छत्रपती शिवाजी महाराज आणि शेतकरी रयत

गोविंद पानसरे -

19 फेबु्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि

20 फेबु्रवारी शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा स्मृतिदिनानिमित्ताने

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आद्यदैवत. त्यांचे नाव घेताच सामान्य माणसाच्या अंगी स्फुरण चढते, मुठी वळतात आणि ‘विजय असो’चा नारा देतो. शिवराय आपले म्हणून शिवरायांचे नाव घेणारा प्रत्येकजण आपलाच, ही भावना सामान्यांच्या मनात असते; पण त्याचा गैरफायदा घ्यायला काही धर्मांध जातीयवादी पुढे आले. त्यांनी महाराजांचे नाव घेत धार्मिकजातीय दंगली घडवल्या, द्वेष पसरवला, मते मिळविली, सत्ता मिळवली, संपत्ती मिळविली, पुरस्कारही मिळवले.

या धर्मांधांना बाजूला सारण्याचे आणि छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास लोकांसमोर मांडण्याचे महत्त्वाचे काम शहीद कॉ. गोविंद पानसरे यांनी केले. त्यांनी अनेक व्याख्याने दिली आणि ‘शिवाजी कोण होता?’ हे 72 पानी पुस्तक लिहिले. 1988 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाच्या आतापर्यंत लाखो प्रती विकल्या गेल्या असून अनेक भारतीय भाषांत त्याचे भाषांतर झाले आहे.

अनेक ग्रंथ लिहून जो परिणाम साधता आला नसता, त्यापेक्षा जास्त परिणाम या पुस्तकाने साधला.

छत्रपती शिवरायांचे मोठेपण त्यांनी दुर्बलांचे केलेले संरक्षण, धर्मजातीनिरपेक्ष राज्यकारभार आणि स्त्रिया, शेतकर्‍यांसाठी राबवलेल्या कायद्यामध्ये असल्याचे सत्य या पुस्तकाने पुढे आणले.

तो काळ सरंजामशाहीचा. त्या वेळचे शासन शेतकर्‍यांकडील करवसुलीवर चाले; पण शासकीय कराच्या कित्येक पट वसूल वतनदार, इनामदार, देशमुख, देशपांडे करत. त्यावरच त्यांची चैन चाले. शेतकरी मात्र पिचला जाई. पुढे भांडवलशाही आली. शेतकरी आणि कामगार यांच्या श्रमावर ती उभी राहिली. आता त्यापुढची अवस्था साम्राज्यवाद आला आहे. कामगारशेतकर्‍यांची पिळवणूक वाढली आहे; नुकतेच शेतकरी त्याविरोधात दिल्लीला वेढा टाकून बसलेले आहेत. अशा वेळी छत्रपती शिवरायांनी शेतकर्‍यांची घेतलेली काळजी ठळकपणे दिसते. शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी अगदी सोप्या भाषेत या बाबी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात पुढीलप्रमाणे मांडल्या आहेत

उद्ध्वस्त झालेली गावे शिवाजीने कौलनामे घेऊन पुन्हा वसवली. नव्याने जमीन कसायला येणार्‍यांना बी-बियाणे देऊन औतफाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिले. नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना सुरुवातीची चार-पाच वर्षेमहसूलसुद्धा कमी ठेवला. मन मानेल तशी वसुली करण्याचा शिरस्ता मोडून काढला. जमिनी मोजून घेतल्या. मोजलेल्या जमिनीचा महसूल निश्चित केला. ठरलेला महसूलच वसूल करण्याचा दंडक घालून दिला व तो अमलात आणला. दुष्काळात महसूल माफ केला. पिकलेच नाही, तर शेतकरी देणार कोठून, हे समजून घेऊन शिवाजी राजा वागला; उलट दुष्काळात शेतकर्‍याला मदत केली जाई.

वतनदारांच्या व्यवहाराचे हे वर्णन पाहा

“अशी पुरातन वहिवाट होती की, महालगे, महालकी व गावगन्ना देशमुख, देशमुख, देसाई, पाटील, कुलकर्णी, खोत, मिरासदार, जमीनदार वगैरे असत. त्यांच्या ताब्यात महाल व गाव असून रयतेकडून जमिनीचा वसूल त्यांनी करावा असे असे. सरकारी अधिकारी रयतेकडून प्रत्यक्ष वसूल घेत नसत. त्याची सर्व जबाबदारी देशमुख वगैरे जमीनदारांकडे असे. त्यामुळे सर्व रयत या मिरासदारांच्या ताब्यात असे. त्यांना वाट्टेल तसा ते रयतेकडून वसूल चोपून घेत असत. एखाद्या गावचे सरकारी देणे दोनशे किंवा तीनशे रुपये असेल, तर हे मिरासदार त्या गावच्या रयतेकडून दोन हजार किंवा तीन हजार रुपये वसूल उकळीत असत. अशा तर्‍हेने आपला तळीराम गार करण्यासाठी रयतेस नाहक त्रास देत व सरकारासही फसवीत. ते आपल्या वस्तीच्या गावात हुडे, वाडे, कोट वगैरे बांधून शिपाई, प्यादे व बंदूक, तलवारी बाळगून बळावत असत. त्यांचा हा बेकायदेशीर कारभार सरकारी अधिकार्‍यांच्या कानी गेला म्हणजे ते त्यांच्याकडे सरकारी देणे अधिक मागत; परंतु त्यास कित्येक देशमुख वगैरे प्रबळ जमीनदार दाद देत नसत. प्रसंग पडल्यास त्यांच्याशी भांडावयासही तयार होत. अशा व्यवस्थेमुळे जिकडे-तिकडे पुंड, पाळेगारांचा सुळसुळाट झाला होता.”

अशा अवस्थेतील शेती वसुलावर शिवाजीने नियंत्रण आणले. आता हे वर्णन पाहा :

“स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करणार्‍यांच्या नावे लावून तिची नोंद महालकर्‍याच्या दप्तरी असे. जमीन मापण्यासाठी काठी केली असे. ती पाच हात, पाच मुठी लांब असे. एका हाताची लांबी चौदा तसू असून काठीची लांबी 82 तसू असे वीस काठ्यांचा एक बिधा/बिघा व एकशेवीस बिध्यांचा/बिघ्यांचा एक चावर, असे मोजणीचे प्रमाण धरीत असे. प्रत्येक बिध्यास/बिघ्यास किती पीक व्हावे, हे उभ्या पिकाची पाहणी करून ठरवीत. या उत्पन्नाच्या पाच तक्षिमा करून तीन तक्षिमा लागवड करणार्‍या शेतकर्‍याने भोगाव्या व दोन तक्षिमा सरकारला द्यावा, असा करार असे. हे सरकार-देणे शेतकर्‍याने धान्याच्या किंवा नगदीच्या रुपाने द्यावे असे असे. अवर्षणादी संकटसमयी शेतकर्‍यांना सढळ हाताने तगाई देत. ही तगाईची रक्कम त्यांनी चार व पाच वर्षांच्या हप्त्यांनी फेडावी असे असे. लागवडीस न अलेल्या जमिनी नव्या रयतेस द्यावयाच्या झाल्या, म्हणजे तिच्यापाशी गुरे-ढोरे नसल्यास तिला ती सरकारांतून द्यावी, तिला बीजास दाणा द्यावा व पीक होईपर्यंत धान्य व पैका द्यावा. दोन-चार वर्षांनी हा ऐवज उजवून घ्यावा. याप्रमाणे रयतेस कौल देऊन जमिनी इस्ताव्याने दिल्या व बहुतेक सुपीक जमीन लागवडीसाठी आणली. उत्पन्नाचा आजमास पाहून रयतेवर कर बसवावा. जुलूम असा कोणावर करू नये, अशी अधिकार्‍यांस सक्त ताकीद असे.”

“वतनदार व जमीनदारांची अव्यवस्था महाराजांनी पार मोडून टाकली. रयतेकडून वसुलीची कामगिरी करण्यासाठी सर्वत्र अधिकारी नेमून दिले. पूर्वीच्या जमीनदारांनी व मिरासदारांनी रयतेला कोणत्याही बाबतीत काडीइतका त्रास देऊ नये. त्यास पूर्वीच्या अमलात जितके मिळत असत, त्याचे योग्य प्रमाण ठरवून, त्यास ते सरकारी कामगाराकडून प्रतिवर्षी मिळत जावे. त्यांनी ते प्रत्यक्ष रयतेकडून वसूल करू नये, असे ठरविले. हा जो सरकारी उत्पन्नाचा ठरीव अंश त्यांना कोणतीही जोखीम शिरी न बसता मिळत असे, त्यास सरकारातून प्रतिवर्षी मंजुरी मिळावी लागे. त्यामुळे त्यांच्या वर्तनावर पुरा दाब बसून, रयत त्यांच्या कचाट्यातून साफ सुटली. सुखी, स्वतंत्र झाली. रयतेस गुलाम करणार्‍या या देशमुख-देशपांडे वगैरे ग्रामाधिकार्‍यांचे वाडे, हुडे, कोट पाहून महाराजांनी जमीनदोस्त केले व त्यांनी इत:पर असले धंदे करू नयेत, इतर रयतेसारखी साधी घरे बांधून राहावे, असा हुकूम सोडला.”

शेतकर्‍यांची आणि त्यांच्या शेतीची अशी काळजी वाहणार्‍या राजासंबंधी रयतेला मग प्रेम का नाही वाटणार? शिवाजीचे कार्य टिकले पाहिजे व वाढले पाहिजे, असे का नाही वाटणार? अशा शेतकरी रयतेचा कोवळा पोरगा मग ‘खबरदार जर…’ वगैरे का नाही म्हणणार?

“रयत राजाशी कशी वागते, हे राजा रयतेशी कसा वागतो, यावरून ठरते. राजा रयतेची एकपट काळजी करू लागला, तर रयत राजाची दसपट काळजी करते. राज्य ही आपली खाजगी मिळकत नसून ‘जनतेची अमानत’ आहे, असे राज्यकर्तेवागू लागले, तर जनता राज्य आपले आहे, असे मानते आणि याच्या उलट ‘जनता-बिनता कुछ नहीं, राज्य ही आमची बापजाद्यांची मिळालेली खाजगी दौलत आहे,’ अशा भावनेने राज्यकर्तेवागू लागले म्हणजे जनता अशा राज्यकर्त्यांना उलथवून टाकते, असा जगाचा इतिहास आहे.”

शिवाजी आणि रयत

रयतेच्या – सामान्य गोरगरीब जनतेच्या – लेकी-सुनांच्या अब्रूसंबंधी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता, तसाच रयतेच्या संपत्तीसंबंधीचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता.

रयतेची संपत्ती म्हणजे दांडगेश्वराने लुटायची वस्तू, अशी त्या काळी रीत होती. त्या काळी सारख्या लढाया होत. पायदळ व घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमांसाठी फिरत असे.

हे सैन्य गावाहून जाऊ लागले किंवा मुक्कामास राहिले, तर रयतेच्या संपत्तीचे होई?

उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाई. वर्षभर राबून निढळाच्या घामाने पोसलेले अन् हाता-तोंडाला आलेले तयार पीक बघता-बघता भुईसपाट होई. ज्याच्या राज्यात राहतो, त्याच राजाचे सैन्य असे करीत असे. मग तक्रार कुणाकडे करणार? अन् दाद कोण घेणार? स्वत:च्या नशिबाला दोष देत घरतल्या घरात रडत-कुढत बसण्याखेरीज दुसरे काही करायला वाव नसे.

असे बेगुमान वागण्याची सैन्याला मुभा होती. त्या काळात शिवाजीने सैन्याला आदेश दिले आहेत की, कोणत्याही मोहिमेवर, कोणत्याही सैन्याच्या तुकडीने शेतकर्‍यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नये. पिकांची नासाडी होता कामा नये.

कल्पना करून पाहा! उभ्या पिकातून बेदरकारपणे दौडत जाणारे व उभे पीक मातीमोल करणारे सैन्य वर्षानुवर्षे पाहण्याचा प्रसंग ज्यांच्यावर येत असेल, त्यांना जर पिकांतून न घुसता रस्त्याने जाणारे आणि ‘पिकाचे जराही नुकसान होऊ नये,’ अशी दक्षता घेणारे शिवाजीचे सैन्य पाहायला मिळाले, तर त्यांना काय वाटेल? रयतेच्या पिकांची काळजी करणारा राजा, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारे सैन्य आणि हे सर्वजण करीत असलेले कार्य यासंबंधी रयतेला काय वाटले असेल? हा राजा, हे सैन्य आणि हे कार्य आपलं आहे, असे रयतेला का नाही वाटणार?

इतरांकडून त्या काळी नुसती पिकांची नासधूसच होत नसे, तर बळजबरीही होत असे. सैन्याचा आणि सरदारांचा गावी मुक्काम पडला, तर काय होई? सैन्यातील घोड्यांची दाणा-वैरण गावातल्या रयतेकडून घेतली जाई. सैन्याची सरबराई गावालाच करावी लागे अन् मग गावचा वतनदार पाटील किंवा कुलकर्णी, गावातील ज्यांच्याकडे जे असेल, ते काढून घेऊन मुक्कामास आलेल्यांची बडदास्त ठेवी. सैन्य आणि सरदार असे वागायला ज्या काळात चटावले होते, दैवावर भरवसा ठेवून अशा आपत्ती सहन करायची सवय ज्या काळी रयतेला झाली होती, त्या काळी हा एक सत्पुरुष येतो आणि सक्त आज्ञा करतो की,

“रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये.”

“सैन्यातील घोड्यांना दाणा-वैरण लागली, तर रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे.”

“सैन्याचा रयतेला त्रास होता कामा नये.”

आणि नुसत्या आज्ञा देत नाही, तर त्याची सक्त अंमलबजावणी करतो. रयतेच्या कष्टाची ही अपूर्व कणव शिवाजीला रयतेची निष्ठा देऊन गेली.

आज तसे ‘सरदार’ नाहीत अन् तसे ‘घोडदळ’ही नाही; पण नवे सरदार आहेत. घोडदळ नसले, तरी ‘मोटारदळ’ आहे. मोहिमेवर नसले, तरी आजही हे ‘नवे सरदार’ मोटारीच्या काफल्यासह ‘पाहणी’ करण्यास अन् ‘भेट’ देण्यास गावोगाव मुक्कामास असतात. आज हे ‘नवे दळ’ गावोगाव कसे वागते? सरबराईस कामी आलेल्या कोंबड्यांचे पैसे मालकाला मिळतात का? सरबराईचा खर्च मुक्कामास आलेले ‘नवे सरदार’ स्वत:च्या मिळणार्‍या पगारातून अन् कमाईतून करतात का? गावगन्नाचे पाटील, कुलकर्णी अन् ‘छोटे अंमलदार’ रोख देऊन वस्तू खरेदी करतात का? काय करतात हे?

या सर्वांच्या घरांत आणि ऑफिसांत शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला असतो अन् हे शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत असतात. शिवाजीपासून हे काय शिकले? यांचा शिवाजी कोण होता? खरा शिवाजी कोणता?

रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात न लावण्याची शिवाजीची सक्त आज्ञा यांना सांगावी की नको?

स्वराज्य संरक्षणाच्या कार्यासाठीसुद्धा रयतेचा जाच होऊ नये म्हणून हा राजा कमालीची काळजी करताना आढळतो.

शिवकालीन राजनीती रामचंद्रपंत अमात्य यांच्या ‘आज्ञापत्रा’त आढळून येते. या ‘आज्ञापत्रा’तील वेगवेगळ्या ‘आज्ञां’मधून अमात्यांचा बारकावा स्पष्ट दिसतो. रयतेसंबंधी प्रीती, मनाचा कोमलपणा आणि सूक्ष्म दृष्टी या सर्वांसाठी खालील आज्ञा पाहा :

छत्रपतींच्या आरमार उभारणीच्या कार्यात लाकडाचे महत्त्व कितीतरी मोठे. त्याशिवाय आरमार कसे उभारणार? त्या काळी जंगले दाट होती अन् लाकूडही विपुल प्रमाणात उपलब्ध हेते. तरीसुद्धा खाली आज्ञा कशी आहे पाहा :

“स्वराज्यातील आंबे, फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची; परंतु त्यास हात लावू देऊ नये. काय म्हणून, तर ही झाडे वर्षा-दोन वर्षांत होतात, असे नाही. रयतांनी ही झाडे लावून लेकरांसाठी ही बहुतकाळ जतन करून वाढविली. त्यांचे दु:खास पारावार काय? कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असले, तरी त्याचे धन्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोष तोडून द्यावे.”

राजवाडे यांच्या आठव्या खंडात शिवाजी महाराजांच्या तोंडचे उद्गार नोंदवलेले आढळतात. चिपळूणजवळ पागेचा तळ पडला असता अधिकार्‍यांनी कसे वागावे, यासंबंधी राजे म्हणतात-

“जवळ पावसाळ्याकरिता प्रयासाने साठवलेले गवत पडले आहे, हे लक्षात न घेता कुणी रंघनाळ्या करतील, कुणी आगट्या करतील, कोणी चिलीम, असे करून गवतास आग लावून अनर्थ ओढवेल. मग सारी पागाच बुडेल. मग घोडी तुम्ही लोकांनी मारली, असे होईल” किंवा हे पाहा … “तुमच्या पदरी पैसा घातला आहे. लागेल तो जिन्नस पैसा खर्च करून बाजारातून आणवावा. तसेच न करता प्रजेस पीडा कराल, तर मोंगल बरे असे प्रजेस होईल…”

रयतेसंबंधी ही कणव त्या काळी कुणाही राजाने व सरंजामदाराने दाखवल्याचे आढळत नाही. राजांची रयतेसंबंधीची ही कणव आगळी होती, म्हणून रयतेची राजांसंबंधीची निष्ठा आगळी होती.

ज्या काळात इतर राजांचे सैन्य जनतेला बटीक समजत असे, रयतेच्या संपत्तीची नासधूस व लूट करीत असे, रयतेच्या लेकी-सुनांची अब्रू बेगुमानपणे लुटीत असे, अशा काळात शिवाजी महाराजांचे सैन्य रयतेशी इतके चांगले का वागले? या सैन्यात हा बदल कशामुळे झाला? त्याचे कारण काय?

हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे.

या प्रश्नाचे उत्तर नुसत्या शिवाजीराजांच्या चारित्र्यात सापडणार नाही. केवळ त्यांच्या ‘आज्ञा’च या बदलास कारणीभूत होत्या, असे म्हणणे अपूर्ण होईल. त्यासाठी या सैन्याची रचना आणि हे सैन्य ज्या हेतूकरिता लढत होते, ती रचना व तो हेतूच नीट समजून घेतला पाहिजे.

शेतकर्‍यांचे सैन्य

त्या काळातील इतर राजांचे सैन्य हे खडे सैन्य होते. लढाया करणे, हाच त्यांचा व्यवसाय होता, उपजीविकेचे साधन होते. बाराही महिने ते सैन्य त्याच कामावर असे. घरादारापासून दूर असलेल्या सैन्यातील शिपाई, कुटुंबापासून व शेती-भातीच्या कामापासून दूर असलेले सैन्य बेगुमानच असते. त्यांना कशाची पर्वा नसते. अशा शिपायांत हडेलहप्पी प्रवृत्तीच असते. लग्न झालेले व पोरेबाळे असलेलेही, बारामाही शिपाईगिरी करणारे रयतेची पर्वा करत नसतात. रयतेच्या संपत्तीची व अब्रूची पर्वा करण्याची मानसिकता त्यांच्यात नसते.

शिवाजीचे सैन्य बारमाही शिपायांचे सैन्य नव्हते. काही खडे सैन्य होते. नाही असे नाही; पण बहुतेक शिपाई शेती-भाती करीत. बायका-मुलांत राहत आणि शिपाईगिरीसुद्धा करीत. दसर्‍याच्या दिवशी सीमोल्लंघन करून मुलूखगिरीला बाहेर पडायचे आणि अक्षय्य तृतीयेला पुन्हा घरी येऊन शेती-भातीच्या कामाला लागून बायका-मुलांत राहायचे, असे रिवाज होता.

शेतीशी व कुटुंबाशी असे जिवंत व सातत्याचे संबंध असणार्‍या शिपायांची मानसिकता दुसर्‍या शेतकर्‍यांच्या शेतीची व संपत्तीची काळजी करण्याची असते. इतरांच्या लेकी-सुनांचा आदर करण्याची असते. दुसर्‍यांची शेती व पिके पाहून त्यांना स्वत:ची पिके आठवतात. दुसर्‍यांच्या लेकी-सुना पाहून त्यांना स्वत:च्या लेकी-सुना आठवतात आणि अत्याचार करीत नाहीत, नासधूस व लूट करीत नाहीत. अब्रू घेत नाहीत. शेतीशी जिवंत संबंध असलेला मनुष्य लुटारू होत नाही.

सैन्यातला शिपाई समाजातल्या कोणत्या थरातून येतो, कोणत्या वर्गातून येतो, हे महत्त्वाचे असते.

यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

इतर राजांचे आणि सरदारांचे सैन्य हे लुटारूंचे सैन्य होते. लूट करणे हाच तर त्यांचा हेतू होता. इतरांना राज्ये तरी कशासाठी हवी होती? लुटीसाठीच ना? मग ते लूट करणार नाहीत, तर काय करणार? सैनिकी सामर्थ्याच्या जोरावर चैनी करायची, हाच ज्यांचा हेतू ते रयतेच्या अबू्रची व संपत्तीची पर्वा कशी करणार? शिवाजीच्या राज्याचा हेतू, शिवाजीच्या शिपाई बनलेल्या शेतकरी सैन्याचा हेतू लूट करणे नव्हता, तर लूट थांबविणे हा होता. वर्षानुवर्षेकेलेल्या लुटीचा, अन्यायाचा प्रतिकार करायला जे सैन्य उभे ठाकले होते, ते लूट कसे करणार? अन्यायाचा प्रतिकार करायला जे उभे राहतात, ते स्वत: अन्याय करीत नसतात.

याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या सैन्याने कधीही आणि कुठेही लूट केली नाही, असा नाही. परमुलखांत जाऊन लूट केली होती. ‘सुरतेची लूट’ तर प्रसिद्ध आहे; परंतु ही लूट करताना गरज म्हणून व आवश्यक म्हणून संपत्तीची लूट केली; इतरांच्या अब्रूची नव्हे. याचा आणखीही एक मुद्दा आहे. इतर राजे सैनिकांना पगार न देता लुटीतला हिस्सा देत. स्वाभाविकच सैनिक जास्तीत जास्त लूट करीत असे. शिवाजी महाराजांनी सैनिकांना लुटीतला हिस्सा देण्याची इतरांची रीत रद्द केली. लुटीचा सर्व ऐवज खजिन्यात जमा करायचा आणि सैनिकांना ठराविक मेहनताना द्यायचा, अशी रीत पाडली. यामुळे लूट करण्यात आणि जास्तीत जास्त लूट करण्यात शिपायांचा हितसंबंध राहिला नाही. लूट मिळो अगर न मिळो, कमी मिळो अगर जास्त मिळो, सैनिकांना पगार मिळत असे. त्यामुळे उगाच लूट करण्याची, चैनीसाठी लूट करण्याची प्रवृत्ती राहिली नाही.

शिवाजी महाराजांचे स्वत:चे शुद्ध चारित्र्य, जाणीवपूर्वक हेतू मनाशी बाळगून दिलेल्या स्पष्ट आज्ञा, आज्ञेचा भंग करणार्‍यांना जरब बसेल अशा शिक्षा, उत्पादक शेतकर्‍यांमधूनच केलेली सैन्याची रचना, शिपायांचा शेतीशी व कष्टाशी जिवंत संबंध, रोख पगार देण्याची रीत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अन्यायाचा व लुटींचा प्रतिकार करण्याच्या हेतूने सुरू केलेले कार्य, यामुळे शिवाजीचे सैन्य व इतर राजांचे सैन्य यात फरक होता. महाराष्ट्रातील सामान्य रयतेला शिवाजी महाराजांचे सैन्य हे लुटारू सैन्य वाटत नव्हते, तर लूट थांबवायला निघालेले संरक्षक सैन्य वाटत होते. रयत सैन्याला सहाय्य करीत होती आणि सैन्य रयतेला वाचवत होते.

सामान्य जनतेसाठी राज्य चालविण्याकरिता सैन्य आणि रयत यांचे संबंध एकत्वाचे असावे लागतात. सैन्याची जनतेला भीती वाटता कामा नये. सैन्य आणि जनता हे एकमेकांस पूरक राहतील, अशी रचना करावी लागते, तरच यश मिळते. आधुनिक काळातसुद्धा अशी जनता आणि असे सैन्य यांची उदाहरणे आहेत. व्हिएतनामचे यासंबंधीचे हे ताजे उदाहरण.

शिवाजी सहकारीचे सामान्य शेतकरी

परंतु शिवाजीच्या नावाने वर्णश्रेष्ठत्व कुणी स्थापू पाहील, तर त्यांनी हे लक्षात ठेवावे की, शिवाजीच्या स्वराज्यकार्यात बहुसंख्य साथीदार – फार मोठ्या बहुसंख्येने असलेले साथीदार – उच्चवर्णीय नव्हते; तसेच ते सरदार, जमीनदार, वतनदारही नव्हते, तर खालच्या म्हणून समजल्या गेलेल्या जातींचे व गोरगरीब शेतकरी होते.

ज्या मावळ्यांच्या चिवटपणावर, ज्यांच्या अव्यभिचारी निष्ठेवर आणि असीम त्यागावर शिवाजी अतुलनीय पराक्रम करू शकला, ते सर्व मावळे म्हणजे सामान्य शेतकरी होते.

जुन्या वतनदारांनी, सरदारांनी सुरुवातीला शिवाजीला फारशी साथ दिली नाही; परंतु शिवाजीने छोटे-मोठे नवे सेनानायक निर्माण केले. ते सर्व जन्माने सर्वसामान्य लोक होते; मात्र पराक्रमाने मोठे झाले.

पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून जायला मदतकारक ठरला तो ‘शिवा’ न्हावी होता. अफजलखानाच्या वधाच्या वेळी शिवाजीचा विश्वासू अन् चपळ लढवय्या म्हणून बरोबर गेलेला जिवा महाला हा सुद्धा जातीने न्हावी होता. त्याचे आडनाव संकपाळ. तो जावळी प्रांतातला मौजे कोंडीवलीचा. तोसुद्धा एक सर्वसामान्य रयत होता.

शिवाजीच्या हेरखात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक हा रामोशी जातीचा होता. प्रत्यक्ष शेती करून उपजीविका करणार्‍या सर्वसामान्य कुणब्यांना शिवाजीने साथीला घेतले व राज्य स्थापन केले. शेती करणारा मराठा-कुणबी हा परंपरेने शूद्रच समजला जाई.

व्यक्तींच्या या उदाहरणांबरोबर समुदायांचे उल्लेखही इतिहासात आहेत.

‘सभासदाच्या बखरी’त एक नोंद आहे -“बेरड, रामोशी, आडेकरी वगैरे लोकांना त्यांच्या मगदुराप्रमाणे नोकर्‍या दिल्या. त्यामुळे शिवाजीच्या राज्यात गुन्हा व उपद्रव कधीही होत नसे. गुन्हेगार समजल्या जाणार्‍या लोकांच्या पराक्रमाला वाव मिळाला, तर ते सहसा उपद्रव करीत नाहीत.”

शिवाजी महाराजांनी जे आरमार उभारले, तेसुद्धा परंपरागत क्षत्रिय किंवा मराठ्यांच्या सहाय्याने नव्हे. शिवाजीचा आरमार प्रमुख जसा दर्यावर्दी मुसलमान होता, तसेच आरमारातले बहुसंख्य सैनिक कोळी, सोनकोळी, भंडारी, मुसलमान इत्यादी जातींतील लोकच होते. समुद्राच्या सहाय्याने पोट भरणार्‍या कष्टकर्‍यांनाच शिवाजीने सैनिक बनवले. सामान्यांना शिवाजीने मोठे केले आणि मग या सामान्यांनी शिवाजीला मोठे केले आणि मग सर्वांनी मिळून खूप मोठे कार्य केले. चांगला विचार सामान्य लोक जेव्हा स्वीकारतात, तेव्हा तो विचार हीच एक शक्ती होते आणि ती शक्ती सामान्यांकडून असामान्य कार्य करवून घेते. सामान्यांच्या सहकार्याखेरीज व सहभागाखेरीज इतिहासातील असामान्य कार्ये घडत नाहीत.

अक्षरश: शेकडो वेळा पुनर्मुद्रण झालेले हे पुस्तक सुरुवातीला ‘लोकवाङ्मय’ने प्रसिद्ध केले आणि केवळ 5 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिले. आता त्याची किंमत रु. 30/- इतकी आहे, तरीही मागणी वाढतेच आहे.

संकलन अनिल चव्हाण

संपर्क – 97641 47483


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]