संघर्ष जारी है…।

-

सध्या असत्य आणि तथ्यहीन, अवैज्ञानिक, अविवेकी, स्त्रियांना तुच्छ लेखणार्‍या, मध्ययुगीन नीतिमूल्यांचा उदो-उदो करणार्‍या, जाती-धर्मात द्वेष पसरवणार्‍या, जहाल राष्ट्रवादाचा ढोल पिटत सरकारवर टीका करणार्‍यांना देशद्रोही ठरवणार्‍या बेताल वक्तव्यांचे पेव फुटले आहे. या सगळ्या घोषणा, वक्तव्यांत केवळ उत्स्फूर्तता आहे, असे नाही तर ही सगळी वक्तव्ये अगदी समजून-उमजून विशिष्ट विचारधारेला धरूनच होत आहेत. त्यामुळेच हे केवळ वक्तव्यांवरच थांबलेले आहे, असे नव्हे तर प्रत्यक्ष कृतीत उतरतानाही दिसत आहे. ‘गोली मारो….’च्या घोषणा गोळ्या घालण्याच्या टोकाला जात आहेत.

स्त्रियांच्या बाबतीत तर ही गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवत आहे. कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी 150 वर्षांपूर्वी चालू केलेल्या स्त्रीशिक्षणाचे वारे आता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला हलवून सोडत सर्वदूर पोहोचले आहे, त्याचे परिणामही जाणवू लागले आहेत. अन्यायाविरोधात महिला आजच्या सत्तेला आणि सत्ताधार्‍यांना आव्हान देत रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर सर्व बाजूंनी हल्ले होत आहेत. हे हल्ले धार्मिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक अंगाने तिचे मानसिक खच्चीकरण करणारे, अपमानित करणारे शाब्दिक, शारीरिक आहेत.

काही हल्ल्यांबाबत खूप चर्चा होती; पण काही कृत्यांचा फारसा गवगवा होत नाही. ‘द वायर’ने दिलेल्या बातमीप्रमाणे गुजरातमधील सूरत नगरपालिकेच्या महिला कारकुनांच्या भरतीप्रक्रियेत आरोग्य चाचणीच्या वेळेस त्यांना नग्नावस्थेत उभे करून त्यांची न्यायालयानेही बेकायदेशीर ठरवलेली ‘टू फिंगर टेस्ट’ कौमार्य चाचणी घेतली गेली. खरे तर या विरोधात मोठा हल्लाबोल व्हावयास पाहिजे होता. कारण पूर्णत: बेकायदेशीर, घटनाविरोधी, स्त्रीला अपमानित करणारे असे हे कृत्य होत; पण स्त्रियांच्या पावित्र्याबद्दलच्या सनातनी कल्पनांचा पगडा प्रशासकीय यंत्रणेवर पूर्णत: असल्याने फारसे काही घडलेच नाही, अशा प्रकारे सूरत नगरपालिकेच्या त्या अधिकार्‍यांविरोधात कडक कारवाई न होता त्या कृत्याच्या केवळ चौकशीचे आदेश देण्यात आले. किरकोळ कारणांवरून, घोषणा दिल्या म्हणून अटक होत असताना अशा गंभीर गुन्ह्यात कोणालाही अटक होत नाही, यावरूनच अशा गुन्ह्यांकडे बघण्याचा सरकारी पातळीवरील दृष्टिकोन दिसून येतो.

दुसरे उदाहरण आहे, गुजरातच्या भूजमधील स्वामीनारायण मंदिराच्या श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूटचे. या कॉलेजच्या विद्यार्थिनींनी तक्रार केली – मासिक पाळी सुरू आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्यांची अंतर्वस्त्रे उतरविण्याची सक्ती केली गेली आणि हे सर्व यासाठी केले गेले की, हे कॉलेज ज्या स्वामी नारायण मंदिराच्या संस्थेतर्फे चालवले जाते त्यांचे मुलींसाठी नियम आहेत. मासिक पाळीच्या वेळेस विद्यार्थिनी एकमेकींसमवेत राहू शकत नाहीत, स्वयंपाकघरात जाऊ शकत नाहीत, मंदिराच्या आवारात प्रवेश करू शकत नाहीत वगैरे; पण मुली हल्ली हे नियम पाळत नाहीत, असा संशय आल्याने वॉर्डनने अंतर्वस्त्रे तपासणीचा हा प्रकार केला. परंतु हा प्रकार स्त्रीला कमी लेखणारा आहे, घटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याच्या मूल्याविरोधातील आहे, याची कोणतीही फिकीर या संस्थेने बाळगली नाही. शबरीमलापासून आजपर्यंत राजकीय पक्षांनी घेतलेल्या भूमिका पाहिल्या कीअशी काही फिकीर करण्याची आवश्यकता आहे किंवा या कॉलेजशी संबंधित असलेल्या स्वामीने, ‘स्त्रीने मासिक पाळीत स्वयंपाक केला तर ती पुढच्या जन्मी कुत्री होईल, असे अन्न खाणारा पुरुष बैल होईल,’ असे म्हणण्याची हिंमत दाखवली. यातही काहीच आश्चर्य वाटत नाही. पण याला छेद देणारा एक कार्यक्रम ‘न्यूज क्लिक’च्या भाषा सिंह यांच्या कार्यक्रमात ऐकायला मिळाला. दिल्लीतील सच्ची सहेली या संस्थेच्या डॉ. सुरभी यांनी ‘पीरियड्स फीस्ट’ कार्यक्रम आयोजित केला. यात मासिक पाळीतील 28 महिलांनी जेवण तयार केले व जवळजवळ 300 जणांनी त्या भोजनाचा आस्वाद घेतला.

तिसरे उदाहरण आहे, राष्ट्रवादाचा कडवा पुरस्कार करणार्‍या संघाचे सर्वोच्च प्रमुख मोहन भागवत यांच्या मताचे. त्यांनी असे मत मांडले की, जास्त शिकल्यामुळे मुलींच्यात अहंकार निर्माण होतो आणि त्यामुळे घटस्फोट होतात. ज्या स्त्रियांनी प्रचंड कष्टाने प्रतिकूल परिस्थितीशी झगडत शिक्षण घेतले व आपल्याला सिद्ध केले, त्या स्त्रियांच्या शिक्षणाविरोधातील हे मत तर आहेच; पण समाजातील पुरुषी अन्यायाच्या ज्या-ज्या गोष्टी घडतात, म्हणजे बलात्कार होतात, छेडछाडी होतात, कौटुंबिक हिंसाचार होतात, त्या सगळ्याला स्त्रीलाच जबाबदार धरण्याची जी मनुवादी मनोवृत्ती आहे, त्याचेच हे मत प्रतिनिधित्व करते.

आज जीवनाच्या सर्वच स्तरांवर स्त्री-पुरुष सर्वांनाच प्रखर संघर्षाला सामोरे जावे लागत आहे; पण त्यातही मनुवादी वृत्ती सत्तेत केंद्रस्थानी असल्याने हा संघर्ष जास्तच तीव्र झाला आहे आणि त्यातही स्त्रियांना या संघर्षाची झळ जास्त सोसावी लागत आहे. पण आजची स्त्री ही आधुनिक शिक्षणाने सुसज्ज होत या मनुवादी वृत्तीशी तितक्याच प्रखरतेने संघर्ष करीत आहे. या संघर्षात ती निश्चितच यशस्वी होईल, यात काहीच शंका नाही.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]