प्रशांत पवार - 9930803328
गेल्या दहा वर्षांत दलित, बहुजन, आदिवासी, मुस्लीम, काश्मिरी आणि उत्तरपूर्वी समुदायाकडून चालवला जाणारा पर्यायी मीडिया मोठ्या संख्येने ऑनलाईन वाचक आपल्याकडे खेचत आहे. यामुळे कथित मेन स्ट्रीम मीडियाला आपला पारंपरिक मार्ग बदलावा लागला आहे. ज्या वेबसाईटला पूर्वी क्षुल्लक म्हणून सोडून देण्यात आले होते, आज या वेबसाईट ‘न्यूजकिंग’ आहेत. पर्यायी माध्यमांच्या याच शृंखलेतील एक नाव म्हणजे ‘बाईमाणूस मीडिया रिसर्च फाऊंडेशन’… स्त्रीवादी दृष्टिकोन, दलित आदिवासींना अग्रक्रम आणि ग्रामीण पत्रकारिता या त्रिसूत्रीवर आधारित माध्यमांमधील एक डिजिटल चळवळ म्हणजे बाईमाणूस. महाराष्ट्रातील अशा प्रकारचे मीडियामधील पहिलेच मॉडेल.
‘ऑक्सफॅम’ नावाची एक फार मोठी संस्था आहे. ‘ऑक्सफॅम’ दरवर्षी त्यांचे अहवाल प्रसिद्ध करत असते. त्यातील एक अहवाल आहे ‘हू टेल्स अवर स्टोरी मॅटर्स’ म्हणजे ‘आमच्या कहाण्या कोण सांगतंय’? आणि दुसरा अहवाल आहे ‘जेंडर इनइक्वॅलिटी इन इंडियन मीडिया’, म्हणजे ‘भारतीय माध्यमांतील लिंग असमानता’… खरं म्हणजे या अहवालाशी सर्वसामान्यांना तसेही काही घेणेदेणे नाही, परंतु ज्या माध्यम संस्थांनी या अहवालातील निष्कर्षांची दखल घेणे अत्यंत गरजेचे असतानाही ते देखील या अहवालाकडे ढुंकूनदेखील पाहात नाहीत. ‘हू टेल्स अवर स्टोरीज मॅटर्स’ या नावाने प्रकाशित झालेल्या अहवालात भारतीय माध्यमातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचा अभ्यास केला गेला आह.े तर ‘जेंडर इनइक्वॅलिटी इन इंडियन मीडिया’ या नावाने प्रकाशित झालेल्या दुसर्या अहवालात भारतीय माध्यमातील महिलांच्या प्रतिनिधित्वाचा अभ्यास करण्यात आला आहे. ऑक्सफॅम या संस्थेने ‘न्यूजलाँड्री’ माध्यमसमूह व ‘टीमवर्क’ या संस्थांच्या मदतीने आणि ‘युनायटेड नेशन्स वुमेन्स’ यांच्या सहकार्याने हे अहवाल प्रसिद्ध केले आहेत. या दोन्ही अहवालांमध्ये बहुतांश राष्ट्रीय पातळीवरील हिंदी आणि इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, नियतकालिके आणि डिजिटल माध्यमांचा अभ्यास करण्यात आला आहे.
‘जेंडर इनइक्वॅलिटी इन इंडियन मीडिया’ या अहवालातील काही महत्त्वाचे निष्कर्ष पाहूयात. या देशातील माध्यमसंस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर म्हणजेच संपादक, कार्यकारी संपादक, ब्युरोचीफ, इनपुट-आऊटपुट हेड अशा प्रमुख जागेवर २७ टयांपेक्षा कमी महिला आहेत. वर्तमानपत्रामध्ये हा टका शून्य आहे. तर नियतकालिके, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांमध्ये ही टकेवारी अनुक्रमे १३.६, २०.९ आणि २६.३ टके इतकी आहे. वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित होणार्या एकूण बातम्या आणि लेखांमध्ये फक्त २१ टके महिलांना प्रतिनिधित्व मिळते. संस्कृती आणि मनोरंजन, सार्वजनिक आयुष्य या संबंधीच्या क्षेत्रात महिलांना जास्तीतजास्त वार्तांकन करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. पण संरक्षण, राजकारण क्रीडा या क्षेत्रासंबंधीच्या पत्रकारितेमध्ये महिलांचं प्रमाण खूप कमी आहे. एकूण प्रकाशित लेख आणि माध्यमांमध्ये महिलांसंबंधीच्या बातम्या आणि लेख ३ टके असतात. त्यातील फक्त ३५ टके लेख आणि बातम्या महिलांनी लिहिलेल्या असतात. वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमधील महिलांचे स्थान चिंताजनक आहे. फक्त ११ टके चर्चांमध्ये महिलांचा सहभाग असतो, पॅनेलिस्ट म्हणून असणारी महिलांची टकेवारी ही १८ टक्केच्या जवळपास आहे… संरक्षण आणि आर्थिक विषयावरील चर्चांमध्ये तर महिलांचा सहभाग हा अगदीच नगण्य आहे. वर्तमानपत्रांप्रमाणेच इथेही महिलांना मनोरंजन, आरोग्य यांसारखी क्षेत्रे दिली गेलेली आहेत. डिजिटल माध्यमांमध्ये महिलांना तुलनेने इतर माध्यमांपेक्षा सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळत आहे. पण त्यांना लिहिण्यासाठी आणि वार्तांकन करण्यासाठी मिळणार्या क्षेत्रांचा ट्रेंड हा वृत्तवाहिनी आणि वर्तमानपत्रांपेक्षा काही वेगळा नाही.. डिजिटल मीडिया आणि नियतकालिकांमध्ये अनुक्रमे ४ टके आणि ८ टके स्थान महिलांच्या विषयांना दिले जाते.
या दोन अहवालावरून हे तरी स्पष्ट दिसतंय की, ‘माध्यमं लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत’ हे वाक्य बोलण्यापुरते आणि व्याख्यानापुरते ठीक आहे, पण या चौथ्या स्तंभातून एससी, एसटी आणि महिला यांना मिळालेल्या प्रतिनिधित्वाचा आणि संधीचा अभ्यास केला तर त्यातला पोकळपणा लक्षात येईल. जात व्यवस्था आणि पितृसत्ताकता आजही भारतीय समाजामध्ये घट्ट पाय रोवून उभी आहे.
माध्यमे वाचक आणि दर्शकांची तत्कालीन घटना आणि परिस्थितीबद्दल मते तयार करत असतात किंवा असलेली मते बदलत असतात. जात, धर्म आणि लिंगभाव यानुसार त्या घटनांकडे पाहण्याचे वेगळे दृष्टिकोन असू शकतात. पण माध्यमांमध्ये फक्त उच्चवर्णीय आणि त्यातही पुरुषच असतील तर तुमच्यापर्यंत पोहोचणार्या बातम्या, लेख आणि त्यातले दृष्टिकोन हे एकांगी असण्याची शक्यता जास्त असते. अशी माध्यमं घटनांचे आणि परिस्थितीचे बहुअंगी वार्तांकन आणि आकलन करण्यात कमी पडतात आणि तुमच्यासमोर पोहोचणारा आशय हा एका विशिष्ट जातीच्या आणि पुरुषप्रधानतेच्या दृष्टिकोनातून येण्याची शक्यता बळावते. ही माध्यमे पक्षपाती ठरतात. बातमी हा इतिहासाचा कच्चा ड्राफ्ट असतो. जेव्हा बातमी लिहिली जाते तेव्हा बातमीदार एक इतिहास लिहीत असतो. जेव्हा तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करता, तेव्हा त्या त्या काळाचे अस्तित्व, माणसं, सामाजिक सांस्कृतिक संबंध, जे काही घडतंय ते बातमीमधून, व्हिडिओमधून डॉक्युमेंट करत असता.
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतर माध्यमांमध्ये सर्व समाजघटक म्हणजे भारतासारख्या विविधता असलेल्या देशामध्ये मग त्यात दलित, ग्रामीण, आदिवासी, भटके, महिला, शेतकरी, ट्रान्सजेंडर या सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळतंय का? प्रतिनिधित्व म्हणजे बातमी होण्यापासून बातमी लिहिण्यापर्यंत त्यांच्याबद्दलचा आशय आणि त्यांनी निर्माण केलेला आशय (कंटेंट) याचे इथल्या माध्यमांमध्ये प्रतिबिंब उमटतंय का?
मुख्य प्रवाहाची ही अवस्था पाहून अनेक पत्रकारांनी माध्यमांमध्ये समांतर प्रयोग यशस्वीपणे उभे केले आहेत. हे समांतर प्रयोग उच्च दर्जाची पत्रकारिता उभी करत आहेत. दलित, आदिवासी आणि महिलांच्या प्रश्नांवर गांभीर्याने मांडणी करणार्या पत्रकारांना ते पक्षपाती असल्याबद्दलचा आरोप सातत्याने मुख्य प्रवाहाकडून ऐकावा लागतो. कारण मुख्य प्रवाहाने निर्माण केलेल्या बातमीसंबंधीची तत्त्वे, नियम आणि मूल्येही उच्चवर्णीयांना पूरक आहेत. त्या पट्टीवर इतरांचे काम मोजल्यास ते पक्षपाती वाटण्याची शक्यता बळावते. त्यामुळे जोपर्यंत माध्यमांमध्ये एससी, एसटी आणि महिलांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळणार नाही.
सुदिप्तो मोंडल नावाच्या पत्रकाराने ‘अल्जझिरा’ वृत्तवाहिनीसाठी लिहिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते, ‘भारतीय माध्यमांना दलितांच्या, आदिवासींच्या बातम्या हव्यात, पण त्यांना दलित, आदिवासी,पत्रकार नकोत.’ हेच भारतीय मुख्य प्रवाहातील माध्यमांचे आजचे जातीय व जेंडरच्या पातळीवरचे वास्तव आहे.
दहा वर्षांपूर्वी इंग्रजी मीडियाचे संपादक आपल्या वार्ताहराला सांगत होते की, दलित, आदिवासी आणि मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराच्या बातम्या कुणी वाचत नाही. आज तेच संपादक आपल्या वार्ताहरासाठी विमानाचे तिकीट देत आहेत, खाजगी टॅक्सी बुक करत आहेत. कारण ते वार्ताहर लांब ग्रामीण भागात जाऊन अत्याचाराच्या ताज्या घटना पूर्ण संवेदना एकवटून देऊ शकतील.
नेमक्या याच कारणामुळे दलित, शोषित, वंचित पत्रकारांना आणि महिलांना आपल्याला हव्या त्या कहाण्या सांगण्यासाठी स्वत:च्या व्यासपीठाची गरज भासू लागली आहे. दुर्बल गटातील बहिष्कृत लोकांसाठी येणारा हा कळवळा आज मीडियासाठी मोठं मार्केट झाला आहे. याचं अजून एक कारण हे आहे की, गेल्या दहा वर्षांत दलित, बहुजन, आदिवासी, मुस्लीम, काश्मिरी आणि उत्तर-पूर्वी समुदायाकडून चालवला जाणारा वैकल्पिक मीडिया मोठ्या संख्येनं ऑनलाईन वाचक आपल्याकडे खेचत आहे. यामुळे कथित मेनस्ट्रीम मीडियाला आपला पारंपरिक मार्ग बदलावा लागला आहे. ज्या वेबसाइटला पूर्वी क्षुल्लक म्हणून सोडून देण्यात आलं होतं, आज या वेबसाईट न्यूजकिंग आहेत. फेसबुक, ट्विटरच्या मदतीनं या वेबसाईटनं आपली लोकप्रियता झटक्यात वाढवली आहे. या वेबसाईट आज बातम्यांच्या शिकारी गटाच्या केंद्रस्थानी आहेत. आज अनेक वेबसाईट ब्रेकिंग न्यूजसाठी मानल्या जातात. दलित कॅमेरा, राउंड टेबल इंडिया, वेलिवाडा, खबरलहरिया, गाँवकनेक्शन, आदिवासी रिसर्जेंस, साहिल ऑनलाइन, मिल्लीगॅजेट, काश्मीररीडर, रैयत आणि थम्बप्रिंट ही त्यापैकी काही उदाहरणं आहेत.
पर्यायी माध्यमांच्या याच शृंखलेतील एक नाव म्हणजे बाईमाणूस मीडिया रिसर्च फाऊंडेशन. स्त्रीवादी दृष्टिकोन, दलित-आदिवासींना अग्रक्रम आणि ग्रामीण पत्रकारिता या त्रिसूत्रीवर आधारित माध्यमांमधील एक डिजिटल चळवळ म्हणजे बाईमाणूस. महाराष्ट्रातील अशा प्रकारचे मीडियामधील पहिलेच मॉडेल.
भारतीय माध्यमांचे चरित्र हे शहरी, पुरुषी आणि अभिजन आहे हे आपण स्वीकारायला हवे. गावाचे प्रतिनिधित्व माध्यमांत दिसत नाही. समाजातल्या या दुर्लक्षित घटकांना आजूबाजूला घडणार्या परिस्थितीबद्दल काय वाटतं किंवा काय वाटत होतं हे पुढच्या पिढीला कसे काय कळणार? त्यांचे प्रश्न, त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या समस्या, त्यांनी निर्माण केलेली नवी मॉडेल्स, त्यांचा संघर्ष हे कसे येणार. म्हणूनच पर्यायी माध्यमांची गरज निर्माण झाली आहे. आवाज नसलेल्या समूहांचा माध्यमांमधला आवाज वाढण्यासाठी पर्यायी माध्यमांची गरज आहे. आता तंत्रज्ञान हे ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं आहे. मग आता आवाज नसलेल्या समूहांनी त्यांची स्टोरी का सांगू नये? त्यांची स्टोरी सांगण्यासाठी मुंबई-पुण्याचा पत्रकार कशाला हवा? म्हणूनच माध्यमांच्या लोकशाहीकरणासाठी समांतर माध्यमाची नितांत गरज आहे.
मुख्य प्रवाहातील प्रस्थापित माध्यमांमध्ये काही दशके काम केल्यानंतर एक संपादक म्हणून मला भारतातील अनेक समूहांचा पुरेसा आवाज या माध्यमांमध्ये उपलब्ध नसल्याचे जाणवले. अनेक शतकांपासून प्रस्थापितांचे अत्याचार, दुर्लक्ष आणि अन्याय सहन केलेल्या भारतातील आदिवासी, दलित आणि महिलांना माध्यमांच्या प्रवाहात कसे समाविष्ट करून घेता येईल, यासाठी कोणकोणते मार्ग असतील या प्रश्नांनी मला भेडसावून सोडले आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तर म्हणजे आम्ही केलेला हा ‘बाईमाणूस’चा प्रयोग. ज्या समुदायांसाठी हळहळ व्यक्त केली जाते त्याच समुदायातील लोकांना पत्रकारितेचे ‘शस्त्र’ हाती देऊन स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करण्याची ताकद देऊ करण्याचा एक प्रयत्न म्हणजे बाईमाणूस.
पत्रकारांची प्रस्थापित असणारी व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या संवाद-माध्यमांच्या मदतीने राज्यातील सर्व घटकांतील महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी, त्यांच्या रोजच्या जगण्यापासून ते त्यांच्या आजूबाजूचा पूर्ण अवकाश त्यांच्या भाषेत व्यक्त करता यावा यासाठी त्यांना हकाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘बाईमाणूस’ हा महत्त्वाकांक्षी प्रयोग भकम पाठबळाशिवाय पूर्ण होणे अशक्यच होते. छत्रपती संभाजीनगरच्या महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठ कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन येथे एका लेक्चरच्या निमित्ताने ही संकल्पना कॉलेजच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांच्या पुढ्यात मांडली आणि काही दिवसांतच ती आकारालाही आली.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम हे नेहमीच अशा नवनव्या प्रयोगाच्या शोधात असतात. त्यांच्यासमोर जेव्हा बाईमाणूसचे प्रेझेंटेशन झाले तेव्हा त्यांनी त्वरित पत्रकारितेच्या दृष्टीने हा प्रकल्प मराठवाड्यात होणे किती आवश्यक आहे हे आम्हाला पटवून दिले आणि मग सुरू झाला महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठ कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन, औरंगाबादतर्फे सुरू झालेला एक महत्त्वाकांक्षी आणि आगळावेगळा उपक्रम म्हणजे बाईमाणूस भारत अब बोल रहा है!
२०१४ नंतर देशभरात झालेल्या इंटरनेटच्या स्फोटामुळे भारतात प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन्स आले. मोबाईल फोन्स येताना आपल्यासोबत सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमधून येणार्या माहितीचा महापूर सोबतच घेऊन आले. फेसबुक, यू ट्यूब आणि इतर सोशल मीडियाच्या गदारोळात माहिती प्रचंड प्रमाणात वाचली जाऊ लागली. पाहिली जाऊ लागली आणि त्याचबरोबर हळूहळू इंटरनेटवर उपलब्ध माहितीची विश्वासार्हतादेखील कमी होऊ लागली. या माहितीच्या महापुरामध्ये समाजासाठी विश्वासार्ह व सत्य घडामोडी देण्यासाठी म्हणून सुरू झालेली एक चळवळ म्हणजे ‘बाईमाणूस.’
बातम्यांना प्रस्थापितांच्या वस्तीबाहेर, शहराबाहेर नेऊन खर्या भारताच्या म्हणजेच भारतात राहणार्या ग्रामीण भागातील समुदायांच्या, आदिवासींच्या, तृतीयपंथीयांच्या समस्या आणि बातम्या सांगण्यासाठी ‘बाईमाणूस’ची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठात करण्यात आली आणि आज ‘बाईमाणूस’ डिजिटल पोर्टलद्वारे, यू ट्यूब चॅनलद्वारे त्याचबरोबर फेसबुक, ट्विटर या नव्या पिढीच्या नवीन बोलीभाषेद्वारे आदिवासी, दलित, वंचित, उपेक्षित आणि महिलांचे मूलभूत प्रश्न मांडत आहे. ‘बाईमाणूस’च्या पत्रकारांनी या सर्व समुदायांचे वास्तव आपल्या बातम्यांमधून, मुलाखतींमधून, वेगवेगळ्या चित्रफितींमार्फत मांडले आहे आणि आजही माणुसकी, संवेदना, न्याय, समता ही मूल्ये शाबूत असणार्या माणसांकडून बाईमाणूसला प्रचंड प्रतिसाद आणि समर्थन मिळत आहे. खर्या अर्थाने पत्रकारितेचा फायदा या देशाच्या रांगेत शेवटी नाही तर रांगेत उभ्याच नसलेल्या मूक आणि दुर्लक्षित समूहाला व्हायला हवा असं वाटणार्या काही मेंदूंमधून ‘बाईमाणूस’ची कल्पना पुढे आली.
‘बाईमाणूस’ने राज्यातील असे भाग निवडले जिथे बातम्याचा महापूर तर असतो, परंतु त्या भागातील पत्रकारितेला महिलांचे, दलितांचे, शोषित-वंचितांचे क्षेत्रच मानलं जात नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की राज्याच्या अनेक जिल्ह्यांत किंवा तालुक्यात महिला पत्रकारांचा पूर्णपणे अभाव आहे. या भागातल्या महिलांनी कुठलं काम करायचं, कुठलं नाही याची एक चौकट तयार असते. त्यांनी जॉब केला तरी त्यांची मानसिकता तशीच पारंपरिक. तिनं नोकरीही विशिष्ट पद्धतीचीच करायची. स्त्रियांच्या अशा विशिष्ट प्रतिमेला छेद देण्यासाठी, पारंपरिक मानसिकता तोडण्यासाठी ‘बाईमाणूस’ने सुरुवातीपासूनच फक्त स्त्रियांना समाविष्ट केलं. आणखी एक गोष्ट म्हणजे, बर्याचदा समाजात उच्च मानल्या जाणार्या जात वर्गातल्या व्यक्तींनाच नोकर्यांमध्ये किंवा पत्रकारितेत काम मिळतं, स्थान मिळतं. आम्ही मात्र गावाकडच्या, कमी शिकलेल्या, दलित-आदिवासी असणार्या स्त्रियांनाही जागा देणं महत्त्वाचं मानले. नुसतीच जागा नव्हे, तर या स्त्रियांचा स्वतःचा विकास कसा होईल, त्यांची आर्थिक उन्नती कशी होईल, त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा कशा रुंदावतील हेही बघितलं… महत्त्वाचं म्हणजे त्यांना घरातून, गावातून बाहेर काढून त्यांना समाजात मानसन्मान मिळेल; समाजाचा दृष्टिकोन बदलेल; त्यांच्याविषयीच्या पारंपरिक धारणांचं उच्चाटन होईल यासाठी व्यासपीठ देण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
एकदा भूमिका निश्चित झाली आणि मग सुरू झाला एक शोध…. तो शोध होता महाराष्ट्रातील अति दुर्गम भागांमध्ये राहणार्या आदिवासी, दलित, भटकेविमुक्त, महिला, पारलिंगी समुदायाच्या; त्याचबरोबर आपल्या कर्तृत्वाने आपल्या समूहाची ओळख बनलेल्या चुणचुणीत, तरुण, कर्तृत्ववान, संवेदनशील आणि धाडसी महिलांचा. खरं म्हणजे, पत्रकारितेत बातम्या पडताळून पाहण्याची गरज आजकाल पत्रकारांना आणि त्या बातम्या प्रसारित करणार्या माध्यमांना तितकीशी वाटत नाही. ‘सगळ्यात आधी’, ‘सगळ्यात वेगवान’च्या स्पर्धेमध्ये आलेल्या बातमीवर पटकन विश्वास न टाकता ती बातमी पडताळून घेणे ही गोष्ट काही सन्माननीय अपवाद सोडले तर फारसं कुणी करताना दिसून येत नाही. अशावेळी ऐकीव माहितीच्या आधारावर, एखाद्या वातानुकूलित कार्यालयात बसून पत्रकारांची निवड करणे आणि दुर्गम भागांचे प्रश्न मांडणे हा सोपा मार्ग उपलब्ध असतानाही याच समूहामध्ये सहभागी असणार्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना आपण नेमकं काय करतो आहोत? कुणाचे प्रश्न मांडतो आहोत? ज्या आदिवासी, दुर्गम भागांच्या बातम्या संपादित आणि प्रकाशित करायच्या आहेत ते परिसर नेमके आहेत तरी कसे, तिथे राहणार्या लोकांचे प्रश्न काय आहेत, वास्तव काय आहे याची जाणीव व्हावी म्हणून प्रत्यक्ष त्या भागांचे दौरे करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाला अनुसरून मग ‘बाईमाणूस’च्या टीमने पहिला दौरा केला तो नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि त्याला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, डहाणू या परिसराचा. नाशिक जिल्हा जरी बागायतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला, तरी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुके हे आदिवासीबहुल तालुके आहेत आणि तिथे पाण्याचे, कुपोषणाचे प्रश्न आ वासून उभे आहेत याची जाणीव बाईमाणूसला झाली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ‘आळवंड’ या धरणाच्या उशाशी असणार्या पुनर्वसित पण तहानलेल्या गावाची कैफियत बाईमाणूसने मांडली. त्यानंतर जव्हार, मोखाडा, डहाणू, वाडा, तलासरी या पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या जीवनाकडे पाहता आले आणि यातूनच बाईमाणूसला पहिली पत्रकार पूनम चौरे भेटली.
पहिल्या दौर्यानंतर दुसरा दौरा होता महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात या ‘प्रगत’ राज्यांच्या सीमेवर असणार्या ‘अप्रगत’ नंदुरबारचा. रस्ते कसे फक्त कागदावर बनवले गेले आहेत, मागील १४ वर्षांपासून एका महाकाय पुलाचे नुसते खांबच कसे रोवले गेले आहेत, पुनर्वसनाचे खरे प्रश्न काय आहेत, सरकारी योजनांचा कसा बट्ट्याबोळ केला गेलाय हे सगळं पाहण्यासाठी नंदुरबारच्या अकलकुवा आणि अक्राणी म्हणजेच धडगाव तालुक्यांचा दौरा प्रत्यक्षात करायलाच हवा. याही दौर्यामध्ये पत्रकार म्हणून समृद्ध करणारे अनुभव ‘टीम बाईमाणूस’ला मिळालेच, पण त्यासोबतच आम्हाला मिळाल्या सुमित्रा वसावे.
या दोन प्रमुख दौर्यानंतर टीम बाईमाणूसने रघुवीर खेडेकरांच्या तमाशात काही दिवस घालवून शोधलेल्या पत्रकार रेणुका थोरात असोत किंवा मग पत्रकार शमिभा पाटीलला जाणून घेण्यासाठीचा प्रवास असो; प्रत्येक दौरा, प्रत्येक प्रवास हा असाच अविस्मरणीय होता, काहीतरी शिकवून जाणारा तर होताच पण त्याचबरोबर या समूहांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाईमाणूसची जबाबदारी अधोरेखित करणारादेखील होता.
‘बाईमाणूस’ची संकल्पनाच मुळात लोकशाहीला अधिक धडधाकट करण्यासाठी आकारास आली. याद्वारे उपेक्षित घटकातील गुणवान, कर्तृत्ववान आणि धाडसी महिलांना व्हिडिओ बनविण्याचे, गोष्टी सांगण्याचे आणि बातम्या मांडण्याचे प्रशिक्षण देऊन बोलते करणे हा मुख्य हेतू होता.
तंत्रज्ञानाच्या जगात बर्याच वाईट गोष्टी घडत असल्या, तरी सुद्धा त्याला एक दुसरी बाजूदेखील आहे. मोबाईलचा उपयोग नेमका कशा कशासाठी होऊ शकतो हे संपूर्णपणे आजही आपल्याला कळलेले नाही. पण बाईमाणूसच्या असे लक्षात आले की, याच मोबाईलचा वापर करून उत्तमोत्तम गोष्टी सांगता येतात. हा मोबाईल या वंचित आणि उपेक्षितांचे हत्यार बनू शकतो आणि म्हणूनच बाईमाणूसने या भावी पत्रकारांना हे मोबाईल आणि त्याचसोबत अत्यावश्यक असणारे मोबाईल पत्रकारितेचे किट म्हणजेच एक मोजोकिट देऊ केले. फक्त वस्तू देऊन न थांबता या महिला पत्रकारांना अतिशय सोप्या भाषेत एका आठवड्याचे प्रशिक्षण देऊन सज्ज केले. महाराष्ट्रातील नकाशावर न दिसणार्या परिसरात आता बाईमाणूसच्या पत्रकार नेटाने काम करतात आणि माध्यम क्षेत्राची क्षितिजे रुंदावू पाहणार्या या चळवळीला आता एक निश्चित आकार येऊ लागला आहे हे नकी.
ज्या महिलांनी हातात कधी मोबाईलही घेतले नव्हते, त्या डिजिटल पत्रकारिता शिकून आपल्या भाषेत आपल्या आवतीभोवतीचं जगणं मांडू लागल्या आणि त्यांच्यातली आग, जिद्द नव्या लेखनाला आयाम देऊ लागली. दलित, आदिवासी, मुस्लीम, ओबीसी, अशिक्षित किंवा नवसाक्षर तरुणींना प्रशिक्षित केलं. त्या आसपासच्या बातम्या, प्रश्न, समस्या आपल्या भाषेत लिहू लागल्या. प्रश्न विचारू लागल्या. ते प्रश्न विचारणं, त्यातही बाईने प्रश्न विचारणं रुचणारं नव्हतंच कुणाला! पण तरी त्यांनी आपलं काम सोडलं नाही.
१८ मे २०२२ ला हा प्रवास सुरू झाला. दोन वर्षांतच या महिला पत्रकार डिजिटल माध्यमात काम करणं शिकू लागल्या. त्यासाठी त्यांच्या हातात मोबाइल आले. त्या शूट करू लागल्या, वेब मिडीयावर बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. त्या सगळ्या महिला, तृतीयपंथी पत्रकार नेमक्या कशा निवडल्या गेल्या? त्या नेमक्या आहेत तरी कोण? हा प्रश्न एव्हाना तुमच्या मनात आलाच असेल. चला तर मग भेटू या ‘बाईमाणूस’ टीमला…
भाग्यश्री लेखामी (मीडियासमूह-भामरागड)
‘बाईमाणूस’ ने महाराष्ट्रातील ज्या महिलांची निवड सगळ्यात आधी केली होती त्यापैकी एक महिला म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात राहणारी २४ वर्षांची तरुण सरपंच भाग्यश्री लेखामी… सुशिक्षित भाग्यश्रीने उच्च शिक्षणाचा पर्याय न निवडता, किंबहुना उच्च शिक्षणासाठी गाव सोडून लांब न जाता राजकारणाच्या माध्यमातून तिथे राहणार्या लोकांच्या समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला. तिने बाईमाणूसची पत्रकार ही ओळख गडचिरोली जिल्ह्यात निर्माण केली. खरं म्हणजे, एकीकडे स्वतः प्रशासनाचा भाग असताना दुसरीकडे समाजातील अन्याय मुख्य पटलावर मांडण्यासाठी लागणारे धाडस आणि प्रामाणिकता याचा सुरेख संगम साधून भाग्यश्री आदिवासींच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वास्तवाचे भान लरळारर्पीी.ळप वर मांडत असते.
सुमित्रा वसावे (भिल्ल आदिवासी – अकलकुवा)
नंदुरबार जिल्ह्यातल्या अकलकुव्यासारख्या दुर्गम भागात राहणार्या सुमित्रा वसावे मागील कित्येक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आदिवासींच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्नशील होत्या. स्थानिक ‘भिली’ आणि ‘पावरी’ भाषेतून निरक्षर आदिवासींना शास्त्रीय ज्ञान देऊन विज्ञानावर विश्वास ठेवायला लावण्याचे ‘शिवधनुष्य’ पेलण्याचे काम सुमित्रा वसावे करत आहेत. याचबरोबर प्रत्येक सामाजिक कार्यात सुद्धा हिरिरीने सहभागी असणार्या सुमित्रा यांनी अनेक आंदोलनात, उपक्रमात सहभाग घेतला होता. बाईमाणूसने दिलेले पत्रकारितेचे प्रशिक्षण आणि काम करण्याची दुर्दम्य इच्छा घेऊन नंदुरबारमध्ये परतलेल्या सुमित्राने केवळ समस्याच मांडल्या नाहीत, तर आदिवासींच्या पारंपरिक शेतीपद्धतीवर, स्वयंपाकाच्या पद्धतीवर आणि विशेष म्हणजे खाद्यसंस्कृतीवर अनेक व्हिडिओ बनवून ते जगासमोर मांडले आहेत.
पूनम चौरे (वारली समूह – डहाणू)
‘बाईमाणूस’ हे केवळ समस्या मांडण्याचे व्यासपीठ नसून लुप्त होत चाललेल्या महाराष्ट्रातील समुदायाच्या लोककला, चित्रकला आणि संस्कृती जपण्याचे आणि संवर्धित करण्याचे हे एक ठिकाण आहे. वारली कलाकारांचे एक क्लस्टर तयार करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून ‘आयुष’ नावाची संघटना करीत आहे. या संघटनेत काम करणारी युवा कार्यकर्ती ‘पूनम चौरे’ ही स्वतः वारली समाजाची असल्याने या चित्रकलेकडे आणि चित्रकारांकडे पाहण्याची संवेदनशीलता तिच्याकडे कितीतरी प्रमाणात अधिक आहे. वारली चित्रकलेकडे इतर नागरिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न ती करीत आहे. वारली कलाकारांना आणि वारली कलेला राजमान्यता मिळवून देण्यासाठी त्याचबरोबर शहरातील सुलभ शौचालयावर, कपड्यावर अगदी कुठेही वारली चित्रे काढून या चित्रांचा होणारा अपमान थांबविण्यासाठी पूनम आणि आयुष ही संस्था काम करते. पूनम आणि बाईमाणूसची भेट बाईमाणूस टीमच्या पहिल्या दौर्यात डहाणू येथे झाली आणि पहिल्या भेटीतच प्रशिक्षण घेऊन पत्रकार होण्याचा मानस पूनमने व्यक्त केला आणि आता जव्हार-मोखाडा-पालघर-डहाणू येथे राहणार्या आदिवासींच्या सांस्कृतिक ओळखी जपण्याचा प्रयत्न बाईमाणूसच्या माध्यमातून ती करत आहे.
शमिभा पाटील (पारलिंगी समूह – फैजपूर)
तृतीयपंथी आणि एकूणच पारलिंगी समाजाला आपलंसं करण्यात समाज म्हणून आपण कमी पडलो आहोत, हे वास्तव आहे. छका, किन्नर, हिजडा या आणि अशा कैक नावांनी ओळखल्या जाणार्या या समुदायाची जनमानसात असणारी प्रतिमा बदलण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होणे गरजेचे आहे आणि म्हणून बाईमाणूसच्या या आगळ्यावेगळ्या आणि धाडसी पत्रकारांच्या चमूमध्ये तृतीयपंथी समाजाला प्रतिनिधित्व असावे या विचारातून जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे राहणार्या शमिभा पाटील यांना पत्रकार बनविण्याचा निर्धार बाईमाणूसने केला आहे. शमिभा लवकरच कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून कवी ग्रेस यांच्या कवितांवर आपली पीएच.डी. पूर्ण करतील.
सुकेशिनी नाईकवाडे (बीड, महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील मागासलेल्या भागांचा उल्लेख मराठवाड्याच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळेच बाईमाणूसने मराठवाड्यासाठी मराठवाड्याच्याच मातीत काम करणार्या दलित समाजाच्या सुकेशिनी नाईकवाडे यांना आपल्या टीममध्ये पत्रकार म्हणून नियुक्त केले. सुकेशिनी या आधीपासूनच वेगवेगळ्या माध्यमांसाठी पत्रकारिता आणि व्हिडिओ स्टोरीज करत होत्या, पण बाईमाणूसची संकल्पना ऐकून त्यांनी स्वतःला बाईमाणूस सोबत जोडण्यासाठी लगेच तयारी दाखविली. मराठवाड्यातील ऊसतोडणी मजुरांचे, दुष्काळाचे, मराठवाड्याच्या संस्कृतीचे आणि इतिहासाचे दर्शन सुकेशिनी बाईमाणूस सोबत संपूर्ण जगाला घडवत आहेत.
अप्सरा आगा (पुणे)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून वृत्तपत्र आणि जनसंवाद या विषयात पदवी घेतलेली अप्सरा आगा ही मुस्लीम समुदायातील तरुणी आता पूर्णवेळ बाईमाणूससाठी काम करते. मुस्लीम सत्यशोधक मंडळ आणि बाबा आढाव यांच्या महात्मा फुले प्रतिष्ठान मध्ये सामाजिक कार्य करणार्या अप्सराने मुस्लिम महिला, कचरा वेचक महिला, हमाल-कष्टकरी कामगार, मुस्लीम वस्त्या या विषयांवर बाईमाणूसमध्ये अनेक स्टोर्या केल्या आहेत.
वर्षा कोडापे (चंद्रपूर)
नागपूर विद्यापीठातून कला आणि मानसशास्त्र विभागातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारी वर्षा ही गोंड आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करते. वर्षाला महाराष्ट्र राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालय अंतर्गत मुख्यमंत्री फेलो म्हणून चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात फेलोशिप मिळाली आहे. गोंड-माडियाकोलाम आदिवासी यांच्या संस्कृती, भाषा आणि राहणीमान या विषयांवर संशोधन, आदिवासी वनहक कायदा आणि पेसा कायदा विषयी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील ५० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती, भारतीय संविधानाचे मूळ माडिया भाषेत भाषांतर करून स्थानिक लोकांमध्ये संविधान जनजागृती अशा वेगवेगळ्या स्तरावर काम करणार्या वर्षाने गेल्या वर्षभरात बाईमाणूससाठी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींवरच्या अन्यायाच्या अनेक बातम्या, ग्राऊंड रिपोर्ट लिहिले आहेत. विशेषत: सुरजागड येथील लोहखनिज खाण प्रकल्पाविरोधातील वर्षाचे ग्राऊंड रिपोर्ट हे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिले गेले आहेत.
भारत हा समृद्ध आणि विविधतेने नटलेला देश आहे आणि अगदी तशीच गोष्ट ‘बाईमाणूस’ची सुद्धा सांगितली जाऊ शकते. कारण बाईमाणूसच्या टीममध्ये वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि भौगोलिक स्तरातून येणार्या महिला, तृतीयपंथी पत्रकारांचा समावेश आहे. प्रत्येकीची कामाची पद्धत वेगळी, उच्चार वेगळे, भाषा वेगळी, सभोवार वेगळा. पण आपल्या समुदायाचे प्रश्न मांडण्याची, भारताची खरी ओळख जगासमोर आणण्याची तळमळ मात्र एकच आहे आणि याचमुळे ‘बाईमाणूस’ हा डिजिटल माध्यमाचा प्रयोग लोकशाही बळकट करण्यासाठी, रांगेत शेवटी उभ्या असणार्या किंबहुना रांगेतच उभ्या नसलेल्या माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक म्हणावा लागेल.
(हा लेख मीडिया वॉच दिवाळी अंक, २०२३ मधील संपादित लेख आहे.)
संपर्क — baimanus.in@gmail.com
मोबा.- ९९३०८०३३२८