पर्यावरण व्यवस्थापनामध्ये नवा विचार स्विकारूया

सुनील प्रसादे -

वैज्ञानिक परिभाषेत वनस्पती अथवा सजीव यांना जगण्यायोग्य आणि त्यांची वाढ होण्यायोग्य वातावरण ज्या परिसरात आहे, त्या परिसरातील हवा, जमीन, पाऊस, पाणी, तापमान आदी गोष्टींना पर्यावरण म्हणतात. सामान्य भाषेत आपण त्याला निसर्ग म्हणतो. निसर्ग ही एक व्यवस्था आहे आणि त्या निसर्गाचं स्वयंव्यवस्थापन हे व्यवस्थापनशास्त्राचं सर्वोत्तम उदाहरण आहे. सौंदर्याची निर्मिती हा सुयोग्य व्यवस्थापनाचा सहज परिणाम आहे आणि म्हणूनच निसर्ग सुंदर आहे. पर्यावरणाच्या या स्वयंशिस्तबद्ध व्यवस्थापनामध्ये मनुष्यप्राण्याच्या स्वार्थी लुडबुडीमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांनी पर्यावरणाचं हे व्यवस्थापन बिघडतं आणि त्यामध्ये असमतोल निर्माण होतो. निर्माण झालेला हा असमतोल दूर व्हावा म्हणून मनुष्य आपल्यापरीने जे प्रयत्न करतो, त्याला आपण पर्यावरणाचे मानवी व्यवस्थापन म्हणतो.

पर्यावरणाच्या निर्मितीमध्ये पाण्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आपल्या आयुष्यामध्ये श्वासाचं जे महत्त्व आहे, तेच महत्त्व पर्यावरणामध्ये पाण्याचं आहे. पाण्याशिवाय पर्यावरणाची निर्मिती आणि परिचालन अशक्य आहे, म्हणूनच ज्या-ज्या वेळी पर्यावरणाच्या व्यवस्थापनाचा विचार आपल्या मनामध्ये येतो, त्या-त्या वेळी सर्वप्रथम तो विचार पाण्याबद्दलचाच असतो. पाणी हाच पर्यावरणाचा प्राण आहे. त्यामुळे पाण्याच्या सुयोग्य व्यवस्थापनातच संपूर्ण पर्यावरणाचं व्यवस्थापन सामावलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. दिसायला पाणी हा पर्यावरणाचा एक घटक दिसत असला, तरी पाणी हा पर्यावरणाचा केवळ घटक नसून संपूर्ण पर्यावरण हा मुळात पाण्याचाच आविष्कार आहे, हे आपण समजून घ्यायला हवं. ऋतुचक्राच्या एक वर्षाच्या कालावधीत ऋतुचक्राच्या बरोबरीने पर्यावरणात फिरणारं पाण्याचं चक्र लक्षात घेतलं तर ही गोष्ट समजायला वेळ लागत नाही. पाण्याच्या या चक्राचं दृश्यस्वरूप आपण पावसाळ्यात अनुभवत असलो, तरी संपूर्ण वर्षभर हे पाणी विविध रुपात पर्यावरणात फिरत असतं. पाण्याचं हे चक्र जोपर्यंत व्यवस्थित चालू आहे, तोपर्यंत एका बाजूने पर्यावरणाला धोका नाही, असं आपण मानतो. पाण्याचं हे चक्र एखाद्या वर्षासाठी जरी खंडित झालं तरी काय हाहाःकार उडतो, ते आपण अनुभवलं आहे. पाण्याचं हे चक्र मागील कित्येक वर्षं व्यवस्थितपणे चालू असूनही पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. याचाच अर्थ केवळ पाणी हा एकमेव घटक या पर्यावरणाचा समतोल साधू शकत नाही, हे स्पष्ट आहे.

‘पर्यावरणाचं व्यवस्थापन’ हा शब्दप्रयोग जेव्हा आपण करतो, त्या वेळी एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात ठेवायला हवी की, हे व्यवस्थापन आपण केवळ मानवी दृष्टिकोनातून, मानवाच्या गैरसोयी टाळण्यापुरतं आणि मानवाच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यापुरतंच मर्यादित असतं. माणसांनी पर्यावरणाच्या शिस्तबद्ध चाकोरीमध्ये लुडबुड करून निर्माण केलेल्या अडथळ्यांची दुरुस्ती करणे हेच त्याचं स्वरूप असतं. पर्यावरणाची निर्मिती करणे किंवा त्यावर ताबा मिळवणे अद्याप तरी आपल्याला शक्य झालेलं नाही.

पाणी, जमीन, हवा आणि तापमान या पर्यावरणाच्या चार घटकांना सुस्थितीत ठेवणं यालाच पर्यावरणाचं व्यवस्थापन म्हणता येईल. पर्यावरणाच्या या चार घटकांकडे आपण जर विचारपूर्वक पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की, या चारपैकी जमीन हा एकच घटक स्थिर आणि पूर्णपणे दृश्य स्वरुपात असलेला घटक आहे. पाणी हा घटक दृश्य स्वरुपातला असला तरी तो अस्थिर श्रेणीमध्ये मोडणारा आहे. त्याचं स्थिर होणं पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असलं तरी त्याच्या स्थिरतेसाठी आपल्याला प्रयत्नपूर्वक विशिष्ट अशा व्यवस्था निर्माण कराव्या लागतात. हवा आणि तापमान या उर्वरित दोन घटकांना पर्यावरणाचे घटक म्हणण्याबरोबरच पाणी आणि जमीन या दोन घटकांच्या बर्‍या-वाईट व्यवस्थापनाचा परिणाम म्हणणे जास्त संयुक्तिक होईल. त्यामुळे पर्यावरणाच्या व्यवस्थापनाचा विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येतो, तेव्हा आपल्यासमोर मुख्यत्वे पाणी आणि जमीन या दोन घटकांचाच विचार यायला हवा. एकीकडे पाणी आणि जमीन, तर दुसरीकडे हवा आणि तापमान, असा भेद जरी आपण निर्माण केला असला तरी हे चारही घटक परस्परसंबंधित आहेत आणि त्यांचं एकमेकांशी संतुलितरित्या बांधलं गेलेलं सुस्थितीतलं चक्र म्हणजे पर्यावरण, असं म्हणावं लागेल. पर्यावरणाचं हे संतुलन बिघडू नये म्हणून मुख्यत्वे पाणी आणि जमीन या दोन घटकांची काळजी घेणं म्हणजेच ‘पर्यावरणाचं व्यवस्थापन’ होय.

सुदैवाने पर्यावरणातील पाणी हा मुख्य घटक अद्याप सुस्थितीमध्ये आहे. मागील कित्येक वर्षांत अपवाद वगळता, पाण्याच्या चक्रामध्ये कोणताही बदल झालेला नाही. जमिनीवर पडणारं पावसाचं पाणी आजही पूर्वीच्याच प्रमाणात पडत आहे. असं असतानाही पर्यावरणाचा समतोल का बिघडत आहे, याचा विचार आपण करायला हवा. कितीही महत्त्वाचा असला तरी पाणी हा घटक एकट्याने पर्यावरणाचा तोल साधू शकत नाही. पाण्याची योग्य प्रमाणातली सांगड जर जमिनीबरोबर घातली गेली नाही, तर तेच पाणी अनुत्पादक आणि विनाशकारी ठरतं. याचा अनुभव सध्या आपण घेत आहोत. पाण्याची परिणामकारकता साधायची असेल तर पाण्याच्या पाठोपाठ, पाण्याच्याच बरोबरीने, पर्यावरणातील जमीन या घटकाकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. पर्यावरणीय दृष्टिकोनातून पाणी हा घटक सुस्थितीमध्ये असतानाही आपण आपलं सर्व लक्ष पाण्यावर केंद्रित केलं आहे. त्यामुळे जमीन हा घटक या नाण्याचीच दुसरी बाजू आहे, याकडे आपलं खूपच दुर्लक्ष झालं आहे. त्याचं पर्यवसान जमिनींची दुर्दशा होण्यामध्ये झालं आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडू नये, असं वाटत असेल तर आपण आपलं लक्ष पाण्याच्या बरोबरीनेच पर्यावरणातील जमीन या घटकावरदेखील केंद्रित करायला हवं. पाणी आणि जमीन यांचा सुयोग्य संयोग हेच पर्यावरणनिर्मितीचं साधन आहे आणि तेच पर्यावरणाच्या समतोलपणाचं सूत्र आहे.

पर्यावरणाच्या इतर घटकांवर जरी मनुष्याचा थेट ताबा नसला, तरी जमीन हा घटक मात्र पूर्णपणे मनुष्याच्याच ताब्यात आहे. मनुष्याचा ताबा असल्यामुळेच या घटकाची स्थिती इतकी वाईट झाली असली तरी ती सुधारणे हेही मनुष्याच्याच हातामध्ये आहे. ठरवलं तर पर्यावरणाच्या या घटकाचं व्यवस्थापन मनुष्य उत्तम प्रकारे करू शकतो. पर्यावरणाच्या दृष्टीने जमिनीचं योग्य प्रकारे व्यवस्थापन होऊन ती सुस्थितीमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जमिनीच्या स्थितीवरच हवा आणि तापमान या पर्यावरणाच्या इतर दोन घटकांची स्थिती अवलंबून असते. जमिनीच्या व्यवस्थापनाकडे वळण्याअगोदर पर्यावरणाच्या दृष्टीने सुयोग्य जमीन म्हणजे काय हे समजून घेतलं तर तिचं अनारोग्य म्हणजे काय, हे समजणं सोपं होईल.

सजीवांना वास्तव्य करण्यास अंतर्बाह्य अनुकूल आणि पोषक असलेली जमीन ही पर्यावरणीय दृष्टीने सुस्थितीतली जमीन समजली जाते. जमिनीची आजची स्थिती जर या कसोटीवर आपण घासून पाहिली तर आपल्या पदरी निराशा येते. जमिनीची आजची स्थिती खूप विदारक असून पर्यावरणातील असमतोलाचं ते एकमेव कारण बनलं आहे. हा असमतोल दूर करायचा असेल तर सुयोग्य व्यवस्थापनाने या जमिनीची स्थिती लवकरात लवकर पूर्वपदाला आणणे सगळ्यात महत्त्वाचं आहे.

पाणी आणि जमीन यांचं एकत्रित व्यवस्थापन नीट न झाल्यामुळे जमिनींमधील; म्हणजेच भूगर्भातील पाण्याची पातळी चिंताजनकरित्या खाली गेली आहे. जमिनीमधील पाण्याच्या अभावामुळे जमिनीची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. जमिनींमधील ओलावा नष्ट झाला आहे, जमिनी कोरड्या पडल्या आहेत. नद्या, नाले, विहिरी, तलाव कोरडे पडत आहेत. जमिनींमधील वाढत्या शुष्कपणामुळे त्या ठिकाणच्या जीवजंतूंच्या आणि जमिनीचा प्राण असलेल्या एकूणच जीवसृष्टीच्या अस्तित्वावर गंडांतर आलं आहे. जमिनीमधले पोषक घटक नष्ट झाल्यामुळे जमिनी सजीवांच्या वास्तव्यासाठी अनुकूल आणि पोषक राहिलेल्या नाहीत. त्यामुळे जमिनींमधील जीवसृष्टी नष्ट होत आहे. झाडं-झुडपं आणि जंगलं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांची नवनिर्मिती थांबली आहे. एकूणच, जमिनीची प्रसूत होण्याची क्षमता आणि वेग लक्षणीयरित्या मंदावला आहे. आपल्या जमिनी मृतवत होऊन त्यांचा प्रवास वाळवंटीकरणाच्या दिशेने सुरू झाला आहे. याच गतीने पुढे सरकत राहिलो तर पुढील पंचवीस ते तीस वर्षांत पृथ्वीवरील नव्वद टक्के जमिनींचं रूपांतर वाळवंटात झालेलं असणार आहे. जमिनींच्या बाबतीतली वाळवंटीकरणाची ही सत्यपरिस्थिती लक्षात घेतली तर या विषयाचं गांभीर्य आपल्या लक्षात येऊ शकेल.

जमिनींच्या बिघडत चाललेल्या या परिस्थितीमुळे पर्यावरणातील हवा आणि तापमान या आणखी दोन घटकांवर परिणाम होत आहे. पर्यावरणातला पाणी हा मुख्य घटक अशाही परिस्थितीमध्ये आज आश्वासक वाटत असला तरी निर्माण झालेल्या या असमतोलामुळे उद्या त्याच्यावरही परिणाम होणार आहे, हे निश्चित आहे. जमीन या घटकाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच पर्यावरणाचं संपूर्ण चक्र धोक्यात यायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पर्यावरण म्हटलं की, पाण्याभोवती केंद्रित होणारं आपलं लक्ष या क्षणापासून जमीन या घटकावर केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. असं झालं तरच पर्यावरणामध्ये निर्माण होणार्‍या या असमतोलावर आपल्याला मात करता येऊ शकेल. भूगर्भाचं जलद गतीनं जलपुनर्भरण होऊन जमिनींच्या पृष्ठभागाच्या खाली खोलवर गेलेली पाण्याची पातळी जमिनीच्या पृष्ठभागाच्या वरच्या स्तरापर्यंत आणणं आणि तशी ती भविष्यात कायम टिकवून ठेवणं हा त्यावरचा एकमेव उपाय आहे.

भूगर्भाचं पुनर्भरण व्हावं आणि जमिनीखालच्या पाण्याची पातळी उंचावावी, यासाठी प्रयत्न चालू नाहीत असं नाही. परंतु त्यामध्ये डोळसपणाचा अभाव आहे, असं खेदानं नमूद करावं लागतं. मागील बर्‍याच वर्षांपासून ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ आणि जलसंधारण या दोन संकल्पनांच्या सहाय्याने आपण जमिनींच्या आतली पाण्याची पातळी उंचावण्याचे प्रयत्न करत आहोत. परंतु केवळ पावसाचं पाणी गोळा करणं आणि साठवणं या दोन क्रिया अंतर्भूत असलेली ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ ही पुरातन संकल्पना आपल्या वाढत्या गरजा ओळखण्यास आणि त्या पुर्‍या करण्यास पूर्णपणे अक्षम आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. काळाच्या ओघात आणि काळाने निर्माण केलेल्या नवनवीन आव्हानांपुढे शरणागत झालेली ही संकल्पना खरं पाहता केव्हाच कालबाह्य झाली आहे. त्यामुळे यापुढेही या संकल्पनेचंच शेपूट धरून फिरत राहणं ही केवळ एक अंधश्रद्धा ठरू शकते.

‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ या संकल्पनेच्या मर्यादा ओळखूनच आपण काही वर्षांपासून जलसंधारणांतर्गत काही पद्धतींच्या माध्यमातून जमिनींचं पुनर्भरण व्हावं, यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु आवश्यक आणि शोधक विचारांअभावी जलसंधारणांतर्गत राबवल्या जाणार्‍या पद्धतींना एक प्रकारच्या कर्मकांडाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. गरजेनुसार या पद्धतींवर विचार आणि त्यामध्ये बदल न झाल्यामुळे या पद्धतींच्या अवलंबामुळे मिळणार्‍या यशाला खूपच मर्यादा पडल्या आहेत. परंतु आपल्या अल्पसंतुष्ट वृत्तीमुळे आपण त्याचा शोध न घेता, आहे त्यातच समाधान मानण्याचं सुख मिळवत आहोत. जलसंधारणाच्या या सर्वच पद्धतींना इतर अनेक अडथळ्यांच्या आणि त्रुटींच्या बरोबरीने जमिनीच्या पाणी धारणक्षमतेचा नियम (water absorption capacity of land) आणि जमिनीमध्ये पाणी जिरण्याच्या वेगाचा नियम (rate of water perculation) या दोन नियमांचा मोठा अडथळा आहे, हे आपण कधी लक्षातच घेतलं नाही. त्यामुळे मागील अनेक वर्षं या कामांवर नियमितपणे मोठा खर्च करूनही आपल्या पदरात काहीच यश पडलं नाही. (‘पागोळी वाचवा अभियान’च्या फेसबुक पेजवर यासंबंधीची अधिक माहिती मिळू शकेल). जमिनींचं जल पुनर्भरण करून, जमिनींमध्ये कायमस्वरुपी ओलावा निर्माण करून या जमिनी जमीनींतर्गत जीवसृष्टीच्या अधिवासासाठी आणि वनस्पतींच्या निर्मितीबरोबरच त्यांच्या वाढीसाठी पोषक बनवणं म्हणजेच जमिनींचं सुयोग्य व्यवस्थापन, हे सूत्र जर आपण स्वीकारलं तर अडथळा ठरणार्‍या वरील दोन नियमांना मात देऊन जमिनींचं पुनर्भरण वेगाने करू शकेल, अशा पावसाच्या पाण्याची शेती (rainwater farming) या ‘पागोळी वाचवा अभियान’ सांगत असलेल्या साध्या, सोप्या, अल्पखर्चिक, तंत्रज्ञानविरहित, स्वावलंबी; परंतु अत्यंत प्रभावी अशा पूर्णपणे नवीन आणि अभिनव संकल्पनेची कास आपण धरण्याची आवश्यकता आहे. (जिज्ञासूंसाठी ‘पागोळी वाचवा अभियान’च्या फेसबुक पेजची लिंक पुढे दिली आहे.)

https://www.facebook.com/Pagoli-Wachawa Abhiyan-108250177466500/

पर्यावरण स्वतःची जबाबदारी केव्हाही मानवावर टाकत नाही. परंतु पर्यावरणाच्या शिस्तबद्ध चाकोरीमध्ये एका ठराविक मर्यादेपुढे मानवाने निर्माण केलेल्या अडथळ्यांची दुरुस्ती मानवाने त्याच्याच भल्यासाठी त्वरेने करावी, ही पर्यावरणाची मानवाकडून असलेली अपेक्षा चुकीची आहे, असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यासाठी पर्यावरणाच्या बाबतीत आपल्याला नव्याने विचार करावा लागेल आणि काळाच्या ओघात तयार झालेलं पर्यावरणीय कर्मकांड आणि अंधश्रद्धांना दूर ठेवावं लागेल.

लेखक संपर्क 8554883272 (whatsapp only)

Email – pagoli.dapoligmail.com


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]