मुस्लिम धर्मांधतेविरोधात लढणारे पाकिस्तानी प्राध्यापक

जतीन देसाई - 8879962668

बुद्धिवादी असल्याने पाकिस्तानात तीन प्राध्यापकांना नोकरीतून काढलं

बुद्धिवादी असणे उपखंडात गुन्हा झाला आहे की काय, असा प्रश्न अलिकडे निर्माण झाला आहे. अलिकडच्या इतिहासाचा विचार केल्यास बुद्धिवादी आणि वैज्ञानिक विचार लोकांमध्ये नेण्याचं काम डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी मोठ्या प्रमाणात केलं. त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश यांची देखील हत्या करण्यात आली. बुद्धिवादी विचार मांडणार्‍यांना एक तर कायमचं गप्प करण्याची किंवा त्यांना बोलण्याच्या संधीपासून दूर ठेवण्यास सुरुवात झाली आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधी असलेली सत्ता उजव्या विचारांच्या संघटनांना बुद्धिवादी विचारांच्या विरोधात उघड-उघड मदत करताना दिसतात. बुद्धिवादी, वस्तुनिष्ठ विचारांचा प्रसार व प्रचार करता येऊ नये, याकरिता वेगवेगळ्या पद्धतीने अडथळे निर्माण केले जातात. अनेक देशांत असं घडताना आपण पाहत आहोत. उजव्या विचारांची सत्ता अनेक देशांत आहे. बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारांशी त्यांचा संबंध नाही; किंबहुना बुद्धिवादी आवाज गप्प करण्याचा त्यांच्याकडून सतत प्रयत्न होत असतो. मात्र बुद्धिवादी विचार हा वैज्ञानिक स्वरुपाचा असल्याने सगळे अडथळे दूर करून तो मात्र पुढे जात राहणार.

अलिकडे पाकिस्तानच्या काही शैक्षणिक संस्थांमध्ये घडलेल्या गोष्टी यादृष्टीने चिंताजनक आहेत. राजकारण आणि समाजजीवनावर धर्माच्या प्रभावामुळं विद्यार्थ्यांचं व समाजाचं कसं नुकसान होतं, हे त्यातून सिद्ध होतं. चांगले शिक्षक असतील तर त्या शाळा किंवा कॉलेजला महत्त्व मिळतं, त्याची प्रतिष्ठा वाढते. चांगल्या शैक्षणिक संस्था असल्या तर त्या-त्या शहराला, राज्याला आणि देशाला गौरव प्राप्त होतो. पाश्चात्य देशात अभ्यास करायला हजारोंच्या संख्येने विद्यार्थी या कारणामुळेच जातात. संशोधनाला तिथे महत्त्व दिलं जातं. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद देखील केली जाते.

पाकिस्तानच्या तीन प्राध्यापकांची गोष्ट या ठिकाणी मुद्दामहून सांगितली पाहिजे. या तीन प्राध्यापकांमुळे ज्या-ज्या कॉलेजात ते शिकवत होते, त्या-त्या कॉलेजच्या संचालकांना खरं तर अभिमान वाटायला हवा होता; पण तसं झालं नाही. त्यांना त्यांची नोकरी सोडावी लागली. त्यांचा गुन्हा काय होता? तर ते तिघेही बुद्धिवादी होते, विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते आणि साहजिकच पुरोगामी विचारांवर त्यांची निष्ठा होती. हा त्यांचा गुन्हा होता. नोकरी टिकवण्यापेक्षा त्यांच्यासाठी त्यांचा विचार महत्त्वाचा होता. विचारांची तडजोड करायची नाही, ही त्यांची भूमिका होती.

हे तीन प्राध्यापक म्हणजे परवेझ हुडभोय, मोहम्मद हनीफ आणि अम्मार जान. तिघेही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध. हुडभोय यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘एमआयटी’ येथे अनेक वर्षं शिकवलं. भौतिकशास्त्र हा त्यांचा विषय. लोकांपर्यंत विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पोचविण्याचा त्यांच्या कामाबद्दल ‘युनेस्को’ने त्यांना कलिंगा पुरस्कार देऊन त्यांचा बहुमान केला होता. त्यानंतर 2005 साली भारत सरकारनं त्यांना आमंत्रित केलं होतं. मुंबई, दिल्लीसह काही शहरांत त्यांनी लोकांपर्यंत विज्ञान कसं पोचवावं, यावर व्याख्याने दिली होती. भारत आणि पाकिस्तानात कायम मैत्री असणे का आवश्यक आहे, या विषयावर देखील त्यांनी मांडणी केली होती. माझे आणि त्यांचे जुने संबंध. नंतर देखील त्यांना एका कार्यक्रमासाठी आम्ही मुंबईत बोलावलं होतं. अत्यंत सरळ, सोप्या भाषेत लोकांना विज्ञान समजून देणं, हे त्यांचं वैशिष्ट्य.

रामानुजन आणि डॉ. अब्दुल सलाम हे हुडभोयचे दोन आवडते वैज्ञानिक. रामानुजन हे भारतीय, तर सलाम पाकिस्तानी. प्रतिष्ठित नोबल पुरस्कार मिळवणारे ते पहिले पाकिस्तानी आणि पहिले मुस्लिम. सलाम हे अहमदिया समाजाचे. 1974 ला झुल्फिकार अली भुत्तो पंतप्रधान असताना त्यांनी घटनादुरुस्ती करून अहमदिया हे मुस्लिम नसल्याचं जाहीर केलं. तेव्हा सलाम पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांनी याबाबत भुत्तो यांना प्रश्न विचारले. आपल्यावर मुल्ला, मौलवींचा दबाव असल्यामुळे असा निर्णय घ्यावा लागला असं भुत्तोंनी त्यांना सांगितलं. परिस्थिती सुधारली की आपण हा निर्णय मागे घेऊ, असंही भुत्तो यांनी सलाम यांना आश्वासन दिलं. त्यावर सलामनी असा निर्णय एकदा घेतल्यानंतर त्याला परत मागे घेणं सोपं नसतं, असं सांगितलं. नंतर काही वर्षांनी सलाम यांना नोबल पुरस्कार मिळाला. असे सलाम हे हुडभोयचे आदर्श वैज्ञानिक आहेत. आजही पाकिस्तानात अहमदिया समाज मुस्लिम नाही. त्यांच्या प्रार्थनास्थळाचा उल्लेख ‘मशीद’ असाही त्यांना करता येत नाही.

पाकिस्तानात परत आल्यानंतर हुडभोय यांनी सुरुवातीला इस्लामाबाद येथील कायदे आझम युनिव्हर्सिटीत आणि नंतर लाहोर येथील लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्स या ठिकाणी काही वर्षं शिकवलं. नंतर लाहोरच्या फोरमेन ख्रिश्चन (एफसी) कॉलेज येथे त्यांनी शिकवण्यास सुरुवात केली. आता अचानक त्यांना अधिक कर्मचारी असल्याचं कारण सांगून तुमचं कॉन्ट्रॅक्ट वाढवता येणार नाही, असं सांगण्यात आलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळविणार्‍या हुडभोयला अधिक कर्मचार्‍यांचं कारण सांगणं हे हास्यास्पद आहे. खरं तर कॉलेजला हुडभोय यांच्याबद्दल अभिमान असायला पाहिजे होता. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट वाढवून न देण्याचं खरं कारण म्हणजे त्यांचे पुरोगामी, बुद्धिवादी विचार. विद्यार्थ्यांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्याएवढं व्यवस्थित भौतिकशास्त्र व इतर विषय समजून सांगणारे फारसे अध्यापक आढळत नाहीत; पण कॉलेजच्या संचालकांवर बाहेरच्या लोकांचा दबाव असल्यामुळे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यात आले नाही. वाढत्या उजव्या आणि धर्मांध शक्तींना हुडभोय यांच्यासारखे प्राध्यापक परवडणारे नाहीत. भारत-पाकिस्तानात कायमची मैत्री असावी आणि अण्वस्त्रमुक्त जग असावं, ही त्यांची भूमिका. अशी भूमिका उजव्या विचारांच्या लोकांना परवडणारी नाही. पाकिस्तानात वर्तमानपत्रात ते नियमित कॉलम लिहितात. भारतातल्या वर्तमानपत्रात देखील अनेकदा ते लिहीत असतात.

मोहम्मद हनीफ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेखक देखील आहे. कराची येथील हबीब युनिव्हर्सिटीनं त्यांना काढलं. मोहम्मद हनीफ मुळातला पत्रकार. ‘बीबीसी’साठी अनेक वर्षेत्यांनी कराची येथून काम केलं. आता तेे ‘न्यूयॉर्क टाईम्स’साठी लेख लिहितात. त्यांना काढण्यापूर्वी एफसी कॉलेजने तरुण अम्मार जान यांना काढलं होतं. हनीफने लगेच अम्मारला ट्विट करून कळवलं – ‘अम्मार साब, कृपाकरून कराचीला या. मला देखील खासगी हबीब युनिव्हर्सिटीने मुक्त केलं आहे. (तुमच्याएवढा मी क्वॉलिफाईड नाही आणि माझी तेवढी बांधिलकीही नाही). परंतु मला विद्यार्थ्यांना शिकवायला आवडायला लागलेलं. यापुढे मला विद्यार्थ्यांशी संवाद साधता येणार नाही, याचं दुःख आहे.’

मोहम्मद हनीफ यांनी इंग्रजीत अनेक पुस्तक लिहिली आहेत. त्याचं सगळ्यात प्रसिद्ध पुस्तक म्हणजे – case of exploding Mangoes ही कादंबरी उपहासात्मक आहे. पाकिस्तानच्या इतिहासात झिया उल-हक हा सर्वांत क्रूर हुकूमशहा झाला. झुल्फिकार अली भुत्तो यांनी काही अधिकार्‍यांना डावलून त्याला लष्करप्रमुख बनवलं. नंतर झियाने सत्ता काबीज केली आणि भुत्तो यांना फाशी दिली. 17 ऑगस्ट 1988 ला झियांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. बहावलपूरहून त्यांचं निघालेलं ‘पाक वन’ विमान थोड्याच मिनिटांत कोसळलं आणि झिया, पाकिस्तानमधील अमेरिकन राजदूत व काही लष्करी अधिकारी त्यात मारले गेले. बहावलपूर हे आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. आंब्याच्या काही टोपल्या तेथे विमानात चढवण्यात आलेल्या. त्याला केंद्रस्थूनी ठेवून लिहिण्यात आलेल्या या कादंबरीला काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. अशा शिक्षकाबद्दल खरं तर हबीब युनिव्हॅर्सिटीला अभिमान असायला पाहिजे होता; पण सत्तेत धर्माचा प्रभाव असलेल्या देशात असं घडत नाही. वस्तुनिष्ठ पद्धतीने शिकवणारे शिक्षक त्यांना नको असतात. भारतात देखील परिस्थिती फारशी वेगळी नाही. शैक्षणिक संस्थांवर येथेही दबाव आणला जातो, अभ्यासक्रम बदलला जातो. अम्मार यांनी हनीफला उत्तर दिलं की, युनिव्हर्सिटीचा कायदा कर्मचार्‍यांना सुरक्षितता देत नाही. त्याने ट्विट करून कळवलं, नोकरीच्या सुरक्षेसाठी मोहिमेची आवश्यकता आहे. सुरक्षा नसल्यास कुठलाही कर्मचारी खरं बोलण्याची हिंमत करणार नाही. हनीफ हा बुद्धिवादी आणि त्यामुळे अर्थातच पुरोगामी. आपल्याला प्रसिद्ध प्राध्यापक शिकवत असल्यामुळे विद्यार्थी देखील खूश होते; पण हबीब युनिव्हर्सिटीवर दबाव आणण्यात आला आणि त्याचा असा परिणाम झाला की, हनीफला प्राध्यापकाची नोकरी सोडावी लागली.

केंब्रिज विद्यापीठातून इतिहासात डॉक्टरेट करून अम्मार पाकिस्तानात शिकवण्यासाठी आला. तो पाश्चात्य देशात राहू शकला असता; पण देशात काम करण्याची त्याची इच्छा होती. तरुण असल्यामुळे डाव्या विचारांचा त्याच्यावर प्रभाव. सुरुवातीला एक वर्ष त्यानं लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजात शिकवलं. परंतु कॉलेजनं राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून त्याला काढलं. नंतर पंजाब युनिव्हर्सिटीत तो शिकवायला लागला. पण तिथून देखील त्याला काढण्यात आलं.

एफसी कॉलेजमध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. परंतु अलिकडे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आणि तेव्हापासून कॉलेजच्या संचालकांचा दृष्टिकोन बदलायला लागला. अम्मारवर तो विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला. बाहेरची काही लोकं कॉलेजच्या संचालकांवर दबाव आणत होती की, अम्मारला कॉलेजमधून काढून टाका. रेक्टरनं त्याला बोलावलं आणि म्हटलं की, कॉलेज कुठल्याही वादात पडू इच्छित नाही. अम्मारला त्याची इतर प्रवृत्ती बंद करण्यास सांगण्यात आले; पण अम्मार म्हणजे अम्मार. आपण काही चुकीचं करतं नसल्याचं त्यानं सांगितलं. माझ्यावर देशद्रोहाचा खटला आहे. माझा माजी विद्यार्थी आलमगीर वझीर शिक्षण क्षेत्रात सुधारणा व्हावी आणि विद्यार्थ्यांना युनियनचा हक्क मिळावा, अशा साध्या मागण्यांसाठी तुरुंगात आहे. मी त्याला आणि इतरांना वार्‍यावर सोडू शकत नाही, असं अम्मारनी सुनावलं.

अम्मार विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. विद्यार्थी आंदोलन, कामगार व महिलांच्या प्रश्नांवर तो स्पष्ट भूमिका घेतो. अनेक ठिकाणांहून त्याला व्याख्यानासाठी लोक आमंत्रित करतात. प्रत्येक मुद्द्याकडे तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहतो. बलोच आणि पश्तुन विद्यार्थ्यांसोबत त्याचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाबद्दल तो बोलत असतो. साहजिकच सत्ताधार्‍यांना ते आवडलं नाही.

पाश्चात्य देशात अशा प्राध्यापकांकडे आदराने पाहिलं जातं. त्यांच्या शैक्षणिक संस्थांसाठी असे प्राध्यापक असणं ही नेहमी अभिमानाची गोष्ट असते; उपखंडात मात्र वेगळं चित्र आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दहशतवादी ओसामा बिन लादेनला संसदेत ‘शहीद’ म्हणतात, तेव्हा एफसी कॉलेज किंवा हबीब युनिव्हर्सिटीकडून हुडभोय, हनीफ आणि अम्मारला न्याय कसा मिळेल? पण त्यातील महत्त्वाचे म्हणजे आपल्या विचारांवर कायम राहण्याची आणि त्यासाठी वाट्टेल ते सहन करण्याची तिघांची तयारी.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]