आलोक देशपांडे -
30 जानेवारी, 2022 ला युवकांचा एक मोठा जमाव मुंबईमधील धारावी भागात जमला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा हा मतदारसंघ. मार्च /एप्रिल महिन्यात होणार्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करून ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही मागणी करीत नुकतेच मिसरूड फुटलेली ही मुले रस्त्यावर उतरली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मुलांसोबत त्यांचे पालक नव्हते किंवा कोणत्याही राजकीय संघटनेचा झेंडा देखील नव्हता. पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना तेथून दूर केले. मात्र त्यावेळी तेथे जमलेल्या मुलांकडून असे सांगण्यात आले की, ही मुले यू-ट्यूबवर ‘हिंदुस्तानी भाऊ’ असे नाव घेऊन व्हिडिओ करणार्या एका विकास पाठक नामक व्यक्तीचे व्हिडिओ बघून तेथे गेली होती. या ‘भाऊ’ने मुलांना स्वत:च्या ‘हक्कां’साठी रस्त्यावर उतरा, असे आवाहन करणारे व्हिडिओ गेले आठवडाभर केले होते. त्यानेच पेटून जाऊन या ‘हिंदुस्तानी भाऊ’चा आदेश शिरसावंद्य मानत ही मुलं रस्त्यावर आली.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड येथे पोलिसांनी ‘थेरगाव क्वीन’ या नावाने इन्स्टाग्राम अकाऊंट चालवणार्या एका 18 वर्षीय युवतीला अटक केली. शिवीगाळ, अश्लील कमेंट करणारे व्हिडिओ तयार करून ते समाजमाध्यमांवर ती आणि तिचे मित्र टाकतात. या विरोधात पोलिसांत तक्रार झाल्यानंतर तिला व अजून दोन जणांना अटक करण्यात आली.
सारं जग नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात मग्न असताना समाजमाध्यमांवर; विशेषत: ट्विटरवर ‘बुल्ली बाई’ अॅपचा कारनामा उघड होत होता. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात समाजमाध्यमांवर जोरकसपणे भूमिका मांडणार्या काही मुस्लिम महिलांचा ऑनलाईन लिलाव केला जात होता. त्यांचे फोटो पसरवून त्यावर किमती चिकटवल्या जात होत्या आणि एखाद्या निर्जीव वस्तूची बोली लावावी, तशी त्यांची इंटरनेटवर विक्री केली जात होती. अर्थात, मुस्लिम महिलांचा हा लिलाव पहिल्यांदाच होत नव्हता. याआधी जुलै 2021 मध्ये देखील असाच प्रकार यातीलच काही महिलांच्या बाबत ‘सुल्ली डील्स’च्या माध्यमातून हेच घडले होते. त्याही आधी पाकिस्तानमधील महिलांचा देखील अशाच प्रकारे लिलाव होण्याची घटना घडली होती. जुलै 2021 च्या ‘सुल्ली डील्स’च्या बाबतीत दिल्ली पोलिसांकडे त्यास बळी पडलेल्या स्त्रियांनी तक्रार करूनदेखील कोणतीही कारवाई कोणाही बाबतीत झाली नव्हती. यावेळेस मात्र मुंबई पोलिसांकडे येथेच राहणार्या एका स्त्रीने, तिचे नाव ‘बुल्ली बाई’ अॅपमध्ये बघून तक्रार केली आणि चक्रे वेगाने फिरली. मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने अवघ्या दोन दिवसांत 18 ते 25 वर्षेवयोगटातील तरुण, उच्चशिक्षित मुले आणि मुलींना देशाच्या विविध भागांमधून अटक केली. मुंबई पोलीस कार्यरत बघून दिल्ली पोलिसांना देखील कृती करणे भाग पडले व त्यांनीही काही तरुणांना अटक केली.
वर उल्लेख केलेल्या घटना प्रातिनिधिक आहेत. मात्र या सर्व घटनांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे इंटरनेटचा वाढलेला प्रचंड वापर आणि त्यातून या समाजमाध्यमांच्या प्रचंड प्रभावाखाली असलेला आजचा युवा वर्ग. हा असा घटक आहे, जो माहितीच्या या महाजालात आपले आभासी ‘आयकॉन’ शोधतोय, पैसे, ग्लॅमर व प्रसिद्धी कमावणे ही उद्दिष्टे डोळ्यांपुढे ठेवून वाट्टेल ते व्हिडिओ ‘कंटेंट’ या नावाखाली तयार करतोय आणि जात्यांध व धर्मांध शक्तींनी पसरवलेल्या जाळ्यात अलगद अडकून कमालीचा विषारी बनतोय. हा युवा आपल्यापासून दूर नाही. जरा आजूबाजूच्या युवक-युवतींवर नजर टाकलीत तर अशी उदाहरणे अगदी आपल्या कुटुंबात, सोसायटीमध्ये, कामाच्या ठिकाणी, समाजात सर्वत्र दिसू शकतील.
काय घडतंय नक्की? स्वत:ला ‘हिंदुस्तानी भाऊ’ म्हणवून घेणारा विकास पाठक याच्या इतिहासावर नजर टाकली तर सध्या सत्ताधारी सर्व प्रश्नांवर जो एकच उपाय सांगतात, त्या आक्रमक राष्ट्रवादाचा वापर करत प्रसिद्ध झालेला हा एक क्षुल्लक माणूस. कधी कोणते आंदोलन नाही केले की जमिनीवर काही काम नाही. एका गाडीत बसून मोबाईलवर व्हिडिओ करणे, ज्यात व्यवस्थेला प्रश्न विचारणार्या असो किंवा प्रचलित राष्ट्रवादाची भूमिका न घेणार्या व्यक्ती असोत, त्या सर्वांना शिव्या घालणे, महिलांबद्दल अश्लील बोलणे किंवा ‘पाकिस्तानात जा,’ वगैरे फुटकळ दम देणे असले ‘उद्योग’ हा करतो. जो आपल्या मताच्या विरोधी मत मांडतो, त्या व्यक्तीवर शिव्यांचा भडिमार करणारेही व्हिडिओ तरुणाईत प्रचंड लोकप्रिय झाले आहेत; इतके की, कलर्स नावाच्या एका वाहिनीवर चालणार्या ‘बिग बॉस’ कार्यक्रमात या व्यक्तीला चक्क स्पर्धक म्हणून बोलावले गेले, जणू समाजमान्यतेची, लोकप्रियतेची मोहरच ती! मध्यंतरी त्याच्या महिलांबद्दल केलेल्या कॉमेंट्समुळे; तसेच शिवराळ भाषेमुळे त्याचे अकाऊंट निलंबित करण्यात आले होते, जे आता परत सुरू झाले आहे. काही राजकीय लागेबांधे असल्याचा आरोप देखील या व्यक्तीवर झाला आहे.
या भाऊला एका मोठ्या वाहिनीवर झळकायची मिळालेली संधी, कोणाला काहीही बोलले तरी पोलीस काही करत नाहीत आणि केले तरी त्यातून लोकप्रियताच मिळते, याची पटलेली खात्री आणि पैशांचा आणलेला आव हे सर्व बघून त्याला कॉपी करणारे अनेक अकाऊंट सध्या सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड भागातील ‘थेरगाव क्वीन’ या नावाने व्हिडिओ करून इन्स्टाग्रामवर टाकणारी 18 वर्षीय युवती व तिचे मित्रमंडळही त्यातलेच एक.
हजारो ‘फॉलोअर’ असणारी ही मुलगी काही सेकंदांचे व्हिडिओ करते, ज्यात एखाद्या फिल्मी संवादाच्या काही ओळी असतात आणि शेवटी ‘पंचलाईन’ म्हणून ती एखादी कचकचित शिवी घालते. बस्स, एवढंच. भरपूर लोकप्रियता असल्या अभिरुचीहीन ‘कंटेंट’ला मिळत आहे. मध्यंतरी तिला अटक झाली, त्या अटकेचे आणि सुटकेनंतरचे स्वागताच्या जल्लोषाचे व्हिडिओ देखील तिने तिच्या अकाऊंटवर टाकले. ना अटकेची भीती किंवा शरम, ना सुधारणेची इच्छा. लोकप्रियता मिळवणे एवढे एकमेव ध्येय आणि त्यासाठी काहीही करायची तयारी.
बाजारकेंद्रित भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही नेहमीच एक प्रॉडक्ट असता. तुमच्या अभिव्यक्तीचा आनंद इतरांनी घेणे यापेक्षाही महत्त्वाचे असते त्या व्यक्त होण्यातून पैसे कसे मिळतील, तुम्ही विकले कसे जाल किंवा तुम्ही काय विकू शकाल, यावर सारे केंद्रित असते. पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला काही हजार ‘फॉलोअर’ तरी आधी हवेत. ते मिळवण्यासाठी सरळ मार्गाने गेल्यास सर्वसामान्य व्यक्तीला काही महिने किंवा वर्षेलागतील. तेवढा वेळ कोणाकडेच नाही. मग लोकांना आकृष्ट करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे काही वादग्रस्त किंवा सनसनाटी केलं जातं. मग कोणी शिवीगाळ करणारे व्हिडिओ करते किंवा कमी कपड्यात अंगप्रदर्शन किंवा काही धोकादायक स्टंट केले जातात. अनेक वेळा अशा फेक ‘फॉलोअर’ मिळवून देणार्या कंपन्या असतात, ज्या काही पैशांच्या मोबदल्यात ही कामं करतात.
समाजमाध्यमांवर मोठा चाहतावर्ग किंवा ‘फॉलोअर’ जमले की अशा व्यक्ती प्रभावशाली (influencer) म्हणून म्हणवून घेतल्या जाऊ लागतात. अनेक खासगी कंपन्या आपापली प्रोडक्ट्स घेऊन त्यांच्याकडे येतात व त्यांच्या व्हिडिओमध्ये ते दाखवण्याच्या बदल्यात पैसे देतात. यात यशस्वी होऊन अफाट पैसा कमावणारे फारच थोडे असतात. मात्र या फारच थोड्यांचे उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून हजारो युवा समाजमाध्यमांवर आले आहेत. मोफत मोबाईल डाटा, बर्यापैकी दर्जाचा मोबाईल कॅमेरा आणि कोणतेही तांत्रिक ज्ञान नसले तरी व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याइतके सोपे झालेले तंत्रज्ञान यातून युवा वर्गाच्या अभिव्यक्तीला धुमारे फुटले नसते तरच नवल. मात्र तेवढ्यांवरच सीमित न राहता सध्या घडत असलेल्या घटना म्हणजे प्रकरण हाताबाहेर चालले असल्याचे दर्शक आहे. ‘फेसबुक’, ‘गुगल’ या डिजिटल युगातील इतर महाकाय कंपन्या त्यांच्या वापरकर्त्या लोकांना कशा प्रकारे ‘मार्केटिंग’च्या जंजाळात गुंतवून पैसे कमावतात, यावर अनेक चित्रपट आहेत.
ज्या प्रकारे खासगी कंपन्या यांचा वापर करतात, त्याप्रमाणे अर्थातच, राजकीय पक्ष देखील मागे राहू शकत नाहीत. त्यांनी स्पॉन्सर केलेले अनेक तथाकथित ‘भाऊ’ नि:पक्षतेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा पुढे ढकलत असतात. मात्र वैयक्तिक लाभासाठी समाजमाध्यमांवर अविचारी वागणे, वाट्टेल ते करणे वेगळे आणि विशिष्ट राजकीय विचारसरणीतून द्वेषपूर्ण, हिंसक आणि संवैधानिक मूल्यविरोधी बेकायदा कारवाया करणे पूर्णपणे वेगळे. सध्या उघडकीस आलेली मुस्लिम महिलांचा ऑनलाईन लिलाव करण्याची घटना या दुसर्या भागात येते. ज्या बाजारकेंद्रित भांडवली व्यवस्थेचा उल्लेख आपण केला तिला आक्रमक धर्मांध राष्ट्रवादाची जोड मिळाल्यावर जे होऊ शकते याचे, उदाहरण म्हणजे ‘बुल्ली बाई’ अॅप प्रकरण आहे. त्या प्रकरणात सध्या अटकेत असलेल्या मुलांनी हे का केले असावे, असा विचार केल्यावर काही गोष्टी स्पष्टपणे जाणवतात.
कोणत्या आहेत त्या गोष्टी? ही मुले उच्चशिक्षित आणि साधारण 18 ते 25 या वयोगटातील आहेत. सध्या देशभर पसरलेल्या आणि साधारण 2013 पासून अधिक तीव्रतेने पसरू लागलेल्या मुस्लिमविरोधी, द्वेषयुक्त वातावरणात यांनी प्रौढावस्थेत प्रवेश केला आहे. बातम्यांच्या नावाखाली, एखाद-दुसरा अपवाद वगळता; प्रसंगी खोटे बोलत धर्मांधतेचे विष पसरवणार्या वृत्तवाहिन्या पाहत ते लहानाचे मोठे झाले. मुसलमान देशद्रोही असतात, धर्मनिरपेक्ष लोकांना पाकिस्तानात हाकलून दिले पाहिजे आणि नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा ‘वध’ करून ‘सत्कार्य’ केले, असे ‘व्हॉट्सअॅप ज्ञान’ बिनधास्त वाटणार्या जवळच्या ‘नातेवाईका’ंची संख्या त्यांच्या आजूबाजूला वाढलेली आहे. दलित किंवा मुस्लिम व्यक्तीला जमावाने लाथा-बुक्क्यांनी तुडवून मारले तरी पोलीस काही करत नाहीत, याची अनेक घटनांवरून त्यांची खात्री पटलेली आहे आणि हे सर्व झाले तरी समाजातून जो प्रखर निषेधाचा सूर एकजुटीने यायला हवा, तो देखील येत नाही, हे देखील त्यांना दिसत होते.
‘बुल्ली बाई’ अॅप प्रकरणात ज्या महिलांचे ऑनलाईन लिलाव करण्यात आले, त्यातील एका महिलेशी बोलण्याची संधी मला मिळाली. तिच्या मते, ही मुले काही स्वतंत्रपणे काम करणारी नाहीत. राजकीय वरदहस्त असलेली आणि पोलिसांची कोणतीही भीती नसलेली एक यंत्रणा हे सर्व ‘नियोजनबद्ध’रित्या घडवून आणत होती. यापूर्वीच्या ‘सुल्ली डील्स’ प्रकरणात दिल्ली पोलिसांकडे जुलै 2021 मध्येच तक्रार करण्यात आली होती. परंतु, केंद्रीय गृह खात्याच्या अखत्यारित असणार्या दिल्ली पोलिसांनी यात ना कोणाला अटक केली, ना या घटनेचा खोलात जाऊन तपास केला. यावेळी, तक्रार जेव्हा मुंबई पोलिसांकडे करण्यात आली, तेव्हा त्यांनी केवळ 2 दिवसांत यातील पहिल्या आरोपीला अटक केली आणि त्यानंतर दिल्ली पोलीस जागे झाले व आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली.
‘Alt न्यूज’सारख्या शोध पत्रकारिता करणार्या वेबसाईटने अशा प्रकारचे हिंसक, लैंगिक अत्याचारास प्रोत्साहन देणारे ट्विटस करणारे अनेक अकाऊंट शोधून त्यांच्यात असणारी सुसूत्रता, उजव्या विचारसरणीशी असलेली त्यांची बांधिलकी आणि गुप्ततेने चालणारे कार्यक्रम यावर वेळोवेळी प्रकाश टाकला आहे. ‘बुल्ली बाई’ अॅप प्रकरणातील पीडितेच्या मते देखील या गोष्टी अचानक, एका रात्रीत घडत नाहीत आणि कोणी एक व्यक्ती हे सर्व करू शकत नाही. ‘राजकीय दबाव न टाकता या प्रकरणाची चौकशी झाली तरच सत्य समोर येईल,’ असे ती म्हणते.
पैसे, ग्लॅमर व लोकप्रियता याला भुलून समाजमाध्यमांवर उच्छाद मांडणे असो किंवा धर्मांध राजकारणाला बळी पडून गुन्हेगारी वर्तन करणे; या सार्यात आजचा युवा वर्ग केंद्रस्थानी आहे. देशात प्रचंड वाढलेली बेरोजगारी, दिवसेंदिवस वर जाणारा महागाईचा दर, दिवसेंदिवस अधिकाधिक गरिबीत ढकलला जाणारा समाज, याकडे लक्ष जाऊ नये म्हणून कोणत्याही भांडवली व्यवस्थेत अनेक अडथळे आणले जातात. ही समाजमाध्यमे काही प्रमाणात या अडथळ्यांचेच काम आज करत आहेत. असे अडथळे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेहमीच सोयीचे ठरतात. कारण जनता आभासी, खोट्या व स्वप्नाळू जगात रमणे त्यांची खुर्ची वाचवायला उपयोगी असते. जेव्हा ‘हिंदुस्तानी भाऊ’सारख्या थिल्लर माणसाच्या आवाहनावर शेकडो मुले रस्त्यावर उतरतात, याचा अर्थ आज त्यांच्यासमोर समजूतदारपणे बोलणारे, त्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे तडीस नेणारे नेतृत्व त्यांना दिसत नाही, असाही घेता येईल. आक्रस्ताळी, हिंसक भाषा, ‘व्हॉट्सअॅप’वरून आलेली खोटी माहिती आणि नाटकी अभिनय करून देशाच्या नेत्यांकडून संसदेतच होणारी भाषणे ‘हॉट’ असल्याने त्याचेच थोडे भडक रूप समाजमाध्यमांवर लोकाना आकृष्ट करू लागले आहे आणि त्याला युवा वर्ग बळी पडत आहे.
आज हा प्रश्न एका ठराविक कुटुंब किंवा वर्गापुरता मर्यादित राहिलेला नाही, तो आपल्या सर्वांच्या घरात कधीच शिरलाय, कमी-अधिक प्रमाणात. त्याला नाकारणे आता शक्य नाही. त्याच्या मुळाशी शिरूनच त्यावर उपाय करावा लागेल. पुढची पिढी; पर्यायाने देश वाचवायचा असेल तर…!