अनिल चव्हाण -
सर्व चिकित्सांची सुरुवात धर्मचिकित्सेपासून होते असे मार्क्स म्हणतो. महर्षी शिंदे यांनी धर्माची चिकित्सा केल्यानंतर समाजातील विविध समस्यांची उत्तरे चिकित्सक पद्धतीने शोधायचा प्रयत्न केला आहे. आजही त्यांचे विचार समाजाला मार्गदर्शक आहेत.
महर्षी शिंदे हे सामाजिक परिवर्तनावर भर देणारे विचारवंत होते; कृतिशील वीर होते. उच्च मराठा कुटुंबात जन्मलेली माणसे महारवाड्यात राहून अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यास स्वतःला स्वखुशीने गुंतवून अखेरच्या श्वासापर्यंत कार्य चालू ठेवतात, ही कल्पनेपलीकडची घटना महर्षी शिंदेंच्या जीवनामध्ये दिसून येते.
ब्रिटिश भारतात आले ते भांडवलदारी व्यापारी म्हणून. त्याचबरोबर सोबत सरंजामशाही लुटारूपणा! त्यांच्या देशात लोकशाही आणि भारतात मात्र साम्राज्यशाही! या साम्राज्यशाहीबरोबर आधुनिक संस्कृती आली. इथले विषमता आणि अंधश्रद्धा यांचे किल्ले उद्ध्वस्त करण्यासाठी या आधुनिक विचारांची गरज होती!
वैदिकांनी दोन हजार वर्षे इथल्या समाजाला मनुस्मृतीच्या साह्याने वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्थेच्या नरकात जखडून ठेवले. परिणामी, पश्चिमात्य देश आधुनिक जगाकडे वाटचाल करत असताना, आजही आपण उलट्या दिशेने चाललो आहोत. अशी गुंतागुंतीची परिस्थिती समजून घेऊन, भारतीय समाजाला प्रगतीची दिशा दाखवणारे, जे विचारवंत झाले, त्यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
महर्षी शिंदे हे सामाजिक परिवर्तनावर भर देणारे विचारवंत होते; कृतिशील वीर होते. उच्च मराठा कुटुंबात जन्मलेली माणसे महारवाड्यात राहून अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यास स्वतःला स्वखुशीने गुंतवून अखेरच्या श्वासापर्यंत कार्य चालू ठेवतात, ही कल्पने पलीकडची घटना महर्षी शिंदेंच्या जीवनामध्ये दिसून येते.
त्यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ चा. २ जानेवारी १९४४ ही त्यांची निधनाची तारीख; पण तोपर्यंत ते चळवळीत, कार्यात राहिले.
शिक्षणाचे महत्त्व
अठराविश्वे दारिद्य्र असताना सुद्धा त्यांनी आईला साक्षर केले, बहिणीला मॅट्रिक केले आणि स्वतः परदेशातही प्रतिष्ठा मिळवली, असा मोठा पल्ला गाठला. ही सारी गुणवत्ता सरकारी नोकरीत, पैसे मिळवण्यात वाया न घालवता, परिवर्तनाच्या कार्यामध्ये खर्च केली. यामध्ये अस्पृश्यतेचा प्रश्न अग्रभागी होता. महात्मा फुलेंच्या पाठोपाठ आणि म. गांधी, डॉ. आंबेडकर यांच्या अगोदर अस्पृश्यतेच्या समस्येचे सर्वांगीण समीक्षण आणि संशोधन करण्याचा प्रयत्न अण्णासाहेबांनी केला.
कार्याबद्दल बक्षीस
त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना बक्षीस मिळालं, ते शारीरिक छळ, मानसिक छळ आणि उपेक्षा, त्याचबरोबर निंदानालस्ती! पण ते म्हणत, ‘निंदानालस्तीच्या नियमित रतीबावरच समाजसुधारकांची गुजराण होत असते.’
प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणतात, “अण्णासाहेबांची महाराष्ट्राने उपेक्षा केल्यामुळे अण्णासाहेबांचे काही एक नुकसान झालेले नाही, नुकसान झाले ते आपले. त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीवर आपला ठसा उमटवला! मराठा समाज त्यांच्या बाबतीत इतका अनुदार आणि असहिष्णू वृत्तीने वागला की, त्याने त्यांना महार शिंदेच मानले! आणि अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणार्या ज्या समाजासाठी त्यांनी आयुष्याची बाजी लावली, त्या समाजाला त्यांच्या रतामांसाचे नेतृत्व मिळाल्यानंतर, त्या वर्गाने अण्णासाहेबांचा दुस्वास करायला सुरुवात केली!”
वारकरी संस्कार
अण्णासाहेबांचं कुटुंब वारकरी! त्यांच्यावर संस्कार झाले, “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म| भेदाभेद भ्रम अमंगळ! कोणाही जिवाचा न घडो मत्सर| वर्म सर्वेश्वर पूजनाचे!”
या संत तुकारामांच्या विचारानुसार, धर्म ही त्यांच्या जीवनातील मूलभूत प्रेरणा होती. अर्थात, त्यांची धर्मासंबंधीची कल्पना परंपरागत कल्पनेपेक्षा वेगळी होती. ते म्हणतात, “धर्म म्हणजे सबलांनी दुर्बलांना, वरिष्ठांनी कनिष्ठांना, सत्तेमध्ये, ज्ञानामध्ये सहभागी करून घेणे होय. समाजातल्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला बलशाली करणारा हाच खरा धर्म आहे. उत्तरोत्तर विकास पावणार्या मानवी शतीच्या साह्याने व बदलणार्या परिस्थितीस अनुसरून श्रेष्ठाने कनिष्ठास, जाणत्याने नेणत्यास, पवित्राने पतितास या देणगीचा फायदा दिला नाही; व स्वतः आपल्यामध्ये ती वाढविली नाही तर, धर्माची मूळ ज्योत विझली आहे असे समजावे!”
महर्षी शिंदे यांच्या जीवनाचे तीन कालखंड दिसतात. १९०३ ते १९१६ पर्यंत त्यांनी मुख्यतः धर्म, अध्यात्म यासंबंधी चिंतन केले आहे. त्यांचे या प्रश्नाबाबतचे लिखाण प्रामुख्याने याच कालखंडातील आहे.
१९१७-१८ नंतर त्यांचे लक्ष वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय व आर्थिक चळवळीकडे जाऊ लागले. १९३५ पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या चळवळीमध्ये आघाडीवर राहून भाग घेतला. या काळात त्यांनी इतिहास, भाषाशास्त्र, आर्यपूर्व संस्कृती, भारतातील भती संप्रदाय इ. संबंधित महत्त्वाचे संशोधन केले. या काळात त्यांनी सामाजिक तत्त्वज्ञानाचा अधिक विचार केला. या कालखंडातच १९२३ ते १९३५ या काळात अधिक सातत्याने लेखन, वाचन व चिंतन केले. हा त्यांच्या जीवनातील दुसरा कालखंड होय.
१९३५ नंतर त्यांच्या जीवनातील तिसरा कालखंड सुरू झाला. या काळात ते आजाराने अंथरुणावर होते. १९३५ ते १९४४ पर्यंत त्यांना त्यामुळे फारसे क्रियाशील जीवन जगता आले नाही, तरीही त्यांनी थोडेफार लेखन व चिंतन केले आहे.
बालपण
अण्णासाहेबांचे कुटुंब तसे सुखवस्तू होते. घरात अन्नधान्याची रेलचेल असायची. गोठ्यामध्ये दहा-वीस जनावरे होती. अनेक माणसे आगंतुकपणे येऊन जेवायला बसायची. येणारी माणसे देखील हिंदू, मुसलमान, स्पृश्य, अस्पृश्य असा भेदाभेद न करता एकाच पंतीला बसून जेवण करायचे. अशा स्थितीत त्यांना दारिद्य्राचे चटके सोसावे लागले. दोन वेळची चूल देखील पेटण्याची मारामार निर्माण झाली! अशावेळी वालुबाई नावाची एक कुणबीण, जी अण्णासाहेबांच्या घरात पूर्वी मोलकरीण म्हणून काम करायची, संध्याकाळच्या वेळी कोणी पाहणार नाही अशी दक्षता घेऊन आपल्या पदराआडून शिळ्या भाकरीचे तुकडे घेऊन यायची. ती आल्यानंतर अण्णासाहेबांच्या मातोश्री ते तुकडे ताकात, वरणात अगर सरळ सरळ पाण्यात भिजवून मुलांना देत असत. लहान लहान मुले, हे तुकडे पंचपवान्न समजून खात! अशा अत्यंत दारिद्य्रात सुद्धा अण्णासाहेबांनी शिक्षण चालू ठेवले. शाळेला जाताना कुडची स्टेशनपासून जमखंडी हे ३३ मैलांचे अंतर, चार आणे वाचवण्यासाठी ते पायी चालत जात असत. या भयानक दारिद्य्रात सुद्धा ते जमखंडी हायस्कूलमधून प्रथम क्रमांकाने मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. दारिद्य्राचे इतके भयानक चटके सोसलेले असून सुद्धा लठ्ठ पगाराची नोकरी मिळवून आरामात आयुष्य जगण्याचा विचार सुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील मन:शांती ढळली नाही.
त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. केले. यासाठी त्यांना बडोदा संस्थानची दरमहा २५ रुपयांची स्कॉलरशिप मंजूर झालेली होती.
या काळात त्यांनी प्रोफेसर मॅक्समुल्लर यांची व्याख्याने ऐकली; केशवचंद्र सेन यांचे चरित्र वाचले! त्याने भारावून जाऊन ते प्रार्थना समाजाचे रीतसर सभासद झाले. त्यांच्या या निर्णयाला आई-वडिलांनी देखील पाठिंबा दिला. बाबा म्हणत, ‘प्रार्थना समाज ही भागवत धर्माची सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे.’
सत्यशोधक की प्रार्थना समाज?
महर्षी शिंदे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. पण तरीही ते सत्यशोधक समाजाकडे न वळता प्रार्थना समाजाकडे वळले, याचे कारण काय असावे? एक तर त्या काळी सत्यशोधक समाजाचा प्रभाव ओसरला असेल आणि त्यातूनही सुशिक्षित वर्गावर फारच कमी प्रभाव शिल्लक राहिला असेल! दुसरे कारण दिसून येते, महर्षी शिंदे यांच्यावर झालेले कुटुंबातील संस्कार हे भागवत धर्माचे होते. हे संस्कार प्रार्थना समाजाशी जुळतात. प्रार्थना समाजाची परिचय झाल्याबरोबर ते प्रार्थना समाजाकडे ओढले गेले, पण पुढील काळामध्ये त्यांनी केलेले कार्य आणि चळवळी, या सत्यशोधक समाजाच्या विचाराशी अधिक जुळतात.
अद्वैतवादाला विरोध
प्रत्येक व्यक्ती ही ब्रह्माची प्रतिकृती आहे. त्यामुळे ब्रह्म आणि प्रत्येक व्यती ही एकरूप होऊ शकतात, अशी अद्वैतवादाची भूमिका आहे.
प्रार्थना समाज या प्रश्नाबाबत वेगळी भूमिका घेतो त्याचा कल द्वैतवादाकडे आहे. मनुष्य परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप होऊ शकतो, ही भूमिका त्याला मान्य नाही. महर्षी शिंदेंनी याची मीमांसा केली आहे. ते म्हणतात, “परमेश्वर अनंत! आम्ही सांताहून सांत; तो सर्वज्ञ आम्ही आपणास अल्पज्ञ म्हणविणे म्हणजेही आम्ही आमच्या ज्ञानाची घमेंड दाखविणे होय. तो सर्व समर्थ, आम्ही त्याचे प्रेमास अपात्र! तो न्यायी आणि आम्ही अन्यायाकडे धावणारे असा त्यांच्यामध्ये व आमच्यामध्ये भेदभाव आहे. हा भेदभाव ओळखून त्यास वचकून असले पाहिजे. त्याच्या पुढे जावयाचे तर अंत:करण शुद्ध करून, मलिन भाव शुद्ध करून आम्ही गेले पाहिजे; निदान अंत:करण मलिन आहे त्याचपाशी अनुतापपूर्वक कबूल केले पाहिजे. देवावर आमचे प्रेम पाहिजे; पण त्याच्या संबंधाने आपल्या ठिकाणी आदरभाव पाहिजे; भीती पाहिजे. आमचा व देवाचा संबंध अवज्ञा करण्यापर्यंत केव्हाही येऊ नये.”
अद्वैतवादावर टीकेचे दुसरे कारण देताना महर्षि शिंदे म्हणतात, “वाढते ज्ञान हे दुसरे तत्त्व होय. आम्ही आपले ज्ञान वाढणारे आहे की नाही याची नेहमी खबरदारी घेतली पाहिजे. अद्वैतवाद्यांचा अद्वैत सिद्धांत हे वाढते ज्ञान नव्हे. जे आहे ते एकच तत्त्व आहे. असा एकदा मनाचा ग्रह झाला की मनाची गती कुंठित होते. या कारणामुळेच ब्राह्म अनुयायांच्या पसंतीस अद्वैतवाद उतरत नाही. व्यतीस येणार्या एखाद्या लहानशा ताज्या अनुभवाची किंमत शिळ्या अद्वैतवादापेक्षा मोठी आहे!”
अवतारवाद
ज्या वेळी विश्वामध्ये पाप वाढते, तेव्हा परमेश्वर जन्म घेतो आणि पापांचा नाश करतो. आताही पाप वाढले की परमेश्वर जन्म घेईल आणि मग सर्व दुरुस्त करेल; ही कल्पना अवतार वादामागे असते.
"यदा यदा ही धर्मस्य। ग्लानिर्भवती भारत: अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥”
गीतेमधील हा श्लोक सर्वांना ठाऊक आहे. पण ही अवतारवादाची कल्पना महर्षी शिंदेंना मान्य नाही. अवतारवादावर त्यांनी कठोर टीका केली आहे. परमेश्वराने अवतार घ्यावा व मग सर्व मानवांचा उद्धार करावा, ही कल्पना त्यांना मान्य नाही. ही कल्पना व्यतीचे कर्तृत्व, इच्छाशक्ती गलितगात्र करून टाकणारी आहे, अशी त्यांची भूमिका आहे. प्रत्येक व्यतीमधील आत्मविश्वास वाढणे, तिच्यातील कर्तृत्व उमलणे म्हणजे अखेरीला समाजाचा विकास होणे आहे. लाखो व्यतींना पंगू बनविणारे अवतारवादाचे तत्त्वज्ञान समाजाला घातक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणतात, “आपण आपल्याच पायावर उभे राहण्यास शिकले पाहिजे व राहिले पाहिजे. मला इतके वाटते की, आज जी आमच्यात आत्मकला अंशभूत आहे, इच्छाशक्ती, बाहुबल, एक एक पाऊल स्वतः पुढे टाकण्याची शती आहे, ती जाऊन अवतारी व्यतीच्या विद्युत्कषर्णाने एकदम कामे होणार असतील तर तो अवतार नको व ती कामेही नकोत. विकास झाला पाहिजे. हे मी धरून बसेन. अवतारवादाने प्रदर्शित केलेला, एक फार उंच व इतर सर्व अत्यंत नीच, खालावलेले, असला विषमभाव मला पसंत नाही. सर्वांची सर्व बाजूंनी व तीही स्वतःच्या प्रयत्नांनी उन्नती होत जावी हेच श्रेयस्कर. अवतारांची गरज भासू लागल्यास समजावे येथे रोग आहे! स्वाभाविक स्थिती नव्हे! स्वतःचा दम संपला, स्वयंशती हरपली, स्वतःचा जोर नाहीसा किंवा कमी झाला. पण चांगल्या सुदृढ राष्ट्रात स्वयंस्फूर्ती हा एक गुण असतो. म्हणजे कोणतेही कृत्य स्वतः आपल्या कळलेल्या दिशेने करण्यास अंगावर घ्यावयाचे. त्या राष्ट्राच्या विभूतीच्या व सामान्य लोकांच्या मध्ये इतके अवाढव्य अंतर नसते. हेही लक्षात ठेवले पाहिजे.”
निवृत्तीवाद म्हणजे नाश
भारतीय मनावर संन्यासवादाचा प्रभाव शेकडो वर्षे आहे. शंकराचार्यांच्या उदयानंतर या संन्यासवादाने भारतीय मनाची विशेष पकड घेतली. पण महर्षी शिंदे यांना हा संन्यासवाद किंवा निवृत्तीवाद अमान्य आहे! या जगाचे जीवन आपण चांगल्या प्रकारे जगले पाहिजे, अशी त्यांची धारणा आहे. प्रवृत्तीवादाची भूमिका स्पष्ट करताना महर्षी शिंदे म्हणतात, “मी तरी समजतो निवृत्ती म्हणजे नाश आहे! कृष्णाने अर्जुनाला अखेर निरोप अट्टाहासाने प्रवृत्ती विषयक सांगितला आहे. तो त्याला म्हणतो, “अरे यापेक्षा तुला काय सांगू? मी जर अव्यक्त असून व्यक्त होत आहे. मी प्रवृत्त आहे तोपर्यंत तू निवृत्तीची कथा सांगू नकोस.”
अंत:प्रामाण्य हेच श्रेष्ठ प्रामाण्य
ब्राह्मो समाजाचा ग्रंथप्रामाण्याला किंवा इतर कोणत्याही बाह्य प्रामाण्याला विरोध आहे. अंत:प्रामाण्य हेच श्रेष्ठ प्रामाण्य आहे अशी त्यांची भूमिका आहे. यासंबंधी चर्चा करताना महर्ष शिंदे म्हणतात, “ब्राम्ह्यास त्याच्या बाहेर प्रमाणभूत वस्तू अशी काय ती एकच ईश्वरच! त्याच्या प्रामाण्याचा बोध जो ब्राम्ह्यास होतो तो बाहेरून नव्हे, तर त्याच्या अंतर्यामातून आणि विवेकबुद्धीतून! यावरून ब्राम्ह्यास प्रमाणभूत असे काहीच नाही! ते स्वैर आहे, असेही होत नाही! उलट ब्राम्ह्याचे असे म्हणणे आहे की, ज्याला हे अंत:प्रामाण्य मान्य नाही किंवा पुरेसे ते जास्त भासत नाही तेच बाहेरच्या अनेक विविध प्रामाण्यांच्या भानगडीत पडतात. आता जर कोणी ब्राम्ह्यास विचारतील की अंत:प्रामाण्यास सर्वत्र सारखेपणा व निश्चितपणा कोठे आढळतो, तर त्यांचे सांगणे असे पडते की ब्राम्ह्य पुस्तकात, आचारात, आपल्याहून अधिक धरसोड, उडवाउडव आढळते. ती निवारण्यास पुन्हा आपल्या शुद्ध व सात्त्विक बुद्धीचा उपयोग करावा लागतो!”
धर्मनिरपेक्ष राज्य
ब्राह्मो समाजाने जगातील सर्व धर्म सारखेच आहेत अशी भूमिका घेतली आहे. आज आपल्या देशात आपण जी धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना स्वीकारली आहे, तिला पोषक अशी भूमिका या समाजाने शंभर वर्षांपूर्वीच स्वीकारली आहे! भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्ष राज्याचा तात्त्विक आधार त्यांच्या विवेचनातून मिळतो. सर्व धर्म समान आहेत, याची चर्चा करताना महर्षी शिंदे म्हणतात, “ईश्वराच्या राज्यात, हा हिंदू, हा मुसलमान, हा ख्रिस्ती असा खात्रीने भेद होणार नाही. हल्ली इंग्रजांच्या राज्यात जर हा भेद पाळण्यात येत नाही. तरी ईश्वराचे राज्य जे खात्रीने पवित्र असणार, त्यात कसा पाळण्यात येईल? इंग्रज सरकार हे स्वतःच ख्रिस्ती धर्माचे आहे व आपल्या धर्माची किंमत ते जाणत नाही असे नाही. पण आजपर्यंतच्या अनुभवाने जर केवळ धर्म निराळा म्हणूनच एखाद्यास आपल्या दरबारात निराळी जागा न देण्याइतके शहाणे झाले आहे, तर देव काय त्यापेक्षा कमी शहाणा असेल की त्याच्या दरबारात असा भेदभाव होईल! मग स्वतः देवच जर धर्मभेद पाळत नाही, तर मनुष्याने तो पाळणे किती सत्यास धरून होईल बरे?”
सत्यशोधक समाजाकडे कल
महात्मा फुले यांनी प्रार्थना समाजावर कठोर टीका केली होती. प्रार्थना समाज म्हणजे ख्रिश्चन धर्मातील उष्टे माष्टे गोळा करून तयार केलेला संघ आहे, अशा प्रकारची ही टीका होती. त्यामुळे प्रार्थना समाजाच्या अनुयायांमध्ये सत्यशोधक समाजाबद्दल दुरावा निर्माण झाला होता. अशा काळात प्रार्थना समाजाचा पुरस्कार करून, सत्यशोधक समाजाला जवळ करणारे महर्षि शिंदे एकमेवच होत. पुढे ते सत्यशोधक समाजाकडे जास्तीत जास्त आकृष्ट होत गेले. महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव करू लागले. १९३८ साली इंडियन मेसेंजर या नियतकालिकात महात्मा फुले यांच्यावर त्यांनी दोन लेख सुद्धा लिहिले. एके ठिकाणी ते म्हणतात, “महात्मा फुले हे एक असामान्य पुरुष होते. त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रात प्रार्थना समाजापेक्षा अधिक कार्य केलेले आहे. त्या समाजाचे ध्येय उच्च आहे. जोतिबांनी लिहिलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचे बायबल आहे. हे पुस्तक आम्ही ब्राह्मो समाजाच्या प्रार्थनेच्या वेळी घेतो. मी छातीला हात लावून सांगतो की, ज्योतिरावांच्या चरित्रात महाराष्ट्राचा इतिहास ग्रंथित झाला आहे! दांभिक देशभता पेक्षा त्यांची देशभक्ती वरच्या दर्जाची आहे.”
बौद्ध धम्म
ब्राह्मो समाजाच्या मिशनरींच्या परिषदेत भाषण करताना महर्षी शिंदे म्हणाले, “मी बौद्ध आहे. आमच्या ब्राह्मो समाजात निरनिराळ्या धर्मातून माणसे येतात हे खरे ना?” ब्राह्मोे समाजात राहून बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे, सर्व भारतामध्ये, ते एकमेव ब्राह्मो समाजवादी आहेत.
१९०९ साली त्यांनी लिहिलेल्या लेखांमध्ये, ‘हिंदुस्थानात सामाजिक प्रबोधनासाठी बौद्ध धर्माचा पुन्हा जीर्णोद्धार झाला पाहिजे’, असे म्हटले आहे!
अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, जातीपातीच्या भिंती पाडण्यासाठी, मानवी समतेचा प्रवाह आपल्या समाजात अखंडपणे खळाळून वाहता ठेवण्यासाठी, बौद्ध धर्माचा स्वीकार केला पाहिजे, असे सांगणारे महर्षी शिंदे हे महाराष्ट्रातील पहिलेच थोर समाजसुधारक आहेत!
महात्मा गांधी
महर्षी शिंदे टिळकांच्या काळात जहाल राष्ट्रवादाकडे झुकले, पण १९२० नंतर गांधी युगात महात्मा गांधींच्या राजकारणाशी ते अधिक झपाट्याने एकरूप झाले. महात्मा गांधींमध्ये सामाजिक सुधारणा आणि राजकीय जहालवाद यांचा सुरेख संगम झाला होता. महात्मा गांधींच्या आंदोलनात भाग घेणारे महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे ते कदाचित एकमेव प्रमुख अनुयायी असावेत.
मंदिर प्रवेश
१९२३-२४ साली केरळमधील वायकोम मध्ये मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला. या सत्याग्रहात महर्षी शिंदे यांनी भाग घेतला होता.
प्रार्थना समाजाचा मूर्तिपूजेला विरोध आहे. त्यामुळे मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करणे योग्य नव्हे, अशी सर्व प्रार्थना समाजवाद्यांची भूमिका होती. पण महर्षी शिंदे यांच्या दृष्टीने हा प्रश्न मूर्तिपूजेचा नव्हता, तर मूलत: हा प्रश्न अस्पृश्यता निवारण्याचा होता; सामाजिक समतेचा होता.
ईश्वर
माणसाने आस्तिक असलेच पाहिजे असा आग्रह महर्षी शिंदे यांचा आहे.
५००० वर्षांत भौतिक जड जग आणि मनुष्येतर प्राणी हे बहुतेक त्याच स्थितीत आहेत. पण मनुष्यप्राण्यांनी इतक्या अवधीत आघाडी मारली. भौतिक कला, मानसिक विद्या, आणि आत्मिक उन्नती ही या प्राण्याने संपादिली आहे! हे जे ऐश्वर्य आणि ही जी संपत्ती मनुष्याने मिळविली आहे त्या सर्वांत श्रेष्ठ दर्जाची संपत्ती म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराची गूढ शती की जिच्यामुळे अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होऊन चालली आहेत. त्याच्यासंबंधी मनुष्याने आपल्या ज्या कल्पना, भावना व सिद्धांत केले आहेत ते होत. ईश्वर म्हटल्यावर काय काय विचार, विकार, ईर्षा इ. उद्भवतात. या संपत्तीशी दुसर्या कशाची तुलना देखील करणे शोभत नाही. स्वतः ईश्वर जरी उत्क्रांती नियमाच्या बाहेर आहे तरी त्याने आपल्या संबंधित ज्ञान मनुष्यास एकदम जाहीर केलेले नसून ते तो उत्क्रांती नियमाप्रमाणे हळूहळू देत आहे. मनुष्यप्राणी ईश्वराची कोणत्या ना रीतीने भावना केल्यावाचून राहिला नाही. इतकेच नव्हे, तर ईश्वरासंबंधी त्याची भावना उत्तरोत्तर शुद्धच होत गेली आहे व पुढे याहून शुद्ध होत जाणार आहे. किंबहुना, ईश्वराला भावणे हाच मनुष्यपणा आहे.
ब्रह्म नाही असे म्हणणारा स्वतः आपणच नाही असा होतो. ब्रह्माला आहे असे जाण्यानेच जाणणार्या स्वतःला अस्तित्व येते, म्हणून हाच मनुष्याचा धर्म आहे. ईश्वरासंबंधी काहीतरी भावना मनुष्यमात्रामध्ये असलीच पाहिजे ही गोष्ट निर्विवाद आहे!
तुलनात्मक धर्मशास्त्राचा उद्देश ईश्वर आहे की नाही हा प्रश्न ठरविण्याचा नाही, तर ईश्वर भावना शुद्ध कसं कशी होत गेली हे दाखविण्याचा आहे. या शुद्धीची मुख्य दिशा ही आहे की, ईश्वर हा कोणी शरीर विशिष्ट व्यती नसून सर्वव्यापी शुद्ध चैतन्य आहे. ईश्वर हा भोगायतन नसून केवळ गुणाश्रय आहे.
(श्रद्धा) विश्वास
महर्षी शिंदे श्रद्धेचे महत्त्व स्पष्ट करताना म्हणतात, “ईश्वराचा व आपला संबंध बुद्धीपेक्षा विश्वासाच्या द्वारे अधिक जडतो. इतकेच नव्हे, तर बुद्धीमुळे हा संबंध केव्हा केव्हा शिथिल होतो, असे दिसून येते. बुद्धी आणि विश्वास यातील फरक थोडक्यात सांगावयाचा झाल्यास असे म्हणता येईल की, बुद्धी म्हणजे पुष्कळ प्रयत्नानंतर पुष्कळ सामग्रीच्या साह्याने अल्प ज्ञान करून देणारी शती; आणि विश्वास म्हणजे काहीच प्रयत्न न करता, अल्पशा सामग्रीने पुष्कळचे ज्ञान करून देणारी शक्ती होय.”
आत्मा
महर्षी शिंदे म्हणतात, “कामना आणि कर्तव्यबुद्धी हे आत्म्याचे दोन पुरुषार्थ आहेत. ते साधत असताना आत्म्याला श्रम होतात. त्याला मधूनमधून विसाव्याचेही स्थान आहे. श्रम आणि विश्रांती अथवा यात्रा आणि वस्ती, किंबहुना बंधन आणि मोक्ष यासंबंधीच्या इतरांहून आमच्या कल्पनेचा निराळेपणा इतकाच की, इतर या अवस्था एकामागून एक येतात, असे म्हणतात. म्हणजे, आत्मा काही काळ बद्ध राहून पुढे कायमचाच मुत होतो. एक जन्म असो किंवा ८४ लक्ष योनी असोत, ती यात्रा संपल्यानंतर तो कायमच्या वस्तीप्रत जातो, अशी इतरांची समजूत आहे.
आम्हांस असे वाटते की, पुरुषार्थाचे श्रम आणि विश्रांतीची शांती या आमच्या अवस्था आलटून पालटून पुन्हा पुन्हा होतात व येणेप्रमाणे आत्म्याची उन्नती अनंत काळ चालू असते.
एखादी मोठी नदी पर्वतावरून निघून तिचे निरनिराळे फाटे फुटून जंगलातून, वाळवंटातून वगैरे गडप होतात, तरी मुख्य प्रवाह जसा पुढे वाहात जातो, त्याप्रमाणे जाणीव, वनस्पती आणि अनेक जीवकोटी मधून प्रवास करीत अखेर मनुष्य प्राण्यांमध्येही बर्याच उज्ज्वल रूपाने विकसली आहे.
मनुष्याचा मेंदू हा जाणिवेचे अवयव किंवा अधिष्ठान आहे. पण जेथे मेंदू नाही, तेथे जाणीव नाही, असे म्हणता येत नाही. पचनक्रियेचे अवयव जे पोट ते वनस्पतीमध्ये नसले तरी झाडातून पचनक्रिया चालू असतेच; पचनक्रियेप्रमाणेच अधिक स्थूलदशेत झाडांमध्ये जाणीवही असतेच. मात्र, तिची वाढ वनस्पतीत खुंटलेली असते. पुढील कोटीत त्या जाणिवांचे दोन फाटे फुटलेले दिसतात. खालील प्राण्यात उपजत बुद्धी आणि मनुष्यमात्रात विवेक बुद्धी अशी हिला निरनिराळी नावे देता येतील.
विश्व चैतन्याचे पर्यवसान केवळ विवेकातच झालेले नाही, तर प्रेम आणि कर्तव्याच्या रूपाने तिचा या मनुष्यकोटीत विकास झालेला दिसत आहे. आमच्या प्रार्थना समाजाला ह्याच वरील विश्वचैतन्याचा भरवसा आहे! तीच आमच्या आत्म्याची वस्ती.”
अपेक्षित धर्म
महर्षी शिंदे यांच्या पुढचा मुख्य प्रश्न काय आहे? ते म्हणतात, “हिंदूंचा धर्म आपली शुद्धी आणि उद्धार कधी होईल याची अद्यापि वाट पहात आहे!”
हिंदुस्थानातील धार्मिक परिस्थितीचे नेमके वर्णन त्यांनी केले आहे! “हिंदुस्थानातील जुन्या धर्माची व्यंगे आणि त्याचे दुष्परिणाम पाश्चात्त्य देशातल्याहून निराळे आहेत.
इथे विशिष्ट ठरावीक मताविषयी आग्रह फारसा आढळून येत नाही. धर्मग्रंथांची प्रमाणता मानण्यात येते. परंतु ते सर्व धर्मग्रंथ पुष्कळ वर्षांपूर्वी मृत झालेल्या भाषेमध्ये लिहिलेले आहेत. त्यामुळे अर्थाची ओढाताण पाहिजे तशी करता येते. उपासना ही एक स्थानिक बाब होऊन बसलेली आहे. विशिष्ट स्थळे आणि प्रतिमा यांना महत्त्व आलेले आहे. प्राचीन काळापासून पवित्र मानली गेलेली निरनिराळी क्षेत्रे आहेत; शृंगारलेली भव्य देवळे आहेत; तसेच घरोघरी देवघर म्हणून एक स्वतंत्र खोली असते. हिंदू धर्म म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे. त्याचे नियमन असंख्य जातींचा जो मोठा एक व्यूह बनलेला आहे, त्याचे द्वारा होत आहे. त्याचा पाया आध्यात्मिक नसून सामाजिक आणि कौटुंबिक हितसंबंधावर रचलेला आहे. आठव्या शतकाच्या सुमारास धर्माचे पहिले मोठे आचार्य पद स्थापण्यात आले असावे, असे दिसते! परंतु त्याची कामगिरी लोकांच्या आध्यात्मिक गरजा काय आहेत, त्या समजून घेऊन त्या भगविण्याची नसून, केवळ जाती बंधनाच्या द्वारे हिंदू धर्माच्या ज्या जुन्या समजुती आणि विधी यांची परंपरा शाबूत ठेवणे एवढेच आहे! फक्त ब्राह्मणांना, विशेष करून त्यातल्या त्यात भिक्षुक मंडळींनाच, धर्माचे काही विहित कर्म आचरावी लागतात. इतर चालू वहिवाटीच्या गोष्टी आपापल्या आवडीप्रमाणे करीत असतो. हिंदुस्थानामध्ये ज्याचे खरे जुलमी साम्राज्य चालू आहे, तो आचार्य, उपाध्याय किंवा धर्मग्रंथ यांच्यापैकी कोणी नसून चालू वहिवाट हीच होय!”
अनिष्ट प्रथा
हिंदू धर्मामध्ये अनेक अनिष्ट प्रथा होत्या. आजही आहेत. त्यासंबंधी महर्षी शिंदे यांची भूमिका पुरोगामी होती. अशा प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि या प्रथांचा सखोल अभ्यास केला.
मुरळी
मुरळी प्रथेविषयी ते म्हणतात, “हिंदू देवळांना लहान मुली वाहण्याचा किंवा हिंदू देवाशी त्यांचा विवाह करण्याचा चमत्कारिक प्रघात या देशात पुरातन कालापासून चालत आला आहे, त्याचे मूळ काय आणि त्याची वाढ कशी झाली? याविषयीचा इतिहास उपलब्ध नाही. बहुतकरून ही चाल वांझ बायका आपल्याला मुले व्हावीत म्हणून, जे देवभोळेपणाचे नवस करीत असतात, त्यामुळे किंवा तरुण आणि धर्मभोळ्या बायकांच्या धर्मवेडामुळे ही चाल बहुतकरून अस्तित्वात आली असावी.”
या दुष्ट चालीची आकडेवारीही त्यांनी जमा केली, त्यानुसार ते लिहितात, “खंडोबा, जोतिबा, अंबाबाई, रवळनाथ, भूतनाथ, महाबळेश्वर, धारेश्वर, गुट्टेम्मा, यल्लम्मा, दुर्गवा, मारुती या देवतांना मुली वाहिल्या जातात. त्यांना मुरळी, जोगीण, भावीण, नायकीण, कलावंतीण, बसवी, देवदासी, देवळी, जोगती, मातंगी, शरणी अशी नावे आहेत.”
“देवाला मुलगे सुद्धा वाहतात. खंडोबाचा वाघ्या, अंबाबाईचा आराध्या, ध्यामवाचा पोतराज, आणि यल्लम्माचा जोग्या! या सर्वांना लग्न करून इतरांप्रमाणे, घरगुती पेशाने राहण्याची सत मनाई असल्याने त्यांचे जीवित कमी अधिक प्रमाणाने बदफैली असते, यात नवल काय? मात्र, बायकांइतकी त्यांची संख्या मोठी नसते!”
“या सामाजिक सुधारणेच्या बाबतीत राजसत्ता आणि धर्म संघ या दोन्ही शती पंगू झाले आहेत. याबाबत दोन प्रकारचे उपाय केले पाहिजेत, एक प्रतिबंधक व दुसरा उपशामक, पहिल्या संबंधाने इंडियन पीनल कोडचे ३७२ व ३७३ कलमे करून सरकारने आपले कर्तव्य बजावले आहे. त्या कायद्यांची सतीने अंमलबजावणी केली पाहिजे.” म्हणजे या प्रश्नाकडे ते शास्त्रीय दृष्टिकोनातून पहात होते!
गुन्हेगार मानलेल्या जाती
‘गुन्हेगार जातींची सुधारणा’ या विषयावर व्याख्यान देताना महर्षी शिंदे म्हणतात, “मुंबई इलाख्यात भिल्ल, गुजराती, कोळी, भीयाने, महादेव कोळी, वंजारी, कातकरी मांगर, लमाण, हरण शिकारी, छप्परबंद, कैकाडी, रामोशी, मांग त्याचप्रमाणे स्त्री जातींपैकी, मुरळ्या, भाविणी, जोगतिणी, कुन्टिंणी, कसबिणी, कोल्हाटणी याप्रमाणे एकंदर जवळजवळ ३० लाख लोक गुन्हेगार जातीचे आहेत. या सामाजिक प्रश्नावर पोलीस आणि कोर्ट हा उपाय नसून, पाश्चात्त्यांनी विचार करून ठरवलेला उपाय म्हणजे, त्यांना पोटभर खायला द्या, योग्य प्रकारचे शिक्षण द्या आणि उद्योग धंद्याला लावा! त्यांना लहान भावंडे समजून ममताळूपणाने वागवा!”, असे आग्रहाने प्रतिपादन केले आहे.
याही प्रश्नाकडे ते मानवतावादी आधुनिक दृष्टिकोनातून पाहतात.
शेतकर्यांसाठी चळवळ
महर्षी शिंदे यांनी शेतकर्यांसाठी चळवळ चालवली. शेतकर्याचे वर्णन त्यांनी ‘बंदिस्त बळीराजा’ असे केले आहे. शेतकरी आणि भांडवलदारांचं आजचं नातं त्यांनी मांडलं आहे. “भांडवलदार शेतकर्यांच्या छातीवर बसलेला कायमचा दावेदार, शेतकरी व कामगार हे खरे राष्ट्राचे धारक व चालक! वास्तविक, भांडवलदाराने शेतकर्यांच्या आणि कामगारांच्या मांडीखालील तट्टासारखे चालले पाहिजे. कारण ह्या तट्टाची चंदी शेतकरी कामगारांच्या हातात असते. पण घडते उलटे. तट्टाच्या हातातच मालकाचा लगाम! तट्टू जिकडे जाईल तिकडे ससेहोलपट शेतकरी कामगारांची!”
ग्रंथ लेखन
महर्षी शिंदे यांनी आपले विचार समाजापर्यंत नेण्यासाठी विपुल लेखन केले आहे. बहिष्कृत भारत, अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास, ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग हे त्यांचे प्रमुख संशोधनपर लेख आहेत. अस्पृश्यतेसंबंधी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून लिहिलेला त्यांचा ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा प्रबंध १९३३ साली प्रसिद्ध झाला. हा भारतातील या विषयावरचा पहिला प्रबंध आहे.
धर्मासंबंधी त्यांचे लेख व व्याख्याने प्रसिद्ध आहेत.
प्रा. गो. मा. पवार यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्मय एकत्रित करून शासनाच्या वतीने प्रसिद्ध केलेले आहे.
डिप्रेस्ड् क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया
विठ्ठल रामजी शिंदे यांनी १६ ऑक्टोबर १९०६ रोजी डिप्रेस्ड् क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया संस्थेची स्थापना केली.
भारतीय समाजाला कलंकभूत असणारी सामाजिक पातळीवरची अस्पृश्यतेची रूढी नष्ट करण्याच्या आणि अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्याच्या कार्याचा एक भाग म्हणून महर्षि शिंदे यांनी या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मुंबई येथे चार शाळा आणि उद्योगशाळा सुरू केल्या. अस्पृश्यवर्गीय स्त्रियांसाठी निराश्रित सेवा सदनाची स्थापना केली. या वर्गातील लोकांसाठी दवाखाना उघडला. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे चालविली. मुंबई बाहेर, भावनगर, नागपूर, अकोला, इंदूर, मनमाड, पुणे, इगतपुरी, हुबळी, धारवाड, मद्रास, मंगळूर इत्यादी ठिकाणी पश्चिम आणि दक्षिण हिंदुस्थानात मिशनच्या बारा शाखा उघडल्या. पुण्यात मिशनच्या व्यापक प्रमाणात परिषदा भरवल्या आणि १९१८ साली मुंबई येथे भव्य प्रमाणात अस्पृश्यता निवारक परिषद भरवली.
अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न राष्ट्रीय सभेने हाती घ्यावा, यासाठी त्यांनी सात-आठ वर्षे सातत्याने प्रयत्न केला. अखेरीस १९१७ च्या कलकत्त्याच्या अधिवेशनात डॉ. अॅनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव मंजूर होऊन अस्पृश्यता निवारण हा राष्ट्रीय सभेच्या कार्याचा एक भाग झाला.
अस्पृश्यतेसंबंधित ते म्हणतात, “अस्पृश्यता ही एक स्वतंत्र मानवी संस्था आहे. हिचा उदय मानवी जातीच्या अगदी प्राथमिक कालात झाला असला पाहिजे. प्रथम अस्पृश्यता ही वैयतिक व प्रासंगिक किंवा नैमित्तिक होती. बाळंतीण आणि तिची खोली, मृतांची जागा व आप्त, विशिष्ट रोगी, झपाटलेली माणसे, विक्षिप्त झाडे, खुनासारख्या अपघाताची ठिकाणे वगैरे बाबी अस्पृश्य आणि वर्जनीय ठरल्या.”
अस्पृश्यतेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी त्यांनी सखोल आणि चिकित्सक अभ्यास केला. अस्पृश्यतेच्या उदयासंबंधी ते म्हणतात, “वेदपूर्वकालीन भारतीय इतिहासाचे पुरावे लेखी मिळणे तूर्त तरी असंभवनीय आहे. वैदिक वाङ्मयात संहिता, ब्राह्मणे, अरण्यके, उपनिषदे, सूत्रे इतक्यांचा समावेश होतो. त्यांच्या काळाला प्राचीन काळ म्हणतात. त्यानंतर गौतम बुद्धाचा उदय म्हणजे ऐतिहासिक काळ चालू झाला. या काळात चार वर्णांचा हळूहळू लोप होऊन हल्ली दृढ झालेल्या जाती, पोटजाती यांची आर्थिक पायावर झपाट्याने उभारणी चालली होती. आणि या उभारणीत अतिशूद्रांना कोणत्याही वृत्तीचा अधिकार अथवा धंद्याची मान्यता दिली गेली नव्हती. अस्पृश्य जाती ग्राम-बाह्य ठरवून त्या वंशपरंपरागत नीच आणि अनाचरणी ठरल्या होत्या. म्हणूनच या सर्व अन्यायाला विरोध करण्यासाठी गौतमाचा शुद्ध बुद्धिवाद उदय पावला.”
अस्पृश्य जातींचा सवर्णांशी संबंध सांगताना त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत; “काठेवाडाकडील भंग्यांचे सहा पोटभाग आहेत. त्या सर्वांची नावे पुढीलप्रमाणे अस्सल राजपुतांची आहेत. १) मकवान, २) परमार किंवा पवार, ३) राठोड, ४) सोळंकी, ५) वाघेला व ६) डोरी.
महाराष्ट्रातील महारामध्येही मराठ्यांच्या अस्सल ९६ कुळांपैकी बर्याच कुळांची नावे आढळतात. ती जाधव, साळुंखे, (चालुक्य), पवार, मोरे म्हणजे मौर्य, गायकवाड, शेलार, साळवी, सुरवसे म्हणजे सूर्यवंशी इत्यादी.
देवक, कुलदैवत आणि उपासना दैवते यामधील साम्य त्यांनी नोंदवले आहे. यावरून महार हे मराठ्यांचे चुलतभाऊ आहेत असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. गावातील जमिनीच्या तंट्यामध्ये महाराची साक्ष महत्त्वाची मानली जाते. यावरून महार हे मूळचे असावेत, त्यांना जिंकून मराठ्यांनी जमिनीचा ताबा घेतला असावा, असा निष्कर्षही महर्षी शिंदे यांनी काढला आहे.
महार आणि मांग यांच्यामध्ये शत्रुत्व दिसून येते याचे कारण महारांनी मांगांना जिंकले असावे, असे ते सांगतात. वर्चस्ववादातून एके काळी राज्यकर्ते असलेल्या समाजाला युद्धात जिंकून अस्पृश्य केले असावे, असाही सिद्धांत त्यांनी मांडला आहे.
सर्व चिकित्सांची सुरुवात धर्मचिकित्सेपासून होते असे मार्क्स म्हणतो. महर्षी शिंदे यांनी धर्माची चिकित्सा केल्यानंतर समाजातील विविध समस्यांची उत्तरे चिकित्सक पद्धतीने शोधायचा प्रयत्न केला आहे. आजही त्यांचे विचार समाजाला मार्गदर्शक आहेत.

- अनिल चव्हाण, कोल्हापूर (लेखक अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक आहेत.) मो. ९७६१४ ७४८३
