प्रभाकर नानावटी - 9503334895
गेल्या काही महिन्यांत जगाचे नंदनवन म्हणून समजलेल्या अमेरिकेच्या कॅलिफोर्निया या राज्यात, अॅमेझॉन नदीच्या खोर्यातील पर्जन्यवनांच्या प्रदेशात व ऑस्ट्रेलियातील अरण्य प्रदेशात लागोपाठ लागलेल्या भयंकर प्रमाणातील वणव्यांमुळे संपूर्ण जग हादरले. टीव्हीच्या पडद्यावर आगीच्या ज्वाळा बघत असताना वणव्याचे भयानक रौद्ररूप काय-काय करू शकते, याची कल्पना नक्कीच आली असावी. पर्यावरणाविषयी जागरूक असलेल्या कार्यकर्त्यांनी व त्यांच्या संघ-संस्थांनी वेळोवेळी दिलेल्या धोक्याच्या सूचनांचा अव्हेर केल्यामुळे हे घडत आहे, असे सर्वसामान्य प्रेक्षकांचे मत झालेले आहे. पर्यावरण व/वा हवामान बदल हे आता एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा स्थानिक प्रश्न असा राहिलेले नसून संपूर्ण जगाच्या समोर तातडीने उत्तरं शोधण्यास प्रवृत्त करणारी समस्या असे स्वरूप त्याला प्राप्त झाले आहे, तरीसुद्धा जगभरातील राजकीय नेते अजूनही हवामान बदलासंबंधी एकत्रितपणे बसून चर्चा करण्यास किंवा सर्वानुमते आपणच ठरवलेल्या उपायांची अंमलबजावणी करण्यास, वा त्यासाठी कडक पावले उचलण्यास तयार नाहीत. अमेरिकेचे सर्वेसर्वा असलेले ट्रम्प महाशय तर, आपल्या देशातील अमेरिकन जीवनशैलीमुळे होत असलेल्या वाढत्या प्रमाणातील कार्बन उत्सर्जनाबद्दल खंत व्यक्त न करता जगातील इतर राष्ट्रांनाच त्यांच्या देशातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याचे सल्ले देत असतात.
वणवा म्हणजे जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. वणवा एकदा का पेटला की जंगल महिनाभर जळत राहू शकते. वणवा पेटण्याची नैसर्गिक; तसेच मानवनिर्मित अशी दोन्ही प्रकारची कारणं असू शकतात. आकाशातून पडणार्या विजेमुळे जंगलातील एखादे झाड पेट घेऊ शकते व ती आग पसरून संपूर्ण जंगलच जळून खाक करू शकते. उन्हाळ्यातील उष्णतेने जंगलातील झाडांखालची कोरडी पाने व गवत पेटल्यामुळे आग पसरू शकते. मोठी झाडे पडताना झालेल्या घर्षणामुळेसुद्धा आग पसरू शकते. गवत व पाने कुजताना तयार झालेल्या मिथेनसारख्या ज्वलनशील वायूमुळे वणवा पेटू शकतो.
या व्यतिरिक्त वैयक्तिक हितासाठी पण जंगलात वणवे पेटविले जातात. जंगलमाफिया मुद्दाम आगी लावतात, असे म्हटले जाते. वणवा विझविल्यानंतर होरपळलेल्या झाडांचा लिलाव केला जातो. त्यातून माफियांची धन होते. याशिवाय वणव्यानंतर मोकळी होणारी वनजमीन हाही एक आडफायदा असतोच. ज्या जंगलात लोक आहेत आणि ज्याच्या बाजूला शेती आहे, त्या ठिकाणी हमखास वणव्याची परिस्थिती तयार होते. जंगलात फिरणारे विडी, सिगारेट, आगकाडीचे थोटूक न विझवता तसेच जळते ठेवून फेकतात. मध गोळा करणारे टेंभे घेऊन जातात आणि काम झाल्यावर तसेच फेकतात. तेंदूपत्ता चांगला यावा म्हणून आग लावली जाते. मोहफुले वेचताना जमिनीवर पडलेल्या पानांचा त्रास होतो म्हणून त्याला आग लावली जाते. गवत पेटवले तर नवीन गवत चांगले येईल, असा गैरसमज शेतकर्यांमध्ये आहे. त्याकरिता ते गवत पेटवून देतात. जंगलालगत शेती असेल तर तेथेही सुपीक पिकांसाठी जमीन साफ केली जाते. त्यासाठी लावलेली आग पसरत जाऊन जंगलापर्यंत पोचते आणि वणवा भडकतो. नैसर्गिकरित्या जंगलाला लागणार्या आगीचे प्रमाण केवळ 15 टक्के, तर मानवनिर्मित आगीचे प्रमाण 85 टक्के आहे.
बहुतेक देशांत अरण्य प्रदेशाच्या रक्षणाची जबाबदारी वनखात्याकडे असते. ती यंत्रणा कुचकामी असल्यास वणव्याची तीव्रता अधिक जाणवते. उदाहरणार्थ, भारतातील एकाही राज्याकडे आग विझवणारी व नियंत्रणात आणणारी अद्ययावत यंत्रणा नाही.
आगीचा इशारा देणारे वायरलेस सेन्सर्सचे जाळे उभारून कमी खर्चात आगीची माहिती मिळवली जाऊ शकते; पण आग लागू नये म्हणून पूर्वापार त्याच जाळरेषा आणि आग लागल्यानंतर विझवण्यासाठी झाडाच्या फांद्या याच पारंपरिक पद्धतीवर भारतीय वनखात्याची मदार आहे. वणवा लागू नये किंवा वणवा लागल्यानंतर पाहणी करण्यासाठी उंच मनोरे जंगलात तयार केले जातात; पण भारतातील किती जंगलांत ही उपलब्धता आहे आणि असेल तर ती भरवशाची आहे का, याबाबत शंकाच आहे. एक मात्र खरे की जंगलात एकदा वणवा पेटल्यानंतर त्याला आवर घालणे अशक्यप्राय ठरते. कुठलेही मानवी उपाय त्या ज्वाळांना व वेगाने पसरत जाणार्या वणव्याला थांबवू शकत नाहीत.
हे वणवे दूर कुठेतरी अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी लागलेले आहेत; आपल्या देशात नाहीत, म्हणून स्वस्थ बसता येत नाही. कारण आपल्या देशातही ठिकठिकाणी वणवे पेटत असून त्यांचे बातमीमूल्य ऑस्ट्रेलिया, ब्राझीलएवढे नसेलही; परंतु जीवित व वित्त हानीचे प्रमाण मात्र दुर्लक्षित करण्यासारखे नाही, असे म्हणता येईल.
यासंबंधात फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेचे आकडे बोलके आहेत. देशात सन 2012 ते 1 मे 2016 या कालावधीत लागलेल्या वणव्यांची संख्या 1 लाख 02 हजार 527 एवढी होती. गेल्या पाच वर्षांतील 2012 हे साल सर्वाधिक वणव्यांचे होते. 2016 साल त्याची बरोबरी करीत असल्याचे फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाची आकडेवारी सांगते. (10,636 – ओडिशा, 10,335 – मिझोरम, 9602 – आसाम, 9210- छत्तीसगढ, 7534 – महाराष्ट्र.) नोव्हेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 पर्यंतच्या या काळात ही संख्या 14,107 एवढी होती. यातील बहुतेक वणवे (सुमारे 37 टक्के) दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या पाच राज्यांतले आहेत. वणवा पेटू नये यासाठी यंत्रणा उभारण्यासाठी निधीची तरतूद केलेली असली तरी बहुतेक वेळा ते खर्चही केले जात नाहीत वा वेळेवर ते उपलब्ध करून दिले जात नाहीत. वणवा ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून मानली जात नाही.
वणव्याची तीव्रता व त्याच्या वाढत्या प्रमाणाला आणि त्यांच्या वारवारंतेला पोषक वातावरण निर्माण होण्याला हवामान बदल कारणीभूत ठरत आहे, असे स्पष्ट मत ‘न्यू सायंटिस्ट’ या विज्ञानविषयक साप्ताहिकाने व्यक्त केले आहे. 1979 व 2013 सालच्या जगभरातील पेटलेल्या वणव्यांच्या अभ्यासावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या कालखंडात जास्त उष्णता, कमी प्रमाणातील आर्द्रता, कमी पाऊस व त्या आठवड्यातील वा महिन्यातील वार्याच्या वेगातील वाढ इत्यादीमुळे पेटलेले वणवे नेहमीच्या वणव्यांच्यापेक्षा जास्त काळ टिकले. या संबंधातील हवामान प्रारूपांवरून नेहमी आढळणार्या वातावरणातील चढ-उतारांपेक्षा हवामान बदलच या टोकाच्या परिस्थितीला कारणीभूत आहे, या निष्कर्षाप्रत तज्ज्ञ पोचले. या प्रारुपानुसार 20 सेल्सिअस एवढी उष्णतामानातील वाढ गृहित धरूनसुद्धा वणव्याची तीव्रता अधिक प्रमाणात होती, असे तज्ज्ञांचे मत होते. त्यामुळे जगातील सर्व राष्ट्रांनी प्रदूषण नियंत्रणासंबंधातील ‘पॅरिस करारा’ची तंतोतंत अंमलबजावणी करणे याला पर्याय नाही, असेच म्हणावे लागेल.
त्यासाठी आपल्या चंगळवादी जीवनशैलीला वेळीच आवर घालणे अत्यंत गरजेची आहे.
28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिवस साजरा करताना वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आपापल्या कुवतीनुसार आपण काय करू शकतो, याचा विचार करणे व त्याप्रमाणे प्रदूषण कमी करण्यासाठी वर्षभर कृती करणे हेच सर्वांकडून अपेक्षित आहे. तसे न केल्यास या मायभूमीचे वाळवंटीकरण होण्यास जास्त वेळ लागणार नाही.
सावधान…! वणवा पेटवला जात आहे
गतवर्षी धुमसणार्या ‘अॅमेझॉन’नंतर ऑस्ट्रेलियातील जंगलातील वणवा एक कालरुपी राक्षस म्हणून सृष्टीसमोर उभा ठाकला. लाखो झाडांची राखरांगोळी झाली, अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली, कैक माणसे गेली, कोट्यवधी प्राण्यांचे जीव होरपळले. या प्रकोपाच्या विरोधात उभे राहण्यासाठी एक विकसित राष्ट्र असलेल्या ऑस्ट्रेलियाची प्रशासकीय व सरकारी यंत्रणा मात्र कमी पडली. जगभरात या घटनेची छायाचित्रे, व्हिडिओ ‘व्हायरल’ झाल्यानंतर प्रार्थना केली जाऊ लागली. अखेर परमेश्वराने सार्यांची हाक ऐकली आणि पाऊस पडला, अशी भावना व्यक्त करण्यात आली. आग विझली. जे या अग्निदिव्यातून बचावले, त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण, हा वणवा खरंच विझला का? या वणव्यातील विकृत कृत्यांचे धगधगते निखारे पुन्हा पेट घेणार नाहीत, हे कशावरून? आज सातासमुद्रापार उठलेले हे आगीचे लोळ तुम्हा-आम्हाला होरपळून टाकणार नाहीत, याची खात्री आपण देऊ शकतो का? भविष्यात हे संकट पुन्हा ओढवले तर त्याला रोखण्याची तयारी आपण केली आहे का? असे कित्येक प्रश्न त्या धुमसत्या निखार्यासोबत अनुत्तरितच राहतात.
याची सुरुवात म्हणजे, ऑस्ट्रेलियातील दहा हजार जंगली उंटांना गोळ्या घालण्याचे दिलेले आदेश. दक्षिण ऑस्ट्रेलियात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने येथील 10 हजार उंटांना शूटर्सद्वारे ठार करण्याचे निर्देशही देण्यात आले. आगीमुळे संपलेला पाणीसाठा आणि त्याच्या दुष्परिणामांमुळे हा दुर्दैवी निर्णय घेण्यात आला होता. वातानुकूलन यंत्रणेतून (एसी) पडणारे पाणी आता लोक रोजच्या कामासाठी वापरत आहेत. अनेक घरांमध्ये उंट पाण्याच्या शोधात घुसत आहेत. एक उंट वर्षाकाठी एक टन मिथेन वायू उत्सर्जित करत असतो, तितकाच कार्बन डायऑक्साईडही. याचा अर्थ रस्त्यावर धावणार्या चार लाख गाड्यांचा अतिरिक्त भार यामुळे सहन करावा लागतो. मध्य ऑस्ट्रेलियात असे एकूण 12 लाख उंट आहेत. दर नऊ वर्षांनी ही संख्या दुप्पट होत असते. यावरून परिस्थिती किती भयानक होऊ शकते, याचा अंदाज येईल.
आग विझल्यानंतरची परिस्थिती आणखी भयानक आहे. पाण्यासाठी वणवण सुरू आहे. जनावरांना चाराच उपलब्ध नाही. आगीतून वाचलेले जीव आता उपाशीपोटी मरत आहेत. आगीत भस्मसात झालेली गावे सोडून लोकांनी शहरात धाव घेतली आहे. 57 टक्के भूभाग हा दुष्काळग्रस्त घोषित झाला आहे. इवांस प्लेन येथील एका धरणात केवळ 37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर वाढत्या उष्म्यामुळे दर आठवड्याला 1.1 टक्के पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. पावसाने आग विझवण्याऐवजी कुठलाच दिलासा दिला नाही. कांगारूंच्या नैसर्गिक वैभवसंपन्नतेची राखरांगोळी उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही.
अॅमेझॉनची पर्जन्यवनं ः जगाची फुफ्फुसं
अॅमेझॉनच्या वनांना जगाचं फुफ्फुस या नावाने ओळखलं जातं. जगभरातील एकूण ऑक्सिजनपैकी 20 टक्के ऑक्सिजन या वनांच्या माध्यमातून तयार होतो. सर्वांत मोठं पर्जन्यवन असणारे अॅमेझॉनचे जंगलाचे एकूण क्षेत्रफळ 55 लाख चौरस फूट इतकं आहे.
दक्षिण अमेरिकेतील 9 देशांमध्ये हे वनक्षेत्र पसरलेले आहे. अॅमेझॉन पर्जन्यवनाचा सर्वाधिक भाग हा ब्राझीलच्या भूप्रदेशावर आहे. त्याचबरोबरच हे अॅमेझॉनचे जंगल कोलंबिया, व्हेनेझुएला, बोलिविया, फ्रेंच गयाना, पेरु, गयाना, सुरीनेम आणि इक्वॅडोर या देशांमध्येही आहे. या जंगलांचा आकारामुळे त्यांची एक स्वतंत्र परिसंस्था अस्तित्वात असून पृथ्वीवरील ऑक्सिजन आणि इतर महत्त्वाच्या नैसर्गिक घटकांचा समतोल राखण्यासाठी हे वनक्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे.
अॅमेझॉन पर्जन्यवनांमध्ये वनस्पतींच्या 40 हजारांहून अधिक जाती आहेत. यामागील अनेक वृक्ष ही काही शे वर्षे जुनी आहेत. या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर प्राणीसंपत्तीही आहे. पक्ष्यांच्या 1 हजार 300 हून अधिक प्रजाती येथे असून त्यापैकी काही अत्यंत दुर्मिळ आहेत. अॅमेझॉन नदीच्या आजूबाजूला पसरलेल्या या जंगलांमध्ये चक्क तीन हजारांहून अधिक प्रकारचे प्रकारचे मासे आणि चारशेहून अधिक सस्तन प्राणी आढळून येतात. अॅमेझॉनच्या पर्जन्यवनामध्ये तब्बल 25 लाखांहून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांचे वास्तव्य आहे. वेगवेगळ्या रंगाचे आणि प्रजातीचे विषारी बेडूक, विजेचा झटका देणारे इलेक्ट्रिक इल्स, भयंकर असे फ्लेश इटिंग पिरान्हा मासे, मांसाहार करणारे जॅग्वार असे अनेक वैविध्यपूर्ण पण हिंस्त्र प्राणीही या जंगलांमध्ये आढळतात. या जंगलामध्ये कीटकांबरोबरच हजारो विषारी साप आढळतात. जगातील सर्वांत मोठे आणि सर्वांत विषारी साप या प्रदेशात आहेत.
अॅमेझॉन हे जगातील सर्वांत मोठे पर्जन्यवन म्हणजेच नैसर्गिक रेन फॉरेस्ट आहे. या जंगलांमध्ये वर्षातील 12 महिने पाऊस पडतो. ही जंगले इतकी घनदाट आहेत की येथे अनेक ठिकाणी सूर्यकिरणे जमीनीपर्यंत पोचत नाहीत. जगभरातील वनस्पतींपासून तयार होणार्या एकूण ऑक्सिजनपैकी 20 टक्के ऑक्सिजन या जंगलांच्या माध्यमातून निर्माण होतो. पृथ्वीवरील ऑक्सिजनचा नैसर्गिक समतोल कायम ठेवण्यासाठी या जंगलांचा मोलाचा वाटा आहे. मात्र आता या जंगलांच्या अस्तित्वालाच या भीषण वणव्यामुळे धोका निर्माण झाला आहे. जंगलामधील अनेक पक्षी आणि प्राणी जळून खाक झाल्याचे अनेक हृदयद्रावक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
कॅलिफोर्नियाची वाताहत
अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्याला वणवा हा काही नवीन विषय नाही. वर्षातील काही महिने याचे अस्तित्व जाणवते व काही दिवसांनंतर ते विसरलेही जाते. परंतु अलिकडे मात्र हे अस्तित्व फार काळ टिकू लागले आहे. 2000 नंतर पेटलेल्या वणव्यांमुळे फार मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. 2018 च्या वणव्याने 85 जणांचा बळी घेतला, 18 हजार इमारती जमीनदोस्त झाल्या. पॅराडाइज हे शहरचे शहर उद्ध्वस्त झाले. नंतरच्या वर्षीसुद्धा अशाच प्रकारच्या आगीमुळे अतोनात नुकसान झाले.
या अग्नितांडवाची कारणं शोधत असताना अरण्याचा तथाकथित विकास, नैसर्गिक वणव्यातून स्वच्छ न झालेले प्रदेश व हवामान बदल ही मुख्य कारणं आहेत. 1990 ते 2010 या काळात या प्रदेशात 11 लाख नवीन इमारती उभारल्या. जास्त रहिवाशांमुळे मूलभूत सुविधांवर ताण पडू लागला. नवीन वीजवाहिन्या टाकण्यात आल्या. 2019 सालचा वणवा या वाहिनीतील वीजप्रवाहामुळे पेटला व पसरला. एका अंदाजानुसार 95 टक्के वणवे हे मानवी दुर्लक्षामुळे पेटले व पुढील काळातही यात काही फरक पडणार नाही. तुलनेने कॅलिफोर्नियातील अरण्यं फार घनदाट आहेत. एके काळी एकरी 50-70 झाडं असलेल्या ठिकाणी आता 400 झाडं आहेत. हवामान बदलामुळे येथील तापमानात 2 डिग्री सेल्सिअस वाढ झाल्यामुळे हे संकट त्यांच्यावर कोसळले आहे व ही तापमान वाढ येथील रहिवाशांच्या एअर कंडिशनर्स, हीटर्स, कार्स, आदी नित्योपयोगी सोयी-सुविधांमुळे झाली, असे तज्ज्ञांचे मत आहे.