठी नुकतेच आले होते, चक्क सुटाबुटात! त्यांना पायघड्या घालण्यासाठी पंतप्रधानांसहित त्यांचे तमाम ‘भक्त’ कामाला लागलेले होते. प्रचंड खर्च करून पँटमधील पाश्चात्य महिलेचा आदर आणि सन्मान, परंपरावादी संस्कृतीचे आणि धर्माचे रक्षक करताना सर्व भारतीयांनी पाहिलेलं आहे. याउलट आपलेच महाराज पँट घातलेल्या आपल्याच महिलेला तुच्छ लेखतात.

4. शेतकरी आणि सर्व्हिसवाल्याच्या घरातील चहाचा फरक सांगताना महाराज म्हणतात, ‘सर्व्हिसवाल्यानं चहा सांगितला की, ते जनावर येतं चहा घेऊन, केसं-बिसं मोकळं सोडलेलं, गाऊन-बिऊन घातलेलं. आपल्याला वाटतं जोडून अमावस्या आली की काय?’ महाराजांना गाऊन घातलेला आणि केस मोकळे सोडलेलं चालत नाही, असा याचा अर्थ. पुरुष कसा चांगला आणि बाई कशी वाईट, हे सांगण्यासाठी इंदुरीकर महाराज छोटी-छोटी कारणं शोधतात. त्यात मग ते गाऊन घालणार्‍या महिलेला जनावर म्हणतात.

5. लग्नात डान्स करणार्‍या मुलींना इंदोरीकर खानदान तपासण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात, “पोरगी नाचती लग्नात. पोरी कमरेपासून वर हालत्या आणि खाली बंद होत्या. काही हालत्या की बंद होत्या, हेच कळत नाही. काय लाजा सोडल्या, वरून पोरीची आई थोबाड वासून पाहती. ओवाळणी टाकिती पोरीवर, दरिद्री, काय मही गुड्डी ताल धरती म्हणती. तूही गुड्डी जेंव्हा एखाद्या गड्डया घेऊन पळून जाईल, तव्हा कळेल तुला. नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?” नाचण्याला यांचा विरोध. फक्त महिलांना. पोरांच्या संदर्भात यांचा काहीच सल्ला नाही. नाचणं एवढं वाईट आहे काय? अरे, जरा महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमात येऊन जावा, म्हणजे कळेल. मुलींना नाचण्याची किती आवड असते? महाराज खानदानाचा उल्लेख करतात म्हणजे ते स्वत:ला सुध्दा खानदानीच समजतात. मनुस्मृतीने ज्यांना नाचण्याचा मक्ता दिलेला आहे, त्यांनीच तो करावा असं महाराजांना सुचवायचं आहे काय? महाराजांना सांगण्याची गरज आहे की, जोपर्यंत नाचण्यासाठी पैसे मिळत नव्हते, मानसन्मान नव्हता, तेव्हा ते दुसर्‍यासाठीच राखीव होतं. आता नाचण्यातच जेव्हा करिअर घडायला लागलं, पैसा मिळू लागला, तेव्हा उच्चभ्रू आणि खानदानी त्यात घ्ाुसले ना!

6. गोरी बायको का करू नये, याची कारणं सांगताना ते म्हणतात, “गोरी बायको कधी करू नई…उन्हात न्यावं तं लाल पडती अन् लाइट गेली तं फॅनखाली उडी हाणीती…काय उपयोग आहे तिचा, म्हणून गोरी बायको कधी करू नये. बायको सावळी पाहिजे. कापूस येचाया चालती आणि तुरीच्या शेंगा तोडाया पण चालती. ज्यांनी-ज्यांनी लै गोर्‍या बायका केल्या, त्यांच्या बायका निघ्ाून गेल्या.” या उद्गारातून महिलेचा अपमान होत नाही काय?

7. “एका पोरीचं नाव तेजस्विनी! ढेकळात सापडंना…एवढी काळी पोर का बॅटरी लावून पाहायची वेळ आली.. तिची आई म्हणती तेजस्विनी….मी तं म्हणलं की, काय अमुशालाच चमकती काय नू….” किती विरोधाभास महाराजांच्या वक्तव्यामध्ये भरलेला आहे. एकदा म्हणायचं गोरी बायको नको, नंतर म्हणायचं काळी पोरगी अमावस्येलाच चमकती, म्हणजे महाराजांना कोणत्या रंगाच्या महिला अपेक्षित आहेत? वर्णभेद, खानदानीपणा महाराजांच्या ठायी पूर्ण भरलेला दिसतो. हे खरं तर संविधानाच्या विरोधी आणि मुख्य म्हणजे माणुसकीच्या विरोधी आहे.

अशी अनेक विधानं महाराजांच्या नावावर ‘यू ट्यूब’वर सहज उपलब्ध आहेत. परंपरेचे गोडवे गाणारे, संस्कृती आणि धर्माची जाणीव करून देणारे महाराज स्वत:ची कीर्ती वाढवण्यासाठी मात्र आधुनिक असणार्‍या ‘यू ट्यूब’, मोबाईल अशा सुविधांचा तल्लखपणे वापर करतात. तीच आधुनिकता महिलांनी स्वीकारली तर मात्र यांना वावडे आहे. हा विरोधाभास आहे. काहींना ही विधानं विनोदी वाटू शकतात. कदाचित ही विनोदनिर्मितीच्या हेतूनेच केलेली असावीत; पण त्यात महिलांचा अपमान होत आहे आणि हे वारंवार सहन केलं तर काळ सोकावणार, हे निश्चित.

केवळ एका चुकीच्या वाक्यावरून या व्यक्तीने केलेले कार्य नाकारून चालणार नाही, हे जसे खरे आहे; तसेच झालेली चूक मान्य करणे, माफी मागणे आणि महिलांचा सन्मान करणे, हे पण क्रमप्राप्तच आहे. महाराजांनी केलेल्या चुकीबद्दल प्रसारमाध्यमांनी आणि महिलांनी जर अकांडतांडव केला असेल तर त्यात बिघडलं कुठं; उलट हे समाज जागृत असल्याचं लक्षण आहे ना! लोकशाहीमध्ये हे बसतं ना! महाराजांच्या वक्तव्याला विरोध करणार्‍यांची संख्या फार प्रचंड आहे, असं पण नाही. याचा दुसरा अर्थ असा होतो की, अजूनही महिलेबद्दल टीका-टिप्पणी करणारी, बुरसटलेली विचारधारा मनामनांमध्ये ठाण मांडून बसलेली आहे, हे अधोरेखित होतंच ना. महाराजांच्या बाजूने निवेदने, गाव बंद अशी आंदोलने करण्यामध्ये पुरुषमंडळी हिरिरीने भाग घेताना दिसत आहेत, याची कारणं आजच्या शिक्षणव्यवस्थेमध्ये असल्याचं जाणवतं.

शिक्षणामध्ये महिलांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असल्याचे दिसून येत आहे; किंबहुना महाविद्यालयातील उपस्थितीमध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा प्रचंड आहे. महाविद्यालयातील मुलींची नियमितता आणि अभ्यासूपणा नजरेत भरण्यासारखा आहे. वर्गाबाहेर मात्र याउलट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत शिक्षणामधून मुलींच्या अपेक्षा वाढत असतील आणि परंपरेला छेद दिला जात असेल, तर यात मुलींंचा दुस्वास करण्याचं कारण काय? परंपरेने आणि संस्कृतीने कायमच महिलावर्गाला दुय्यम स्थान दिलेलं आहे. आजपर्यंत शिक्षणाच्या अभावामुळे पन्नास टक्के वर्ग घरामध्येच बंद झालेला होता. आज महाविद्यालयामध्ये अथवा शाळेमध्ये शिकणार्‍या आणि शिकवणार्‍या शिक्षकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. हे यश खरं तर सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचं आहे. अनेक समाजसुधारकांच्या नावाचाही उल्लेख कीतर्नकार आपल्या कीर्तनामध्ये घेत नसतील, तर मग समाजप्रबोधन म्हणजे काय, याचा विचार करावाच लागेल. आजच्या मुलींच्या बद्दल आणि महिलेबद्दल केलेली टीका-टिप्पणी मुलांना आणि पुरुषांना आनंद देत असेल तर मात्र काळाची पावलं उलटी पडत आहेत, असं समजावं लागेल. इंदुरीकर महाराजांची महिलांच्या संदर्भातील वक्तव्यं या व्यवस्थेला सुखावतात, असं खेदानं म्हणावं लागेल. महिला आपल्यापेक्षा पुढे जाणं, हे आजही कमीपणाचं लक्षण मानलं जात असेल, तर जरा विचार करावाच लागेल. ‘मअंनिस’चा विरोध हा कीर्तनाला, समाजप्रबोधनाला नाही, तर महिलांचा अनादर करणार्‍या आणि अवैज्ञानिक गोष्टींच्या अंतर्भावाला आहे; इंदुरीकर या व्यक्तिमत्त्वाला विरोध असण्याचा तर बिलकुलच नाही. वैचारिकद़ृष्ट्या समाजाचं अधःपतन होईल, असं वक्तव्यं कोणाकडूनच होता कामा नये, हीच एक अपेक्षा.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]