डॉ. प्रसन्न दाभोलकर -
या बुधवारच्या तासाआधी वर्गात अस्वस्थ शांतता होती. सगळ्या मुली काहीतरी निश्चय करून ताठ आणि गप्प बसल्या होत्या. सरांनी वर्गात प्रवेश केल्याबरोबर तडफदार तेजस्विनी उभी राहिली आणि तिने सरांना विचारले, “नेहमी मुलेच जास्त प्रश्न विचारतात. आम्हालाही संधी हवी. आम्हा मुलींचा एक प्रश्न आहे. आज संकष्टी आहे. अनेक मुलींना घरी त्यांच्या आईनं सांगितलं, ‘तूही आता संकष्टी करायला लाग. उपवास केलेलं चांगलं असतं’.”
एवढ्यात मुलांच्या बाकावरून एका मुलाने फुसकुली सोडली, “व्याख्यान नको, प्रश्न विचारा.” तिकडे पूर्ण दुर्लक्ष करीत देशमुख सर मुलींकडे बघत म्हणाले, “मोकळेपणानं विचारा. तुम्हा मुलींचा काय प्रश्न आहे?”
फणकार्याने तेजस्विनीने विचारले, “उपवास म्हणजे काय? आणि मुलींनीच उपवास का करायचा?”
मुलांच्या बाकावरून एक तिरकस प्रतिक्रिया आलीच, “फालतू, बायकी प्रश्न.”
कधी नव्हे ते देशमुख सरांच्या चेहर्यावर राग उमटला. स्वतःला सावरत ते मुलांच्या बाकांकडे वळले आणि ठाम स्वरांत म्हणाले, “कोणताच प्रश्न फालतू आणि बायकी नसतो. आपण सारे मिळून या प्रश्नांची उत्तरे शोधू या. हं, मुलांपासून सुरुवात. पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोण देतंय? उपवास म्हणजे नेमकं काय?”
खाडकन सार्या मुलांचे चेहरे पडले. उपवास हा अगदी ओळखीचा शब्द. पण त्याचा अर्थ कुणालाच येत नव्हता. गंभीरपणे सर म्हणाले, “सोप्या वाटणार्या प्रश्नाचं उत्तर अनेकदा कठीण असतं.”
थोडे थांबून सर पुढे म्हणाले, “उपवास हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात काय काय विचार येतात ते तुम्ही मोकळेपणानं सांगा. कोणताही विचार फालतू किंवा बायकी नसतो हे लक्षात घ्या. मनात येईल ते मोकळेपणानं सांगायचं.”
वर्गातले वातावरण जरा हलके झाले. मुले-मुली सारे मिळून उत्स्फूर्तपणे बोलू लागले. ‘उपवास म्हणजे खिचडी, नवस म्हणून उपवास करायचा, उपवासानं देव प्रसन्न होतो, उपवास केलं तर माझं डोकं दुखतं, निर्जळी उपवास करणं फार कठीण असतं, वरीच्या तांदळाचा भात मला आवडत नाही, उपवास म्हणजे लंघन, उपवास म्हणजे व्रत. तो मोडला तर पाप लागतं, उपवास म्हणजे उपोषण’, अशी एक ना अनेक उत्तरे येऊ लागली.
सरांचा चेहरा खुलला. प्रसन्नपणे हसत ते म्हणाले, “छान. असं मोकळेपणानं बोलता आणि विचार करता आलं पाहिजे. कशाचाही दडपण मनावर घ्यायचं नाही. कुठल्या विचाराला किंवा प्रश्नाला नाव ठेवायची नाहीत. तुमच्यापैकी काही जणांनी उपवास म्हणजे उपोषण, लंघन असं सांगितलं. अशा शब्दांना आपण काय म्हणतो?”
मराठीवर प्रभुत्व असणारी मेधा पटकन म्हणाली, “समानार्थी शब्द!”
“अगदी बरोबर,” सर बोलू लागले, “समानार्थी शब्द म्हणजे एकच अर्थ असलेले शब्द. एका शब्दाला आपण दुसरा समानार्थी शब्द दिला तर त्यामुळे आपल्याला मूळ शब्दाचा अर्थ समजतोच असे नाही. मूळ शब्दाचा अर्थ नीट समजणं हे फार महत्त्वाचं असतं. उपास या शब्दाला ‘उपवास’ असंही म्हणतात हे तुम्हाला माहीत असेल. आता उपवास या शब्दाची फोड कोण करून सांगेल? मेधा सोडून दुसर्या कोणीतरी बोला.”
आमच्या वर्गातील लेखक, अमेय म्हणाला, “उपवास म्हणजे उप अधिक वास. इथे वास या शब्दाचा अर्थ राहाणे असा आहे हे मला माहीत आहे. पण येथे ‘उप’ या शब्दाचा नेमका अर्थ काय?”
“सर, ‘उप’ या शब्दाचा अर्थ हाताखालचा माणूस असा होतो का? म्हणजे मुख्याध्यापकाखाली उपमुख्याध्यापक असतात.” हुशार पण अबोल सायली पहिल्यांदाच आपणहून काही बोलली.
“तुझं म्हणणं बरोबर आहे. उप म्हणजे कनिष्ठ असा एक अर्थ आहे.” सर म्हणाले. “परंतु येथे ‘उप’ या शब्दाचा अर्थ जवळ असा आहे. उपवास या मूळ शब्दापासून पुढे उपास असा छोटा शब्द रूढ झाला असावा. आता उपासाला आपण काही कुठं जवळ जाऊन बसत नाही. मग उपास किंवा उपवास या शब्दाचा नेमका अर्थ काय? कोण सांगेल?”
“सर. तुम्हीच सांगा.” अनेक मुले एकदम उदगारली.
शांतपणे सर म्हणाले, “या वेळी सांगतो. पण सांगण्याआधी मला हा अर्थ कसा कळला तेही सांगतो. मलाही लहानपणी असाच प्रश्न पडला होता. माझ्या घरी माझी आई आणि आजी गुरुवारचा उपवास करायच्या. मी त्यांना विचारले, त्यांनाही उपवास या शब्दाचा नेमका अर्थ माहीत नव्हता. मग घरातील आणि शेजारपाजारच्या वडीलधार्यांना विचारले. उपवास सगळ्यांना माहीत होता, पण कोणालाच नेमका अर्थ सांगता आला नाही.
माझ्याकडे शब्दकोश होता. त्यामध्ये देखील उपोषण, लंघन असे समानार्थी शब्द दिले होते, ‘षरीींळपस’ हा इंग्रजी शब्दही दिला होता. पण तिथेही नेमका अर्थ मिळाला नाही. मग मी माझ्या संस्कृतच्या शिक्षकांना जाऊन विचारले. ते पूजा सांगायचेही काम करायचे. त्यांनी मला उपवास या शब्दाची फोड आणि अर्थ नीट समजावून सांगितला. तोच मी तुम्हाला सांगत आहे.”
‘उप + वास’ असे फळ्यावर लिहून देशमुख सर पुढे बोलू लागले, “इथं ’वास’ म्हणजे राहणे हे अमेयनं सांगितलं आहेच. येथे ‘उप’ या उपपदाचा अर्थ होतो ‘जवळ’. तेव्हा उपवास किंवा उपास म्हणजे जवळ बसणे. ‘कशाजवळ बसायचं आणि न जेवण्याचा किंवा उपवासाचे पदार्थ खाण्याचा मूळ अर्थाशी संबंध काय’ हे काही केल्या माझ्या लक्षात येत नव्हतं.”
“सर, तुम्हाला ते कुणी समजावून सांगितलं?” सदैव कुतूहल जागृत असलेल्या करणने विचारले.
आम्हाला समजावून सांगत सर सांगू लागले, “सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला गुरुजनांकडून मिळतातच असे नव्हे. आमच्या वेळी ‘गुगल’ देखील नव्हते. मग आम्ही मुलं काय करायचो? असे प्रश्न मनात साठवून ठेवायचो. मला वाचण्याची खूप आवड होती. काही वर्षांनी अचानक एका लेखात ‘न खाणे आणि जवळ बसणे’ यांची जोड कशी घालायची याचे स्पष्टीकरण मला मिळाले. तर ‘उपवास’ याचा अर्थ देवाच्या जवळ बसणे. आता आपण दिवसभर काही देवासमोर बसू शकत नाही. पण आपल्या मनात देव नेहमीच असू शकतो. मग उपवासाच्या दिवशी खाणं आणि इतर संसारी गोष्टीतलं लक्ष कमी करून सदैव देवाचं चिंतन करणं असा ‘उपास’ या शब्दाचा अर्थ बनला.”
“पण उपवास म्हटल्यावर आपल्याला साबुदाण्याची खिचडीच का आठवते?” आमच्या वर्गातील गोलमटोल गजेंद्र म्हणाला.
“याला खाण्याशिवाय काही सुचत नाही.” एक मुलगी फिसकारलीच.
सर सांगू लागले, “काही न खाता देवाचं चिंतन करीत वेळ व्यतीत करणं हे सहजासहजी जमणारं नाही. सुरुवातीला कोणतंही अन्न खाऊ नये असा नियम असावा. मग पाणी घेतलं तर चालेल, आजारी आणि म्हातार्या माणसांनी दूध आणि फळे घेतली तर चालतील अशी सूट देण्यात आली असेल. त्यानंतर उपास करताना जड, चटपटीत, मंदपणा आणणारे अन्न खाऊ नये असा नियम बनवला गेला असावा.”
“पण खिचडी तर जड असते म्हणतात. दणकून खाल्ल्यावर मस्त झोप येते. ती कशी चालते?” गजेंद्र खिचडीच्या बाहेर यायला तयार नव्हता.
सरांनी फळ्यावर, ‘उपासाला खिचडी का चालते?’ असा प्रश्न लिहिला आणि ते म्हणाले, “या प्रश्नाचं उत्तर मुलांनी शोधायचं आहे. जवळजवळ राहणार्या पाच-सहा मुलांचा एकेक गट तयार करा. प्रत्येक गटानं उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा. आपापसात चर्चा करा, कोणालाही विचारा, कितीही पुस्तके बघा किंवा ‘गुगल’ काकांनाही प्रश्न करा. बघू या, तुम्हाला या प्रश्नाची काय काय उत्तरं मिळतात.”
शेवटी तेजस्विनीकडे वळत सर म्हणाले, “तेजस्विनी, तुझ्यावर एक जबाबदारी सोपवतो. सर्व गटांची उत्तरे एकत्र करून एक सुटसुटीत उत्तर तयार कर. ते उत्तर तू मुक्त प्रश्नांच्या पुढच्या तासाला सुरुवातीस वाचून दाखव. त्यानंतर ‘फक्त मुलींनीच का उपवास करायचा’ या तुझ्या प्रश्नावर आपण चर्चा करू.”
सगळ्या वर्गावर नजर टाकत सर म्हणाले, “या महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार तुमच्यापैकी प्रत्येकानं करायचा आणि पुढच्या तासाला आपापलं मत मांडायचं.”