किर्लोस्कर मासिक : एक अंधश्रद्धा निर्मूलनाची सामाजिक चळवळ

प्रभा पुरोहित -

महाराष्ट्रातील औंध संस्थानात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी 1910 साली पहिला उद्योग समूह काढला. या किर्लोस्कर उद्योगसमूहाचे ‘किर्लोस्कर खबर’ हे मुखपत्र हे त्या काळचे एक नवमतवादी, पुढारलेले मासिक होते. ऑगस्ट 1920 ला त्याचा पहिला अंक निघाला. सामाजिक सुधारणा, जातिनिर्मूलन, स्त्री-पुरुष समानता ही मूल्ये वैचारिक पातळीवर किर्लोस्कर मासिकातून तर प्रत्यक्षात किर्लोस्करवाडीमध्ये जोपासली जात होती. अनेक विचारवंत आपली परखड आणि बर्‍याचदा प्रक्षोभक मते या मासिकात निर्भयपणे मांडीत होते.

ऑगस्ट 1925 च्या अंकात र. धों. कर्वे यांचा ‘अमर्याद संतती’ हा लेख छापून आला होता. यात महात्मा गांधीजींच्या, ‘संतती निर्माण करण्याकरताच समागम करावा, एरव्ही ब्रह्मचर्य पाळावे,’ या मतावर टीका केली होती. हे अनैसर्गिक आहे असे म्हटले होते. संत रामदास स्वामी यांचे लेकुरे उदंड झाली। तों ते लक्ष्मी निघोन गेली॥ बापडी भिकेस लागली। काही खाया मिळेना॥ हे वचन त्यात दिले होते. या लेखावर सनातन्यांनी टीकेची झोड उठवली. शंकरराव किर्लोस्करांचे गुरू पं. सातवळेकर यांनी त्यावर टीका केली. औंधच्या महाराजांनी पण त्याबाबत जाब विचारला. 1927 मध्ये ‘र.धों.चा विनय म्हणजे काय?’ हा लेख संभाव्य वादंग टाळण्यासाठी ‘किर्लोस्कर’ने छापायचे नाकारले. त्यात विनय म्हणजे एक ढोंग आहे. कर्व्यांनी आपले स्वत:चे लैंगिक जीवन, कुटुंब नियोजन या विषयाला वाहिलेले ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक सुरू केले. तोवर ‘किर्लोस्कर’ मासिक ही एक चळवळ बनली होती. 1927 साली वर्गणीदारांचे ‘उत्कर्ष मंडळ’ सुरू करण्यात आले होते. ‘उद्धरेदात्मनात्मानं’ हे मंडळाचे ब्रीद वाक्य होते.

‘मी स्वत:चा उत्कर्ष स्वत: घडवून आणीन. सत्य, प्रामाणिकता आणि नीती सोडणार नाही. आरोग्याचे नियम पाळून दीर्घायुष्य मिळवीन. माझा उद्योग करताना स्वत:च्या स्वार्थाबरोबरच समाजाची सेवाही करीन.’ हे मंडळाचे उद्दिष्ट होते. ‘अंनिस’च्या ध्येयधोरणाशी हे खूप मिळते-जुळते वाटते.

1926 मध्ये वाईच्या प्राज्ञ पाठशाळेतून आलेले आधुनिक विचारांचे लेखक महादेवशास्त्री दिवेकर ‘किर्लोस्कर’ला मिळाले. त्यांनी बुवाबाजीच्या विरोधात एक आघाडीच उघडली होती. ते लिहितात, “एकदा मी एकादशीला गंगेवर स्नानासाठी गेलो होतो. धाबळी आणि पंचपात्री वाळूमध्ये झाकून खाणेसाठी वाळूचे लिंग केले होते. अर्ध्या घटकेने येऊन बघतो तो काय शेकडो वाळूची लिंगे तयार करून लोक पूजत आहेत आणि भटजी त्यांना पूजा सांगत आहेत, असे दिसले.”

ते पुढे मार्मिक टिप्पणी करतात, “मूर्खाचा पैसा हा लुच्च्या माणसांचा खुराक असतो.” महादेवशास्त्री दिवेकर यांनी बुवाबाजीवर प्रखर टीका केली आणि धर्माच्या नावावर चाललेली लबाडी उघडकीस आणली. नारायण महाराज उपासनी ऊर्फ उपासनीबुवा यांच्या भक्तांनी ‘किर्लोस्कर’ आणि पं. महादेवशास्त्री दिवेकर यांच्यावर खटले भरले. बुवांच्या जबानीत, “मी धर्मशास्त्र वाचलेले नाही. मी वेदांतही पढलो नाही. मी सांगेन तेच धर्मशास्त्र होय.” असे अकलेचे तारे त्यांनी तोडले. “ज्यांच्या इच्छेला येईल ते माझ्या दर्शनास येतात. माझी पूजाअर्चा करतात. माझ्या पायखान्याची सुद्धा बायका पूजा करतात. माझी लिंगपूजा करतात. मला मुली अर्पण करतात. अशा पाच मुली माझ्याकडे आहेत. या मुलींना मी पिंजर्‍यात ठेवतो.”

याहूनही बीभत्स गोष्टी उपासनी बुवांच्या जबानीतून बाहेर आल्या. हजारो रुपयांची त्यांनी जमवलेली मालमत्ता उघडकीला आली. बुवांच्या पूर्वचरित्रात मनुष्यवधाबद्दल त्यांना झालेल्या तुरुगंवासाचा प्रश्न निघताच हे ‘अनंतकोटी ब्रह्मांडनायक’ काकुळतीला आले. बुवाबाजीची फजिती सर्वदूर पसरली.

1928 साली निघालेल्या शंभराव्या अंकात दिवेकर शास्त्री लिहितात, “हिंदू समाजाची उन्नती का होत नाही? याला कारण आमच्यात बोकाळलेला दैववाद होय. दैव असे काही नसते. उद्योग करणे वा न करणे यामुळे आपण दैव ओढवून घेतो.” त्यांनी अपशकुन आणि फलज्योतिष यांचीही खिल्ली उडवली. त्या काळी ‘किर्लोस्कर मासिक म्हणजे बुवाबाजीवर हल्ला’ असे समीकरण बनले होते. ‘बुवाशाही हा विचारशक्ती खच्ची करणारा गुप्तरोग आहे,’ असे मासिकात म्हटले होते. बुवाबाजीने नाडलेल्या लोकांच्या तक्रारी घेणारा एक ‘बुवाबाजी विध्वंसक संघ’ स्थापन केला होता. 1933 साली किर्लोस्कर मासिकाचे 12 हजार सभासद होते.

1934 साली वि. दा. सावरकर यांचे हिंदू धर्मातील सवंग प्रथा, जातिभेदाच्या रुढी-परंपरा यांवर घणाघाती हल्ला करणारे विज्ञाननिष्ठ लेख ‘किर्लोस्कर’मध्ये छापून येत. ‘जातिभेद हा जन्मजात नसून पोथीजात आहे.’ ‘दुसर्‍या जातीतील आमटीचा भुरका मारताच जात मरते आणि नंतर पंचगव्य प्राशन करताच ती परत जोडता येते,’ या शंकराचार्यांच्या शास्त्रार्थावरून जात मानण्यावर आहे, हेच सिद्ध होते. सावरकर पुढे म्हणतात, ‘जात राष्ट्रहितास घातक आणि म्हणून पातकच मानली पाहिजे. कुत्र्या-मांजराने स्पर्श केलेला आपल्याला चालतो; पण आपल्यासाठी कष्ट करणार्‍या अस्पृश्याचा स्पर्श आपल्याला चालत नाही.’ ‘गोपालन हवे, गोपूजन नव्हे’ हा त्यांचा लेख गायीच्या व्यंगचित्रासकट छापून आला होता. त्यात ते लिहितात, ‘गाय हा एक उपयुक्त पशू आहे; परंतु तिला देवता समजून तिचे शेणमूत पवित्र म्हणून पिणे ही हतबुद्धतेची कमाल झाली.’ सत्यनारायणाविषयी ते म्हणतात, ‘संकटातून सोडविले म्हणून देवाचा सत्यनारायण करताना प्रथम त्याने संकटात टाकलेच का, असा प्रश्न विचारण्याचा आपल्याला हक्क आहे.’ नेमक्या भाषेत मांडलेले हे मुद्देसूद विवेचन आणि धारदार उपहास यामुळे ‘किर्लोस्कर’मधील सावरकरांचे हे विज्ञाननिष्ठ निबंध खूप गाजले.

प्रा. न. र. फाटक यांनी पण काळाच्या पुढचे, प्रागतिक विचार ‘किर्लोस्कर’मधून मांडले. हिंदुस्थान निधर्मी राष्ट्र कसे होईल, यासंबंधी त्यांनी सहा उपाय सुचविले, ते असे –

1. धर्म आणि देवाची राज्यकारभारातून उचलबांगडी करणे.

2. यात्रा, उरूस आणि उत्सव यांची दखल न घेणे.

3. सणावाराच्या सुट्ट्या बंद करणे.

4. देवळांसाठी, त्यांच्या जीर्णोद्धारासाठी वगैरे शासकीय मदत नाकारणे.

5) वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळे कायदे न करणे.

6) धर्मशिक्षणाचे उच्चाटन करणे.

हे सहा उपाय आजही विचारार्ह आहेत.

शेअर व्होल्डर्सकडून, सनातन्यांकडून होणार्‍या विरोधाला न जुमानता एखाद्या उद्योगसमूहाने आपल्या मुखपत्रातून सातत्याने अनेक वर्षेसमाजप्रबोधनाची अशी सक्रिय चळवळ चालवली. याची ‘अंनिस’सारख्या संघटनांनी योग्य दखल घेणे योग्य ठरेल. अगदी अलिकडे; म्हणजे 1986 साली श्याम मानव आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्षपद मुकुंदराव किर्लोस्कर यांनी भूषविले होते. किर्लोस्कर मासिकाच्या या वाटचालीचा सुंदर आलेख शांताबाई किर्लोस्कर यांनी आपल्या ‘गोष्ट पासष्टीची’ या पुस्तकात मांडला आहे. त्या काळच्या सामाजिक परिस्थितीचा व्यापक आढावा त्यात वाचायला मिळतो.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]