प्रभाकर नानावटी -
खरेखुरे भक्त आपल्या गुरुसाठी मरणसुद्धा पत्करण्यास तयार होतात, याबद्दल शंका नसावी. विशेष करून हा गुरु जर एखाद्या कल्टचा संस्थापक असल्यास व या शिष्यगणांच्या आयुष्यात फार मोठा बदल घडवून देण्याची भाषा करत असल्यास हे शिष्य मागचा पुढचा विचार न करता काहीही करायला तयार होतात. मग हा गुरु त्यांना परमेश्वर, मार्गदर्शी व त्यांच्या आयुष्याला आकार देणारा ठरतो. अशाच एका भन्नाट गुरुबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्याचे नाव आहे परमहंस नित्यानंद.
बहुतेकांनी यू ट्यूबवर त्याच्या मर्कटचेष्टा नकीच बघितल्या असतील, प्रत्येक शब्दावर जोर देत त्याचे तमिळियन-इंग्रजीतील भन्नाट दावे ऐकले असतील. (व जोकर म्हणून त्याची चेष्टाही केली असेल.) परंतु यू ट्यूबच्या खालील त्याच्या फॉलोअर्सची संख्या (२८ लाख) वाचल्यास त्याची लोकप्रियता किती जबरदस्त आहे, याची कल्पना येईल.
(परमशिवं, स्वामी) परमहंस नित्यानंद यांनी, त्याच्या वयाच्या २० व्या वर्षी, तमिळनाडूमध्ये २००० साली आपल्या पहिल्या आश्रमाची स्थापना केली. त्याच्या टीव्हीवरील शोमध्ये हवेत तरंगणे, मुठीतून हार काढणे इत्यादी चित्रविचित्र चमत्कारांच्या प्रयोगामुळे व त्याच्या तथाकथित ‘वतृत्व’ शैलीमुळे त्याला (दक्षिण) भारतात व परदेशात भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्याचे साम्राज्य पसरू लागले. २००९ पर्यंत विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे गुरुकुल, आश्रम व इतर काही प्रकारच्या संस्था यांचे जाळे भारतातच नव्हे तर युरोप, अमेरिकेसारख्या परदेशातसुद्धा पसरले.
परंतु २००० साली त्याच्या काही ‘सत्कृत्यां’चे भांडाफोड होऊ लागले. त्याच्यावर अनेक प्रकारचे आरोप होऊ लागले. त्याच्या महिला शिष्यांबरोबरचे लैंगिक व्यवहाराचे चित्रीकरण केलेले एक-दोन व्हिडिओ टेप प्रसिद्धी माध्यमात प्रसारित झाले. सेक्स सीडी समोर आल्यानंतर नित्यानंद याला अटक करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच त्याला जामीन देखील मिळाला. अमेरिकेतील एका महिला शिष्येने तिच्यावर या स्वामीने अनेक वेळा बलात्कार केल्याचे आरोप केले. कर्नाटकातील एका आश्रमामध्ये पोलिसांच्या धाडीत मोठ्या प्रमाणात गर्भ निरोधकांचे साठे व काही अवैध संमतीपत्रे सापडली. या अवैध संमतीपत्रातील मजकूर वाचकांना धक्का देणारा होता. विशेष करून त्यातील ‘मास्टर्स कार्यक्रमामधून शिक्षण’ हे कलम तर वाचणार्यांची मती गुंग करणारी होती.
आध्यात्मिक उन्नतीसाठी लैंगिकतेचा आधार घेणे हे काही पहिल्यांदाच घडत नव्हते. अत्यंत पुरातन काळापासून तांत्रिक विद्येच्या पुरस्कर्त्यांचा भर लैंगिकतेवर होता. १९६०-८० च्या दशकात भगवान रजनीश (ओशो) याने तर जाहीरपणे आध्यात्मिकतेला लैंगिक व्यवहारांची जोड दिली होती. ‘संभोगातून समाधीकडे’ हा त्याचा मंत्र होता. रजनीश हा कुठल्याही धर्माचा वा आध्यात्मिक तत्वप्रणालीचा पुरस्कर्ता नव्हता. तो फक्त प्रस्थापित समजुतींना धका देणारा भगवान होता. परंतु नित्यानंदाच्या संस्थेने विद्यार्थ्यांच्या लैंगिकतेसकट इतर आध्यात्मिक शिक्षणासाठी वसतिगृहांची सोय केली होती. तो कायम ब्रह्मचर्याविषयी बोलत होता. परंतु त्याच्यावरील लैंगिक दुर्व्यवहाराच्या आरोपामुळे अनेक पालकांना धका बसला. अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना परत बोलाविले.
परंतु आश्रम वा गुरुकुल सोडून गेलेल्या निवासींना परत बोलवणे इतके सुलभ नव्हते. २०१२ मधील अजून एका बलात्काराच्या प्रकरणात भारतातील त्याच्या एका महिला शिष्येनेच त्याच्यावर तिच्या मुलींना पळवून नेल्याचा आरोप केला होता. परंतु या २० वर्षे वयाच्या दोन (सज्ञान) मुलींनी उलट त्यांचे पालकच नित्यानंदापासून त्यांना दूर ठेवत आहेत असे पत्र पोलिसांना दिले. यावरून गुरुवरील अढळ श्रद्धा कुठल्या थरापर्यंत जाऊ शकते, हे कळू शकते.
नित्यानंदाच्या संस्थेतून आपल्या पाल्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक पालकांना कोर्ट-कचेर्या कराव्या लागल्या. काहींना त्यात यश आले. काहींना मात्र आपल्या पाल्यांकडूनच विरोध झाला.
२००० ते २००४ पर्यंत हा गुरु भारतातून गायब झाला. फेब्रुवारी २००४ मध्ये त्याने एका बेटावर ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’ या नावाच्या स्वतंत्र देशाची स्थापना केल्याची बातमी येऊन धडकली. गुजरातमधील एका मुलीच्या वडिलांनी गुजरात उच्च न्यायालयात मुलीला त्याच्या देशातील आश्रमातून परत आणण्यासाठी खटला दाखल केला. न्यायालयाच्या खंडपीठाने याविषयी काही कृती करण्यास असमर्थता दर्शविली. कोर्टाच्या निरीक्षणानुसार, या महिला त्याच्या आश्रमात राहून अध्यात्माच्या मार्गाचा शोध घेत होत्या.
अमेरिकेतील सारा स्टेफ्नी लँड्री नावाच्या नित्यानंदाच्या शिष्येने त्याचे आश्रम सोडल्यानंतरच्या एका वर्षानंतर एक व्हिडिओ प्रसारित केला. तिच्या मते, कल्ट हा फार धोकादायक असतो. नित्यानंदमध्ये नार्सिस्टिक सोशियोपाथची सर्व लक्षणे आढळतात. परंतु आश्रमवासी त्याचा प्रत्येक शब्द न शब्द झेलतात. त्यांच्या दृष्टीने तेच अंतिम सत्य असते. त्याच्या पलीकडे काहीही नाही असेच त्यांना वाटत असते. त्यांनी माझे एका प्रकारे ब्रेनवॉशिंगच केले. ती सांगत होती.
नित्यानंदाचे निष्ठावान भक्त मात्र ही महिला गुरुविषयी विष पेरण्याचे दुष्कृत्य करत आहे, असे आरोप करत होते.
वाल्डेन विद्यापीठाच्या एका शोधनिबंधानुसार. कल्ट माणसातील स्वतंत्र प्रज्ञा व कौटुंबिक जिव्हाळ्यालाच उखडून काढते. कल्टच्या संस्थापकाने स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी आखलेल्या डावपेचामुळे त्याच्या भक्तांचे भावनिक व शारीरिक शोषण होत असते.
१९८१ मध्ये रजनीशच्या भक्तांनी अमेरिकेतील ओरेगान प्रांतात रजनीशपुरम नावाचे शहर वसविले होते. त्याचे तथाकथित मूलगामी, क्रांतिकारक आणि निंदनीय विचारच त्याच्या कल्टच्या अशा प्रकारचे आचरट कृत्य व त्याच्या प्रचंड लोकप्रियतेच्या मागचे राक्षसी बळ होते.
६०-७० च्या दशकात पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील व ८० च्या दशकात अमेरिकेच्या ओरेगान येथील भगवान रजनीश याच्या कम्यून टाईप रजनीशपुरम आश्रमामध्ये सेक्स व संभोगाच्या (विविध) प्रकारांमधून आध्यात्मिक समाधान मिळवण्यासाठी भगवे कपडे व गळ्यात रजनीशचा ताईत असलेल्या माळा घातलेल्या मित्र-मैत्रिणींनी (व त्याच्या पाल्यांनी) गर्दी केली व छानपैकी संसारच तेथे थाटला. हे आश्रम म्हणजे, एक स्वतंत्र जगच होते. आश्रमात काय चालते याची कुणालाच कल्पना येत नव्हती. ८५ च्या सुमारास येथील व्यसनाधीनता व सेक्सच्या भानगडी चव्हाट्यावर आल्या. तरीसुद्धा रजनीशचा प्रभाव त्याच्या मृत्यूपर्यंत (१९९०) तसूभरही कमी झाला नाही. त्याला अटक करण्यापूर्वीच तो भारताबाहेर फरार झाला. तेव्हासुद्धा अमेरिका, जर्मनी व भारतातील शिष्यांना त्यात त्याचे काहीतरी चुकत आहे, असे कधीच वाटले नाही. उलट अटकेच्या विरोधात त्या शिष्यांनी जाहीर निदर्शनेही केली.
अलीकडेच फेसबुकवरची ओशोबद्दलची ही कमेंट भरपूर काही सांगून जाते. ओशो हा ड्रग विकणारा, सेक्स एजंट म्हणून काम करणारा (थोडक्यात दलाली करणारा), नशेबाजी करणारा आणि नशेबाजीचा प्रचार करणारा, अध्यात्माचा बुरखा पांघरलेला आधुनिक, इंग्रजी बोलणारा आसाराम बापूच आहे. फक्त त्याचा आश्रम एक्सक्लूझिव्ह होता. त्यामुळे तो एक कल्ट झालाय आणि आश्रमात जायला न मिळणार्या कोल्ह्यांना त्याचा अध्यात्म द्राक्षे म्हणून आवडतो.
कल्टमध्ये तर्क शोधणे अत्यंत कठीण काम ठरेल. भतांनी ठरवलेली ती एक जादुई नगरी असते. त्यात विवेकी विचारांना कुठेही स्थान नाही. गुरुकेंद्रित हे जग श्रद्धेने घट्ट विणलेले, पूर्णपणे सुरक्षित असलेले आहे. याची भिंत फक्त आतलेच भक्तगण फोडू शकतात, इतर बाहेरचे कुणीही त्याला धका लावू शकत नाही. आश्रमातून बाहेर पडणारे जागलेच आतल्या भानगडींचा पाढा वाचू शकतात.
‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’
सध्या नित्यानंद याने स्वतःचा देश तयार केल्याचा दावा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांची सभा आहे. त्यामध्ये विजयप्रिया नित्यानंद नावाच्या महिलेनेही या बैठकीत आपले म्हणणे मांडले.
विजयप्रिया नित्यानंद स्वतःला ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’चे प्रतिनिधी म्हणून वर्णन करते. तिचा दावा आहे की, ती युनायटेड नेशन्समधील कैलासाची युनायटेड स्टेट्सची कायमस्वरूपी राजदूत आहे.
विजयप्रिया नित्यानंद ही संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाली की, युनायटेड ‘स्टेट्स ऑफ कैलासा’ हा हिंदूंचा पहिला सार्वभौम देश आहे, ज्याची स्थापना नित्यानंदांनी केली आहे. विजयप्रिया हिने नित्यानंद यांचे हिंदूंचे ‘सर्वोच्च गुरु’ म्हणून वर्णन केले आणि त्यांचा ‘छळ’ होत असल्याचा आरोप केला.
नित्यानंद याने स्वतः घोषित केलेल्या कैलास देशाबद्दल अनेक दावे केले आहेत. ते दावे ऐकून तुम्हालाही धका बसेल.
दावा १ : भारतातून पळून गेल्यानंतर, नित्यानंदाने दक्षिण अमेरिकेतील इवेडोरमध्ये जमीन खरेदी केली आणि तो आपला देश म्हणून घोषित केला. त्याला ‘कैलासा’ असे नाव देण्यात आले. भारतापासून त्याचे अंतर सुमारे १७ हजार किलोमीटर आहे.
दावा २ : कैलासाच्या वेबसाइटचा दावा आहे की, कैलासा चळवळ अमेरिकेत सुरू झाली. त्याची स्थापना नित्यानंद यांनी केली होती. संयुक्त राष्ट्रांमध्ये हा हिंदूंचा एकमेव आणि पहिला सार्वभौम देश आहे, असा दावा विजयप्रिया नित्यानंद यांनी केला आहे.
दावा ३ : लोकसंख्येबाबत, कैलासाच्या वेबसाईटवर असा दावा करण्यात आला आहे की, हिंदू धर्म मानणारे २०० कोटी लोक त्यांच्या देशाचे नागरिक आहेत. त्यापैकी १ कोटी आदि शंकराला मानणारे आहेत. विजयप्रिया नित्यानंद यांनी संयुक्त राष्ट्रात दावा केला की, कैलासामध्ये २० लाख स्थलांतरित हिंदू राहतात.
दावा ४ : अलीकडे कैलासाने अमेरिकेसोबत द्विपक्षीय करार झाल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने कैलासाला मान्यता दिल्याचा दावाही केला जात आहे. विजयप्रिया नित्यानंद यांनी दावा केला होता की, कैलासाने १५० देशांमध्ये दूतावास आणि एनजीओ स्थापन केल्या आहेत.
दावा ५ : कैलासा देखील स्वतःचे संविधान असल्याचा दावा करतो. येथे धर्मग्रंथ आणि मनुस्मृतीवर आधारित कायदा चालतो, असा दावा केला जातो. येथील लोक मनूचे नियम पाळतात. कैलासाचे सरकार हे सर्वांत महत्वाचे आणि अधिकृत धर्मशास्त्र (हिंदू कायद्याचे पुस्तक) मानते. वेबसाईटनुसार, प्राचीन भारतात या पुस्तकाच्या माध्यमातून केवळ दीड हजार वर्षांपूर्वी नियमांचे पालन केले जात होते.
दावा ६ : कैलासाच्या वेबसाईटचा दावा आहे की, या देशात अत्याचारित हिंदूंना संरक्षण दिले जाते. येथे राहणारे हिंदू जात, लिंग असा कोणताही भेद न करता शांततेने राहतात.
दावा ७ : वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, कैलासामध्ये इंग्रजी, संस्कृत आणि तमिळ भाषा बोलल्या जातात. देशाचा राष्ट्रीय प्राणी ‘नंदी’ आहे. देशाचे राष्ट्रीय फूल ‘कमळ’ आणि राष्ट्रीय वृक्ष ‘वट’ आहे.
दावा ८ : कैलासाने स्वतःची रिझर्व्ह बँक असल्याचा दावाही केला आहे. त्याचे स्वतःचे चलन देखील आहे. रिझर्व्ह बँक आणि चलन ऑगस्ट २०२० मध्ये लाँच करण्यात आले.
अनेकवेळा या जागल्यांना गुरुंच्या भतांच्या रोषाचा सामना करावा लागतो. हे भक्त नेहमीच हिंसक मार्ग वापरतात. आसारामबापूवर बलात्काराचा आरोप झाला, तरीही या गुरुचे समर्थन करणार्यांची संख्या कमी नव्हती.
ही एक जाणून बुजून केलेली सज्ञानात्मक विसंगती असते. कल्टचे सदस्य आपले काही तरी चुकते यावर विश्वास ठेवायलाच तयार नसतात व प्रत्येक वेळी आपल्या कृतीच्या व उतीच्या समर्थनार्थ श्रद्धेलाच विवेक म्हणण्यापर्यंत त्यांची मजल जाते.
तुम्ही कितीही पर्दाफाश करा, भांडाफोड करा, कितीही घोटाळे जाहीर करा, गुरुंच्या आयुष्यात त्याचा काहीही परिणाम होत नाही. जेव्हा पुट्टपर्थीचा सत्य साईबाबा हवेत हात फिरवून संदेश (बंगाली मिठाईचा एक जिन्नस) बाहेर काढून स्वतःच्या अतिंद्रिय शक्तीचे प्रदर्शन करून दाखवतो तेव्हा जादूगार पी. सी. सरकार यांनी त्याच्या समोरच हात फिरवून रसगुल्ला बाहेर काढून दाखवतो. बाबा चिडून त्याला बाहेर हाकलतो. सरकारच्या मते, सत्य साईबाबाकडे कुठलीही दैवी शती नसून ती फक्त (जादूगारासारखी) हातचलाखी आहे व त्यात विशेष काहीही नाही.
ओशो हा ड्रग विकणारा, सेक्स एजंट म्हणून काम करणारा (थोडक्यात दलाली करणारा), नशेबाजी करणारा आणि नशेबाजीचा प्रचार करणारा, अध्यात्माचा बुरखा पांघरलेला आधुनिक, इंग्रजी बोलणारा आसारामबापूच आहे.
फक्त त्याचा आश्रम एक्स्लूझिव्ह होता. त्यामुळे तो एक कल्ट झालाय आणि आश्रमात जायला न मिळणार्या कोल्ह्यांना त्याचा अध्यात्म ‘द्राक्षे’ म्हणून आवडतो.
ड्रग विकणारा, सेक्स एजंट, दलाल ही विशेषणं आक्रमक अन् अपमानजनक वाटतात एवढंच.
पण ओशोने या गोष्टी त्याच्या तत्त्वज्ञानात नॉर्मलाईज करून ठेवल्यात, हे मात्र खरं आहे. याची एक सकारात्मक बाजू देखील आहे. पारंपरिक धर्मांनी नैतिक अनैतिकतेच्या नियमांआडून मानवी आनंदाचे केलेले दमन झुगारून देऊन आयुष्यातल्या सुंदर सुखद गोष्टींचा आस्वाद घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आणि स्वातंत्र्य आहे ह्याची त्याने लोकांना प्रकर्षाने जाणीव करून दिली. रूढीवादी अध्यात्माने बांधून दिलेल्या जोखडातून स्वतःची सोडवणूक करून घेण्यासाठी प्रोत्साहन अन् उपाय ओशोने दिलेत.
पर्सनली माझ्या टोकाच्या आस्तिकता ते नास्तिकता दरम्यानच्या transition मध्ये मला ओशोची मदत झाली, त्याबद्दल माझ्या मनात त्याच्याबद्दल कृतज्ञता आहे. सेक्स एजंट म्हणणे अति होईल, पण लैंगिकतेकडे टॅबू म्हणून पाहणेही चुकीचे होते ते ओशोने दूर केले. फ्री सेक्स किंवा स्वैर सेक्स असं काही असतं मला वाटत नाही. आत्मसन्मान शाबूत असलेल्या व्यक्तीला कितीही फ्री सेक्स उपलब्ध करून दिला तरीही तो अधाशासारखा सेक्स करत सुटत नाही. सेक्ससाठीही प्रत्येकाचे काही स्टँडर्डस् सेट असतात.
मी ओशो फार काळ ऐकला नाही. तशी गरजही वाटली नाही. आता कुणाशीही बांधलं जायचं नाही, हे आधीच कळलं होतं. मी ओशोवाला झालो नाही. ओशोही तोच गेम खेळला जो त्याच्या आधीच्यांनी खेळला होता. तोच गूढवाद, तेच मुती नावाचं फसवं गंतव्य, तीच वाटचाल, तीच एक गॉडफिगर अन तसेच अनुयायी. ओशोने फक्त त्यात सोफिस्टिकेशन अॅड केलं.
असे असूनही ओशोबद्दल मला फारशा तक्रारी नाहीत. कदाचित, मी ज्यातून बाहेर पडलो होतो ते अत्यंत जाचक असेल अन् त्या तुलनेत मला ओशो मुक्तिदाता वाटला असेल असेही असू शकते…. – नित्यानंद
नोव्हेंबर १९९२ मध्ये सत्य साईबाबा यांनी प्रधान मंत्री पी. व्ही. नरसिंहराव यांना आशीर्वाद देण्यासाठी हातवारे करत सोन्याची चेन काढून दिली. दुसर्या दिवशीच्या पेपरमध्ये फोटोसकट ही बातमी छापली गेली. त्यात हा बाबा त्याच्या शिष्याकडून ही सोन्याची चेन कशी हस्तांतरित करण्यात आली होती याचेही वर्णन केले होते. नेमका तोच प्रकार दूरदर्शनच्या कॅमेर्याने पकडून प्रसारित केल्यामुळे जगाला त्याची हातचलाखी कळाली व त्याच्या दैवी चमत्काराचा भांडाफोड होऊ शकला.
परंतु या (व इतर कुठल्याही बाबा-बुवावांच्या) पर्दाफाशाचा त्याच्या भक्तगणांवर काहीही परिणाम होत नाही, हा अनुभव आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपांनासुद्धा केराची टोपली दाखविण्यात आली. २०११ साली त्याच्या मृत्यूपर्यंत हे आरोप करण्यात आले व काहीही फरक पडला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
या गुरुंच्या दैनंदिन सत्संगांना तर मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. रस्ते अडविले जातात. कदाचित, या गर्दीला हा गुरु आपल्याला आध्यात्मिक दैवी शक्ती मिळवून देईल व त्यातून आपल्या दैनंदिन संकटापासून मुत होऊ अशी एक भावना त्यामागे असावी. ब्रह्मकुमारीच्या प्रवचनात सकारात्मक व नकारात्मक भावना प्रत्येकाच्या भोवती असून त्या तुमच्या जीवनावर प्रभाव टाकतात असे काही तरी सांगितले जाते. सद्गुरु जग्गी वासुदेवसुद्धा असेच काही तरी बडबड करत असतो.
सुटा-बुटातील वा जीन्स कपडे घालून मिरवत तरुणांना आकर्षित करणारा हा सद्गुरू तर आणखी एक पाऊल टाकून जीवनाचे रहस्य सांगण्याचा आव आणतो. पाण्याची आण्विक रचना रासायनिकरित्या न बदलता केवळ बघितल्याने वा हस्तस्पर्शाने बदलता येते, याचे ठोस पुरावे आहेत. मी माझ्या हातात पाण्याचा पेला घेतला आणि तो एका विशिष्ट प्रकारे बघितला आणि तुम्हाला दिला तरी तुमचे कल्याण होईल. या त्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणारेही लाखोंनी आहेत.
तुमच्या आयुष्यात गुरु हाच निर्विवाद मध्यबिंदू असल्यास बाबा वाक्यम प्रमाणम याबद्दल शंका घेणे कधीच शक्य होणार नाही.
वयाच्या २० व्या वर्षीच प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला व टीव्ही-यू ट्यूबसारख्या प्रसारमाध्यमावर कायम वावरणारा मध्य प्रदेश येथील बागेश्वर धाम येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी जाहीरपणे तथाकथित दैवी चमत्कारांचे सादरीकरण करून शिष्यांवर भुरळ पाडत होता. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याच्या भक्तांनी नागपूर येथे जाहीररित्या दुसर्यांच्या मनातले ओळखणे व हस्तस्पर्शाने रोगोपचार यांसारखे चमत्कार बाबा करणार आहेत, अशी समाजमाध्यमातून प्रसिद्धी दिली. या त्याच्या कार्यक्रमाला तेथील स्थानिक विवेकवाद्यांनी आव्हान दिले व चमत्कार सिद्ध झाल्यास ३० लाख रुपये देऊ, अशी घोषणा केली. परंतु हा बाबा आव्हान न स्वीकारता चक पळून गेला. परंतु त्याचे सत्संग प्रवचन आजही थांबलेले नाहीत व भक्तांची संख्याही कमी झालेली नाही.
कल्टगुरुच्या जितक्या जवळ जाल तेवढे त्याच्या मगरमिठीत फसविले जाल. एका संगणक क्षेत्रात काम करणारा सांगत होता. त्याची पत्नी ब्रह्मकुमारीच्या कल्ट मध्ये फसली असून तिला त्यातून बाहेर काढणे जवळ जवळ अशक्यातली गोष्ट ठरत आहे.
ब्रह्मकुमारीच्या भक्तांनी तिचे ब्रेन वॉश केले आहे व त्यामुळे ती पूर्णपणे बदलली आहे. त्या भक्तांमधून तिला बाहेर काढणे शक्य होत नाही. गुरु हाच आता तिचा सर्वस्व झाला आहे. एखाद्यातील नैराश्य व अनिश्चितता याचेच भांडवल करून हे कल्टगुरु व त्यांच्या संस्था डोईजड होत असावेत. तो सांगत होता.
हाथरस येथील चेगराचेंगरीतील अनेकांचे मृत्यूसुद्धा या कल्ट प्रकारांना अधोरेखित करतात. हाथरसच्या भोलेबाबाच्या पायाखालची धूळच नव्हे, तर त्याच्या कारच्या टायरखालील धूळसुद्धा डोके टेकवण्यास पुरेसे ठरल्यामुळे अनेकांचे जीव गेले व बाबा मात्र पूर्णपणे निर्दोष सुटला.
(संदर्भ – आऊटलूक)
