प्रा. प. रा. आर्डे - 9822679546

सर आर्थर एडिंग्टन या पाश्चात्य वैज्ञानिकाचे एक सुवचन आहे – “सागरातील बोटीमध्ये तळघरात बटाट्याची पोती ठेवली आहेत. त्यातील एका पोत्यातील एका बटाट्यात एक किडा आहे. अफाट अशा विश्वातील माणूस म्हणजे या बटाट्यातील किड्यासारखा आहे.” या वचनानुसार विश्वाच्या प्रचंड पसार्यात माणसाचं स्थान नगण्य आहे. पण हे जरी खरं असलं तरी या छोट्याशा ‘मानवा’ने अवकाशाला गवसणी घालण्याचं साहस केलं आहे. आपल्या बुद्धिचातुर्याने अतिसूक्ष्म अशा अणूरेणुपासून अतिभव्य अशा आकाशगंगेपर्यंत मानवी प्रज्ञेने संचार केला आहे. ज्या साधनाद्वारे किंवा वैचारिक सामर्थ्यामुळे त्याला हा चित्तथरारक प्रवास करता आला त्याचं नाव आहे ‘विज्ञान’. विज्ञानामुळे मानवाने आपल्या संस्कृतीत क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत. हे बदल काही चांगले, तर काही विनाशकारी पण आहेत. याचा तपशिलात व खोलात जाऊन विचार करूया.
विज्ञानपूर्व काळात जगाच्या पाठीवर ज्या विविध धर्मांची आणि देवदेवतांची निर्मिती झाली, त्यात मानवाचे स्थान केंद्रस्थानी होते. बायबल हा ख्रिस्ती धर्माचा धर्मग्रंथ. त्यात अशी कल्पना आहे की, माणूस हा देवाचा लाडका; अवघं विश्व देवानं मानवासाठी निर्माण केलं. माणूस ज्या पृथ्वीवर राहतो, ती पृथ्वी विश्वाचा केंद्रबिंदू आहे. सूर्य, चंद्र आणि तारे हे मानवाला प्रकाश देण्यासाठी पृथ्वीभोवती देवाने फिरत ठेवले आहेत. हे आकाशातील गोल अमर आहेत. त्याचा पृष्ठभाग मोत्यासारखा गुळगुळीत आहे वगैरे वगैरे… या पृथ्वीकेंद्रित विश्वरचनेबद्दल पहिली शंका आली कोपर्निकस याला. त्याने सूर्य हा केंद्रस्थानी असून पृथ्वी व इतर ग्रह त्याच्याभोवती फिरत आहेत, असा विचार मांडला; पण हा विचार धर्मग्रंथातील कल्पनेच्या विरोधात जातो म्हणून त्याने आपल्या हयातीत पुस्तकरुपाने प्रसिद्ध केला नाही. त्याच्या मृत्यूनंतर मात्र त्याच्या या सूर्यकेंद्री सिद्धांताला त्याच्या मित्रांनी प्रसिद्धी दिली. गॅलिलिओने कोपर्निकसचा हा सिद्धांत वाचला होता.
इ.स. 1609 च्या जानेवारी महिन्यात गॅलिलिओने आपली दुर्बीण चंद्राकडे रोखली. त्याला चंद्राचा पृष्ठभाग खडबडीत आहे, असे समजले. त्याच्यावर विवरे आणि डोंगर आहेत, हे त्याला दुर्बिणीतून दिसू लागले. नंतर त्याने आपली दुर्बीण शुक्राकडे रोखली. त्याला शुक्र चंद्रासारखा लहान-मोठा होत असलेला आढळला आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने दुर्बिणीतून केलेले गुरू ग्रहाचे निरीक्षण. गुरूच्या भोवती फिरत असलेले चार चंद्र त्याला दिसून आले. गॅलिलिओने आकाशाच्या ज्या भागात तारे दिसत नाहीत तिकडे दुर्बीण वळविली असता त्याला नवे तारे दिसू लागले. या निरीक्षणातून गॅलिलिओने एक नवा क्रांतिकारक विचार मांडण्यास सुरुवात केली. त्याला दुर्बिणीतून दिसलेले जग आणि धर्मग्रंथात वर्णन केलेले जग यात मोठी विसंगती दिसून आली. आकाशस्थ गोलांचे पृष्ठभाग गुळगुळीत नसून ते खडबडीत आहेत. हे गोल आकाराने स्थिर आहेत, असा धर्मग्रंथाचा दावा; पण शुक्र तर लहान-मोठा होतोय हे गॅलिलिओचे निरीक्षण. आकाशात असलेल्या तेजोगोलांची संख्या कायम आहे, ती कमी किंवा जास्त होत नाही, आपल्या डोळ्याला जे गोल दिसतात तेवढेच गोल आकाशात आहेत ही धर्मकल्पना; पण गॅलिलिओला दुर्बिणीतून नवे तारे दिसले. या सर्वांपेक्षा गॅलिलिओचे क्रांतिकारी निरीक्षण म्हणजे गुरूभोवती फिरणारे चार चंद्र. मग सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह फिरत आहेत, हे खरे असावे.
कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धांताचे गॅलिलिओ समर्थन करू लागला. या समर्थनासाठी त्याने आपल्या निरीक्षणाद्वारे भक्कम पुरावे दिले. धर्मग्रंथांतील विचारांना यामुळे धक्का बसत होता. परिणामी ख्रिस्ती धर्मपीठ चिडले आणि त्यांनी गॅलिलिओवर खटला भरून आजन्म नजरकैदेची शिक्षा सुनावली.
‘सत्य न मरते दळभारे’ या वचनानुसार गॅलिलिओ सत्य सांगत होता आणि धर्मपीठ असत्याची पाठराखण करत होते; पण अखेर सत्याचाच विजय होतो. धर्मपीठाच्या दडपशाहीला युरोपमधील जनमानसानं जुमानले नाही. गॅलिलिओच्या ज्ञान मिळण्याच्या पद्धतीला पुढे न्यूटनने आधार दिला आणि सृष्टीकडे बघण्याचा एक नवा कार्यकारणभाव युरोपमध्ये उदयास आला. यालाच वैज्ञानिक क्रांती असे म्हणतात. या क्रांतीचे नेमके स्वरूप काय?
विश्वातील भौतिक घटनांमागील योग्य कार्यकारणभाव वैज्ञानिक दृष्टिकोनातून मिळू शकतो. मनुष्य हा या विश्वाचा केंद्रबिंदू नाही आणि विश्वातील सार्या घटना मानवासाठी घडत नाहीत, हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे पहिले वैशिष्ट्य होय. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक किंवा इतर प्रकारच्या अधिकारवादापेक्षा निरीक्षणाला महत्त्व आहे आणि तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे विश्व स्वयंचलित आणि निसर्गनियमांनी बद्ध आहे. हे नियम वैज्ञानिक पद्धतीने शोधता येतात. गॅलिलिओने नैसर्गिक घटनांबाबत निरीक्षणाचे आणि प्रयोगाचे महत्त्व स्पष्ट केले; तर न्यूटनने गृहितांच्या आधारे काढलेली अनुमाने पडताळा घेऊन सिद्ध करता येतात, हे दाखवून दिले. यातूनच नैसर्गिक घटना तपासण्याची वैज्ञानिक पद्धती आकाराला आली. निरीक्षण, गृहित, तार्किक मांडणी, अनुमान आणि पडताळा या पायर्यांनी निसर्गाचे नियम मिळविता येतात. हीच ती वैज्ञानिक पद्धती.
न्यूटनने आपल्या प्रतिभेने वैज्ञानिक पद्धती विकसित केली. त्याने गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि गतीचे तीन नियम मांडले. या नियमांच्या आधारे पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरतात, हे गणिताने सिद्ध केले. त्याच्या ‘प्रिन्सीपिया मॅथेमॅटिका’ या विश्वविख्यात ग्रंथात वैज्ञानिक पद्धतीचे सार आहे. समुद्राची भरती-ओहोटी ही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे कशी घडते, याचे न्यूटनने स्पष्टीकरण दिले. एवढंच नव्हे, तर हॅलेचा धुमकेतू पुन्हा केव्हा दिसेल, याचे गणिताने निष्कर्ष काढले. ते निष्कर्षही अचूक ठरले. अशा प्रकारे निसर्गाच्या नियमांनी विश्वातील घटनांचा शोध घेता येतो, हे तत्त्व न्यूटनमुळे सिद्ध झाले. म्हणूनच त्याला महान वैज्ञानिक किंवा विज्ञानाचा जनक अशा बिरूदाने गौरविले जाते.
नैसर्गिक घटना तपासण्यासाठी गॅलिलिओ-न्यूटनप्रणित वैज्ञानिक पद्धत म्हणजे जणू काही विश्वाची कळच. या कळीने विश्वरुपी अलिबाबाची गुहा उघडण्यास मदत झाली आणि विज्ञानाचे युग आकारण्यास सुरुवात झाली. विश्वातील घटनांच्या पाठीमागे दैवी किंवा अदृश्य शक्तींचे कारण नसून या घटना विशिष्ट नियमांनी घडत असतात, हे लक्षात आल्यावर विज्ञानाचा खजिनाच माणसाला गवसू लागला. विविध प्रकारच्या घटनांमागचे नियम शोधण्याची सुरुवात झाली. शरीरातील घडामोडी कशा घडतात, याचे शरीरविज्ञान शोधले जाऊ लागले. विल्यम हार्वेयाने रक्ताभिसरणाचा शोध लावला, तर व्हेसॅलियस याने मानवी शरीरातील सांगाड्याची रचना सिद्ध केली. विविध प्रकारच्या धातूंचा शोध सुरू झाला. निसर्गातील ऊर्जेचे आविष्कार उघड होऊ लागले. वाफेची शक्ती शोधली गेली. मायकेल फॅरेडे, अॅम्पिअर इत्यादींनी विजेचे नियम सिद्ध केले. यातूनच मग यंत्रयुग अवतरले. प्रथम निसर्गाचे मूलभूत सिद्धांत आणि या सिद्धांताचा उपयोग करून विविध पदार्थांची आणि यंत्रांची निर्मिती सुरू झाली. युरोप खंडात औद्योगिक क्रांतीने वेग घेतला.
माणूस विचार करायला लागला, तेव्हापासून त्याला काही प्रश्न पडत होते. हे विश्व कसे निर्माण झाले? केव्हा निर्माण झाले? या विश्वाला निर्माता आहे का? माझे या विश्वात स्थान काय? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला तत्त्वविज्ञानातून मिळतात. माणसाला जर असे प्रश्नच पडले नसते, तर विज्ञानाची निर्मिती कदाचित झाली नसती. वरील प्रश्नांची उत्तरे केवळ एका व्यक्तीला मिळत नसतात. विश्वाची गुढे उकलून आपल्या विस्मयाला वाट करून देणे, हे मानवाचे सामूहिक साहस आहे. या विस्मयातच विज्ञानाच्या सिद्धांताची किंवा तत्त्वविज्ञानाची निर्मिती झाली; पण माणूस इथेच थांबत नाही. एखादे तत्त्व सापडले की, त्याचा उपयोग सर्वांसाठी करता येईल, या गरजेपोटी विविध साधने माणसांनी निर्माण केली. या साधनांची निर्मिती आणि त्यांचा उपयोग म्हणजे तंत्रविज्ञान. तत्त्वविज्ञान आणि तंत्रविज्ञान यातून आपण काही प्रश्न सोडविले किंवा सुकर केले; पण विज्ञान-तंत्रज्ञानाकडून काही नवे प्रश्नही निर्माण झाले आहेत. म्हणून विज्ञानाचा सामाजिक संदर्भ तपासण्याची आवश्यकता आहे. प्रथम आपण तत्त्वविज्ञानाचा विचार करूया.
तत्त्वविज्ञानाने माणूस आणि विश्व यांच्या संबंधाबाबत नवा क्रांतिकारी विचार मांडला आहे. तत्त्वविज्ञानाचा पहिला आघात हा न्यूटनच्या सिद्धांतातून झाला आहे. न्यूटनचे सिद्धांत आणि विश्वाच्या एकूण रचनेबद्दल विसाव्या शतकापर्यंत मानवाने मिळविलेले ज्ञान यातून विश्वातील मानवाच्या स्थानाचे महत्त्व कमी झाले. या निबंधाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या अफाट विश्वात माणूस हा खिजगणतीतही नाही. आपली सूर्यमाला ही आकाशगंगेच्या एका टोकाला आहे. आपल्या आकाशगंगेसारख्या लाखो आकाशगंगा या विश्वात आहेत. पुन्हा त्या प्रचंड वेगाने एकमेकींपासून दूर जात आहेत. पृथ्वीवर माणूस निर्माण होण्यापूर्वी हे विश्व अस्तित्वात होते. कदाचित भविष्यकाळात विश्वातील घडामोडींनी मानवजात नष्टही होऊ शकेल; पण हे विश्व अस्तित्वात असेल.
मानवाची निर्मिती तरी कशी झाली? माणूस हा देवाचा खास लाडका आहे का? डार्विनने याला नकारार्थी उत्तर दिले. डार्विनच्या उत्क्रांती तत्त्वानुसार माणूस हा एकपेशी प्राण्यापासून जीवसृष्टी उत्क्रांत होत होत निर्माण झाला. माणसाचा पूर्वज हा माकड आहे. म्हणजे इथेही माणसाचे महत्त्व कमी झाले. म्हणूनच डार्विनच्या सिद्धांताला धर्मपीठाने विरोध केला होता.
माणूस हा विश्वाचा स्वामी नाही, तो पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ प्राणीही नाही. मग निदान तो स्वत:चा तरी स्वामी आहे की नाही? याचेही उत्तर नाही, असेच आहे. रिचर्ड डॉकिन्स यांचा ‘सेल्फीश जीन’चा सिद्धांत सांगतो की, माणसाला माणसाच्या इच्छा स्वातंत्र्याला मर्यादा आहेत. माणसाचा रंग, रूप, इच्छा, आकांक्षा, भावना आणि बुद्धिमत्ता यांचं नियंत्रण प्राधान्याने त्याच्या शरीरातील जीन्स करतात. हे जीन्स स्वत:च्या अस्तित्वासाठी मानवी शरीराचा वापर करतात. त्यांना पुढे जायचे असते. त्यांनी आपला एक प्रकारे ताबा घेतलेला असतो. अशा तर्हेने एकूण विश्वाच्या पसार्यात आपले मूल्य नगण्य आहे. हे वाचून कुणीही अस्वस्थ होईल. प्रख्यात तत्त्वज्ञ नित्शे याला आपण सर्वश्रेष्ठ आहोत आणि विश्वाचे लाडके आहोेत, हे खरे नाही याबद्दल विषाद वाटला; पण प्रख्यात वैज्ञानिक कार्ल सेगन म्हणतो की, “विश्व हे आपल्यासाठी नाही, हे सत्य असताना त्याविषयीच्या भ्रमाला गोंजारणे हे बरोबर नाही. विश्वाच्या पसार्यात नगण्य असलेल्या बटाट्यातील किड्याएवढ्या माणसाने अवघे विश्व विज्ञानाच्या सामर्थ्याने आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. आपले शरीर, आपले मन आणि विश्वातील पदार्थ यांची रहस्ये मिळवण्यात तो यशस्वी ठरत आहे.” अज्ञानात आणि भ्रमात राहण्यापेक्षा हे जग खर्या अर्थाने जाणून घेण्यातच आपली प्रगल्भता आहे, हेच खरे. आत्मप्रौढीपेक्षा आणि आपणच विश्वाचे लाडके आहोत, या भ्रमापेक्षा नम्रपणे सत्याचा शोध घेत पुढे जात राहणे, यातच शहाणपणा नाही का? संस्कृतीचा प्रवास निर्भयपणे करीत पुढे जाणे, हाच तत्त्वविज्ञानाचा संदेश आहे.
विज्ञानाचा दुसरा सामाजिक परिणाम म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभाव. छद्मविज्ञानाची निर्मिती म्हणजे विज्ञानाच्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होय. तंत्रज्ञानाने मानवी संस्कृतीला आकार देताना विविध प्रकारचे चांगले-वाईट आघात सामाजिक प्रश्नांबाबत केलेत.
तंत्रविज्ञानाने अलिबाबाची गुहा उघडली खरी; पण त्यातून मानवी समाजावर काय परिणाम झाले? विज्ञानाच्या सुपरिणामाचा विचार करता अनेक आश्चर्यकारक सुखावणार्या गोष्टी विज्ञानाने आपणाला मिळवून दिल्या. उपभोगाच्या विविध वस्तू विज्ञान-तंत्रज्ञानातून आपणास मिळाल्या. प्रवासाची जलद साधने प्राप्त झाली. दृष्टीच्या पलिकडचा प्रदेश आपल्या दृष्टिपथात आला. दूरवरचे संगीत रेडिओद्वारे आपल्या कानी ऐकू येऊ लागले. विज्ञानाचे सिद्धांत आणि त्याच्या उपयोगातून मिळालेले तंत्रज्ञान यांनी स्वयंपाकघरातील साधनांपासून अन्न, वस्त्र, निवारा यासाठी प्लास्टिकपासून ते कृत्रिम धाग्यांपर्यंत निर्माण केलेल्या विविध वस्तू; तसेच मनोरंजन आणि दळणवळण यामध्ये केलेल्या साधनांपर्यंत सुख-समृद्धीचा खजिना आपणापर्यंत पोचविला आहे; पण या सुख-समृद्धीच्या अतिरेकातून नव्या समस्यांना जन्म दिला आहे. त्या म्हणजे वाढते मनोविकार आणि अंधविश्वास. आधुनिक बुवाबाजी आणि रेकी, फेंगशुई, ज्योतिष यासारखी नकली विज्ञानं. यातून विज्ञानाकडे पाहण्याचा आपला एक चुकीचा दृष्टिकोन समाजाला ग्रासू पाहत आहे. विज्ञान हे भल्यासाठी नाही. प्रदूषण, तीव्र स्पर्धा, मानसिक समस्या हीच जर विज्ञानाची अपत्ये असतील, तर असे विज्ञान काय कामाचे, असे प्रश्न लोकांकडून विचारले जाऊ लागले आहेत. विज्ञानाबद्दलचा हा दृष्टिकोन जरी बरोबर नसला, तरी तो निर्माण झालाय, याचे कारण तंत्रज्ञानामुळे समाजाला वेढत चाललेला चंगळवाद.
1980 च्या दशकात मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे जगात वाहायला लागले. आपल्याकडे भारतात 1990 नंतर मुक्त अर्थव्यवस्था किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारी करार स्वीकारला गेला. उद्योगातला पैसा सट्टेबाजीकडे वळू लागला. यातूनच वित्त भांडवलाचं जगावर राज्य सुरू झालं. वस्तूंचे अधिक उत्पादन आणि ते उत्पादन खपवून प्रचंड नफा मिळविण्यासाठी मोठ-मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या जगावर राज्य करू लागल्या. समाजाची गरज यापेक्षाही अधिकाधिक नफा आणि अधिकाधिक श्रीमंती या दिशेने स्वार्थाचा बाजार सुरू झाला. याचाच परिणाम म्हणून लोकांमध्ये अधिकाधिक वस्तूंचा उपभोग म्हणजेच, चंगळवाद हेतुपूर्वक वाढीला लावला गेला त्यासाठी आकर्षक जाहिराती आणि इतर प्रभावी तंत्रे याचांही वापर सुरू झाला. या चंगळवादी, स्वार्थी संस्कृतीमध्ये जास्तीत जास्त संसाधने स्वत:करिता वापरून इतर माणसं आणि जीवसृष्टी यांचा विचार न करण्याची वृत्ती बळावली. ही बाजारू संस्कृती मग आपल्या दैनंदिन व्यवहारात घरात आणि अगदी बेडरूमपर्यंत पोचली. परिणामी प्रचंड विषमता, विविध प्रकारचे मनोविकार आणि पर्यावरणाचा विनाश होऊ लागला.
जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण ही नवभांडवलशाहीतून येणारी आक्रमणे अवघी समाजव्यवस्था एका अवघड आणि विध्वंसक वळणावर नेऊ लागली आहेत. चंगळवादी उपभोग संस्कृतीचा रतीब विविध प्रसारमाध्यमांच्या द्वारा रोज घरी आणून टाकला जात आहे. चंगळवादातून निर्माण झालेला आर्थिक ताण मन:शांती हरवू पाहत आहे. त्यातूनच विविध प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होऊ पाहत आहेत. स्वाध्याय, सिद्ध सायन्स, रेकी, सहजसिद्ध योग, कुंडलिनी जागृती इत्यादी मार्गांनी लोकांना चित्तशांतीपासून आर्थिक समृद्धीपर्यंत शेकडो गोष्टी मिळवून देण्याचे दावे करणार्या शास्त्री, बापू, श्री श्री, सद्गुरू, विश्वसंत प्रभृतींचे अक्षरश: पेव फुटले आहे. मध्यमवर्गाने आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य जीवनशैली जवळ केली; पण त्याचवेळी आपली पाळेमुळे टिकवून ठेवण्याची धडपडही चालूच ठेवली. त्यातून ही बुवाबाजी वाढते आहे. यातून भक्तिभावनेचा बाजार उभा राहिला आणि धार्मिक उत्सवापासून ते सर्व पातळ्यांवरील बाबा, बुवा महाराजांचे अमाप पीक बाजारात आले. प्रश्न केवळ बुवा, बाबा, शास्त्री, स्वामी, महाराजांकरवी फैलावल्या जाणार्या अंधश्रद्धांचा नाही, त्यांची प्रदीर्घ परंपरा पूर्वापार येथे आहेच. या आंधळ्या आणि वेडगळपणाच्या पातळीवर वैचारिक मांडणी करणार्या गुरूमहाराजांना जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे, तो चिंताजनक आहे. जनसामान्यांची द्विधा मन:स्थिती आणि बुवाबाजीला राजाश्रय यामुळे हे प्रस्थ समाजात एवढे वाढले आहे.
आपल्याकडे पैसे देऊन देवदर्शन फास्ट ट्रॅकमध्ये मिळतं. शिकले-सवरलेले लोक बाबांच्या, साधूंच्या नादी लागतात. आपल्याला गणपती दूध पिल्याचे भास होतात, विज्ञान संशोधन केंद्रात आणि सरकारी कचेर्यात सत्यनारायणाच्या पूजा होतात. शिकलेले उच्चविद्याविभूषित लोक वास्तुशास्त्र आणि फेंगशुईच्या मागे लागतात. खगोल विज्ञानाऐवजी, ज्योतिषावर विश्वास ठेवतात. सगळं नॉर्मल असूनही मुहुर्तावर सिझेरियन शस्त्रक्रिया करून घेतात. राजकारणी, निवडणुकीचा फॉर्म भरताना आणि चित्रपट निर्माते चित्रपटाची सुरुवात करताना, मुहूर्त आणि न्यूमरॉलॉजीचा आधार घेतात. थोडक्यात आपण विज्ञान जगत नाही.
चंगळवाद आणि पूर्वापारची दैववादी मनोवृत्ती यातून समाजाला मुक्त करायचे असेल, तर विवेकवादाशिवाय पर्याय नाही. विवेक म्हणजे शहाणपण हे दोन प्रकारचे आहे. एक भौतिक जगातील सत्य सांगणारे विज्ञानाचे नियम. भौतिक जगातील व्यवहार विविध देवदेवता, भूतपिशाच, हडळ, मुंजा (गॉड्स, डेमन्स आणि स्पिरीट्स) या तथाकथित अतींद्रियशक्ती नियंत्रित करीत नाहीत; किंबहुना अशा शक्तींना पुरावाच नाही. प्रत्येक भौतिक घटनेचे योग्य कारण तपासणे म्हणजेच कार्यकारणभाव समजून घेणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. विवेकाचा दुसरा भाग म्हणजे नीतिविवेक. चांगलं काय, वाईट काय म्हणजेच मूल्यविवेक. चंगळवाद आणि बुवाबाजी यांच्यावर मात करण्यासाठी विवेकाचा प्रभावी वापर हवा.
बुवा करत असलेले चमत्कार आणि अध्यात्माच्या नावाखाली करत असलेली फसवणूक याच्या विरोधात विज्ञानदृष्टीचा प्रभावी वापर करता येईल. शिवाय मानसशास्त्रीय उपाय अमलात आणता येतील. चमत्कारामागे असलेला वैज्ञानिक कार्यकारणभाव उघड करून बुवाचे बिंग फोडता येईल. हे कार्य महाराष्ट्र अंनिस गेली तीस वर्षे सातत्याने करीत आली आहे. त्याला यशही मिळत आहे. हल्ली चमत्कार करणारे बाबा फारसे दिसत नाहीत. आध्यात्मिक बुवाबाजी विरोधी प्रभावी जनप्रबोधनामुळे आसारामबापू, रामरहीम, रामलालसारखे बाबा गजाआड होत आहेत.
दैववादी मनोवृत्तीवर मात करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावी ठरेल, अशी आशा धरायला हरकत नाही; पण एवढंच पुरेसं नाही. या मनोवृत्तीला उत्तेजन देणार्या चंगळवादाला आवर घालायचा असेल, तर पर्यायी विकासनीतीचा वापर करायला हवा. आल्विन टॉफलर यांच्या ‘थर्ड वेव्ह’ या गाजलेल्या पुस्तकात ‘गांधी वुईथ सॅटेलाईट’ या शीर्षकाचे एक प्रकरण आहे. त्यात निसर्गाचा विध्वंस करणार्या खनिज इंधनाचा दुरूपयोग टाळून क्लीन उर्जेच्या सहाय्याने आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्राच्या मदतीने छोटे-छोटे उद्योग कसे उभारता येतील, त्यातून अधिकाधिक लोकांना कसं काम मिळेल; तसेच अवाजवी नफाकेंद्री अर्थव्यवस्था कशी बदलता येईल, याचं छान स्पष्टीकरण दिलंय. अतिरेकी, राक्षसी विज्ञान-तंत्रज्ञानाला दिलेलं हे उत्तर आहे. चंगळवादाच्या वाढीला कारण ठरलेली मादक उत्पादने चैनबाजीला प्रोत्साहन देणारे उद्योग, तसेच अणुबाँब व रासायनिक विध्वंसक शस्त्रात्रे, यांचा त्याग करावा लागेल.
पूर्वापार चालत आलेल्या बुवाबाजीला आणि राक्षसी तंत्रज्ञानाला समुचित तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याद्वारे नियंत्रित करता येईल; पण विज्ञानालाच हाताशी धरून एक नवी बुवाबाजी समाजात थैमान घालत सुटली आहे, त्याचं काय? या आधुनिक बुवाबाजीचे नाव आहे ‘छद्मविज्ञान‘ किंवा नकली विज्ञान. विज्ञानाचा सामाजिक प्रभाव ओळखून विज्ञानालाच वेठीस धरणार्या या नव्या बुवाबाजीचे स्वरूप चक्रावून टाकणारे आहे. लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन विज्ञानाची झूल पांघरलेले नकली विज्ञान हे अनर्थकारी आहे, त्यासाठी अस्सल विज्ञान आणि नकली विज्ञान यातील भेद ओळखायला हवा, त्याचं मानसशास्त्र नीट समजावून घ्यायला हवं आणि हल्ली प्रचलित असलेल्या नकली विज्ञानाचा पर्दाफाश करायला हवा. भविष्यातील संघर्ष हा नकली विज्ञानाच्या आधुनिक बुवाबाजी विरोधाचा संघर्ष असेल.
आधुनिक काळात निर्माण झालेला चंगळवाद, त्यातून निर्माण झालेली छद्मविज्ञानासारखी आधुनिक बुवाबाजी व आध्यात्मिक बुवाबाजी याला विज्ञान जबाबदार नाही. विज्ञानाचा अविवेकी वापर हेच जबाबदार आहेत. म्हणून समुचित तंत्रज्ञान व विज्ञानाचा कार्यकारणभाव यांचा विवेकी वापर हेच या प्रश्नांवरचे उत्तर आहे.