डॉक्टरांच्या खुनानंतर अस्वस्थ होऊन जटा निर्मूलनाचे काम जोमाने सुरू केले

नंदिनी जाधव -

मला तो दिवस अजूनही चांगला आठवतोय, १८ फेब्रुवारी २०१३. त्या दिवशी वर्तमानपत्रात पुणे शहर शाखेच्या कार्यकारिणी निवडीची बातमी आली होती. ज्यांना समितीच्या कार्याशी जोडायचे आहे, त्यांच्यासाठी एक संपर्क क्रमांक देण्यात आला होता. मी ताबडतोब त्या क्रमांकावर फोन करून मला समितीत काम करायचे आहे असे सांगितले. तो फोन ललवाणी सरांचा होता. त्यांनी सांगितले, आठवड्यात एक दिवस आपली मिटींग असते, ती आजच आहे. मी विचारले, “तुम्ही आठवड्यातून एक दिवसच काम करता?” ललवाणी सर म्हणाले, “तुम्ही मिटींगला या, मग आपण बोलू.” त्याप्रमाणे मी मिटींगला गेले. थोड्या वेळाने एक व्यती माझ्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसली. मिटींग संपायच्या आधी मी विचारले, “डॉ. दाभोलकर कोण आहेत?” ललवाणी सर म्हणाले, “तुमच्या शेजारी बसले आहेत तेच डॉ. दाभोलकर आहेत.” मी अवाक्च झाले. अत्यंत साधे व्यक्तिमत्त्व, शांतपणाने सर्वांचे बोलणे ऐकणारे, मान किंचित एका बाजूला झुकलेली, डोळ्यांत अनेक विचारांचे भाव, अशी डॉक्टरांची प्रतिमा माझ्या मनात ठसली ती कायमचीच.

दुसर्‍याच दिवशी फुले वाड्यावर एक कार्यक्रम होता. जादूटोणा विरोधी कायद्याच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम राबवायची होती. त्याची सुरुवात फुले वाड्यापासून सुप्रिया सुळे यांच्याहस्ते होणार होती. डॉ. श्रीराम लागू, विद्या बाळ, अशोक हिवरे हे मान्यवरही उपस्थित राहणार होते. डॉक्टरांनी मिटींगमध्ये विचारले, मान्यवरांच्या स्वागतासाठी फुलं घेऊन यायचे आहे, कोण ते काम करेल? मी लगेच ती जबाबदारी स्वीकारली. दुसर्‍या दिवशी सकाळी मी पावणेदहा वाजताच फुलं घेऊन सर्वांच्या अगोदर फुले वाड्यात पोचले. त्यावेळी मी पहिल्यांदाच फुले वाड्यात गेले होते. नवीन व्यतीवर काम सोपवले म्हणून मनात धाकधूक असलेले ललवाणी सर माझ्याविषयी निश्चित झाले. त्या दिवशी सर्व तरुण कार्यकर्त्यांशी माझी ओळख झाली आणि समितीच्या कामाची मला मजा यायला लागली.

यानंतर काही दिवसांनी ‘प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे’ या कार्यक्रमाचे शूटिंग एस. एम. जोशी सभागृहात होणार होते. प्रश्नोत्तरांच्या अगोदर काही चमत्कार, प्रात्यक्षिकांचे शूटिंग होणार होते. यात मी खिळ्यांच्या पाटाखाली झोपणार होते व दुसरा कार्यकर्ता त्या पाटावर उभा राहणार होता. डॉक्टरांना जेव्हा हे समजले त्यावेळी ते म्हणाले, “ही नवीन कार्यकर्ती आहे. हिला खाली न झोपवता वर उभे राहू द्या.” डॉक्टर कार्यकर्त्यांची किती काळजी घ्यायचे हे यावरून लक्षात आले. १६ ऑगस्ट २०१३ रोजी झालेल्या जिल्ह्याच्या मिटींगमध्येे मी चमत्कार प्रात्यक्षिकाचे प्रयोग केले. डॉक्टरांनी त्याचेही मनापासून कौतुक केले. ‘अंनिस’मध्ये महिलांची संख्या खूप कमी आहे आणि तुझ्यासारख्या धाडसी महिलेने या समितीमध्ये सहभागी व्हायला हवे.

आणि २० ऑगस्ट २०१३ चा तो काळा दिवस उजाडला. मी माझ्या सकाळच्या कामात गर्क होते. तेवढ्यात टी.व्ही.वर बातमी पाहिली. डॉ. दाभोलकर यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. मला प्रचंड धका बसला. मी हातातले काम तसेच टाकून साधनाच्या ऑफिसवर व तेथून ससूनला पोचले. त्यावेळी तेथे अमोल पालेकर, संध्या गोखले, असे काही ठरावीक लोकच आले होते. थोड्याच वेळात तेथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले. माझ्यासहित सर्वांना अश्रू अनावर झाले. काही कार्यकर्ते धाय मोकलून रडत होते. डॉक्टरांचे शव साधना मीडिया सेंटर येथे दर्शनासाठी ठेवून अंत्यविधीसाठी सातार्‍याला न्यायचे ठरले. मीही सातार्‍याला जायचा निर्णय घेतला.

हडपसरमध्ये माझे स्वत:चे अद्ययावत ब्युटी पार्लर असून या पार्लरमधून मला चांगली कमाई होत होती. डॉक्टरांच्या हत्येने मन सुन्न झाले होते. तेव्हा यापुढे पार्लर बंद करून पूर्णवेळ ‘अंनिस’चे काम करायचे असे मनोमन ठरवले. स्त्रियांचे बाह्य सौंदर्य वाढविण्यापेक्षा त्यांचे आंतरिक, वैचारिक सौंदर्य वाढवायचे असे ठरवले. या घटनेमुळे मी ब्युटीपार्लर कायमस्वरूपी बंद करायचे ठरवले.

दि. २१ ऑगस्ट २०१३ रोजी एस. एम. जोशी सभागृहात डॉक्टरांना आदरांजली वाहण्यासाठी सभा झाली. त्यास मी उपस्थित राहिले. दिग्गज लोकांनी डॉक्टरांविषयी व्यक्त केलेल्या भावना ऐकून मी खूपच भारावून गेले. समितीच्या कामासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा माझा निर्धार पका झाला. त्यानंतर पुढील काही दिवस रोज वेगवेगळ्या आंदोलन आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले. त्यात मी सक्रिय सहभागी झाले. ज्या वि. रा. शिंदे पुलावर डॉक्टरांचा खून झाला, त्याच पुलावर ‘धारातीर्थी पडा’ आंदोलन केले. भर उन्हामध्ये तापलेल्या डांबरी रस्त्यावर झोपल्यामुळे पाठ संपूर्ण भाजून निघाली होती. असे असतानाही माझ्यासहित शेकडो कार्यकर्ते पुलावर झोपून राहिले. आम्हीही बलिदानाला तयार आहोत, हा संदेश याद्वारे देण्यात आला. विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक मोठा मोर्चा निघाला. समाजातील विविध स्तरातून आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळू लागला. २० सप्टेंबर २०१३ रोजी डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली एक महामोर्चा काढण्यात आला. त्यात अनेक पुरोगामी संघटना सामील झाल्या. दर महिन्याच्या २० तारखेला पुलावर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुढची ५ वर्षे प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला पुलावर आंदोलन करण्यात आले. एखादे अपवाद वगळल्यास महिन्याच्या प्रत्येक आंदोलनावेळी मी उपस्थित होते. बाहेरगावी असले, तरी मी २० तारखेला आंदोलनासाठी येत असे. मिलिंद देशमुख सर, ललवाणी सर व माझा या आंदोलनाच्या आयोजनात महत्त्वाचा सहभाग होता. प्रत्येक वेळी डॉ. हमीद किंवा अ‍ॅड. मुक्ता या आंदोलनाला उपस्थित राहात असत. विविध पुरोगामी विचारवंत व कार्यकर्ते आवर्जून हजेरी लावत. प्रसारमाध्यमे याची आवर्जून दखल घेत. या सर्वांचा शासनावर दबाव आणण्यात मोठाच उपयोग झाला.

प्रत्येक वर्षी २० ऑगस्टला दिवसभराचा कार्यक्रम घेण्यात येत असे. त्याला अनेक नामवंत पुढारी, अभिनेते, कार्यकर्ते हजेरी लावत. २०१४ साली ‘अंनिस’चे रौप्यमहोत्सवी ३ दिवसांचे अधिवेशन पुण्यात घेण्यात आले. या सर्वांसाठी मी आठ-आठ दिवस तयारीला देत असे. यासाठी लागणारे सामान बाजारातून आणणे, फ्लेक्स तयार करणे, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफर ठरवणे, वेगवेगळ्या महाविद्यालयात आंदोलनाची माहिती देणे, पत्रकारांशी संपर्क साधणे अशी कितीतरी कामे मी करत असे. अनेक कार्यकर्तेही मदतीला असत. मी सकाळी लवकर घरातून निघाले की रात्री घरी जाण्याची वेळ कधीच ठरलेली नसे. अतुल पेठे यांनी घेतलेल्या रिंगण नाटकातही माझ्यासह अनेक तरुण कार्यकर्ते सहभागी झाले. या सर्वांचा परिणाम चळवळ वाढण्यात नक्कीच झाला.

दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्त्या शालिनीताई ओक यांच्याकडून मी चमत्कार प्रात्यक्षिकाचे प्रयोग करण्यास शिकले, त्यावेळी कसे व्याख्यान द्यायचे याचे मार्गदर्शन मिलिंद देशमुख सरांनी केले. यामुळे मी अनेक शाळा, महाविद्यालये, वस्ती पातळीवर, झोपडपट्टीतून चमत्कार प्रात्यक्षिकाचे हजारो प्रयोग केले. हे काम करताना मला खूप मजा वाटत होती.

जो जादूटोणा विरोधी कायदा व्हावा यासाठी डॉक्टरांनी १८ वर्षे अथक प्रयत्न केले तो कायदा डॉक्टरांच्या खुनानंतर लगेचच सरकारने वटहुकूम काढून लागू केला. त्यानंतर ६ महिन्यांच्या आत तो राज्याच्या सभागृहात पारित करून घेणे आवश्यक होते. त्यानंतर डिसेंबर २०१३ मध्ये राज्याचे अधिवेशन भरले. हा कायदा पारित करावा म्हणून ‘अंनिस’तर्फे अधिवेशन काळात नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आले. त्यात मी सक्रिय सहभागी होते. हा ऐतिहासिक कायदा संमत झाला त्यावेळी मी सभागृहात उपस्थित होते. याचा मला विलक्षण आनंद झाला. कायदा झाला तरी त्याचा प्रचार, प्रसार व प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक होते. त्यासाठी एक राज्यव्यापी दौरा काढण्याचे समितीतर्फे ठरविण्यात आले. ८५ दिवस झालेल्या या दौर्‍याला ९ मार्च २०१४ रोजी महाड येथील चवदार तळ्यापासून डॉ. बाबा आढाव यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. यावेळी मला चवदार तळे व तेथील आंदोलनाची माहिती मिळाली. ‘अंनिस’मुळे मला महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची माहिती मिळाली व मी एक खरीखुरी पुरोगामी कार्यकर्ती झाले. ९ मार्च २०१४ रोजी निघालेल्या या दौर्‍यात मी सहभागी झाले. माझ्याबरोबर प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे हेही या दौर्‍यात होते. मी ४९ दिवस या दौर्‍यात सहभाग घेतला. वेगवेगळ्या २६ जिल्ह्यातून ४०० च्या वर व्याख्याने दिली. या दौर्‍यात आम्ही रोज ५ ते ६ कार्यक्रम घेत असू. वेगवेगळ्या ग्रामपंचायती, पोलीस प्रशिक्षण शिबिरात आम्ही कायद्याची कलमे समजावून सांगत असू. बुवा-बाबांविरुद्धच्या अनेक दाव्यांत याचा उपयोग झाला. पुढे बुवांविरोधात एफ.आय.आर. दाखल व्हावी यासाठी मला दिवस दिवस पोलीस स्टेशनला थांबावे लागत असे. जोपर्यंत एफ.आय.आर. हातात पडत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन कधी सोडलेच नाही. पोलिसांनाही कोणते कलम लावायचे हे समजावून सांगावे लागे. अशा प्रकारे या दौर्‍यांमुळे माझ्या कार्यास अधिक बळकटी आली.

मला खरी ओळख मिळाली ती जात पंचायतीच्या विरोधी लढा व जटानिर्मूलनामुळे. २०१६ साली जात पंचायत विरोधी कायदा झाला. त्या आधारे राज्यातील पहिल्या तीन केसेस पुण्यात दाखल केल्या. अनेक जातपंचायतीचे कायद्या संदर्भात प्रशिक्षण घेतले. कंजारभाट समाजात होत असलेल्या कौमार्य चाचणी या अघोरी प्रथेविरुद्ध त्या समाजातील पंचांचे कायद्याचे शिबिर घेतले. जातपंचायत बसवून एखाद्या व्यतीला बहिष्कृत करणे किंवा कौमार्यासारखी अनिष्ट रूढी, परंपरा करण्यास भाग पाडणे हा कायद्याने गुन्हा आहे, हे समजावून सांगत त्यांचे प्रबोधन करूनही कौमार्य परीक्षा छुप्या पद्धतीने घेतल्या जात होत्या. तेव्हा त्या समाजातील महाराष्ट्रातील ६० तरुणांना एकत्र करून साधना मीडिया सेंटर येथे एक दिवसाचे शिबिर घेऊन त्या तरुणांना तुमच्या समाजातील होणारी कौमार्याची परीक्षा याबाबत तुम्ही सर्वांनी पुढाकार घेऊन या प्रथेला तुम्ही सर्वांनी विरोध करणे गरजेचे आहे. तेव्हा त्या समाजातील तरुणांनीही यापुढे आमच्या समाजात किंवा आम्ही लग्न केल्यानंतर कौमार्यासारख्या परीक्षा होऊ देणार नाही, अशी सर्वांनी हमी दिली. त्यानंतर या प्रथेविरोधात Stop The Ritual Group तयार करून समाजातील या कुप्रथेविरुद्ध लढण्यास संघटित करण्याचा माझा मोठा वाटा आहे.

डॉक्टरांच्या खुनानंतर काही दिवसांनी एका बँक मॅनेजरच्या पत्नीच्या डोक्यात जट झाल्याची केस ‘अंनिस’कडे आली. तुम्हाला ब्युटीपार्लरच्या कामाचा अनुभव आहे. तेव्हा तुम्ही हे जटानिर्मूलन करा, असे गिरमे सरांनी सांगितले. त्याप्रमाणे त्या महिलेचे जटानिर्मूलन केले. त्याला काही चॅनेलनी प्रसिद्धी दिली आणि जटा निर्मूलनाचे काम सुरू झाले. त्यानंतर एका शालेय विद्यार्थिनीची केस आली. ८ वीतल्या या विद्यार्थिनीच्या डोक्यात जट आली. तिच्या घरच्यांना भेटून जट काढण्याविषयी विनवले. पण ते मानायला तयार होईनात. मग त्यांना कायद्याचा व पोलिसांचा धाक दाखवला. तेव्हा ते तयार झाले. मुलीशी बोलताना जट येण्याचे कारण समजले की मुलगी पापड लाटायचे काम करायची. तिचाच तेलकट हात डोक्याला लागून लागून जट तयार झाली. देवऋषीला दाखवले तर त्याने तेल म्हणून वडाचा चीक लावायला दिला. त्यामुळे जट अधिकच घट्ट झाली. तिला देवीला सोडावे असे देवऋषीचे म्हणणे होते. एका मुलीचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले याचे मोठे समाधान लाभले. दै. लोकमतने याला फोटोसहित पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली. पुढे जट असलेल्या महिलांच्या केसेस सतत येऊ लागल्या. गरीब-श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित, ग्रामीण, शहरी अशा सर्व स्तरांवर जट संदर्भात अंधश्रद्धा आढळून आल्या. जट काढायला फारसा वेळ लागत नाही, पण डोक्यात असलेली जट काढण्यासंबंधीची भीती व अंधश्रद्धा काढायला खूप परिश्रम पडतात. महिनोन्महिने नव्हे, तर दोन-दोन वर्ष त्या महिलांचे व त्यांच्या घरच्यांचे समुपदेशन करावे लागते. त्यांच्या शिव्या खाव्यात लागतात. अपमानित करून हाताला धरून घराच्या बाहेर काढले जात. पण न थकता, न चिडता संयमाने या सर्वांचे प्रबोधन करून जट काढण्यास तयार करत असे. राज्यभरात केव्हाही कोठेही जायची तयारी ठेवावी लागते. आत्तापर्यंत २७४ महिलांचे जट निर्मूलन केले याचा अभिमान वाटतो. या कामात मिलिंद देशमुख सरांचे तसेच डॉ. बुरांडे, श्रीराम नलावडे, सुभाष सोळंकी, अनिल वेल्हाळ तसेच महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

एखाद्या व्यतीच्या परिसस्पर्शाने आयुष्य कसे आमूलाग्र बदलते याचा अनुभव मी गेली १० वर्षे घेत आहे. डॉ. दाभोलकरांचा थोडा काळ लाभलेला सहवास आणि मार्गदर्शन याने माझ्या आयुष्यात फार फरक पडला. अरे ला का रे करणारी अत्यंत आक्रमक स्वभावाची मी शांतपणे अनेक दिवस प्रबोधन, समुपदेशन करू लागले. या कामात मिळणार्‍या शिव्याशाप सहज पचवू लागले. वाचनाची आवड वाढली. टी.व्ही. वर बाईट देणे, चर्चेत भाग घेणे हे सहज जमू लागले. पुणे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम करताना अनेक शाखा वाढवल्या. संघटनात्मक कामाच्या अनुभवामुळे मला राज्य कार्यकारी समितीत सध्या काम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या कामात आपल्याला मजा आली पाहिजे असे डॉ. दाभोलकर नेहमी म्हणत. आत्तापर्यंत मिळालेल्या ८९ पुरस्कारांत राज्य महिला आयोगाने व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनने दिलेल्या पुरस्काराचाही समावेश आहे. शेवटपर्यंत हे काम करण्याचा माझा निश्चय आहे. अंनिस हे एक कुटुंबच वाटते. या वाटचालीस ज्यांचे ज्यांचे मला सहकार्य व मार्गदर्शन लाभले त्या सर्वांची मी ऋणी आहे.

– नंदिनी जाधव

लेखक संपर्क : ९४२२३ ०५९२९

शब्दांकन श्रीपाल ललवाणी


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]