राहुल थोरात -
तनोट माता मंदिर राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यामध्ये, भारत-पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ (लोंगोवाला युद्धभूमीजवळ) स्थित आहे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, पाकिस्तानी सैन्याने तनोट गावावर आणि मंदिराच्या आसपास जोरदार बॉम्बहल्ला केला होता. पाकिस्तानी सैनिकांनी जवळपास ३,००० बाँब या भागात फेकले होते, त्यापैकी सुमारे ४५० बाँब मंदिराच्या परिसरात किंवा अगदी जवळ पडले होते. यातील एकही बाँब मंदिराला किंवा मंदिराच्या आत असलेल्या कोणत्याही व्यतीला इजा न पोहोचवता फुटला नाही. बाँब जसेच्या तसे निष्क्रिय होऊन पडले.
मंदिर परिसरात बाँब न फुटण्याच्या या चमत्कारांमुळे लोकांची तनोट मातेवरची श्रद्धा अधिक वाढली. १९६५ च्या युद्धानंतर, भारतीय सीमा सुरक्षा दलाने (इडऋ) मंदिराची व्यवस्था, पूजा आणि देखभाल करण्याची जबाबदारी घेतली आणि आजही तेच करत आहेत. १९७१ च्या लोंगोवालाच्या लढाईतील भारताच्या विजयाच्या स्मरणार्थ मंदिराच्या आवारात ‘विजय स्तंभ’ मंदिराच्या आवारात उभारण्यात आला आहे.
तनोटमाता मंदिरात आजही १९६५ आणि १९७१ च्या युद्धात निष्क्रिय झालेले पाकिस्तानी बाँब प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत, जे या चमत्काराचा पुरावा म्हणून पाहिले जातात. आम्ही ते बाँब पाहिले. त्याचे फोटोही काढले. लेखासोबत ते देत आहे.
तनोट माता मंदिराजवळ बाँब न फुटण्याच्या घटनेला वैज्ञानिक किंवा लष्करी दृष्टिकोनातून ठोस, सिद्ध झालेले स्पष्टीकरण उपलब्ध नाही. ही घटना आजही ‘चमत्कार’ किंवा ‘दैवी शती’ म्हणूनच पाहिली जाते. पण या घटनेबद्दल अनेक तर्कवितर्क दिले जातात, पण यापैकी कशाचीही अधिकृत लष्करी पुष्टी झालेली नाही.
१. बाँब निकामी असणे : काही तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानने वापरलेले बाँब (विशेषतः जुन्या बॅचचे) निकृष्ट दर्जाचे किंवा उत्पादन दोष असलेले असू शकतात, ज्यामुळे ते जमिनीवर आदळल्यानंतर त्यांचा फ्यूज सक्रिय झाला नसावा आणि बाँब फुटले नसावेत. मात्र, दोन वेगवेगळ्या युद्धांत, इतक्या मोठ्या प्रमाणात बाँब सतत निकामी होणे, ही शक्यता फार कमी मानली जाते.
२. वाळूचा परिणाम : जैसलमेरचा हा भाग अतिशय बारीक वाळूचा आहे. काही वेळा, बाँब जेव्हा मऊ वाळूमध्ये आदळतात, तेव्हा त्यांना स्फोट होण्यासाठी लागणारा आवश्यक ‘धका’ मिळत नाही. बाँब वाळूत खोलवर रुतल्यामुळे ते निष्क्रिय होऊ शकतात.
आपले भारतीय सैन्यदल हे एका धर्मनिरपेक्ष देशाचे प्रतिनिधित्व करते आणि ते पूर्णपणे वैज्ञानिक रणनीती, प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. कोणतीही लढाई केवळ चमत्काराने जिंकली जात नाही, ती जवानांच्या शौर्याने आणि नियोजनाने जिंकली जाते. त्यामुळे अशा चमत्काराची पाठराखण भारतीय सैन्यांनी करणे हे खेदजनक आहे.
– राहुल थोरात, रमेश माने
