18 वर्षीय मुलीची आत्महत्या जातपंचायतीचे क्रौर्य : मृतदेहावर आकारला 20 हजारांचा दंड

प्रा. दिगंबर कट्यारे -

आपण फक्त पुरोगामी महाराष्ट्राची चर्चा करतोय. आज 2020 वर्ष सुरू असले तरी जातीय जाणिवा आपल्याकडे किती तीव्र आहेत, जातपंचायतीचा पगडा किती भयानक पध्दतीने आपापल्या समाजावर फास आवळतोय, हे जळगावच्या घटनेवरून पाहता येईल. कंजारभाट समाजातील मुलगी मानसीचं लग्न तब्बल 21 वेळा मोडून तिला आत्महत्या करण्यापर्यंत जातपंचायतीने भाग पाडलं. इतक्यावर जातपंचायतीचे जुलूम थांबले नाहीत, तर मृत्यूनंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी या मंडळींनी 20 हजार रुपये घेतल्याचीही चर्चा आहे. हाच का तो पुरोगामी विचारवंतांचा महाराष्ट्र?

जातपंचायतीचा जाच – 18 वर्षीय मुलीची आत्महत्या

जातपंचायतीच्या छळाला कंटाळून जळगावच्या जाखनीनगर भागातील रहिवासी मानसी ऊर्फ मुस्कान आनंद बागडे या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानसीच्या आई-वडिलांनी आंतरधर्मिय लग्न केले असून सुरुवातीपासून त्यांना समाजाने बहिष्कृत केले होते. मानसीचे लग्नही जातीत जातपंचायतीतील लोक जमू देत नव्हते. तब्बल 20 वेळा तिचे लग्न मोडण्यात आले होते. शेवटी लग्न जमूनही समाजातून त्रास सुरू असल्याने मानसीने मृत्यूला कवटाळले. माणुसकीला काळीमा फासणारी बाब म्हणजे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार व्हावेत, म्हणून जातपंचायतीने 20 हजार रुपये घेतल्याचीही चर्चा जळगावात आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी म्हणून महाराष्ट्र अंनिस जळगाव शाखेने पोलिस अधीक्षकांना निवेदन देत याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

जळगावच्या जाखनीनगर भागात राहणारी मानसी ऊर्फ मुस्कान आनंद बागडे ही 18 वर्षीय तरुणी यंदा लग्नाच्या तयारीत होती. मानसीची आई मुस्लिम समाजातील, तर वडील कंजारभाट समाजातील आहेत. आई-वडिलांनी आंतरधर्मिय लग्न केले म्हणून कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीने या दोघांना कायमचे बहिष्कृत करत त्यांना वाळीत टाकले. आपला ज्या पध्दतीने आयुष्यभर छळ झाला, ती वेळ आपल्या मुलीवर येऊ नये, म्हणून मानसीचे लग्न जातीतच करण्याचे मानसीच्या आई-वडिलांनी ठरविले. त्यानुसार तिचे तब्बल 20 वेळा लग्न जवळपास जमले होते. परंतु प्रत्येक वेळी जातपंचायतीने खोडा घालत ते लग्न मोडले. 21 व्या वेळी कोल्हापूर येथील कंजारभाट समाजाचा मुलगा मानसीशी लग्न करण्यास तयार झाला. परंतु याची कुणकुण जातपंचायतीला लागल्याने पुन्हा ते लग्न मोडण्यात आले. शेवटी वारंवार छळाला कंटाळत मानसीने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. इतकेच नव्हे, तर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देण्यासाठी तडजोड म्हणून पंचांनी 20 हजार रुपये घेतल्याची चर्चा आहे. ही बाब महाराष्ट्र अंनिसच्या कानावर आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांची भेट घेत अंत्यसंस्कारापूर्वी मानसीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा आग्रह केला. त्यात तिने गळफास घेतल्याची बाब समोर आली. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. या तरुणीने कंजरभाट समाजातील जातपंचायतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा अंनिसला संशय आहे. या जमातीच्या जातपंचांची सखोल चौकशी करून मानसीच्या आत्महत्येस कारणीभूत सर्व जातपंचांवर प्रचलित आपण सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा 2016 नुसार कठोर कारवाई करावी, असे निवेदन तातडीने पोलिस अधीक्षकांना देण्यात आले. घटनास्थळी कार्यकर्त्यांनी भेट दिली. घटनेचे प्राथमिक स्वरूप जाणून घेतले. यावेळी विश्वजित चौधरी, अ‍ॅड. भरत गुजर, जितेंद्र धनगर, अ‍ॅड. डी. एस. भालेराव आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.