‘कोरोना’ आणि अफवांची ‘फॉरवर्डेड’ साथ

डॉ. प्रदीप आवटे -

“म्हसवडमध्ये पोचला कोरोना व्हायरस…” माझ्या एका पत्रकार मैत्रिणीने मला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज केला आणि मला विचारले, “डॉक्टर, हे खरं आहे का?” मी चक्रावूनच गेलो. आम्ही इथं मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करतोय, कोरोनाचे निदान करणारी महत्त्वाची प्रयोगशाळा इथं पुण्यात आणि सातारा – सोलापूरच्या सीमारेषेवर करोना रुग्ण मला न समजता कसा येऊ शकतो? बातमी अर्थातच साफ खोटी होती, सफेद झूठ .. फेक न्यूज; पण तिथं तालुका वैद्यकीय अधिकारी असणार्‍या डॉ. रामचंद्र मोहितेंना दिवसभरात शंभरएक फोन आले होते. जे इथं म्हसवडला घडले, तेच हंगेरी, चीन आणि इतर अनेक देशांमध्येही घडते आहे.

नवीन कोरोना विषाणूच्या साथीने चीनमध्ये एक हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पण या विषाणूपेक्षाही कितीतरी वेगाने अफवांचा विषाणू जगभर पसरतो आहे. कोरोना विषाणूच्या पदराखाली तोंड झाकून वांशिक भेदभावाचा विषाणू गल्लीबोळातून फैलावतो आहे. रोगाच्या साथीकरिता इंग्रजीत आपण ‘इपीडिमिक’ असा शब्द वापरतो. सध्याची अफवांची साथ पाहता त्याला ‘इन्फोडेमिक’ असा शब्द तज्ज्ञ वापरत आहेत.

दिवसागाणिक कोरोनाचे मृत्यू वाढत आहेत आणि त्यासोबतच अफवा, ‘फेक न्यूज’ना नवं उधाण येते आहे आणि या अफवा, ‘फेक न्यूज’ फक्त आपल्याकडेच आहेत, असं नव्हे तर त्या जगभर फिरताना दिसत आहेत. साथीरोगांच्या असोत, नाही तर अफवांच्या; त्या इतक्या वेगात पसरण्याकरिता काही कारणं आहेत. जागतिकीकरणासोबत आंतरराष्ट्रीय दळणवळण वाढलं आणि म्हणूनच जगातल्या एका कोपर्‍यातील साथीचा आजार पार दुसर्‍या टोकाला पोचायला काही महिन्यांचा काळही पुरेसा ठरतो. ‘स्वाईन फ्ल्यू’च्या वेळीदेखील आपण हे पाहिलं आहे आणि अफवांची साथ वेगाने पसरायला कारणीभूत आहे, माहिती-तंत्रज्ञानामधील क्रांती, इंटरनेट, सोशल मीडिया. अगदी तुलनाच करायची झाली तर 2003 मध्ये जेव्हा ‘सार्स’ या विषाणूचा उद्रेक झाला, तेव्हा जगातील धड पाच टक्के देखील जनता इंटरनेट वापरत नव्हती; सोशल मीडिया अजून जन्मायचा होता. आज जगातील जवळपास 57 टक्के लोकसंख्या ऑनलाईन आहे, रोज 6 -6 तास सोशल मीडियावर पडीक आहे आणि यामध्ये दर सेकंदागणिक, दर दिवसागणिक वाढ होते आहे. दर दिवसाला जवळपास 10 लाख नवे लोक इंटरनेटवर येताहेत. या सगळ्यांमुळे अफवा पसरण्याचा वेग आणि व्याप्ती प्रचंड वाढली आहे. ‘सत्य चप्पल घालेपर्यंत खोटं अख्खं गाव फिरून येतं,’ ही गावाकडली म्हण आजच्या ग्लोबल गावामध्ये अधिक खरी ठरली आहे. खरं-खोटं, अफवा, भूलथापा पूर्वीपण होतंच; मात्र आज त्याचा वेग, व्याप्ती आणि म्हणूनच परिणामही मोठा होतो आहे.

पण अशा क्रायसिसमध्ये माणसं खोटं का बोलतात, अशा अफवा का पसरवतात? खरं म्हणजे त्यांना खोटं बोलायचं नसतं, त्यांच्या मनात मृत्यूचे भय असते, मनात चिंतेचे ढग असतात. यातून ते काही-बाही अशा काळात जवळच्या माणसाची काळजी घेता येईल, असं परस्परांना पाठवत राहतात. कुणी चिनी आजोबा आपल्या नातवांना ‘वुई चॅट’वरून कोरोना विषाणू अ‍ॅसिडला घाबरतो, म्हणून नाकात व्हिनेगारमध्ये भिजलेला कापसाचा बोळा ठेवावा,’ असा मेसेज करतो, नातू तोच मेसेज आपल्या गर्लफ्रेंडला पाठवतो, ती तिच्या मैत्रिणीला, ती तिच्या बॉयफ्रेंडला अशी मालिका सुरू होते. पण त्या सगळ्या आडनिड्या आणि बिनबुडाच्या मेसेजमागे चिंता असते, काळजी असते, मला यातलं काही माहीत आहे, हे दाखवून स्वतःला जरा शहाणं म्हणून सिध्द करण्याची हौसही असते. जे चीनमध्ये होते, तेच आपल्याकडेही होतं, कुणी म्हणतो कोरोना टाळण्यासाठी लसणाच्या पाकळ्या खा, कुणी म्हणतो कडुनिंबाचा पाला खा, कडीपत्ता खा, तर कुणी सांगतो चिकन, मासे, अंडी खाऊ नका. आधार कशालाच नसतो, प्रत्येकजण मरणाच्या भीतीने कळपामध्ये सामील झालेला असतो आणि ‘काळजीवाहू’ भूमिका अदा करत असतो. पण काही अफवा या ‘मार्केटिंग गिमिक’ असतात. कोरोनाचे औषध माझ्याजवळ आहे, असं सांगून कुणी खोटी जाहिरात करतो. कुणी तीळ तेल, निलगिरी तेल या आजारांमध्ये गुणकारी आहे, असे मेसेजच व्हायरल करत धंदेवाईक लोक अशा गोष्टींचा साठा करत त्या चढ्या भावाने विकत आपलं उखळ पांढरं करतात आणि ऐन मोक्याला ‘मास्क’सारख्या गोष्टींचा तुटवडा जाणवू लागतो.

घाबरट माणसं भीतिदायक गोष्टी पसरवत जातात. चीनमध्ये सरकार सर्व कोरोना रुग्णांना मारणार असल्याची तद्दन खोटी बातमी केवळ सोशल मीडियापुरती राहत नाही, तर आपली मुख्य प्रवाहातील माध्यमे ती दाखवतात, छापतात. काय बोलणार? अशा बातम्यांमुळे संशयित रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती होण्याला किती अडचण येईल, लोक आपला आजार लपवतील, याचा विचारही ही ‘फेक न्यूज’ पसरवणार्‍या लोकांच्या मनात येत नाही. ‘व्हायरस’ अफवा होतो आणि अफवा ‘व्हायरल’ होते, हेच खरं.

कोरोना, स्वाईन फ्ल्यू, इबोला अशी संकटे येतात, तेव्हा आपल्या माणूसपणाचा आणि माणसाच्या समाजाचा कस लागलेला असतो. परवा बर्लिनमध्ये कुणीतरी वेड्यासारखा एका मध्यमवयीन चिनी महिलेवर हल्ला केला, का? तर तिच्यामुळे कोरोना येईल, ही भीती. आपल्याकडे चीनमधून आलेल्या आपल्या कर्मचार्‍यांना काही कंपन्या रुजू करून घ्यायला तयार नव्हत्या, मेडिकल सर्टिफिकेट मागत होत्या. केरळमध्ये ‘निपा’ उद्रेक झाला, तेव्हाही असेच झाले होते. अशी भीती बाळगण्याचे काहीच कारण नसते. एखाद्या भागात एखादा उद्रेक झाला म्हणून तिथली सगळी माणसं संसर्गजन्य नसतात. पण समजावणार कोण? प्रेमापेक्षा काळजी आणि जिव्हाळ्यापेक्षा असा भेदभाव अधिक संसर्गजन्य असतो की काय कोण जाणे? या ना त्या कारणाने माणसांना वाळीत टाकणं आपल्याला आवडत असावं, दुसरं काय? हे केवळ सर्वसामान्य माणसांबाबतच घडते, असे नाही. डॉक्टर, नर्सेस यांच्या बाबतीतही ते घडते. जीवाची बाजी लावून रुग्णसेवा करणारे डॉक्टर्स, नर्सेस जसे असतात, तसेच अशा वेळी रुग्णाला हात लावणे तर सोडा; त्याचा केस पेपरही हातात न घेणारे डॉक्टरही मी प्लेग साथीत पाहिले आहेत.

अशा उद्रेकप्रसंगी माध्यमांची भूमिका अधिक जबाबदार असण्याची आवश्यकता असते. विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर आपण अशा साथीच्या बातम्या उगीच नाटकी करून टाकतो, गूढ आवाजात नव्या आजाराचे थैमान नवा विषाणू तुमच्या घरापर्यंतही येणार काय? असं काहीतरी बोलत वस्तुस्थिती नेमकी मांडण्याकडे दुर्लक्ष करतो. स्वाईन फ्ल्यूच्या वेळी शंभरावा मृत्यू आपल्याला लवकर कळावा, यासाठी हॉस्पिटलबाहेर उभ्या असलेल्या चॅनेलच्या गाड्या आणि क्षणोक्षणी वाजणारे फोन मला अजून आठवतात. चमकी आजारात हॉस्पिटलमध्ये शिरून रुग्णाला उपचार देणार्‍या डॉक्टरला वेडेवाकडे प्रश्न विचारणारी अंजना आपल्या लक्षात असेलच. ‘एक्सक्लुजिव्ह’ नादात आपण माणूसपणाला पारखे न होण्याची काळजी घेतली पाहिजे. एका स्वच्छ समंजस ‘आरोग्य पत्रकारिते’ची गरज कुणीच नाकारणार नाही.

प्रत्येक साथ आपल्याला काही शिकवत असते. ही साथही त्याला अपवाद नाही. आपण सर्वांनीच अंतर्मुख होऊन आपापल्या भूमिका समजावून घेतल्या पाहिजेत. येणारा कोणताच विषाणू तुमचं-माझं माणूसपण संपविण्याइतका बलवान असता कामा नये.

( लेखक महाराष्ट्र आरोग्य सेवेत राज्य सर्वेक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]